Maharashtra

Bhandara

CC/19/9

DADARAO BOMAJI INGOLE - Complainant(s)

Versus

HEMANT ZHAM MANAGER ,CHAIRMEN ZHAM BUILDING AND DEVELOPMENT PVT.LTD - Opp.Party(s)

ADV.P.M TEMBHURNIKAR

20 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/19/9
( Date of Filing : 15 Jan 2019 )
 
1. DADARAO BOMAJI INGOLE
PLOT NO.32 VAISHALI NAGAR KHAT ROAD BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. HEMANT ZHAM MANAGER ,CHAIRMEN ZHAM BUILDING AND DEVELOPMENT PVT.LTD
10 PRAYAWARN NAGAR SAMLAWADA VARDHA ROAD NAGPUR TAH JILHA NAGPUR
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:ADV.P.M TEMBHURNIKAR , Advocate
For the Opp. Party:
Dated : 20 Jan 2020
Final Order / Judgement

                      (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्‍या)

                                                                                      (पारीत दिनांक–20 जानेवारी, 2020)

01.    तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्ष बिल्‍डर कडून कराराप्रमाणे सदनीकेपोटी दिलेली एकूण आंशिक रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍यासाठी तसेच अन्‍य अनुषंगिक मागण्‍यासाठी  प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

      तक्रारकर्ता हा उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून तो शासकीय शिक्षण महाविद्दालयात प्राध्‍यापक पदावर नौकरी करतो. तर विरुध्‍दपक्ष हा झाम बिल्‍डर अॅन्‍ड डेव्‍हलपर्स प्रायव्‍हेट लिमिटेड या फर्मचे नावाने बांधकाम व्‍यवसाय करीत असून तो सदर फर्मचा संचालक/मालक आहे. विरुध्‍दपक्षाने नागपूर येथे कन्‍हैय्या सिटी फेज-1 ते 3 विकसित केले आणि कन्‍हैय्या सिटी फेज-4 ही निवासी ईमारत बांधण्‍याचे प्रस्‍तावित केले होते. तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्षाने त्‍याचेशी भंडारा येथे संपर्क साधून नागपूर येथे प्रस्‍तावित ईमारत व त्‍यातील सदनीकांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करुन विक्रीस उपलब्‍ध होतील असे आश्‍वासित केले होते. तक्रारकर्त्‍याला सुध्‍दा नागपूर येथे सदनीका विकत घ्‍यावयाची असल्‍याने त्‍याने विरुध्‍दपक्षाचे प्रस्‍तावित  मौजा वागधरा, तालुका-जिल्‍हा नागपूर येथील खसरा  क्रं-94, पटवारी हलका क्रं-46 वरील  कन्‍हैय्या फेज-4 या ईमारती मधील अविभक्‍त भूखंड-938.62 चौरसफूट हिश्‍श्‍यासह रोहाऊस क्रं-191, आर्कीड टु बीएचके, सुपर बिल्‍टअप बांधकाम-850 चौरसफूट अशा वर्णनाची मालमत्‍ता एकूण रुपये-13,11,170/- एवढया किमतीमध्‍ये विकत घेण्‍याचा स्‍टॅम्‍प पेपरवरील करार दिनांक-05 नोव्‍हेंबर, 2011 रोजी विरुध्‍दपक्ष मे.झाम बिल्‍डर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर या नोंदणीकृत फर्म आणि सदर फर्मचा व्‍यवस्‍थापकीय संचालक  श्री हेमंत झाम याचे सोबत केला. सदर करारावर उभय पक्षांच्‍या सहया असून दोन साक्षीदारांच्‍या सहया आहेत. तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, विरुध्‍दपक्षाने भंडारा येथे येऊन सदर प्रस्‍तावित बांधकाम ईमारत व त्‍यामधील सदनीका विक्रीची जाहिरात केलेली असल्‍याने तक्रारीचे कारण हे भंडारा जिल्‍हयाचे कार्यक्षेत्रात घडलेले असल्‍याने प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याचे अधिकार क्षेत्र हे मा.जिल्‍हा ग्राहक न्‍यायमंच, भंडारा यांना येते. सदर करारान्‍वये मालमत्‍तेच्‍या नोंदणीपोटी 20 टक्‍के रक्‍कम आणि उर्वरीत रक्‍कमा या बांधकामातील प्रगती नुसार टप्‍प्‍या-टप्प्‍याने विरुध्‍दपक्षाला अदा करावयाच्‍या होत्‍या.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-05 नोव्‍हेंबर, 2011 रोजीच्‍या करारापूर्वी त्‍याने विरुध्‍दपक्षास सदर रो-हाऊसचे सौदेपोटी आंशिक रकमा त्‍याचे स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया मुख्‍य शाखा भंडारा येथील शाखेतील बचतखाते क्रमांक-11244742148 मधील धनादेशाव्‍दारे दिल्‍या होत्‍या, त्‍या रकमा तक्रारकर्त्‍या कडून खालील प्रमाणे मिळाल्‍याचे करारात विरुध्‍दपक्षाने मान्‍य केलेले आहे, त्‍याचे विवरण खालील प्रमाणे-

