श्री. मिलिंद केदार, मा. सदस्य यांचे आदेशांन्वये.
1. वि.प.ने तक्रारकर्त्याची मृतक बहीण नाजनीन कौसर हिचा मृत्यु विमा दावा मंजूर न केल्यामुळे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, मृतक नाजनीन कौसर व तक्रारकर्ता हे सख्खे बहीण भाऊ असून त्यांनी ऑगस्ट 2018 मध्ये रु.10,00,000/- चे गृहकर्ज घेण्याकरीता स्टेट बँक ऑफ इंडियाकडे अर्ज सादर केला व बँकेने रु.8,30,000/- चे गृहकर्ज मंजूर करुन रु.4,790/- विमा प्रीमीयमबाबत समायोजित केले. सप्टेंबर 2018 मध्ये बँकेने मृतक नाजनीनच्या नावे एसबीआय लाईफ विमा योजनेंतर्गत विमा पॉलिसी काढली. सदर विमा पॉलिसी ही ऋणरक्षा होम लोन योजनेंतर्गत होती. मृतक नाजनीन आणि तक्रारकर्ता यांना विमा पॉलिसीच्या अटी, शर्ती याबाबत कुठलीही माहिती नव्हती. त्यांना फक्त पेंसिलने दर्शविलेल्या ठिकाणी स्वाक्षरी करण्यात सांगितले होते. विमाधारक नाजनीन कौसर हिंचा मृत्यु दि.23.07.2020 रोजी झाला. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार मृतक नाजनीन विमा धारकाच्या मृत्युनंतर वि.प.ने विमा दावा नाकारला.
3. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार वि.प.ने दि.04.01.2021 रोजीच्या पत्र क्र. 3273564/OPS/FY/2020-21/CL/D अन्वये विमा दावा नाकारला. तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीमध्ये काही तथ्य विमा धारकाने प्रस्तुत केले नसल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्त्याने नमूद केल्याप्रमाणे मृतक विमा धारकाचा मृत्यु हा ह्रदय विकारामुळे झाला. त्यांनी पुढे असे नमूद केले आहे की, विमा धारकाचा मृत्यु कोरोनाच्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये भरती असतांना ह्रदय विकारामुळे झाल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्त्याने आपले तक्रारीत नमूद केले आहे की, वि.प.ने विमा दावा नाकरतांना घेतलेला आक्षेप हा चुकीचा असल्यामुळे त्यांनी सदर तक्रार आयोगासमोर दाखल केलेली असून तक्रारीत मागणी केली आहे की, गृहकर्जाची रक्कम रु.7,45,734/- तक्रारकर्त्याने वि.प.ला अदा केलेली 12 टक्के व्याजासह परत करावी व सदर रकमेवर 07.08.2020 ते 03.04.2024 पर्यंत 12 टक्के दराने व्याजाची मागणी केली असून रु.30,000/- शारिरीक व मानसिक त्रासाकरीता व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- मागणी केलेली आहे.
4. सदर तक्रारीची नोटीस वि.प.वर बजावण्यात आली व त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दस्तऐवजासह दाखल केले.
5. वि.प.ने आपल्या लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्त्याचे संपूर्ण म्हणणे नाकारले असून त्यांनी आपल्या प्राथमिक आक्षेपात नमूद केले आहे की, विमा धारक व विमा कंपनी यांच्यामधील करार हा ‘’UTMOST GOOD FAITH” मध्ये असतो.
त्यांनी पुढे असेही नमूद केले आहे की, विमाकृत व्यक्ती ही डायबेटीज मेलीशियस आणि टयुबरकोलॅसिस या रोगाने ग्रस्त होती. परंतू त्याबाबत विमा प्रपोजलमध्ये त्याचा कुठेही उल्लेख केला नव्हता. त्यांनी पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्याला किंवा विमाकृत व्यक्तीला सदर आजाराची जाणिव असतांनासुध्दा त्याबाबतची माहिती विमा कंपनीला दिली नाही व जाणिवपूर्वक सदर आजार लपवून ठेवला ही बाब विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीचा भंग करणारी आहे. त्यांनी पुढे असे नमूद केले की, विमा प्रीमीयमसुध्दा तक्रारकर्त्याच्या खात्यामध्ये परत जमा केली. त्यांनी आपल्या परिच्छेदनिहाय उत्तरात तक्रारकर्त्याचे संपूर्ण म्हणणे नाकारले असून सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे.
6. सदर तक्रार आयोगासमोर तोंडी युक्तीवादाकरीता आली असता उभय पक्षांचा युक्तीवाद आयोगाने ऐकला. तसेच उभय पक्षांचे कथन व आयोगासमक्ष दाखल दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता आयोगाच्या विचारार्थ उपस्थित झालेले मुद्दे व त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ते विरुध्द पक्षांचे ग्राहक आहेत काय ? होय
2. तक्रार ग्रा.सं. कायद्यानुसार विहित कालमर्यादेत व आर्थिक मर्यादेत आहे काय ? होय
3. वि.प.च्या सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब आहे काय? नाही
4. तक्रारकर्ते कुठला आदेश मिळण्यास पात्र आहे ? तक्रार खारीज.
7. मुद्दा क्र. 1 – तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद व तक्रारीसोबत दाखल दस्तऐवज क्र. 4 (सर्टिफिकेट ऑफ इंशूरंस) यावरुन व उभय पक्षाचे कथनावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्ता व त्यांच्या मृतक बहीणीने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्ज घेतले होते. तसेच सदर गृहकर्जाच्या संदर्भात ऋणरक्षा होम लोन योजनेंतर्गत विमा पॉलिसी घेतली होती. याबाबत उभय पक्षामध्ये कुठलाही वाद नाही. त्यामुळे तक्रारकर्ता हा वि.प. यांची ग्राहक ठरतो असे आयोगाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
8. मुद्दा क्र. 2 – तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले आहे की, त्याच्या बहीणीचा मृत्यु 23.07.2020 रोजी झाला होता. त्यासंदर्भात तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 2 दाखल केलेले आहे. सदर तक्रार 29.04.2022 रोजी दाखल केलेली आहे. त्यामुळे सदर तक्रार ही कालमर्यादेत आहे. तसेच आर्थिक मागणी पाहता सदर तक्रार ही आयोगाचे आर्थिक अधिकारीतेत असल्याचे आयोगाचे मत असल्याने मुद्दा क्र. 2 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदविण्यात येतात.
9. मुद्दा क्र. 3 – सदर तक्रारीमध्ये मुख्य मुद्दा हा आहे की, तक्रारकर्ता व त्याच्या मृतक बहीणीने विमा पॉलिसी काढली असता प्रपोजल फॉर्ममध्ये काही आवश्यक बाबी ज्या स्पष्टपणे नमूद करावयाच्या होत्या त्या केल्या की नाही हे महत्वाचे आहे.
तक्रारकर्त्याचे नुसार त्याच्या मृतक बहीणीचा मृत्यु हा कोरोना काळामध्ये ह्रदय विकारामुळे झाला.
वि.प. यांनी आक्षेप नोंदविला आहे की, मृतक नाजनीनला पूर्वीपासून Diabetes Mellitus and Tuberculosis चा आजार होता. सदर आजार माहिती असतांनासुध्दा विमा धारकाने त्याबाबी स्पष्टपणे प्रपोजल फॉर्ममध्ये नमूद केल्या नाही. वि.प. यांनी सदर प्रकरणात प्रपोजल फॉर्म दाखल केला असून त्याचे अवलोकन केले असता सदर फॉर्ममध्ये मृतकाने कुठेही पूर्वी आजार असल्याची बाब नमूद केलेली नाही. वि.प. यांनी सदर प्रकरणात SBI LIFE CLAIMS INVESTIGATION REPORT दाखल केला, त्यानुसार मृतक नाजनीन हिला पूर्वीपासून Diabetes Mellitus and Tuberculosis असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
याउलट, तक्रारकर्त्याने अशी भुमिका घेतलेली आहे की, विमा कंपनीच्या एजेंटने कोणतेही माहिती न विचारता सह्या करावयास सांगितले व त्यानुसार मृतकाने अभिकर्त्याने ज्या–ज्या ठिकाणी सह्या करावयास सांगितले त्या–त्या ठिकाणी सह्या केल्या.
सदर प्रकरणातील दस्तऐवजांचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट आहे की, मृतक विमा धारकाने विमा घेत असतांना प्रपोजल फॉर्मवर पूर्वीचा आजार होता काय ? त्या जागी नाही असे लिहिले आहे. यावर तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, सदर प्रपोजल फॉर्मसुध्दा वि.प.च्या अभिकर्त्याने भरुन दिला व त्यावर मृतक विमा धारकाची सही घेतली होती. उभय पक्षाचे युक्तीवादामध्ये व दस्तऐवजावरुन ही बाब स्पष्ट होते की, मृतक विमा धारकाने पूर्वीचा आजार नमूद केला नाही.
