निकाल
दिनांक- 17.08.2013
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्या)
तक्रारदार श्रीमती कोतांबाई यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अनवये दाखल केली आहे.
तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार या मयत बळीराम गिताराम वारे यांच्या पत्नी आहेत. तक्रारदार यांचे पती बळीराम गिताराम वारे हे रा.चिखली ता.गेवराई जि.बीड येथे राहतात. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचे नांवे शेत जमिन नोदलेली आहे. शेती करुन ते आपल्या कूटूंबियाचा उदरनिर्वाह करीत होते. दि.11.10.2011 रोजी तक्रारदार यांचे पती शेतात काम करीत असताना वादळी वारा पावसात झाडाची फांदी अंगावर पडून दबून जागीच मृत्यू झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा काढला असून व त्यांना विमा रक्कम देण्याची तरतुद आहे. तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर तक्रारदाराने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.3 यांचेकडे रितसर अर्ज दिला व तो अर्ज सामनेवाला क्र.3 यांनी सामनेवाले क्र.1 डेक्कन इन्शुरन्स अँन्ड रिइन्शुरन्स कंपनी यांचेकडे पूढील कार्यवाहीसाठी पाठविला.
महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत 2011-12 या एका वर्षासाठी औरंगाबाद महसूल विभागाचा वरील योजनेचा संबंधीत प्रिमियम दि न्यू इंडिया अँश्युरन्स कंपनी यांचेकडे जमा केलेला आहे. पॉलिसी सुरु झालेल्या कालावधीत शेतक-यांचा अपघात झाल्यास सदर विमा योजने अंतर्गत त्यांच्या कूटूंबास अथवा त्यांस दयावयाची रक्कम विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आंत विमा कंपनीने तक्रारदाराला देणे बंधनकारक आहे. वरील विमा दावा सामनेवाले क्र.1 व 2 यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेवराई यांच्यामार्फत सर्व कागदपत्रे सांक्षाकीत करुन पाठविलेले आहेत. सदर दावा आजपर्यत मंजूर केलेला नाही. तक्रारदाराची मागणी की, विमा रक्कम रु.1,00,000/- 18 टक्के व्याजासहीत व शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- तसेच दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती आहे.
सामनेवाले क्र.3 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांनी त्यांच्याकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज केला ही बाब मान्य आहे. सामनेवाले क्र.3 यांचे कथन की, त्यांना सदर प्रस्ताव त्यांचे कार्यालयात दि.09.12.2011 रोजी प्राप्त झाला असून सामनेवाला क्र.3 यांनी सदर प्रस्ताव दि.22.12.2011 रोजी सामनेवाला क्र.1 डेक्कन इन्शुरन्स अँन्ड रिइन्शुरन्स कंपनी यांचेकडे पाठविला आहे. शासनाने तक्रारदार यांचेकडून कोणताही विमा हप्ता घेतलेला नाही किंवा तक्रारदाराने अथवा मयत बळीराम गिताराम वारे यांनी कोणताही विमा हप्ता शासनाकडे भरलेला नाही. शासनानेच राज्यातील शेतक-यांच्या वतीने विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीला अदा केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार हे शासनाचे ग्राहक नाहीत. शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून शासनाने एक कल्याणकारी योजना म्हणून शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरु केलेली आहे. सबब, सामनेवाले क्र.3 यांचेविरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी.
सामनेवाले क्र.1 डेक्कन इन्शुरन्स कंपनी यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाले क्र.1 यांनी असे कथन केले आहे की, डेक्कन इन्शुरन्स अँन्ड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. ही संस्था विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण मान्यताप्राप्त विमा सेवा देणारी संस्था आहे. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजना सन 2010-11 सन 2011/12 या योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाने संबंधीत विमा कंपनी आणि माझी संस्था यांचेत विमा कालावधी 15 ऑगस्ट 2010 ते 14 ऑगस्ट 2011 असा आहे. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, त्यांनी शेतक-याकडून प्रस्तावाची छाननी करुन संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करुन तो प्रस्ताव सामनेवाला क्र.2 यांचेकडे पाठविण्याचे काम करतात. त्यांचे काम फक्त कागदपत्र पूर्ण आहे किंवा नाही हे पाहणे व काही त्रूटी असल्यास सामनेवाले क्र.3 यांना कळविणे व कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे एवढे आहे.
सामनेवाले क्र.2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे कथनानुसार तक्रारदार व मयत बळीराम गिताराम वारे यांनी सामनेवाला क्र.2 यांना कोणताही व्यक्तीगत विमा योजने अंतर्गत पॉलिसीचा हप्ता भरला नाही म्हणून सदर तक्रारदार व मयत सामनेवाला यांचा ग्राहक नाही. म्हणून तक्रारदार हया नुकसान भरपाई मागण्यास पात्र नाही. मयत बळीराम वारे हे अपघाताने मरण पावले नाही. असे की, त्रिपक्षीय कराराप्रमाणे कन्सलंट व ब्रोकर इन्शुरन्स खलील प्रमाणे सदर प्रस्तावाचा निर्णय घेतात. कागदपत्रांची सात दिवसाचे आंत छाननी करुन सामनेवाला क्र.2 यांचेकडे पाठवावयाचे असते. त्रिपक्षीय कराराप्रमाणे अपघातापासून मृत्यू झाल्यास एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, इत्यादी कागदपत्रे दाखल करावी लागतात. तक्रारदाराने ही सर्व कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. म्हणून सामनेवाला क्र.2 यांचे कथन असे की, मयत बळीराम गिताराम वारे यांचा मृत्यू अपघातामुळे झाला नाही. सबब सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदारांनी तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, 7/12 चा उतारा, शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत क्लेम माहिती पत्र, गावचा नमुना सहा क, मंडळ अधिकारी विभाग, मादळमोही ता.गेवराई जि.बीड यांचा पंचनामा, पोलीस पाटील श्री.संदीपान भानुदास ठोसर यांचा अपघाती मृत्यू संबंधीचा दाखला मंडळ अधिकारी मादलमोही यांनी तहसीलदार यांना पाठवलेले रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र व बॅकेचे पासबूक इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती दाखल केल्या.
तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्र व सामनेवाले यांचे लेखी म्हणणे यांहचे बारकाईने अवलोकन केले असता खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे सिध्द करु शकतात का की, मयत
बळीराम गिताराम वारे यांचा मृत्यू झाडाची फांदी
अंगावर पडून झाला आहे ? होय.
2. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द
करु शकतात काय ? होय.
3. तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यास कसूर
केला आहे काय ? होय.
5. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 5 ः- तक्रारदार यांचे शपथपत्राचे अवलोकन केले तसेच तक्रारदार यांनी 7/12 चा उतारा, गाव नमुना 6-क चा उतारा सदरील कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, मयत बळीराम वारे हे शेतकरी होते व त्यांच्या नांवे चिखली येथे शेत जमिन आहे. तसेच पोलिस पाटलाचा दाखला व मंडळ अधिकारी मादळमोही यांचा पंचनामा व त्यांनी तहसीलदार यांना पाठवलेले रिपोर्ट यांचे अवलोकन करता असे निदर्शनास येते की, मयत हा शेतातील लिंबाच्या झाडाखाली खळयातील बाजरीचे कणसे झाकण्यासाठी झाकण टाकीत असताना वादळी वारा पावसात झाडाची फांदी तुटून त्यांचे अंगावर पडल्यामुळे व डोक्याला व पाठीत मार लागुन जागेवरच मृत्यू झाला. सदर कागदपत्राचे अवलोकन केले असता मयत हा शेतकरी होता व शेतात काम करीत असताना त्यांचा मृत्यू झाला ही बाब सिध्द होते. तसेच तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी मादळमोही यांचे समक्ष सहया केल्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, ही बाब सिध्द होते.
तक्रारदार यांनी त्यांचे शपथपत्रात कथन केले की, त्यांचे पती मयत झाल्यानंतर त्यांनी विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत प्रस्ताव दाखल केला आहे. सदर प्रस्ताव सामनेवाले क्र.1 यांच्याकडून सामनेवाले क्र.2 यांच्याकडे योग्य कार्यवाही साठी पाठविला जातो.
सामनेवाले क्र.3 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाले क्र.3 चे कथन असे की, सदर प्रस्ताव त्यांना दि.09.12.2011 रोजी प्राप्त झाला असून सदर प्रस्ताव दि.22.12.2011 रोजी सामनेवाले क्र.1 यांच्याकडे पाठविण्यात आला.
सामनेवाले क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाले क्र.1 यांच्या वतीने नंदकुमार प्रभाकर देशपांडे यांनी आपले म्हणणे सादर केले. त्यांचे कथन असे की, विमा दाव्याच्या विचारासाठी विमा कंपनीसाठी आवश्यक असलेले कागदपत्र गोळा करुन व त्या कागदपत्रांची शहानिशा करुन सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सामनेवाले क्र.2 इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे पाठविण्यात येतो.
सामनेवाले क्र.2 यांच्या कथनेनुसार तक्रारदार व मयत यांनी कधीही शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचा विमा हप्ता भरला नाही म्हणून ते सामनेवाले क्र.2 चे ग्राहक नाहीत. तसेच तक्रारदार यांनी विमा प्रस्तावासाठी आवश्यक असलेले कागदपत्र पाठविले नाही. तक्रारदार यांचा मृत्यू अपघाताने झाला नाही असे सामनेवाले क्र.2 चे कथन आहे.
तक्रारदाराची तकार व दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाले यांचे जवाब यांचे बारकाईने अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.3 यांच्याकडे मुदतीत प्रस्ताव दाखल केला व तो प्रस्ताव सामनेवाले क्र.3 कडून सामनेवाले क्र.1 कडे पाठविला ही बाब निष्पन्न होते. तसेच सदर योजनेचा विमा महाराष्ट्र शासनाने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी कडे भरला आहे. सबब, तक्रारदार हा ग्राहक आहे ही बाब सिध्द होते. महाराष्ट्र शासनाने शेतक-याच्या हितासाठी कल्याणकारी योजना म्हणून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सुरु केली आहे. यांचा मुख्य उददेश शेतक-याच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी असा आहे. पण सामनेवाले क्र.2 यांनी विमा प्रस्ताव सादर झाल्यानंतर कोणतेही ठळक किंवा स्पष्ट कारण नसताना तक्रारदाराचा प्रस्ताव नाकारला आहे. तसेच कागदपत्र पुर्ण नसल्यास तक्रारदार यांना त्या बाबत सुचना करणे गरजेचे होते. पण तसे काही सामनेवाले क्र.2 यांनी केले नाही. तक्रारदाराचा प्रस्ताव नाकारला आहे. सबब, मंचाचे मत की, सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कसूर केला आहे. म्हणून तक्रारदार हे रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच सामनेवाले क्र.2 यांनी सेवेत कसूर केल्यामुळे सदर रक्कमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल झाल्यापासून 9 टक्के व्याज मिळण्यास पात्र आहेत. तसेच झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2500/- मिळण्यास पात्र आहेत.
सबब, मुददा क्र.1 ते 5 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) व त्यावर तक्रार दाखल दि.17.07.2012 पासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावे.
3. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.3,000/- (अक्षरी रुपये तिन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.