अक्रं

धनादेश क्रमांक

पावती क्रमांक

पावती दिनांक

रक्‍कम

01

139895

3755

05/03/2011

11,000/-

02

139905

4503

28/06/2011

2,01,234/-

03

534874

5975

21/09/2011

50,000/-

 

 

एकूण आंशिक अदा केलेली रक्‍कम रुपये-

2,62,234/-

    तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, अशाप्रकारे त्‍याने उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे करारातील रोहाऊसचे सौदेपोटी आंशिक रक्‍कम एकूण रुपये-2,62,234/- विरुध्‍दपक्षास अदा केल्‍याची आणि विरुध्‍दपक्षाने करारा मध्‍ये सदर एकूण आंशिक रक्‍कम तक्रारकर्त्‍या कडून मिळाल्‍याची बाब मान्‍य केलेली असल्‍याने तसेच सदर करारा मध्‍ये विरुध्‍दपक्षाने त्‍याला करारातील  रो-हाऊसचे बांधकाम करुन योग्‍य त्‍या सोयी सुविधा पुरविण्‍याचे मान्‍य केलेले असल्‍याने तो विरुध्‍दपक्षाचा ग्राहक होतो. विरुध्‍दपक्षाने सदर करारान्‍वये बांधकामातील प्रगती नुसार शेवटच्‍या किस्‍तीची रक्‍कम मिळाल्‍या नंतर पंधरा दिवसाचे आत रजिस्‍टर नोंदणीकृत खरेदीखत तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून देण्‍याचे मान्‍य केले होते परंतु विरुध्‍दपक्ष हा नेमक्‍या कोणत्‍या तारखेस संपूर्ण बांधकाम करेल याचा उल्‍लेख त्‍याने करारा मध्‍ये केला नाही. मात्र विरुध्‍दपक्षाने करारातील रोहाऊसचे बांधकाम करार दिनांका पासून एक वर्षाचे आत पूर्ण होईल असे मौखीक आश्‍वासन त्‍याला दिले होते. तक्रारकर्ता हा भंडारा येथे नौकरीत असल्‍याने त्‍याने वेळोवेळी विरुध्‍दपक्षाशी दुरध्‍वनीव्‍दारे संपर्क साधून करारातील रो-हाऊसचे बांधकामा विषयी चौकशी केली असता विरुध्‍दपक्षाने बांधकाम सध्‍या संथगतीने सुरु असून तो निश्‍चीतच मुदतीत रो हाऊसचे विक्रीपत्र नोंदवून देईल असे वेळोवेळी त्‍याला आश्‍वस्‍त केले होते. शेवटी त्‍याने मे-2017 मध्‍ये नागपूर येथे प्रत्‍यक्ष मोक्‍यावर भेट देऊन बांधकामाची पाहणी केली असता करारातील प्रस्‍तावित कन्‍हैय्या फेज-4 चे कोणतेही बांधकाम आढळून न आल्‍याने त्‍याला प्रंचड धक्‍का बसला आणि विरुध्‍दपक्षाने खोटे बोलून त्‍याची फसवणूक केल्‍याचे लक्षात आले. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने त्‍याचे कडून करारातील मालमत्‍तेपोटी आंशिक रक्‍कम स्विकारुनही प्रत्‍यक्ष मोक्‍यावर कोणतेही बांधकाम सुरु केले नाही आणि त्‍याने मालमत्‍तेपोटी जमा केलेली आंशिक रक्‍कम विरुध्‍दपक्ष स्‍वतः वापरीत आहे. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली, त्‍यामुळे त्‍याचे आर्थिक नुकसान होत असून त्‍याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, म्‍हणून त्‍याने वकील श्री टेंभूर्णीकर यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्षाला दिनांक-08.06.2017 रोजीची कायदेशीर नोटीस रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविली असता सदर नोटीस विरुध्‍दपक्षाने न स्विकारल्‍यामुळे ती वकीलांचे पत्‍त्‍यावर परत आली. म्‍हणून शेवटी त्‍याने विरुध्‍दपक्षा विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

     तक्रारकर्त्‍याने करारातील सदनीकेपोटी विरुध्‍दपक्षाला दिलेली आंशिक रक्‍कम रुपये-2,62,234/- करार दिनांक-05.11.2011 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पोवतो द.सा.द.शे.18% व्‍याजासह परत करण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे.  विरुध्‍दपक्षाच्‍या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-25,000/- विरुध्‍दपक्षा कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे. या शिवाय योग्‍य ती दाद त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

03.   विरुध्‍दपक्ष हेमंत झाम, व्‍यवस्‍थापकीय संचालक, झाम बिल्‍डर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स याचे नावाने त्‍याचे 10-पर्यावरण नगर, सोमलवाडा, वर्धा रोड, नागपूर येथील पत्‍त्‍यावर ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली असता सदर नोटीस दिलेल्‍या पत्‍त्‍यावर कोणी राहत नाही, वापस-12/03/2019 या पोस्‍टाचे शे-यासह परत आली, सदर परत आलेले पॉकीट पान क्रं 35 वर दाखल आहे. त्‍यानंतर विरुध्‍दपक्षाचे नावे त्‍याचे कन्‍हैय्या हाईटस, बेसा घोगली रोड, बेसा, नागपूर या पत्‍त्‍यावर ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली असता सदर नोटीस व लिफाफा “Unclaimed, Return to Sender-19/07/2019 20/07/2019” या पोस्‍टाचे शे-यासह ग्राहक मंचात परत आली व सदर नोटीसचे पॉकीट अभिलेखावर पान क्रं 39 वर दाखल आहे. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाला ग्राहक मंचाची रजि.नोटीसची सुचना मिळूनही त्‍याने जाणूनबुजून सदर नोटीस स्विकारली नाही आणि तो ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाला नाही वा त्‍याने लेखी निवेदन दाखल केलेले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्षा विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश ग्राहक मंचाने दिनांक-16/10/2019 रोजी प्रकरणात पारीत केला.

04.   तक्रारकर्त्‍याने पान क्रं 13 वरील दस्‍तऐवज यादी नुसार एकूण-09 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने उभय पक्षांमध्‍ये सदनीका विक्री संबधाने झालेल्‍या कराराची प्रत, तक्रारकर्त्‍या कडून करारातील सदनीकेपोटी आंशिक रकमा मिळाल्‍या बाबत विरुध्‍दपक्षाने दिलेल्‍या पावत्‍यांच्‍या प्रती,  तक्रारकर्त्‍याचे स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया भंडारा मुख्‍य शाखेतील खाते                 उता-याची प्रत, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेल्‍या कायदेशीर नोटीसची प्रत, रजि. पोस्‍टाची पावती अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तसेच तक्रारकर्त्‍या तर्फे त्‍यांचे वकीलांनी पान क्रं-42 ते 45 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तक्रारकर्त्‍याने पुराव्‍या दाखल स्‍वतःचा प्रतिज्ञालेख पान क्रं -46 ते 49 वर दाखल केला.

05.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, त्‍याचा प्रतिज्ञालेख व लेखी युक्‍तीवाद तसेच त्‍याने प्रकरणात दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे ग्राहक मंचाव्‍दारे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले तसेच त्‍याचे तर्फे वकील श्री टेंभूर्णीकर यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकला असता ग्राहक न्‍यायमंचा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होऊन त्‍याचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहे-

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

01

तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष बिल्‍डर फर्म आणि तिचा व्‍यवस्‍थापकीय संचालक हेमंत झाम याचा ग्राहक होतो काय?

-होय-

02

वि.प. बांधकाम फर्म आणि तिचा व्‍यवस्‍थापकीय संचालक हेमंत झाम याने त.क.कडून करारातील सदनीकेपोटी आंशिक रक्‍कम स्विकारुनही प्रत्‍यक्ष मोक्‍यावर कोणतेही बांधकाम न करुन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन त.क.ला दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

03

काय आदेश

अंतिम आदेशा नुसार

                                                                                        ::निष्‍कर्ष::

मुद्दा क्रं-1 ते 3-

06.     तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष फर्म आणि तिचा व्‍यवस्‍थापकीय संचालक हेमंत झाम याचे सोबत सदनीकेच्‍या खरेदीपोटी केलेल्‍या कराराची प्रत अभिलेखावरील पान क्रं-14 ते 17 वर दाखल केली. सदर सदनीका कराराचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्‍याने तक्रारीमध्‍ये वर्णन केलेल्‍या विरुध्‍दपक्षाचे प्रस्‍तावित मौजा वागधरा, तालुका-जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रं-94, पटवारी हलका क्रं-46 वरील कन्‍हैय्या फेज-4 या ईमारती मधील अविभक्‍त हिश्‍श्‍यासह भूखंड-938.62 चौरसफूट रो-हाऊस क्रं 191, आर्कीड टु बीएचके, आणि सुपर बिल्‍टअप बांधकाम क्षेत्रफळ-850 चौरसफूट अशा वर्णनाची मालमत्‍ता एकूण रुपये-13,11,170/- एवढया किमतीमध्‍ये विकत घेण्‍याचा स्‍टॅम्‍प पेपरवरील करार दिनांक-05 नोव्‍हेंबर, 2011 रोजी विरुध्‍दपक्ष मे.झाम बिल्‍डर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर या नोंदणीकृत फर्म आणि सदर फर्मचा व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री हेमंत झाम याचे सोबत केल्‍याचे दिसून येते. सदर करारावर उभय पक्षांच्‍या सहया असून दोन साक्षीदारांच्‍या सहया आहेत. सदर करारा मध्‍ये तक्रारकर्त्‍या कडून करारातील सदनीकेपोटी धनादेश क्रमांक-139895 पावती क्रमांक-3755 पावती दिनांक- 05/03/2011 अन्‍वये रक्‍कम रुपये-11,000/- तसेच धनादेश क्रमांक-139905 पावती क्रमांक-4503, पावती दिनांक- 28/06/2011अन्‍वये रक्‍कम रुपये-2,01,234/- तसेच धनादेश क्रमांक- 534874 पावती क्रमांक-5975, पावती दिनांक-21.09.2011 अन्‍वये रक्‍कम रुपये-50,000/-अशी एकूण आंशिक रक्‍कम रुपये-2,62,234/- तक्रारकर्त्‍या कडून मिळाल्‍याची बाब विरुध्‍दपक्षाने मान्‍य केलेली आहे. या व्‍यतिरिक्‍त तक्रारकर्त्‍याने पुराव्‍या दाखल पान क्रं 18 व 19 वर विरुध्‍दपक्ष मे.झाम बिल्‍डर्स फर्म व्‍दारे निर्गमित पावत्‍यांच्‍या प्रती ज्‍याव्‍दारे रक्‍कम रुपये-11,000/- आणि रुपये-2,01,234/- अशा रकमा मिळाल्‍याचे पावत्‍याव्‍दारे मान्‍य केलेले आहे. या व्‍यतिरिक्‍त तक्रारकर्त्‍याने पान क्रं 20 ते 22 वर त्‍याचे स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया भंडारा येथील बॅंक खाते उता-याची प्रत दाखल केलेली असून त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष फर्मला तक्रारकर्त्‍याने दिलेले धनादेश वटून विरुध्‍दपक्ष झाम बिल्‍डर्सला सदर धनादेशाच्‍या रकमा मिळाल्‍याची बाब दिसून येते. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष फर्म आणि तिचा व्‍यवस्‍थापकीय संचालक हेमंत झाम याने तक्रारकर्त्‍या कडून सदनीकेच्‍या कराराचे नोंदणीपोटी आंशिक रक्‍कम स्विकारुन त्‍याला करारातील सदनीकेची विक्री करुन ताबा देण्‍याचे तसेच योग्‍य त्‍या सोयी सुविधा पुरविण्‍याची जबाबदारी स्विकारल्‍याने तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचा ग्राहक होतो आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

07. या व्‍यतिरिक्‍त तक्रारकर्त्‍याने पान क्रं-23 ते 26 वर विरुध्‍दपक्षाला पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, पान क्रं 27 व 29 वर विरुध्‍दपक्षाचे दोन वेगवेगळया पत्‍त्‍यावर रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेल्‍या नोटीस बाबत रजिस्‍टर पोस्‍टाच्‍या दोन पावत्‍या, पान क्रं 29 वर सदर नोटीस वि.प.ला मिळाल्‍याची रजि.पोच आणि पान क्रं 30 वर रजिस्‍टर पोस्‍टाचे परत आलेले पॉकीट पुराव्‍या दाखल सादर केलेले आहे. विरुध्‍दपक्षाला पाठविलेल्‍या कायदेशीर नोटीस मध्‍ये असे नमुद केलेले आहे की, तो भंडारा येथे सरकारी नौकरीत असल्‍याने त्‍याने वेळोवेळी विरुध्‍दपक्षाशी दुरध्‍वनीव्‍दारे संपर्क साधून करारातील रो-हाऊसचे बांधकामा विषयी चौकशी केली असता विरुध्‍दपक्षाने तो निश्‍चीतच एका वर्षाचे आत करारातील रो हाऊसची विक्री नोंदवून देईल असे वेळोवेळी त्‍याला आश्‍वस्‍त केले होते. शेवटी त्‍याने मे-2017 मध्‍ये नागपूर येथे प्रत्‍यक्ष मोक्‍यावर भेट देऊन बांधकामाची पाहणी केली असता करारातील प्रस्‍तावित कन्‍हैय्या फेज-4 चे कोणतेही बांधकाम तेथे आढळून न आल्‍याने करारातील सदनीकेच्‍या बुकींगपोटी विरुध्‍दपक्षाला आंशिक अदा केलेली रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याची नोटीसव्‍दारे मागणी केल्‍याचे दिसून येते.

08.   उभय पक्षां मधील सदनीका विक्रीचे कराराचे प्रतीवरुन विरुध्‍दपक्षाचा बिल्‍डरचा व्‍यवसाय असून ईमारत बांधून त्‍यातील सदनीका गरजू ग्राहकांना विक्री करुन त्‍यातून नफा कमाविण्‍याचा त्‍याचा उद्देश्‍य दिसून येतो. दिनांक-05 नोव्‍हेंबर, 2011 रोजीचे सदनीका विक्री करारामध्‍ये विरुध्‍दपक्षाने बांधकामातील प्रगती नुसार रकमा तक्रारकर्त्‍याने अदा कराव्‍यात असे करारात नमुद केले असून शेवटच्‍या किस्‍त अदा केल्‍या पासून पंधरा दिवसांचे आत विक्रीपत्र नोंदवून ताबा देण्‍याचे कराराव्‍दारे विरुध्‍दपक्षाने मान्‍य केलेले आहे.

09.  तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे उभय पक्षांमध्‍ये सदनीका विक्री बाबत करार झाल्‍या नंतर बराच कालावधी होऊन सुध्‍दा विरुध्‍दपक्षाने करारातील ईमारतीचे बांधकामच प्रत्‍यक्ष भूखंडावर सुरु केले नाही

10.   विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍या कडून करारा प्रमाणे सदनीकेची आंशिक एकूण रक्‍कम रुपये-2,62,234/- स्विकारुनही विहित मुदतीत ईमारतीचे कोणतेही बांधकाम केलेले नाही त्‍यामुळे करारा प्रमाणे बांधकामाचे प्रगती अनुसार पुढील रक्‍कमा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला देण्‍याचा कोणताही प्रश्‍नच उदभवत नाही. ईमारतीचे मोक्‍यावर प्रत्‍यक्ष बांधकामच सुरु झालेले नसल्‍याने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला कायदेशीर नोटीस पाठवूनही विरुध्‍दपक्षाने त्‍याला कोणताही प्रतिसाद दिला नाही वा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला करारातील सदनीकेपोटी जमा केलेली आंशिक रक्‍कम व्‍याजासह परत केलेली नाही.

11.   विरुध्‍दपक्षाला ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीसची सुचना मिळूनही त्‍याने ती नोटीस स्विकारली नाही व  तो ग्राहक मंचा समोर उपस्थित झाला नाही तसेच तक्रारकर्त्‍याने त्‍याचे विरुध्‍द केलेली विपरीत विधाने खोडून काढलेली नाहीत. हा सर्व घटनाक्रम पाहता विरुध्‍दपक्षाला प्रत्‍यक्ष्‍य मोक्‍यावर कोणतेही बांधकाम सुरु करावयाचे नसून तक्रारकर्त्‍याची रक्‍कम पचविण्‍याचा त्‍याचा  हेतू असल्‍याचे सकृतदर्शनी दिसून येतो, त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाची सदरची कृती अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब (Unfair Trade Practice)  असून तक्रारकर्त्‍याला दिलेली दोषपूर्ण (Deficiency in Service) सेवा ठरते. विरुध्‍दपक्षाचे अनुचित व्‍यापारी प्रथेमुळे तसेच दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला निश्‍चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

12.   सदर प्रकरणात हे न्‍यायमंच खालील नमुद मा.राष्‍ट्रीय आयोगाचे निवाडया वर आपली भिस्‍त ठेवीत आहे.                                  

    “Juliet V. Quadros-Versus-Mrs.Malti   Kumar & Ors.” - 2005(2) CPR-1 (NC).

          उपरोक्‍त मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाच्‍या निवाडया मध्‍ये असे नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करणारा विकासक कराराप्रमाणे भूखंडाचा कब्‍जा संबधित ग्राहकास देण्‍यास किंवा त्‍याने जमा केलेली रक्‍कम परत करण्‍यास असमर्थ ठरला तर तक्रार दाखल करण्‍यास सतत कारण (Continuous cause of action) घडत असते. मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात  पुढे असेही नमुद  केले  आहे की,  जर  भूखंडाचा  विकास  करण्‍यास विकासक/बांधकाम व्‍यवसायिक काही प्रयत्‍न करीत नसेल किंवा त्‍याठिकाणी कुठलेच बांधकाम होत नसेल तर खरेदीदारास मासिक हप्‍ते नियमित भरणे अपेक्षित नाही.

