जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 41/2011 तक्रार दाखल तारीख –17/02/2011
1. सुनंदा नवनाथ सायंबर
वय 35 वर्षे धंदा घरकाम .तक्रारदार
2 संदिप नवनाथ सायंबर
वय 19 वर्षे, धंदा शिक्षण
3. पंडीत नवनाथ सायंबर
वय 15 वर्षे, धंदा शिक्षण
अ.पा.क्र.1 सुंनदा नवनाथ सायंबर
सर्व रा. पारोडी ता.आष्टी जि.बीड
विरुध्द
1. मा.मॅनेजर,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि.शॉप नं.2,
दिशा अंलकार, कॅनॉट टाऊन सेंटर,सिडको,औरंगाबाद
2. तहसीलदार,
तहसील कार्यालय, आष्टी ता.आष्टी जि.बीड
3. महाराष्ट्र शासन, मार्फत जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय,नगर रोड, बीड. .सामनेवाला
4. विभागीय व्यवस्थापक,
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
हजारी चेंबर्स, स्टेशन रोड, औरंगाबाद
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.बी.एस.बोडखे
सामनेवाला 1 तर्फे :- स्वतः
सामनेवाला 2 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.3 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.4 तर्फे ः- अँड.एस.एल.वाघमारे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मौजे पारोडी ता.आष्टी येथील रहिवासी असून तक्रारदार क्र.1 चे पती नवनाथ सायंबर शेतकरी होते. त्यांची मौजे पारोडी शिवारात सर्व्हे नंबर 4 आर व 20 ई मध्ये वडिलोपार्जीत शेत जमिन आहेत. तक्रारदार क्र.1 चे पती दि.23.04.2007 रोजी रुईछत्तीशी ता.जि. अहमदनगर येथे नगर-सोलापूर रोडवर मयत व त्यांचा मुलगा पंडीत हे नगर कडून त्यांच्या गांवी मौजे पारोडी येथे जात असताना सदर ठिकाणी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला व त्यामध्ये नवनाथ सायंबर हे मरण पावले. त्या बाबत नगर तालुका पोलिस स्टेशन येथे मो.अ.रजि.नं.44/2007 दि.23.4.2007 रोजी दाखल झालेला आहे. त्या अनुषंगाने घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा इतर लोकांचे जाबजवाब तयार केलेले होते.
मयत सायंबर यांचे मृत्यूनंतर तक्रारदारांनी तहसीलदार आष्टी सामनेवाला क्र.2 कडे विमा योजना अंतर्गत दावा अर्ज दि.28.6.2007 रोजी दाखल केंला. त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे सादर केली. सदर कागदपत्रे वेळोवेळी करुन दाखल केली. सामनेवाला क्र.2 कडे प्रत्यक्ष चौकशी केली असता प्रकरण सामनेवाला क्र.1 कडे पाठविण्यात आले असे सांगण्यात आले. त्यानंतर सामनेवाला क्र.1 च्या कार्यालयाचे फोनवर चौकशी केली असता प्रकरण प्राप्त झाले नाहीअसे सांगण्यात आले. त्यामुळे दि.28.01.2008 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांना नोटीस दिली. सदरची नोटीस सामनेवाला क्र.2 यांना दि.30.01.2008 रोजी मिळाली. त्यांनी नूकसान भरपाई दिली नारही व उत्तरही दिले नाही. म्हणून तक्रार क्र.108 दाखल केली त्यात जिल्हा मंचाने दि.25.3.2009 रोजी निकाल दिलेला आहे.
त्यानुसार सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचा विम्याचा प्रस्ताव आदेश मिळाल्यापासून 1 महिन्याचे आंत सामनेवाला क्र.1 कडे पूर्ण विचारार्थ पाठवणे आवश्यकहोते परंतु दि.2.2.2011 रोजी पर्यत आदेशाप्रमाणे कार्यवाही केल्याबाबत कोणताही पत्रव्यवहार अथवा माहीती देण्यात आली नाही.त्यामुळे तक्रारदारांनी वकील श्री.बी.एस.बोडखे बीड चे मार्फत सामनेवाला क्र.1 ते 3 यांना दि.3.2.2011 रोजी रजिस्ट्रर पोस्टाने नोटीसा पाठविल्या. सदर नोटीस सामनेवाला क्र.1 यांना दि.17.2.2011रोजी मिळाली. सामनेवाला क्र.2 यांनी दि.15.2.2011 रोजी मिळाली.सामनेवाला क्र.1 यांनी दि.20.02.2011रोजी वकील श्री.बोडखे यांना लेखी कळविले की, सामनेवाला क्र.1 यांनी दि.30.12.2009 रोजी सामनेवाला क्र.3 मार्फत आदेशाचा प्रस्ताव मिळाला. सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना दि.30.12.2009 रोजी मा. मंचाच्या आदेशानुसार विम्यासाठीचे सर्व मुळ कागदपत्र पाठविण्याची विनंती केली. तशा स्वरुपाचे पत्रही पाठविले. परंतु सामनेवाला क्र.2यांनीदि.5.12.2009 रोजी फक्त कव्हरिंग लेटर पाठविले. ते सामनेवाला क्र.1 यांना दि.7.1.2011 रोजी मिळाले. सामनेवाला क्र.1 यांनी नवनाथ सायंबर यांचे विम्याचीसर्व कागदपत्र न मिळाल्याने तक्रारदाराचा विमा प्रस्ताव बाबत कोणतीही कार्यवाही करण्यासाठी असमर्थता दाखविली.
सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना कळविले की, त्यांनी मा. मंचाचे आदेशाप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचे विमा योजना अंतर्गत सर्व कागदपत्रे पाठविली असून त्यासोबत दि.10.03.2011 रोजी पून्हा स्मरणपत्र देखील पाठविण्यात आले.
मा. मंचाचे आदेशानंतर सामनेवाला क्र.1 ते 4 हे तक्रारदारास नूकसान भरपाई देण्यास विमा प्रस्ताव सक्षम अधिका-याकडे पाठविण्यास जाणीवपूर्वक कसूर करीतअसून तक्रारदारांना विनाकारण खर्चात पाडत आहेत. सेवा देण्यास जाणीवपूर्वक कसूर करीत आहेत. जबाबदारी एकमेकावर ढकलत आहेत. शेवटी तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांना दि.23.9.2011 रोजी दूरध्वनी वरुन विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहीती दिली नाही. दि.29.09.2011 रोजी सामनेवाला क्र.2 व 3 याचेकडे चौकशी केली असता त्यांनी कोणतीही माहीती न देता सेवा देण्यास कसूर केला.
विनंती की, सामनेवाला क्र.1 ते 4 कडून मयत नवनाथ सायबर यांचे मृत्यूच्या दाव्याची रक्कम रु.1,00,000/- नूकसान भरपाई, त्यावर दि.28.6.2007 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याज देण्या बाबत आदेश व्हावेत, सामनेवाला क्र.1 ते 3यांनी नूकसान भरपाई मूदतीत दिली नाही व तक्रार क्र.101 वरील आदेशाचे पालक केले नाही म्हणून नूकसान भरपाई रक्कमे इतकाच दंड करण्यात यावा.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दि.20.02.2010 रोजी पत्राअन्वये पोस्टा द्वारे दाखल केला. मा. जिल्हा मंच बीड यांचे आदेशाची प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे दि.2 9.12.2009 रोजीच्या पत्राद्वारे मिळाले. त्यानुसार तहसीलदार आष्टी यांनी दि.30.12.2009 रोजी दावा अर्ज पाठविण्या बाबत पत्र दिले. परंतु त्यांनी दि.05.12.2009 रोजी कव्हरिंग लेटर पाठविले. ते दि.21.12.2009 रोजीला डिसपॅच केले होते. ते या सामनेवाला यांना दि.7.1.2010 रोजी मिळाले. या कार्यालयाचे सर्व कृती या दावा प्रस्ताव अर्ज तहसीलदार कडून येण्यावरच अवलंबून आहे. तक्रारदाराच्या हिताचे दृष्टीने सामनेवाला असे सुचवू इच्छितात की, कागदपत्र त्यांचे कार्यालयात पाठविण्या बाबत सांगण्यात यावे व त्यानुसार कागदपत्र आल्यावर ती ते विमा कंपनीकडे पाठवतील.
सामनेवाला क्र.2 व 3 यांनी त्यांचा एकत्रित खुलासा दि.15.4.2011 रोजी दाखल केला. मा. जिल्हा मंचाने दि.25.03.2009 रोजी दिलेल्या निकाल पत्राप्रमाणे सामनेवाला क्र.2 तहसीलदार आष्टी यांनी दि.16.11.2009 रोजी मयत शेतकरी नवनाथ सायंबर यांचे शेतकरी विमा दाव्याची मुळ संचिका सामनेवाला क्र.1 तथा कबाल इन्शुरन्स यांना पाठविली असून त्यांची माहीती जिल्हा मंच बीड आणि वकील श्री. बोडखे यांना दिलेली आहे. नंतर प्रकरणात कार्यवाही बाबत माहीती घेण्याकरिता दि.05.12.2009 , 10.03.2010, 24.11.2010, 01.01.2011 रोजी पत्रव्यवहार केला. त्यांचा पत्रव्यवहाराची प्रत तक्रारदार व त्यांचे वकील यांना दिलेली आहे. दि.05.12.2009 आणि दि.10.03.2010 रोजी पत्र देऊन कार्यवाही बाबत विचारणा केली. यात सामनेवाला क्र.2 व 3 यांनी प्रकरणात जाणीवपूर्वक कसूर अथवा चालढकल केली नाही. आरोप फेटाळण्यात यावेत.
