श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 13 जानेवारी, 2017)
तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारकर्त्याची संक्षिप्त तक्रार अशी आहे की,
1. वि.प.च्या मालकीचे भंडारा येथे ‘हेमंत सेलेबेशन’ नावाने मंगल कार्यालय असून लग्न व इतर कार्यक्रमासाठी सदर मंगल कार्यालय भाडयाने देण्याचा वि.प. व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याची मुलगी कु. नुपूर हिचे लग्न जुळल्यामुळे तक्रारकर्त्याने दि.25.12.2015 च्या लग्न कार्यासाठी रु.4,30,000/- मध्ये वि.प.चे मंगल कार्यालय बुक केले आणि वि.प.च्या मागणीप्रमाणे रु.1,00,000/- अॅडव्हान्स दिला. त्याबाबत वि.प.ने पावती क्र. 069 दि.17.06.2015 तक्रारकर्त्यास दिली.
लग्न जमल्यानंतर वराकडील मंडळी वधुपक्षाकडून अधिक मागणी करु लागले परंतू तक्रारकर्त्याने त्यास नकार दिल्याने आपसी बैठक होऊन दि.07.07.2015 रोजी सदर लग्न तोडण्यांत आले. तक्रारकर्त्याने वि.प.ला 08.07.2015 रोजी त्याबाबत फोनवरुन कळविले. त्यावेळी वि.प. राजस्थान फिरायला गेला असल्याने अॅडव्हान्सची पावती परत घेतल्यावरच कार्यालय रद्द समजण्यांत येईल असे तक्रारकर्त्यास कळविले.
दि.18.07.2015 रोजी तक्रारकर्त्याचे भाऊ मधुकर रोकडे यांनी मुळ पावती वि.प.ला त्याच्या कार्यालयात नेऊन दिल्यावर वि.प.ने दि.25.12.2015 चा कार्यक्रम रद्द झाल्याची नोंद त्याच्या बुकींग रजिस्टरमध्ये घेतली व अॅडव्हान्सची रक्कम रु.1,00,000/- आठ दहा दिवसांत परत देतो असे सांगितले. तक्रारकर्त्याचे भाऊदेखिल भंडारा येथील रहिवासी असल्याने आठ दहा दिवसांनी पैशासाठी येतो असे सांगून घरी परत आले.
त्यानंतर तक्रारकर्ता व त्याच्या भावाने वि.प.ला वेळोवेळी फोन करुन अॅडव्हान्स रकमेची मागणी केली परंतू काही ना काही कारण सांगून वि.प.ने पैसे परत देण्याचे टाळत राहिला आणि 24.11.2015 रोजी पैसे परत देण्यास नकार दिला.
तक्रारकर्त्याकडून पावती परत घेऊन आठ दहा दिवसांत अॅडव्हान्सची रक्कम परत करण्याचे आश्वासन देणे आणि प्रत्यक्षात ती परत न करणे ही सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे, म्हणून तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- वि.प.ने तक्रारकर्त्याकडून अॅडव्हान्स रकमेची पावती परत घेऊन न दिलेली रक्कम रु.1,00,000/- तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह परत करण्याचा वि.प.ला आदेश व्हावा.
- तक्रार खर्च वि.प.वर बसवावा.
तक्रारकर्त्याने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ वि.प.ने त्यास दिलेल्या पावतीची प्रत दाखल केलेली आहे.
2. वि.प.ने लेखी जवाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याने 24 व 25 डिसेंबरसाठी वि.प.चा हेमंत सेलिब्रेशन हॉल बुक केला होता व त्याबाबत तक्रारकर्त्याकडून रु.1,00,000/- अॅडव्हान्स मिळाल्यावर दि.17.06.2015 रोजी तक्रारीत नमूद पावती दिल्याचे वि.प.ने कबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, तक्रारकर्त्याने 24.11.2015 रोजी त्यांची भेट घेऊन मुलीचे लग्न तुटल्याचे सांगितले. भंडारा जिल्हा मंगल कार्यालय असोशिएशनचे नियमाप्रमाणे एक महिन्याचे अगोदर बुकींग रद्द केल्यामुळे तक्रारकर्त्याकडून दि.17.06.2015 रोजीची मुळ पावती घेऊन रु.1,00,000/- परत केले. पावतीची रक्कम परत केल्यामुळे सदर तक्रारीस कोणतेही कारण घडले नाही.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याचा भाऊ 18.07.2015 रोजी तक्रारकर्त्याकडे बुकींग रद्द करण्यासाठी आला नाही आणि पावती दिल्यावर पावती ठेवून घेऊन पैसे नेण्यासाठी आठ दहा दिवसांनी येण्यास वि.प.ने सांगितले नाही. तक्रारकर्ता स्वतः 24.11.2015 रोजी आला होता व तयांस रु.1,00,000/- परत केले आहेत.
तक्रारकर्त्याने वेळेवर बुकींग रद्द केल्यामुळे दि.24.12.2015 व 25.12.2015 रोजी वि.प.ला बुकींग मिळू न शकल्याने त्याचे रु.50,000/- चे आर्थिक नुकसान झाले आहे त्याची तक्रारकर्त्याने भरपाई करण्याचा तसेच खोटी तक्रार दाखल करुन वि.प.ला आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास दिल्याबाबत रु.25,000/- खर्च बसवून तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
3. सदर प्रकरणाच्या निर्णयासाठी खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ आले, त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
-कारणमिमांसा-
4. मुद्दा क्र. 1 बाबत – सदर प्रकरणात वि.प.ला रु.1,00,000/- अॅडव्हान्स दिल्याबाबतची पावती क्र. 069 दि.17.06.2015 ची प्रत तक्रारकर्त्याने दाखल केली असून ती वि.प.ला मान्य आहे. तक्रारकर्त्याने शपथपत्रावर कथन केले आहे की. दि.25.12.2015 रोजी ठरलेले त्याच्या मुलीचे लग्न 07.07.2015 रोजी आपसी सहमतीने तुटल्यामुळे तसे त्याने दि.08.07.2015 रोजी फोनवरुन वि.प.ला कळविले आणि बुकींग रद्द करण्याची विनंती केली. त्यावेळी वि.प. राजस्थानला फिरण्यासाठी गेला असल्याने मुळ अॅडव्हान्स पावती सादर केल्यावरच बुकींग रद्द करण्यांत येईल असे सांगितले. तक्रारकर्त्याचे भाऊ मधुकर रोकडे भंडारा येथे राहतात. त्यांनी दि.18.07.2015 तक्रारकर्त्यास मुळ पावती नेऊन दिल्यावर वि.प.ने बुकींग रजिस्टरमध्ये बुकींग रद्द केल्याची नोंद घेतली आणि पावती स्वतःजवळ ठेऊन घेतली व आठ दहा दिवसांनी येऊन पैसे घेऊन जाण्यास सांगितले. परंतू त्यानंतर वारंवार विनंती करुनही पैसे परत केले नाही. तक्रारकर्त्याबरोबर त्याचा भाऊ मधुकर रोकडे यांनीही शपथपत्राद्वारे तक्रारकर्त्याच्या म्हणण्याला पुष्टी दिली आहे.
याऊलट वि.प.चे म्हणणे असे की, तक्रारकर्ता किंवा त्याचा भाऊ मधुकर यांनी दि.08.07.2015 रोजी फोन केला नाही किंवा 18.07.2015 रोजी अॅडव्हान्स पावती सदर केली नाही. प्रत्यक्षात तक्रारकर्ता स्वतः 24.11.2015 रोजी वि.प.कडे आला व लग्न तुटल्याने बुकिंग रद्द करण्याची विनंती केली. भंडारा मंगल कार्यालय ओनर्स असोशिएशनच्या नियमाप्रमाणे कार्यक्रमाच्या एक महिना आधी बुकिंग रद्द केल्यास अॅडव्हान्स परत करण्यांत येते. म्हणून तक्रारकर्त्याकडून त्याचवेळी अॅडव्हान्स पावती घेऊन त्यास अॅडव्हान्सची रक्कम रु.1,00,000/- परत केली.
वि.प.ने तक्रारकर्त्याकडुन पावती क्र. 069 दि.17.06.2015 प्रमाणे रु.1,00,000/- बुकींग अॅडव्हान्स घेतल्याचे मान्य केले असून मुळ पावती घेऊन सदर रक्कम दि.24.11.2015 रोजी तक्रारकर्त्यास परत केल्याचे लेखी जवाबात तसेच शपथपत्रात कथन केले आहे. त्यामुळे वि.प.ने दि.24.11.2015 रोजी तक्रारकर्त्यास रु.1,00,000/- परत केल्याचे पुराव्यानिशी सिध्द करण्याची जबाबदारी वि.प.वर आहे. त्यासाठी वि.प.ला खालीलप्रमाणे दस्तऐवज दाखल करणे शक्य होते.
- दि.24.11.2015 रोजी बुकींग रद्द करुन तक्रारकर्त्यास रु.1,00,000/- परत केल्याबाबत बुकींग रजिस्टरमधील नोंद.
- रु.1,00,000/- परत मिळाल्याची तक्रारकर्त्याने लिहून दिलेली पावती.
- तक्रारकर्त्याने परत केलेल्या रु.1,00,000/- च्या अॅडव्हान्स पावतीवर सदर पावतीप्रमाणे दिलेली रक्कम परत मिळाल्याबाबत तक्रारकर्त्याच्या सहीसह पोच.
- वि.प.च्या हिशोब पुस्तकातील तक्रारकर्त्यास रु.1,00,000/- परत केल्याबाबतची नोंद.
वि.प.ने तक्रारकर्त्याकडून रु.1,00,000/- अॅडव्हान्स घेतला तेव्हा तक्रारकर्त्यास पावती दिलेली आहे. त्यामुळे एवढी मोठी रक्कम परत करतांना त्याबाबत लेखी स्वरुपात पोच (स्वतंत्र किंवा पावतीवर) न घेता विरुध्द पक्ष सदर रक्कम परत करील हे अशक्य आहे. तक्रारकर्त्यास अॅडव्हान्सची रक्कम रु.1,00,000/- दि.24.11.2015 रोजी परत केल्याबाबतचा कोणताही लेखी पुरावा वि.प.ने दाखल केला नसल्याने त्याने दि.24.11.2015 रोजी तक्रारकर्त्यास रु.1,00,000/- परत केले हे वि.प.चे तोंडी कथन खरे म्हणून स्विकारणे अशक्य आहे. म्हणून तक्रारकर्त्याच्या भावाकडून रु.1,00,000/- अॅडव्हान्सची मुळ पावती घेऊन तक्रारकर्त्यास सदर अॅडव्हान्सची रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊनही ती परत केली नाही हे तक्रारकर्त्याचे म्हणणे सिध्द होते. वि.प.ची सदर कृती निश्चितच ग्राहकाप्रती सेवेतील न्युनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणुन मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्षाप्रमाणे वि.प.ने तक्रारकर्त्यास अॅडव्हान्सची रक्कम रु.1,00,000/- आश्वासन देऊनही परत न केल्याने तक्रारकर्ता सदर रक्कम रु.1,00,000/- तक्रार दाखल दि.11.12.2015 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे म्हणून मुद्उ क्र. 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
- आ दे श -
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार वि.प.विरुध्द खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1) वि.प.ने तक्रारकर्त्यास रु.1,00,000/- तक्रार दाखल दिनांक 11.12.2015 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह द्यावे.
2) वि.प.ने तक्रारकर्त्यास शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाईदाखल रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्चादाखल रु.5,000/- द्यावे.
3) वि.प.ने सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी.
4) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.
5) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.