Maharashtra

Satara

CC/14/107

shri hanmant yashvnt jadhav - Complainant(s)

Versus

hem motor div pvt ltd - Opp.Party(s)

jagdale

26 Aug 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा.

          मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्‍य.

          मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

                          

                                                           तक्रार क्र. 107/2014.

                                                            तक्रार दाखल ता.8-8-2014.

                                                           तक्रार निकाली ता. 26-8-2015.

                                      

श्री.हणमंत यशवंत जाधव,

रा.जळगांव, ता.कोरेगांव,

जि.सातारा.                                 ....तक्रारदार.     

     

          विरुध्‍द

 

1. शाखा प्रबंधक,

   हेम मोटर्स डिव्‍हीजन प्रा.लि. (टाटा डिव्‍हीजन)

   ए-4/2, एम.आय.डी.सी.

   पुणे बेंगलोर हायवे, सातारा.

2. शाखा प्रबंधक,

   भारत अँटो सर्व्‍हीसेस,

   547/2, प्‍लॉट नं.1, कोल्‍हापूर रोड,

   सांगली 416 416.        

3. शाखा प्रबंधक,

   टाटा मोटर्स, एरिया ऑफिस,

   413-416 प्राईड सिलिकॉन प्‍लाझा,

   चौथा मजला, बी विंग, चतुःश्रुंगी मंदिराजवळ,

   सेनापती बापट, मार्ग पुणे 411 016.             .....  जाबदार.

                  तक्रारदारतर्फे अँड.विकास जगदाळे.    

                  जाबदार क्र.1   नो से आदेश.

                  जाबदार क्र.2  - अँड.विनय कुलकर्णी. 

                  जाबदार क्र.3  - एकतर्फा आदेश.                    

                                                न्‍यायनिर्णय

सदर न्‍यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य यांनी पारित केला.

1.     तक्रारदारांनी त्‍यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे जाबदारांनी दिलेल्‍या सदोष सेवेबाबत दाखल केलेली आहे. 

2.       तक्रारदारांचे तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे-

        तक्रारदार हे मौजे जळगांव, ता.कोरेगोव, जि.सातारा येथील रहिवासी आहेत.  ते पेशाने व्‍यापारी आहेत.  त्‍यांनी त्‍यांचे स्‍वतःचे उपभोगासाठी यातील जाबदार क्र.1 कडून दि.30-8-2002 रोजी टाटा सफारी जी एक्‍स-4712, बी.एस.4 ही गाडी खरेदी केली जिचा रजिस्‍ट्रेशन नंबर MH-11-BH 1001  असा होता.  या विषयांकित वाहनाचा वॉरंटी/गॅरंटी कालावधी दोन वर्षे किंवा एक लाख किलोमीटर असा होता.  दि.1-2-2014 रोजी सातारा ते कोल्‍हापूर असा विषयांकित वाहन प्रवास करीत असताना पेठ नाका इस्‍लामपूर येथे गाडीत अचानक बिघाड होऊन गाडी गरम होऊन बंद पडली.  ब-याच प्रयत्‍नांनी सुध्‍दा विषयांकित वाहन चालू झाले नाही, त्‍यामुळे तक्रारदारानी जाबदार क्र.3 यांच्‍या कस्‍टमर केअर युनिटला फोन केला तेव्‍हा त्‍यांनी विषयांकित वाहन यातील जाबदार क्र.2 भारत अँटो सर्व्‍हीसेस, सांगली यांचेकडे नेण्‍यास सांगितले.   त्‍याप्रमाणे सदरचे वाहन जाबदार क्र.2 यांचेकडे नेले असता त्‍यानी गाडीचा टाईमिंग बेल्‍ट खराब झालेचे सांगितले.  याप्रमाणे जाबदार क्र.2 यांनी तो बदलला.  त्‍यावेळी ऑईल फिल्‍टर, डिझेल फिल्‍टर व सर्व्‍हीसिंग करणेत आले.  त्‍यावेळी टाईमिंग बेल्‍ट सोडून इतर सर्व बिल तक्रारदारानी जाबदार क्र.2 चे मागणीप्रमाणे त्‍यांना अदा केले व तयार दुरुस्‍त गाडी घेऊन निघाले असता गाडीमध्‍ये पुन्‍हा दोष आढळून आला, त्‍यावेळी जाबदार क्र.2 चे मॅकेनिक यांनी सांगितले की, गाडीचे नोझल खराब झालेले आहे, ते त्‍यांचेकडे दुरुस्‍त होऊ शकत नाही, ते तक्रारदारानी सातारा येथील त्‍यांच्‍या डिलरकडे जाऊन दुरुस्‍त करुन घ्‍यावे असे जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारास सांगितले.   त्‍याप्रमाणे तक्रारदार हे सदरचे वाहन घेऊन दि.20-3-2014 रोजी जाबदार क्र.1 यांना भेटले.  जाबदार क्र.1 यानी गाडीची संपूर्ण तपासणी केली त्‍यावेळी जाबदार क्र.1 यानी गाडीचे सर्व्‍हीस बुक स्‍वतःजवळ ठेवून घेतले व एक रिसीट तक्रारदाराना दिली व वाहन दुरुस्‍तीसाठी त्‍यांचेकडे ठेवून घेतले.  त्‍यानंतर तक्रारदाराने वारंवार जाबदार क्र.1 कडे वाहन दुरुस्‍त झाले किंवा कसे याबाबत चौकशी करीत राहिले परंतु आज या उद्या या, या उत्‍तरापलिकडे जाबदार क्र.1 यांनी काहीही सांगितले नाही, त्‍यानंतरचे भेटीत जाबदार क्र.1च्‍या वर्कशॉप इनचार्ज यांनी सांगितले की, पिस्‍टन जाम झाले आहे आणि पूर्ण मशीन ब्‍लॉक णले आहे व संपूर्ण मशीनचे काम करावे लागेल व त्‍याचा पूर्ण खर्च त्‍यांना करावा लागेल.  जरी गाडीचा वॉरंटी पिरीयड असला तरी तुम्‍ही 15,000 कि.मी.चे सर्व्‍हीसिंग वेळेवर केलेले नाही.  सदर गाडीचे वेळेवर सर्व्‍हीसिंग न केल्‍याने गाडीचे काम निघाले आहे व पूर्वी गाडीचा मेंटेनन्‍स भारत ऑटो सर्व्‍हीसिंग सांगली येथे (जाबदार क्र.2) केले असल्‍याने त्‍यांचेकडे वाहन घेऊन जा.  तक्रारदारानी त्‍यास नकार दिला.  अशा प्रकारे जाबदार क्र.1 या गाडीच्‍या अधिकृत विक्रेत्‍यानी त्‍यांचे वर्कशॉप इनचार्जने तक्रारदार-ग्राहकास द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली तेव्‍हापासून जाबदार क्र.1 यांचेकडे विषयांकित वाहन पडून आहे.  त्‍यानंतर तक्रारदारांनी दि.27-3-2014 रोजी जाबदार क्र.1 यांना नोटीस पाठविली.  अशा प्रकारे एकूण दोन वेळा नोटीसा जाबदाराना तक्रारदारानी पाठविल्‍या परंतु या नोटीसीला जाबदारांनी कोणतेही उत्‍तर दिले नाही व सेवेत त्रुटी केली आहे त्‍यामुळे तक्रारदारानी मे.मंचात तक्रार दाखल करुन जाबदार क्र.1 ते 3 यांना दोषी धरुन सदोष सेवा दिल्‍याचे घोषित करावे, विषयांकित गाडीचे बदल्‍यात विषयांकित गाडीच्‍या समान श्रेणीतील गाडी द्यावी, तक्रारदारांचे व्‍यावसायिक नुकसानीपोटी प्रतिमहा रु.36,000/- दि.27-3-2014 पासून द्यावे, तक्रारअर्जाचा खर्च रु.20,000/- व शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- जाबदार क्र.1 ते 3 यांचेकडून मिळावेत अशी विनंती मे.मंचास तक्रारदारांनी केली आहे. 

 

3.     तक्रारदाराने नि.1 कडे तक्रारअर्ज, त्‍याचे पृष्‍टयर्थ नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे तक्रारदारातर्फे वकीलपत्र, नि.5 कडे पुराव्‍याची एकूण 6 कागदपत्रे, नि.19 कडे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.22 कडे मूळ तक्रार व पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र हाच लेखी व तोंडी युक्‍तीवाद समजावा अशी पुरसीस इ.कागदपत्रे दाखल केली आहेत. 