सामनेवाला क्र.4 यांनी दि.13.05.2011 रोजी खुलासा दाखल केला. त्यात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. सामनेवालाकडे दावा अर्ज मिळाला नाही. त्यामुळे सामनेवाला यांना सदर दाव्या बाबत निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कोणताही कसूर केलेला नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1,2,3 व 4 यांचा खुलासा, सामनेवाला क्र.4 यांचे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.बोडखे व सामनेवाला क्र.4 यांचे विद्वान वकील श्री.वाघमारे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता सामनेवाला क्र.2 यांनी सदरची कागदपत्रे जिल्हा मंचाचे आदेशानुसार सामनेवाला क्र.1 कडे पाठविल्याचे सामनेवाला यांचे म्हणणे आहे परंतु सामनेवाला क्र.1 यांना कागदपत्रे प्राप्त झाले नाही, केवळ कव्हरिंग लेटर प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. या संदर्भात सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 कडे दि.16.11.2009, 05.12.2009, 10.03.2010, 24.11,2010, 01.01.2011 रोजी स्मरणपत्रे पाठविलेली आहेत, परंतु या संदर्भात सदरची स्मरणपत्रे सामनेवाला क्र.1 यांनी नाकारलेली नाहीत. सामनेवाला क्र.1 यांचे स्तरावर प्रस्ताव अर्ज मिळाला नाही या बाबतचे एकही पत्र सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना दिलेले नाही अथवा दिले असल्याचे नमूद केलेले नाही.
या संदर्भात विमेदारांनी ( तक्रारदारांनी ) मुदतीत सर्व कागदपत्रे सामनेवाला कडे दाखल केल्यानंतर सदर परिपत्रकानुसार कार्यवाही होणे अपेक्षीत असताना सदरचा प्रस्ताव अर्ज कोणत्या ठिकाणी अडकला या बाबतचा सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे खुलासावरुन बोध होत नाही. सामनेवाला क्र.2 यांचे दि.16.11.2009 रोजीच्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, जिल्हा मंच बीड यांहचे निकालाची प्रत व मुळ संचिका परत पत्रासोबत पाठविल्या आहेत. प्रत्यक्ष वरील दिनांकाच्या स्मरणपत्रात मुळ संचिका परत पाठविल्याचे त्यात नमुद करण्यात आलेले आहे. असे असताना निश्चितपणे कोणात्या स्तरावरुन सदरची कारवाई ही प्रलंबित राहीली यांचा बोध होत नाही. तथापि सामनेवाला क्र.1 कडे प्रस्ताव अर्ज न आल्याने सामनेवाला क्र.1 हे सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.4 कडे पाठवू शकले नाहीत. सामनेवाला क्र.4 यांनी देखील प्रस्ताव अर्ज न आल्याने त्यावर निर्णय घेऊ शकलेले नाहीत. तथापि यात कारण नसताना तक्रारदाराचा कोणताही दोष नसताना त्यांस दाव्याचे रक्कमेपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच शासनाचे परिपत्रकाचे पालन योग्य त-हेने होताना दिसत नाही. त्यामुळे सेवेत कसूरीची बाब सामनेवाला क्र.4 विरुध्द स्पष्ट झालेली नसली तरी सामनेवाला क्र.4 यांनी विमा रक्कम स्विकारली असल्याने व मयत हे शेतकरी असल्याने व तसेच त्यांचा अपघाती मृत्यू झालेला असल्याने मृत्यूच्या दाव्याची रक्कम रु.1,00,000/- सामनेवाला क्र.4 ने देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.1,2 व 3 यांनी त्यांचे सेवेत कसूर केल्याची बाब कोठेही स्पष्ट होत नाही.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.4 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मयत
नवनाथ सायंबर यांचे अपघाती मृत्यू दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून
एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.4 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.17.02.2011 पासून पूर्ण रक्कम पदरीपडेपर्यत सामनेवाला
क्र.4 देण्यास जबाबदार राहतील.
4. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड