Maharashtra

Satara

CC/13/77

PRAVIN RAMESH DHUMAL - Complainant(s)

Versus

HEM MOTARS DIVIJION - Opp.Party(s)

28 Sep 2015

ORDER

 

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा.

          मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्‍य.

          मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

                        

                                                                तक्रार क्र. 77/2013.

                                                              तक्रार दाखल ता.6-5-2013.

                                                             तक्रार निकाली ता.28-9-2015.                                     

श्री.प्रविण रमेश ढमाळ,  

रा.मु.पो.आसवली, ता.खंडाळा,

जि.सातारा.                                                                   ....तक्रारदार.         

          विरुध्‍द

1. हेम मोटर्स डिव्‍हीजन प्रा.लि.

  टाटा मोटर्स व फियाटचे अधिकृत विक्रेते,

  अ/2/अ, जुनी एम.आय.डी.सी.

  पुणे बेंगलोर हायवे, सातारा 415 004.

2. रॉयल सुंदरम अलायन्‍स इन्‍शु.कं.लि.

   साकार, दुसरा मजला, अँक्‍सीस बँकेचे वर

   सी.टी.एस.क्र.10030, अदालत रोड,

   औरंगाबाद.                          .....  जाबदार.

 

                     तक्रारदारतर्फे अँड.व्‍ही.एस.बर्गे.   

                    जाबदार 1 तर्फे अँड.व्‍ही.डी.निकम.

                    जाबदार 2 तर्फे- अँड.एस.बी.गोवेकर                   

                                                न्‍यायनिर्णय

सदर न्‍यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य यांनी पारित केला.                                                

1.     तक्रारदारानी त्‍यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे जाबदारानी दिलेल्‍या सदोष सेवेबाबत दाखल केलेली आहे. 

2.       तक्रारदारांचे तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे-

        तक्रारदार हा मु.पो.आसवली, ता.खंडाळा, जि.सातारा येथील रहिवासी असून उदरनिर्वाहाचे साधन म्‍हणून व्‍यवसायासाठी टाटा इंडिका 2 LS BJ-2     गाडी क्र. MH-11-AL-9932 ची गाडी जाबदार क्र.1 कडून दि.24-10-2011 रोजी खरेदी केली होती.   सदर वाहनावर टाटा फायनान्‍स कंपनीचे रु.3,92,000/-चे कर्ज तक्रारदारानी घेतले होते.  याचा दरमहा हप्‍ता रु.10,909/-चा होता.   तक्रारदारांनी वरील नमूद खरेदी वाहन आर.टी.ओ.कडे पासिंग करुन निरंजन टूर्स अँड ट्रॅव्‍हल्‍स या नावाने प्रवासी वाहतूक व्‍यवसाय सुरु केला होता.  वरील विषयांकित वाहनाचा विमा जाबदार क्र.2 कडे उतरविला असून विषयांकित वाहनाचा वैध विमा कालावधी दि.24-10-2011 ते दि.23-10-2012 असा होता.  या विषयांकित वाहनाचा अपघात दि.13-9-2012 रोजी खंडाळा येथे झाला.  त्‍यामध्‍ये विषयांकित वाहनाचे नुकसान झाले.  या अपघाताची माहिती तक्रारदाराने जाबदार क्र.2 याना तत्‍काळ दिली.  त्‍यांनी दुरुस्‍तीसाठी अपघातग्रस्‍त वाहन जाबदार क्र.1 कडे जमा करणेस सांगितले.   सदर वाहन अपघातामध्‍ये मनुष्‍यहानी न झाल्‍याने यातील तक्रारदाराने पोलिस स्‍टेशनला वाहन अपघाताची फिर्याद दिली नाही.  विषयांकित अपघातग्रस्‍त वाहन दि.14-9-2012 ला जाबदार क्र.2 चे सूचनेप्रमाणे जाबदार क्र.1 कडे दुरुस्‍तीसाठी जमा केले.  जाबदार क्र.1 चे मॅकेनिकल विभागाचे मॅनेजर यानी गाडीची संपूर्ण तपासणी करुन गेटवर गाडीची नोंद करुन जाबदार क्र.1 यांचे मॅनेजरनी ताब्‍यात घेतली व दोन महिन्‍यात वाहन दुरुस्‍ती करुन देतो असे सांगितले.  त्‍यानंतरचे आठ दिवसामध्‍ये यातील तक्रारदारानी सर्व कागदपत्रांची पूर्तता जाबदार क्र.1 चे मॅनेजरकडे केली.  दोन महिन्‍यानंतर गाडीच्‍या दुरुस्‍तीबाबत जाबदार क्र.1 कडे चौकशी केली असता जाबदारानी उडवाउडवीची उत्‍तरे दिली.  "गाडीचे पार्टस मिळाले नाहीत, मागणी केली आहे, कंपनीकडून पार्टस् आल्‍यावर गाडीला घातले जातील.  पंधरा दिवसात गाडीची दुरुस्‍ती करुन देतो" असे जाबदारानी तक्रारदाराना सांगितले.  त्‍याप्रमाणे तक्रारदारानी पुन्‍हा गाडीची चौकशी केली असता जाबदारानी सांगितले की, तक्रारदारांची गाडी दुरुस्‍त झाली आहे परंतु इन्‍शुरन्‍सची कागदपत्रे चुकीची झाली असल्‍याने तक्रारदारांचा विमा क्‍लेम मंजूर होणार नाही, त्‍यानंतर तक्रारदार जाबदार क्र.2 याना समक्ष भेटले.  वाहन अपघात नुकसानीबाबत विचारणा केली, त्‍यावेळी जाबदार क्र.2 यानी तक्रारदारांचा विमा दावा मंजूर होईल, त्‍यास कोणतीही अडचण नाही असे सांगितले.  त्‍यामुळे तक्रारदाराने दुरुस्‍त गाडीची मागणी पुन्‍हा जाबदार क्र.1 कडे केली असता गाडी दुरुस्‍त असूनही ती देणेस तक्रारदारानी नकार दिला व तेवहापासून जाबदार क्र.1 यानी दुरुस्‍त गाडी दुरुस्‍तीच्‍या नावाखाली त्‍यांचेकडेच ठेवून अद्याप तक्रारदाराना परत केलेली नाही.  त्‍यामुळे तक्रारदारांचे उत्‍पन्‍नावर परिणाम झाला.  वाहनाअभावी दररोजचे उत्‍पन्‍न बुडाले, उत्‍पन्‍नाअभावी त्‍याना गाडीचे कर्जाचे हप्‍ते भरता आले नाहीत, त्‍यामुळे जाबदार क्र.1 यांचे सदोष सेवेमुळे झालेल्‍या नुकसानीमुळे जाबदार क्र.1 यानी वकीलांतर्फे नोटीस पाठवली व वाहन दुरुस्‍त करुन विमा कंपनीचा विमा क्‍लेम पूर्ण करुन व वाहनाअभावी झालेले नुकसान जाबदारानी देणेबाबत मागणी केली.    जाबदार क्र.1 यानी तक्रारदारांच्‍या वकील नोटीसीस उत्‍तर दिले नाही वा वकीलांमार्फत पाठविलेल्‍या नोटीसीतील मागणीची पूर्तता केली नाही व विषयांकित वाहनही ताब्‍यात दिले नाही.  त्‍यामुळे जाबदार क्र.1 यानी तक्रारदाराना द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केलेमुळे तक्रारदारानी मंचात तक्रार दाखल करुन दाद मागितली आहे.   प्रस्‍तुत जाबदार क्र.1 यानी विषयांकित वाहनाचे दुरुस्‍तीसाठी आलेला खर्च रु.1,79,955/-पैकी जाबदार क्र.2 यानी रु.1,13,962/- एवढा क्‍लेम मंजूर केलेला आहे त्‍यामुळे जाबदारांचा वाहन दुरुस्‍तीसाठी दाखवलेला अवाजवी खर्च व जाबदार क्र.1 यानी मंजूर केलेला अत्‍यल्‍प नुकसानी क्‍लेम या बाबी तक्रारदारांना मान्‍य व कबूल नाहीत.  त्‍यामुळे तक्रारदारांचे वाहन दुरुस्‍त होऊन मिळावे, त्‍याचा होणारा संपूर्ण खर्च जाबदार क्र.2 यानी द्यावा, वाहन तत्‍काळ दुरुस्‍त करुन न दिल्‍याने तक्रारदारांचे झालेले नुकसान रु.2,50,000/- त्‍यावर द.सा.द.शे.15 टक्‍के व्‍याज अर्जाचे निकालापर्यंत होणारे वाहन उत्‍पन्‍नाचे नुकसान रु.35,000/-, अर्जाचा खर्च रु.5,000/- जाबदाराकडून मिळावेत अशी मागणी मे.मंचास तक्रारदारानी केली आहे. 

2.      तक्रारदाराने नि.1 कडे तक्रारअर्ज, त्‍याचे पृष्‍टयर्थ नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 कडे वकीलपत्र, नि.6 कडे पुराव्‍याचे एकूण 6 कागदपत्रे, नि.22 कडे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.24/1 कडील पॅनकार्डची झेरॉक्‍स, नि.27 कडील लेखी युक्‍तीवाद, नि.34 सोबत नि.35 कडे राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडील न्‍यायनिर्णय इ.कागदपत्रे दाखल केली आहेत. 

 

3.      सदर कामाची नोटीस जाबदार क्र.1 व 2 यांना मंचातर्फे रजि.पोस्‍टाने पाठवणेत आली, ती जाबदार क्र.1 याना मिळाली.  त्‍याची पोस्‍टाची पोहोचपावती प्रकरणी नि.8 कडे आहे. त्‍याचप्रमाणे जाबदार क्र.1 त्‍यांचे विधिज्ञ अँड.विनोद निकम यांचेतर्फे नि.10 कडे वकीलपत्र दाखल करुन हजर झाले व सदर प्रकरणी नि.21 कडील वकीलपत्राने जाबदार क्र.2 हे त्‍यांचे विधिज्ञ अँड.सुधीर गोवेकर यांचेतर्फे हजर झाले. 

 

4.      जाबदार क्र.1 यानी त्‍यांची कैफियत नि.12 कडे व त्‍याचेपृष्‍टयर्थ नि.13 कडे प्रतिज्ञापत्र प्रकरणी दाखल केले असून नि.14 कडे तक्रारदाराचे वाहनाचे दुरुस्‍तीचे बिल पुराव्‍यासाठी प्रकरणी दाखल केले आहे व नि.25 कडे प्रकरणी जाबदार क्र.1 यानी दाखल केलेले म्‍हणणे व पुरावा हाच लेखी युक्‍तीवाद समजावा अशी पुरसीस दाखल केली आहे.  यातील तक्रारदारानी अर्जदारांचे तक्रारीस खालीलप्रमाणे आक्षेप घेतलेले आहेत. 

   अर्जदार हा विषयांकित वाहनाचा उपयोग व्‍यापारी तत्‍वावर व्‍यवसायासाठी करीत होता, त्‍यामुळे ग्राहक कायद्यातील तरतुदीनुसार तो जाबदाराचा ग्राहक होत नाही.  गाडीला झालेला अपघात मान्‍य असून या जाबदार क्र.1 ने अर्जदाराचे विषयांकित अपघातग्रस्‍त वाहन दि.23-2-2013 रोजी दुरुस्‍त करुन त्‍याचे बिल रु.1,70,880/- करुन जाबदार क्र.2 कडे मंजुरीसाठी जाबदार क्र.1 यानी दाखल केले होते.  ती जबाबदारी जाबदार क्र.2 यानी स्विकारुन अपघातग्रस्‍त वाहनाचे दुरुस्‍तीबिल अद्याप जाबदार क्र.1 याना दिले नाही त्‍यामुळे दुरुस्‍त वाहन अर्जदाराला जाबदारानी दिले नाही.   जाबदार क्र.1 चे माहितीप्रमाणे जाबदार क्र.2 ने विषयांकित वाहनाचे दुरुस्‍ती बिलापोटी रु.1,13,962/- इतकी रक्‍कम मंजूर केलेचे समजले आहे व अर्जदाराचे अपघातग्रस्‍त वाहन जाबदार क्र.2 चे सूचनेप्रमाणे जाबदार क्र.2 यानी वाहन दुरुस्‍ती करावी असे सांगितलेमुळे अर्जदारांचे विषयांकित वाहन जाबदार क्र.1 यांनी दुरुस्‍त केले होते.  वाहनाचा उपयोग अर्जदार हा ट्रॅव्‍हल व्‍यवसायासाठी करीत असलेने त्‍याचे शॉपअँक्‍टचे लायसन्‍स अर्जदाराने न दिल्‍याने किंवा नसल्‍यास त्‍याबाबतचा ग्रामपंचायतीचा दाखला सादर करणेस सांगितले होते, तो न केल्‍याने जादबार क्र.2 ने त्‍यांचा क्‍लेम मंजूर केलेचे अद्याप कळविले नाही, त्‍यामुळे यामध्‍ये जाबदार क्र.1 यांची कोणतीही सेवेत त्रुटी नसल्‍याने अर्जदारांची तक्रार फेटाळावी असे कथन केले आहे. 

5.      प्रस्‍तुत अर्जदारांचा तक्रारअर्ज, नि.6 कडील पुराव्‍याची कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र, नि.6/1 ची वकीलामार्फत जाबदार क्र.1 ला दिलेली नोटीस व त्‍यातील कथनांचा आशय त्‍याचप्रमाणे जाबदार क्र.1 यानी प्रकरणी दाखल केलेली कैफियत व त्‍याचे पृष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र, जाबदार क्र.2 ची कैफियत, प्रतिज्ञापत्र व पुराव्‍याची कागदपत्रे व त्‍यातील कथनांचा आशय व आक्षेपांचा विचार करता सदर प्रकरणाचे न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात-

अ.क्र.       मुद्दा                                               निष्‍कर्ष

 1. प्रस्‍तुत अर्जदार हा जाबदार क्र.1 व 2 यांचा ग्राहक आहे काय?          होय.

 2. यातील जाबदार क्र.2 यानी अर्जदाराना त्‍यांच्‍या अपघातग्रस्‍त

    वाहनाची नुकसानी वेळेत न देऊन व त्‍यामुळे दुरुस्‍त

    झालेले वाहन अर्जदारास मिळणेसाठी 2 वर्षे

    वंचित ठेवून अर्जदाराना सदोष सेवादिली

    आहे काय?                                                                                       होय.

 3. यातील जाबदार क्र.1 यानी अर्जदारांना त्‍यांचे दुरुस्‍त वाहन

    अर्जदाराना न देऊन अर्जदाराना सदोष सेवा दिली आहे काय?          नाही.

 4. जाबदार क्र.2 हे जाबदार क्र.1 यांचे वाहन दुरुस्‍तीचे संपूर्ण खर्चाचे

    बिल अदा करणेस जबाबदार आहेत काय?                                             होय.

 5. अंतिम आदेश काय?                                   तक्रार अंशतः मंजूर.

 

6.                कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 5-

      अर्जदाराने त्‍यांचे व कुटुंबाचे उदरनिर्वाहासाठी उत्‍पन्‍नाचे साधन म्‍हणून व्‍यवसायासाठी टाटा इंडिका V/2, SLBJ 3 ही डिझेल कार याचा आर.टी.ओ.रजि.नं.MH-11-AL-9932 ही जाबदार क्र.1 यांचेकडून दि.24-10-2011 रोजी खरेदी केली व त्‍यासाठी टाटा फायनान्‍स या कंपनीकडून रु.3,92,000/- (रु.तीन लाख ब्‍याण्‍णव हजार मात्र) कर्ज घेऊन वरील विषयांकित वाहन खरेदी केले.  या एकुलत्‍या एक वाहनाद्वारे निरंजन टूर्स अँड ट्रॅव्‍हल्‍स या नावाने अर्जदाराने वाहतुकीचा व्‍यवसाय सुरु केला.  यातील जाबदार क्र.1 यांचा व्‍यवसाय पहाता ते विषयांकित  वरील वाहनाचे कंपनीचे अधिकृत विक्रेते असून वाहन खरेदीनंतर वाहनधारकास जाबदार क्र.1 हे विक्रीपश्‍चात सेवा देतात.  या व्‍यवहारावरुन प्रस्‍तुत अर्जदार हा जादबार क्र.1 यांचा ग्राहक असल्‍याचे निर्विवादरित्‍या शाबित होते.  यातील जाबदार क्र.2 हे वाहनाधारकाना त्‍यांचे वाहनाचे प्रकारानुसार वाहनाच्‍या आग, चोरी, अपघाती नुकसान अशा व अन्‍य प्रकारे होणा-या नुकसानीबाबत वाहनाची संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्‍यानी निर्धारित केलेले प्रिमियम आकारुन वाहनाचे नुकसान भरुन देणे अशा प्रकारचे संरक्षण पुरवणेचा जाबदार क्र.2 व्‍यवसाय करतात, त्‍यास अनुसरुन प्रस्‍तुत अर्जदाराने यातील जाबदार क्र.2 यांचेकडून विषयांकित वाहनास विमा संरक्षण घेतले होते.  त्‍याचा पॉलिसी क्र. VPV0081931000100 असून सदर पॉलिसी संरक्षणाचा वैध कालावधी 24-10-2011 ते 23-10-2012  असा होता.  या विमा पॉलिसीद्वारे विषयांकित वाहनाची निर्धारित बाजारभावानुसार विम्‍यासाठी किंमत रु.3,72,259/- इतकी निर्धारित केलेली असून या विमा सेवा संरक्षणापोटी अर्जदारानी जाबदार क्र.2 याना रक्‍कम रु.20,703/- (रु.वीस हजार सातशे तीन मात्र)प्रिमियम अदा केलेला आहे.  या व्‍यवहारावरुन व नि.32/1 च्‍या कागदोपत्री पुराव्‍यावरुन अर्जदार हा जाबदार क्र.2 यांचा ग्राहक असल्‍याचे निर्विवादरित्‍या शाबित होते, त्‍यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देतो. 

6.1 -    प्रस्‍तुत जाबदाराना तक्रारदारांचे विषयांकित वाहनाचा झालेला अपघात मान्‍य आहे.  त्‍यांच्‍या सूचनेप्रमाणे त्‍यावेळी तक्रारदारानी वाहनास झालेल्‍या अपघाताची कल्‍पना जाबदार जाबदार 2 विमा कंपनीला दिली त्‍यावेळी विमा कंपनीने वाहन दुरुस्‍तीसाठी जाबदार क्र.1 यांच्‍याकडे लावणेस सांगितले, त्‍याप्रमाणे सदर तक्रारदारानी विषयांकित अपघातग्रस्‍त वाहन जाबदार 1 यांच्‍याकडे जमा केले.  जाबदार 1 यांनी तक्रारदारांचे विषयांकित वाहन दुरुस्‍त केले व त्‍या दुरुस्‍तीचे एकूण बिल रु.1,70,880/- इतके झाले व त्‍या बिलाची मागणी जाबदार 1 यांनी जाबदार 2 यांच्‍याकडे केली.  त्‍यावेळी जाबदार क्र.2 यांना विषयांकित वाहनाच्‍या नुकसानभरपाईपोटी रु.1,13,965/- इतका क्‍लेम मंजूर केला, परंतु जाबदार क्र.1 यांना वरील रक्‍कम मान्‍य नसल्‍यामुळे त्‍यांना वाहनावर दुरुस्‍तीसाठी खर्च झालेली रक्‍कम रु.1,70,880/- ही पूर्ण मिळणे आवश्‍यक होते व तशी त्‍यांची मागणी होती.  या कारणास्‍तव वाहनाच्‍या दुरुस्‍तीनंतर दुरुस्‍तीचे होणारे बिल यातील तक्रारदार किंवा जाबदार क्र.2 या वाहनाच्‍या विमा कंपनीपैकी कोणीही अदा करावी म्‍हणजे तक्रारदारांना त्‍यांचे विषयांकित अपघातग्रस्‍त वाहन दुरुस्‍त झाले असल्‍यामुळे त्‍यांच्‍या ताब्‍यात देता येईल अशी जाबदार क्र.1 ची भूमिका होती.  प्रत्‍यक्षात दुरुस्‍ती खर्चापेक्षा जाबदार 2 यांनी अत्‍यंत कमी क्‍लेम वाहन नुकसानीचा मंजूर केल्‍यामुळे प्रस्‍तुत जाबदार क्र.1 यांनी तकारदाराना वाहन परत केले नाही.  वाहनाबाबत वरील वस्‍तुस्थिती पहाता सदर जाबदार क्र.1 यांची भूमिका आम्‍हांस योग्‍य व बरोबर वाटते.  जोपर्यंत दुरुस्‍त वाहनाचे पैसे जाबदार क्र.2 किंवा तक्रारदार हे पूर्णपणे अदा करीत नाहीत तोपर्यंत दुरुस्‍त झालेले वाहन तक्रारदाराचे ताब्‍यात देता येणार नाही.  वरील स्थितीमध्‍ये जाबदार क्र.1 यांनी त्‍यांच्‍या भूमिकेशी सुसंगत वर्तन केले असल्‍यामुळे ते त्‍यांच्‍या व्‍यवसायाला धरुन व कायद्याला धरुन असल्‍यामुळे जाबदार क्र.1 यांनी वरील वस्‍तुस्थितीमध्‍ये तक्रारदाराना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  त्‍यामुळे मुद्दा क्र.3 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देतो.  जाबदार क्र.2 यांनी तक्रारदाराच्‍या विषयांकित चारचाकी वाहनासाठी दिलेल्‍या पॉलिसीचे अवलोकन केले असता ती नि.32/1 कडे आहे.  त्‍यामध्‍ये तक्रारदारानी त्‍यांच्‍या विषयांकित वाहनासाठी झालेल्‍या अपघातासाठी (own damage) योग्‍य संपूर्ण तो प्रिमियम भरुन पॉलिसी घेतल्‍याचे दिसून येते.  या अनुषंगाने तक्रारदाराचे वाहनास अपघात झाल्‍यानंतर त्‍यांचा विमा क्‍लेम देणेचे वेळी प्रस्‍तुत तक्रारदारानी नि.32/12 कडील दाखल केलेल्‍या विमा दावा फॉर्म प्रमाणे कंपनीकडे सर्व कागदपत्रे जोडून अपघात नुकसानभरपाई मागणी केली होती हे दिसून येते परंतु नि.32/4 चे पत्राने प्रस्‍तुत जाबदारानी मागितलेल्‍या पॅनकार्डची प्रत जाबदार क्र.2 याना दिली होती.  ही बाब नि.32/5 अ कडे दाखल असलेल्‍या आर.पी.ए.डी.पोस्‍टाचे रिसीटवरुन स्‍पष्‍ट होते म्‍हणजे तक्रारदारानी विषयांकित वाहनाच्‍या अपघाताचा क्‍लेम सर्व कागदपत्रासह जाबदार क्र.2 कडे सादर केला होता हे स्‍पष्‍ट होते व त्‍याप्रमाणे जाबदार क्र.2 यानी दिलेल्‍या सूचनेप्रमाणे तक्रारदारानी जाबदार क्र.1 कडे वाहन दुरुस्‍तीसाठी लावल्‍यानंतर त्‍याचे होणारे संपूर्ण बिल जाबदार क्र.1 याना अदा करणेची जबाबदारी जाबदार क्र.2 यांची होती परंतु ती त्‍यांनी व्‍यवस्थित पार पाडलेली नाही.  जाबदार क्र.1 यांनी प्रकरणी दाखल केलेल्‍या विषयांकित वाहनाच्‍या दुरुस्‍तीचे टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस पाहिले असता त्‍यामध्‍ये घातलेले स्‍पेअरपार्टस व त्‍यांची बाजारमूल्‍याप्रमाणे असणारी किंमत नमूद करुन त्‍यावर होणारा व्‍हॅट टॅक्‍स इ.सह  रु.1,70,880/- इतके वाहनाचे दुरुस्‍तीचे बिल दिलेले आहे.  सदर टॅक्‍स इन्‍व्‍हॉईसचे तपशीलवार निरीक्षण केल्‍यावर असे स्‍पष्‍ट दिसते की, जाबदार क्र.1 यानी घेतलेले लेबर चार्जेस व बाजारमूल्‍याप्रमाणे आकारणी केलेले वापरलेल्‍या मशीन पार्टसचे बिल आम्‍हांस योग्‍य वाटते व असे एकूण बिल रु.1,70,880/- जाबदार क्र.2 यानी जाबदार क्र.1 यांना अदा करणे आवश्‍यक होते ते अदा करणेची जाणीवपूर्वक टाळाटाळ करुन त्‍यानी विषयांकित अपघातग्रस्‍त वाहनासाठी फक्‍त रु.1,13,962/- इतकी रक्‍कम मंजूर केली आहे.  सदरची रक्‍कम जाबदार क्र.2 यानी नि.32/3 कडे दाखल असलेल्‍या सर्व्‍हेअर श्री.नवले यांच्‍या रिपोर्टवरुन घेतलेली आहे परंतु आम्‍हांस या सर्व्‍हे रिपोर्टचे तपशीलवार अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये दिलेल्‍या विश्‍लेषणास हा मंच सहमत होऊ शकत  नाही.  नि.32/3 कडील नवले यांच्‍या सर्व्‍हे रिपोर्टमधील बाबीच्‍या सिध्‍दतेसाठी सर्व्‍हेअर श्री.नवले यांचे प्रतिज्ञापत्र या प्रकरणी पुरावा म्‍हणून दाखल नाही, त्‍यामुळे जाबदार क्र.2 यानी सदरचा सर्व्‍हे रिपोर्ट  पुराव्‍यानिशी सिध्‍द केलेला नाही.  सर्व्‍हे रिपोर्टमधील कथन व नोंदी हा भारतीय पुराव्‍याच्‍या कथनानुसार पुराव्‍याचे सिध्‍दतेच्‍या संकल्‍पनेमध्‍ये बसत  नाही.  आमच्‍या मते विषयांकित वाहनाच्‍या नुकसानभरपाईपोटी विमा कंपनीतर्फे सादर होणारा सर्व्‍हे रिपोर्ट हा अंतिम नसतो किंवा तो मंचाने प्रमाणभूत धरावा व असे कायद्यातील तरतूद सांगत नाही.  याउलट जाबदार क्र.1 यांनी प्रकरणी नि.14/1 कडे दाखल केलेल्‍या विषयांकित वाहनाच्‍या दुरुस्‍तीचे टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस बिल संपूर्णतः योग्‍य व पारदर्शी रक्‍कम आकारणी करुन केल्‍याचे आमच्‍या निरीक्षणात आम्‍हांस आढळून आले व ते योग्‍य आहे, त्‍यामुळे जाबदार क्र.2 हे जाबदार क्र.1 यांचे वाहन दुरुस्‍ती खर्चाचे संपूर्ण बिल अदा करणेस जबाबदार आहेत या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही येत आहोत.  त्‍यामुळे मुद्दा क्र.4 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देतो. 

      वरील सर्व वस्‍तुस्थिती पाहिली असता प्रस्‍तुत जाबदार क्र.1 यांनी मागितलेली वाहन दुरुस्‍ती बिल  रक्‍कम रु.1,70,880/- जाबदार क्र.2 यांनी जाबदार क्र.1 यांना त्‍वरीत अदा न केल्‍यामुळे व ते थातुरमातूर कारणे देऊन लांबवल्‍याने प्रस्‍तुत तक्रारदारानी त्‍यांचे दि.23-2-2013 रोजी दुरुस्‍त झालेले वाहन जाबदार क्र.2 यांच्‍या वेळकाढूपणामुळे निष्‍काळजीपणामुळे जाबदार क्र.1 यांच्‍या योग्‍य आकारणी केलेल्‍या दुरुस्‍तीचे बिल न दिल्‍यामुळे तकारदाराना वाहनाच्‍या उपभोगापासून वंचित रहावे लागले.   त्‍यामुळे त्‍यांच्‍या स्‍वचरितार्थाचा व्‍यवसाय बुडाला व उत्‍पन्‍नाचे नुकसान झाले.  या सर्व बाबी जाबदार क्र.2च्‍या सेवेतील गंभीर स्‍वरुपाच्‍या त्रुटी असल्‍याचे आमचे स्‍पष्‍ट मत आहे, त्‍यामुळे सदर प्रकरणी तक्रारदाराच्‍या अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या दुरुस्‍तीचे संपूर्ण बिल रु.1,70,880/- जाबदार क्र.1 याना अदा न करुन व त्‍यमुळे प्रस्‍तुत तक्रारदाराना त्‍यांना वाहनापासूनचे उपभोगापासून वंचित ठेवून त्‍यांच्‍या धंद्याचे नुकसान केले ही बाब तक्रारदारानी पुराव्‍यानिशी सिध्‍द केलेली आहे त्‍यामुळे जाबदार क्र.2 यानी तक्रारदाराच्‍या अपघातग्रस्‍त वाहनाची नुकसानभरपाई जाबदार क्र.1 यानी वेळेत न देऊन त्‍यांच्‍या धंद्याचे नुकसान करुन तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे ही बाब निर्विवादरित्‍या सिध्‍द होते त्‍यामुळे तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर होणेस पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही आलो आहोत.  त्‍यामुळे मुद्दा क्र.2 व 5 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  त्‍यामुळे सदर तक्रारदार हा त्‍यांच्‍या विषयांकित वाहनाच्‍या दुरुस्‍तीचे बिल रु.1,70,880/- जाबदार क्र.2यानी जाबदार क्र.1 याना अदा केलेवर त्‍यांचे वाहन जाबदार क्र.1 कडून ताब्‍यात घेणेस पात्र आहेत त्‍याचप्रमाणे सदर जाबदाराकडून तक्रारदाराना विषयांकित वाहन दुरुस्‍त होऊन त्‍याचा ताबा जाबदार क्र.2 यांच्‍या कृतीमुळे न मिळाल्‍यामुळे त्‍यांच्‍या झालेल्‍या धंद्याच्‍या नुकसानीमुळे त्‍यांना झालेल्‍या त्रासापोटी रु.20,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत मंच आला आहे. 

 

7.     वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन याना अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

                              आदेश

1.    तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो. 

2.   जाबदार क्र.2 यांनी तक्रारदाराना विषयांकित वाहनाच्‍या दुरुस्‍तीपोटी आलेल्‍या जाबदार क्र.1 यांनी दुरुस्‍तीपोटी केलेला खर्च त्‍वरीत अदा न केल्‍यामुळे दुरुस्‍तीस असलेले वाहन तक्रारदार याना 2 वर्ष ताब्‍यात मिळाले नाही, त्‍यामुळे त्‍यांच्‍या चरितार्थाचा व्‍यवसाय बुडाला व त्‍यांना उत्‍पन्‍नाच्‍या नुकसानीस सामोरे जावे लागले अशा प्रकारची गंभीर स्‍वरुपाची सदोष सेवा तक्रारदाराना दिली आहे असे घोषित करणेत येते. 

3.    जाबदार क्र.2 यांनी विषयांकित वाहन क्र.MH-11/AL-9932 च्‍या दुरुस्‍तीची रक्‍कम रु.1,70,880/- (रु.एक लाख सत्‍त्‍याहत्‍तर हजार आठशे ऐंशी मात्र)जाबदार क्र.1 याना सदर आदेश प्राप्‍त झालेपासून 15 दिवसाचे आत अदा करावी.  या मुदतीपेक्षा वाहनदुरुस्‍तीचे बिल जाबदार क्र.2 यांनी जाबदार क्र.1 यांना दिले मुदतीत अदा न केलेस व त्‍या तारखेपासून पुढे जाबदार क्र.2 चे बिल अदा करणेमधील दिरंगाईमुळे तक्रारदाराना विषयांकित वाहन मिळणेस उशीर झालेस प्रतिदिन रु.1000/-ची भरपाई जाबदार क्र.2 यांनी तक्रारदारांना द्यावयाची आहे. 

4.   जाबदार क्र.2 यानी वाहनाच्‍या दुरुस्‍तीपोटी झालेल्‍या बिलाची रक्‍कम रु.1,70,880/- त्‍यावर दि.23-2-2013 पासून 8 टक्‍के दराने जाबदार क्र.1 याना रक्‍कम अदा होईपर्यंतचे कालावधीपर्यंत होणारे संपूर्ण व्‍याज तक्रारदाराना अदा करावे.

5.   प्रस्‍तुत जाबदार क्र.2 यानी तक्रारदारांचे वाहन दि.13-2-2013 रोजी दुरुस्‍त झाल्‍यापासून त्‍वरीत जाबदार क्र.1 याना दुरुस्‍तीचे बिल अदा न केल्‍यामुळे व दुरुस्‍त वाहन अखंड 2 वर्षे तक्रारदाराच्‍या ताब्‍यात न मिळाल्‍यामुळे त्‍यांच्‍या झालेल्‍या उत्‍पन्‍नाच्‍या नुकसानीपोटी रक्‍कम रु.20,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- सदर आदेश प्राप्‍त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.

6.   जाबदारानी वरील आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदारांना त्‍यांचेविरुध्‍द कलम 25 व 27 अन्‍वये कारवाई करणेची मुभा राहील. 

7.    सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

8.    सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य देणेत याव्‍यात.

 

ठिकाण- सातारा.

दि.28-9-2015.

 

           (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)  (सौ.सविता भोसले)

             सदस्‍या          सदस्‍य           अध्‍यक्षा

                जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.