 

4.        सदर प्रकरणाच्‍या नोटीसा जाबदार क्र.1 ते 3 याना मे.मंचातर्फे रजि.पोस्‍टाने पाठवणेत आल्‍या.  सदर नोटीसा जाबदाराना मिळाल्‍या, त्‍याप्रमाणे सदर प्रकरणातील जाबदार क्र.1 हे त्‍यांचे वकीलांतर्फे नि.9 कडे वकीलपत्र दाखल करुन प्रकरणी हजर झाले.  यातील जाबदार क्र.2 यानी नि.14 कडे दाखल वकीलपत्राने हजर झाले व त्‍यानी त्‍यांचे म्‍हणणे नि.12 कडे व त्‍यासोबत म्‍हणण्‍याचे पृष्‍टयर्थ नि.13 कडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.  त्‍याचप्रमाणे जाबदार क्र.2 यानी नि.15 कडे पुराव्‍याची एकूण 8 कागदपत्रे दाखल केलेली आहेत व जाबदार क्र.1 यानी त्‍यांचा युक्‍तीवाद नि.23 सोबत व नि.24 कडे प्रकरणी दाखल केला आहे. 

       प्रस्‍तुत जाबदार क्र.1 यानी प्रकरणी हजर होऊनही मुदतीत म्‍हणणे दाखल केले नाही म्‍हणून मे.मंचाने त्‍यांचेविरुध्‍द नि.1 वर दि.3-11-2014 रोजी नो से आदेश पारित केला आहे.  तसेच जाबदार क्र.3 हे मे.मंचात हजर झाले नाहीत किंवा त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणेही प्रकरणी दाखल केलेले नाही त्‍यामुळे जाबदार क्र.3 विरुध्‍द मंचाने दि.29-9-2014 रोजी एकतर्फा आदेश पारित केला आहे.  त्‍यामुळे प्रकरण जाबदार क्र.2 ची कैफियत व त्‍यानी दाखल केलेले पुराव्‍याचे कागदपत्र व जाबदार क्र.1 यांचा युक्‍तीवाद यांचा विचार करुन प्रकरण निकालासाठी ठेवणेत आले. 

5.        सदर प्रकरणातील तक्रारदारांचा तक्रारअर्ज, त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुराव्‍याची दाखल कागदपत्रे, पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र व जाबदार क्र.1 चा युक्‍तीवाद, जाबदार क्र.2 चे म्‍हणणे व त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुराव्‍याची दाखल कागदपत्रे व त्‍यांचे आक्षेप यांचा विचार करता सदर प्रकरणाचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्यांचा विचार केला-

अ.क्र.        मुद्दा                                              निष्‍कर्ष

 1.   प्रस्‍तुत तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक आहे काय?                 होय.

 2.  जाबदार क्र.1 व 3 यानी विषयांकित वाहनाचे विक्रीपश्‍चात

     सेवेबाबत तक्रारदारांना सदोष सेवा दिली आहे काय?                 नाही. 

 3. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या विषयांकित वाहनामध्‍ये उत्‍पादन दोष

    (Manufacturing Defect)होता हे पुराव्‍यानिशी शाबित केले आहे काय?     नाही.

 4.  अंतिम आदेश काय?                                       तक्रार नामंजूर.     6.                  कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 4-

 

         प्रस्‍तुत तक्रारदार हे मौजे जळगांव, ता.कोरेगांव, जि.सातारा येथील रहिवासी असून त्‍यानी जाबदार क्र.1 कडून दि.30-8-2012 रोजी MH-11-BH-1001 या आर.टी.ओ.रजिस्‍ट्रेशनची टाटा सफारी जी-एक्‍स 4712 पी.एस.4 या मॉडेलची गाडी त्‍यांच्‍या वैयक्तिक वापरासाठी खरेदी केली होती ही बाब प्रकरणी नि.5 सोबत दाखल असलेल्‍या नि.5/12 चे स्‍मार्टकार्डवरुन व नि.5/4 कडील वाहन खरेदीच्‍या रोखीच्‍या पावत्‍यावरुन दिसून येते व यातील जाबदार क्र.1 हे विषयांकित वाहनाचे- जाबदार क्र.3 चे अधिकृत विकेते असून संबंधित ग्राहकास टाटा कंपनीची वरील प्रकारची वाहने व वाहन विक्रीनंतरची सेवा ते संबंधित वाहन खरेदीदारास पुरवणेचा व्‍यवसाय जाबदार करतात, त्‍यामुळे याठिकाणी उभयतामध्‍ये सेवा घेणारा व सेवा पुरवठादार असे नाते अस्तित्‍वात आहे त्‍यामुळे तक्रारदार हा या जाबदार क्र.1 चा ग्राहक आहे हे निर्विवादरित्‍या शाबित होते त्‍यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देतो. 

6.1-       प्रस्‍तुत तक्रारदाराची मुख्‍य तक्रार पहाता तक्रारदाराचे कथनाप्रमाणे विषयांकित  वाहनामध्‍ये निर्मितीदोष होता.  दि.1-2-2014 रोजी विषयांकित वाहनातून प्रवास करीत असता सदर वाहन पेठ नाका येथे आले असता गाडीत अचानक बिघाड होऊन गाडी गरम होऊन बंद पडली व बराच प्रयत्‍न करुनही चालू शकली नाही, त्‍यामुळे तक्रारदारानी संबंधित वाहनाचे कस्‍टमर केअरला फोन केला तेव्‍हा जाबदार क्र.3 यानी विषयांकित नादुरुस्‍त वाहन भारत अँटो सर्व्‍हीसेस सांगली- जाबदार क्र.2 येथे नेणेस सांगितले व त्‍याठिकाणी तक्रारदार वाहन दुरुस्‍तीस घेऊन गेलेवर जाबदार क्र.3 यानी विषयांकित वाहन दुरुस्‍त करुन दिले त्‍यावेळी विषयांकित वाहनाचा टायमिंग बेल्‍ट बदलणेत आला.  ऑईल, फिल्‍टर, डिझेल फिल्‍टर करुन वाहनाचे सर्व्‍हीसिंग करणेत आले, त्‍यामध्‍ये टायमिंग बेल्‍ट वगळता इतर कामाचे बिल प्रस्‍तुत तक्रारदाराकडून जाबदार क्र.2 यानी घेतले.  या दुरुस्‍तीनंतरही पुन्‍हा गाडीमध्‍ये प्रवास करीत असताना दोष आढळून आला व पुन्‍हा जाबदार क्र.2 यानी विषयांकित वाहन तपासले असता गाडीचे नोझल खराब झालेचे त्‍यानी सांगितले.  "ते आमचेकडून दुरुस्‍तच होऊ शकत नाही त्‍यामुळे मूळ सातारा डिलरकडूनच तुम्‍ही ते दुरुस्‍त करुन घ्‍या असे सांगितले" या कथनाबाबत पुरावा नाही त्‍यामुळे तक्रारदाराने विषयांकित वाहन डिलरकडे दुरुस्‍तीसाठी दिले असता त्‍याना वर्कशॉप इनचार्जने सांगितले की कंपनीने दिलेल्‍या शेडयूलप्रमाणे तक्रारदारानी वेळोवेळी सर्व्‍हीसिंग केले नाही त्‍यामुळे गाडीचे काम निघाले.  भारत अँटो सर्व्हिसिंग सांगली यांचेकडे तक्रारदारानी काम केलेने त्‍यांचे चुकीने गाडीचे काम निघाले आहे व गाडीचे पिस्‍टन जाम होऊन संपूर्ण मशीन ब्‍लॉक झाले आहे त्‍याचा खर्च करावा लागेल.  या सर्व बाबी पहाता तक्रारदाराना वरील कामाच्‍या दुरुस्‍तीसाठी रक्‍कम रु.1,77,198/- इतक्‍या खर्चात तक्रारदाराची वाहन दुरुस्‍ती करुन देणेस हे जाबदार तयार आहेत व वाहनामध्‍ये निर्माण झालेले दोष हे तक्रारदारांकडून सदर वाहनामध्‍ये मॅन्‍युअलप्रमाणे वेळोवेळी सर्व्‍हीसिंग न केल्‍याने निर्माण झालेले आहेत.  उदा.वेळोवेळी स‍र्व्‍हीसिंग, ऑईल चेंज, ग्रिसिंग इ.केलेले नाही, त्‍यामुळे सदर वाहनामधील दोषास जाबदार जबाबदार नाहीत.  त्‍याचप्रमाणे यातील जाबदार क्र.2 यांचे नि.22 कडील लेखी म्‍हणणे, त्‍याचेपृष्‍टयर्थ नि.13 चे प्रतिज्ञापत्र पाहिले असता वरील बाबी या ख-या असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  कारण जाबदार क्र.2 हे जाबदार क्र.3 चे अधिकृत सर्व्हिसिंग सेंटर असून तक्रारदारांचे वाहन खरेदीनंतर 16 महिन्‍यांनी गाडी बंद पडल्‍यावर त्‍याची दुरुस्‍ती जाबदार क्र.2 यानी केली असून सदर जाबदार क्र.2 यानी वॉरंटी काळामध्‍ये जी कामे करणे आवश्‍यक होते ती करुन दिलेली आहेत व ज्‍या पार्टसची वॉरंटी संपलेली आहे त्‍याचे बिल तक्रारदाराकडून घेतले असून ते त्‍यांनी दिले आहे, त्‍याचप्रमाणे injuctor related noojel चे कामाचा खर्च रु.50,000/- येईल परंतु तो पार्ट बदलल्‍यास व दुरुस्‍ती करणेस तक्रारदाराने नकार देऊन बाकीचे कामाबाबत तक्रारदाराचे समाधान झालेबाबत त्‍यानी त्‍यांची सही नि.15/3 चे प्रकरणी दाखल जॉबकार्डवर केलेली आहे, त्‍यामुळे नोझल बदली दुरुस्‍तीसाठी जाबदार क्र.1 कडे जाणेचा सल्‍ला जाबदार क्र.2 यानी तक्रारदाराना दिला.  हे तक्रारदाराचे कथन आम्‍हांस रचनात्‍मक, खोटे व मूळ प्रकरणातील वस्‍तुस्थिती लपवणारे असल्‍याचे आम्‍हांस वाटते. जाबदार क्र.2 चे वरील नाकारलेले कथन तक्रारदारानी पुराव्‍यानिशी शाबित केलेले नसलेचे स्‍पष्‍ट होते.  नि.5/1, पान 23 वरील पावत्‍यांचे अवलोकन करता यातील तक्रारदारानी सदरचे वाहन दि.30-8-2012 रोजी जाबदार क्र.1 कडून खरेदी केलेचे दिसते.  सदर वाहनाचे उत्‍पादन हे मे 2012 चे असून विषयांकित वाहन आर.टी.ओ.साताराकडे दि.4-10-2012 रोजी रजिस्‍टर करणेत आले तेव्‍हापासून विषयांकित वाहन तक्रारदारांचे वापरात होते ते दि.1-2-2014 अखेर अचानक बंद पडण्‍याच्‍या तारखेपर्यंत एकूण 15 ते 16 महिने तक्रारदाराचे ताब्‍यात वापरात होते व त्‍यांचा वरील कालावधीचा एकूण वापर 40,371 कि.मी इतका झाला होता. 

अ) या प्रवासादरम्‍यान विषयांकित गाडीचा प्रवास 40371 कि.मी.इतका झालेला होता. 

ब) तक्रारदाराने विषयांकित वाहनास दोन वर्षे किंवा एक लाख कि.मी.असा वॉरंटी/गॅरंटी पिरीयड होता हे दाखविणारा कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही व याबाबत वाहनासोबतचे मॅन्‍युअल या प्रकरणी दाखल केलेले नाही.  

क)  दि.30-8-2012 पासून दि.1-2-2014 अखेर सदर प्रकरणातील विषयांकित वाहन हे विनातक्रार चाललेले आहे, या दरम्‍यान 15 ते 16 महिन्‍यामध्‍ये विषयांकित वाहनामध्‍ये बिघाडाबाबत कोणतीही तक्रार तक्रारदाराची नाही. 

ड)  तक्रारदारानी वाहन कंपनीच्‍या दिलेल्‍या मार्गदर्शनाप्रमाणे दिले वेळी विषयांकित वाहनाचे सर्व्‍हीसिंग केले होते हे दाखवणारा निर्णायक पुरावा मंचात दाखल केलेला  नाही, केवळ तक्रारदाराचे कथन की, त्‍यानी विषयांकित वाहन मॅन्‍युअलप्रमाणे सर्व्‍हीसिंग वेळोवेळी केलेले आहे.  याबाबत तक्रारदाराचे कथनाशिवाय अन्‍य पुरावा मंचात तक्रारदारानी दाखल केलेला नाही.

इ)   वाहन खरेदीपासून 15000 कि.मी.पर्यंत कि.मी. झालेवर त्‍यांचे वेळेत सर्व्हिसिंग केले होते हे दाखवणारा पुरावा तक्रारदारानी मंचात सादर केलेला नाही. 

फ)   जर तक्रारदाराचे विषयांकित वाहनामध्‍ये वाहन र्नि‍मिती दोष (Manufacturing Defect) होता तर त्‍या वाहनाचे मान्‍यताप्राप्‍त वर्कशॉपमधून तपासणी करुन त्‍यातील निर्मिती दोषाबाबत त्‍याचा तज्ञांचा अहवाल मंचात दाखल केलेला नाही. 

       एकूणच तक्रारदारानी त्‍यांच्‍या विषयांकित वाहनाचे बाबतीत त्‍यामध्‍ये वाहन निर्माण करतेवेळी सदोष पार्टस हो‍ते किंवा वाहनात दोष होता हे ठोस व अधिकृत पुराव्‍याने शाबित केलेले नाही व दि.1-2-2012 रोजी विषयांकित वाहनामध्‍ये जाबदार क्र.2 यानी करुन दिलेल्‍या दुरुस्‍तीचे स्‍वरुप पहाता ते वाहनातील निर्मिती दोषामुळे निर्माण झालेले आहेत असे म्‍हणण्‍यास कोणताच आधार नाही.  केवळ तक्रारदाराचे कथन हे संबधित विषयाचा पुरावा होऊ शकत नाही.    सदर प्रकरणी जाबदारांनी विषयांकित वाहनाचे विक्रीपश्‍चात तक्रारदाराना द्यावयाच्‍या सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही.  तक्रारदाराना सदोष सेवा दिलेली नसल्‍याचे पूर्णतः शाबीत होते.  प्रस्‍तुत जाबदारानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 Procedure on admission of complaint मधील पान क्र.665 वरील केसलॉ स्‍वराज माझदा लि. विरुध्‍द पी.के.चक्‍कपोरे, सी.पी.जे.(2)2005 पान 72 (एन.सी.)या केसचा आधार घेतला असून त्‍यामध्‍ये मा.वरिष्‍ठ न्‍यायालयानी असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे की, तक्रारदारानी त्‍यांचे तक्रारीत विषयांकित वाहनामध्‍ये (Manufacturing Defect) असेल तर तो ठोस पुराव्‍यानिशी संबंधित तज्ञाच्‍या कमिशन अहवालाद्वारे काटेकोरपणे सिध्‍द करणे आवश्‍यक असते.  केवळ वाहनाच्‍या उत्‍पादनाचे वेळी विषयांकित वाहनामध्‍ये दोष होता व त्‍यामुळे ते गाडीचा वापर चालू असताना 17 ते 18 महिन्‍यानी सदर कारणाने बंद पडले असे केवळ लिहीण्‍याने व या प्रकारच्‍या तक्रारीतील कथनाने वरील बाब शाबित होत नाही.  तक्रारीतील कथन म्‍हणजे पुरावा नव्‍हे.  तक्रारदारानी त्‍यांच्‍या विषयांकित वाहनामध्‍ये वाहन निर्मितीचे वेळी उत्‍पादन दोष होता हे पुराव्‍यानिशी शाबित केलेले नाही, त्‍यामुळे जाबदारानी तक्रारदाराना कोणतीही सदोष सेवा दिली नसलेचे सिध्‍द होते व तक्रारदारानी त्‍यांच्‍या विषयांकित वाहनामध्‍ये उत्‍पादनदोष (Manufacturing Defect) होता हे ठोस योग्‍य त्‍या वाहनतज्ञाकडून तपासून तसा अहवाल मंचात दाखल केलेला नाही व निर्णायक पुराव्‍यानिशी शाबीत केलेले नाही, त्‍यामुळे सदरची तक्रार नामंजूर करणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे त्‍यामुळे मुद्दा क्र.2, 3 व 4 यांचे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देतो. 

7.      वरील कारणमीमांसा व विवेचन याना अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात-

                                आदेश

1.    तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत येते.

2.  प्रस्‍तुत जाबदारानी तक्रारदारांना वाहनाच्‍या विक्रीपश्‍चात द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये     कोणतीही त्रुटी केलेली नाही, त्‍यांना सदोष सेवा दिलेली नाही असे घोषित करणेत      येते. 

3.    सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

4.    प्रस्‍तुत न्‍यायनिर्णयाच्‍या प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य देण्‍यात याव्‍यात.

 

ठिकाण- सातारा.

दि. 26–8-2015.

 

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

     

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.