      उपरोक्‍त  निवाडयातील वस्‍तुस्थिती मंचाचे समोरील निवाडयास अंशतः लागू होते. सदर प्रकरणात सुध्‍दा विरुध्‍दपक्ष बिल्‍डींग फर्म आणि तिचे कार्यकारी संचालकाने विहित मुदतीत करारातील सदनीकेचे बांधकाम पूर्ण करुन विक्रीपत्र व  ताबा देण्‍याची जबाबदारी स्विकारलेली असतानाही प्रत्‍यक्ष मोक्‍यावरील भूखंडावर कोणतेही बांधकाम सुरु झाल्‍याचे दिसून न आल्‍याने विरुध्‍दपक्षाचे हेतू संबधी तक्रारकर्त्‍याला शंका निर्माण झाल्‍याने त्‍याने वेळोवेळी दुरध्‍वनीव्‍दारे चौकशी केली असता त्‍याला विरुध्‍दपक्षाने खोटी उत्‍तरे दिलीत आणि पुढे रजिस्‍टर पोस्‍टाने कायदेशीर नोटीस पाठविली परंतु नोटीसलाही उत्‍तर न मिळाल्‍याने तक्रारकर्त्‍याचे मनात विरुध्‍दपक्षाला करारातील सदनीकेपोटी आंशिक दिलेली रक्‍कम पचीत होईल की काय अशी भिती निर्माण होणे स्‍वाभाविक आहे तसेच विरुध्‍दपक्ष हा तक्रारकर्त्‍याने दिलेली रक्‍कम आज पर्यंत स्‍वतः करीता वापरीत असल्‍याची बाब संपूर्ण पुराव्‍यानिशी सिध्‍द झालेली असल्‍याने आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी आलेले असल्‍याने मुद्दा क्रं 3 अनुसार तक्रारकर्त्‍याची विरुध्‍दपक्ष फर्म आणि तिचा कार्यकारी संचालक याचे विरुध्‍दची तक्रार अंशतः मंजूर होण्‍यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे.

13.     विरुध्‍दपक्षाने करारातील सदनीके संबधात प्रत्‍यक्ष मोक्‍यावरील भूखंडावर प्रस्‍तावित ईमारतीचे कोणतेही बांधकामच सुरु केलेले नसल्‍याने तक्रारकर्त्‍याने करारातील सदनीकपेटी विरुध्‍दपक्षाकडे जमा केलेली एकूण आंशिक रक्‍कम व्‍याजासह मागणी केलेली आहे. उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थिती पाहता तक्रारकर्त्‍याला त्‍याने करारातील सदनीकेपोटी आंशिक जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-2,62,234/- विरुध्‍दपक्षाने परत करावी आणि सदर रकमेवर सदनीका विक्री करार केल्‍याचा दिनांक-05.11.2011 पासुन ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-14% दराने व्‍याज दयावे असे विरुध्‍दपक्षाला आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल तसेच तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित करणे योग्‍य न्‍यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे मत आहे.

14.     उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन  ग्राहक मंच प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                                                                                     :: अंतिम आदेश ::

01)   तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष मे. झाम बिल्‍डर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स फर्म आणि सदर फर्मचा व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री हेमंत झाम यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.

02विरुध्‍दपक्ष फर्म आणि तिचा व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री हेमंत झाम याने तक्रारकर्त्‍याकडून करारातील सदनीके पोटी स्विकारलेली आंशिक  एकूण रक्‍कम रुपये-2,62,234/- (अक्षरी रुपये दोन लक्ष बासष्‍ठ हजार दोनशे चौतीस फक्‍त)  तक्रारकर्त्‍यास परत करावी आणि सदर रकमेवर सदनीका विक्री करार दिनांक-05.11.2011 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.14%  दराने व्‍याज विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला दयावे.

03)   तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये- 20,000/- (अक्षरी रुपये विस हजार फक्‍त) आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास दयावेत.

04)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष मे.झाम बिल्‍डर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स नागपूर फर्म आणि सदर फर्मचा व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री हेमंत झाम याने निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विरुध्‍दपक्ष फर्म आणि तिचा व्‍यवस्‍थापकीय संचालक यांनी विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-02 प्रमाणे विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला परत करावयाची रक्‍कम रुपये-2,62,234/- सदनीका विक्री करार दिनांक-05.11.2011 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.18% दराने दंडनीय व्‍याजासह परत करण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्ष फर्म आणि तिचा व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री हेमंत झाम याची राहिल.  

         05)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्‍ध करुन दयावी.

        06)    तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्‍यास परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.