तक्रारकर्त्याने आपल्या भुमिकेच्या पुष्टयर्थ युनिवर्सल शॅम्पो जनरल इंशूरंस वि. माधव उपाध्याय (Appeal No. 1176 of 2014 decided on 31.01.2022) हा मा. राष्ट्रीय आयोगाचा न्याय निवाडा सादर केला आहे. सदर न्याय निवाडयाचे अवलोकन केले असता त्यामध्ये विमा धारकाला मधूमेह व उच्च रक्तदाब होता. सदर आजार हे life style disease असून सामान्य असल्याचे मा. राष्ट्रीय आयोगाचे मत आहे. सदर प्रकरणात मृतकाला Diabetes Mellitus and Tuberculosis आजार होता व सदर आजाराकरीता मृतक विमा धारकाने उपचार घेतले होते व त्या संदर्भातील Tuberculosis हा आजार असल्याचे निष्पन्न झाल्याचे दस्तऐवजसुध्दा वि.प. यांनी प्रकरणात दाखल केले आहे. सदर दस्तऐवज तक्रारकर्त्याने नाकारलेले नाही. त्यामुळे सदर न्याय निवाडा तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील कथनास सुसंगत नसल्याचे आयोगाचे मत आहे. कारण Tuberculosis हा आजार सामान्य श्रेणीत नसून त्याबाबत विशेष दिर्घ उपचाराची गरज असते.
तक्रारकर्त्याने सदर प्रकरणामध्ये मा. राष्ट्रीय आयोगाचा न्याय निवाडा AUTHORIZED SIGNATORY, BAJA ALLIANZ INSURANCE CO. LTD. VS. KANDURU GANGADHARA RAO (Revision Petition No. 1054 of 2020 decided on 07.10.2021) सदर न्याय निवाडयात मा. राष्ट्रीय आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की, विमा धारकाने जर कोणतीही अथवा आजार लपवून ठेवला असेल तर तो आजार होता व त्याकरीता आवश्यक असलेले उपचार घेतल्याबाबत दस्तऐवज दाखल करुन ते सिध्द करण्याची जबाबदारी ही विमा कंपनीची असल्याचे मत आहे. सदर प्रकरणात वि.प. यांनी दाखल केलेले SBI LIFE CLAIMS INVESTIGATION REPORT व त्या समर्थनार्थ दाखल केलेले दस्तऐवज हे विश्वसार्ह्य वाटत असून त्यासंदर्भात तक्रारकर्त्याने कोणताही विशेषत्वाने आक्षेप नोंदविलेला नाही. त्यामुळे सदर न्यायनिवाडा तक्रारकर्त्याला पूरक नसल्याचे आयोगाचे मत आहे.
तक्रारकर्त्याने सदर प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाचा Branch Manager, Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd. Vs. Dalbi Kaur (Civil Appeal No. 3397 of 2020 decided on 09.10.2020) निवाडा सादर केलेला आहे. सदर निवाडयामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदविले आहे की, मृत्यु होण्याला न प्रदर्शित केलेला आजार (non disclosure) कारणीभूत होता काय हे महत्वाचे आहे. तसेच सदर बाब सिध्द करण्याची जबाबदारी ही विमा कंपनीची असल्याचे म्हटले आहे. परंतू सदर प्रकणात तक्रारकर्त्याने तसा कोणताही मुद्दा घेतला नसून फक्त मृतक विमा धारकाला विमा कंपनीच्या अभिकर्त्याने जेथे सही करण्यास सांगितले तेथेच सही केली असा बचाव घेतला आहे. याउलट, वि.प.ने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन मृतकाला असलेल्या आजारामुळे ह्रदय विकाराचा आजार उद्भवून शकतो असे युक्तीवादाचे वेळेस नमूद केले व सदर बाब विचारात घेणे योग्य वाटत असल्यामुळे सदर न्याय निवाडासुध्दा तक्रारकर्त्याचे कथनाला पूरक नसल्याचे आयोगाचे मत आहे. याउलट, न्याय निवाडा हा वि.प.ला पूरक ठरतो. तसेच वि.प. यांनी आपली भिस्त याच न्याय निवाडयावर ठेवलेली आहे.
10. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्ता व त्याची मृतक बहीण यांनी विमा पॉलिसी काढल्यावर आवश्यक माहिती विमा कंपनीचा देणे हे अटी व शर्तीनुसार व कायद्यानुसार बंधनकारक होते. आपली जबाबदारी ही विमा कंपनीच्या अभिकर्त्यावर ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे सदर प्रकरणात निष्पन्न होत आहे.
सदर प्रकरणामध्ये वि.प.ने सेवेत कोणतीही त्रुटी दिल्याचे निष्पन्न होत नसल्याने मुद्दा क्र. 3 चे निष्कर्ष नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
11. मुद्दा क्र. 4 – सदर तक्रारीचा गुणवत्तेवर विचार करता तसेच आयोगासमक्ष दाखल दस्तऐवज व उभय पक्षांचे कथनानुसार आयोगाने वरील निष्कर्ष नोंदविले आहे. त्यावरुन वि.प. यांचे कुठलीही सेवेत त्रुटी दिसून येत नसल्याने सदर तक्रार खारीज करण्यात येत आहे.
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) तक्रारीचा खर्च उभय पक्षांनी स्वतः सहन करावा.
3) आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरविण्यात यावी.