श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
* निकालपत्र*
दिनांक 19/10/2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. जाबदेणार सिव्हील कॉन्ट्रॅक्टर असून तक्रारदारांच्या घराचा पहिला मजला बांधण्यासंबंधात दिनांक 24/8/2008 रोजी तक्रारदार व जाबदेणार यांच्या करार झाला. 210 दिवसात काम पुर्ण करण्याचे जाबदेणार यांनी मान्य केले. सदरहू कामासाठी रुपये 80,000/- मोबदला ठरविण्यात आला होता. पैकी तक्रारदारांनी जाबदेणार यांना रुपये 65,000/- अदा केले. काही तांत्रिक अडचणी दाखवून जाबदेणार यांनी काम पुर्ण केले नाही, त्या जाबदेणार यांनी दुर करुन काम पुर्ण करावयास हवे होते. यासंबंधी तक्रारदारांनी वेळोवेळी जाबदेणारांकडे पाठपुरावा करुनही जाबदेणार यांनी पुर्तता केली नाही म्हणून सदरहू तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रुपये 65,000/- 10 टक्के व्याजासह परत मागतात, तसेच रुपये 20,000/- नुकसान भरपाई पोटी व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांबरोबर जाबदेणार यांनी करार केला नव्हता. परंतू तक्रारदारांकडून रुपये 65,000/- कामाच्या प्रगतीनुसार मिळाल्याचे जाबदेणार मान्य करतात. तक्रारदारांच्या घराचे काम करण्यासाठी आवश्यक कागदत्रांसंबंधितील तांत्रिक अडचणी दुर करण्याचे जाबदेणार यांनी मान्य केले नव्हते. तक्रारदारांनी जी कागदपत्रे दिलेली होती ती व शासनाकडील रेकॉर्ड मॅच होत नव्हते. तक्रारदारांनी sanction plan प्रमाणे sanction layout दिलेला नाही. जाबदेणारांनी लॅन्ड रेकॉर्ड पुणे मधून रेकॉर्ड मिळविले. बांधकामा संदर्भात कुठलाही करार झालेला नव्हता म्हणून तक्रार नामंजुर करावी अशी जाबदेणार मागणी करतात.
3. तक्रारदारांनी रिजॉईंडर दाखल करुन जाबदेणार यांचा लेखी जबाब नाकारला.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. जाबदेणार यांच्या दिनांक 24/8/2008 च्या पत्राचे मंचाने अवलोकन केले असता त्यात जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून त्यांच्या रो हाऊसमधील additions and alterations पोटी रुपये 20,000/- इनिशिअल पेमेंट मिळाल्याचे कबूल केले आहे. तसेच मोजणीचे काम, नवीन मोजणी नकाशा, क्लायंट/आर्किटेक्ट बरोबर नकाशा तयार करुन घेणे, पी.एम.सी ला प्लान सबमिट करणे, त्यांची मंजुरी घेणे, प्रत्यक्ष बांधकाम करणे, पी.एम.सी कडून पुर्णत्वाचा दाखला मिळविणे ही सर्व कामे 240 दिवसात पुर्ण करण्याचे मान्य केले होते. त्याच पत्रात शेवटी जाबदेणार यांनी “It is possible to save 30 days from the above schedule and complete work in 7 months” असे नमूद करुन सही केल्याचे दिसून येते. जाबदेणार यांनी लेखी जबाबात तक्रारदारांकडून रुपेय 65000/- मिळाल्याचे मान्यही केलेले आहे. परंतु कामाबाबत जाबदेणार यांनी काय प्रगती केली किंवा त्यासंबंधी काय पाठपुरावा केला, तक्रारदारांकडून काही पुर्तता व्हावयाची असल्यास त्यासंबंधी तक्रारदारांशी केलेला पाठपुरावा, याबाबतचा कोणताही पुरावा जाबदेणार यांनी मंचासमोर दाखल केलेला नाही. तक्रारदारांकडून रुपये 65,000/- मोबदला स्विकारुनही दिनांक 24/8/2008 च्या पत्रान्वये मान्य केलेली कामे जाबदेणार यांनी पुर्ण केलेली नाहीत, ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 65,000/- 9 टक्के व्याजासह दिनांक 9/11/2008 पासून संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांना जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटीमुळे निश्चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार, म्हणून नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतो-
:- आदेश :-
1. तक्रार मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 65,000/- 9 टक्के व्याजासह दिनांक 9/11/2008 पासून संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत परत करावी.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.