न्या य नि र्ण य
(दि.04-04-2024)
व्दाराः- मा. श्री अरुण रा. गायकवाड, अध्यक्ष
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज सामनेवाला विमा कंपनीने विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केलेने दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार हे तक्रार अर्जातील नमुद पत्त्यावर कायमस्वरुपी राहत असून तक्रारदार क्र.1 हे पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांचे पती आहेत व तक्रारदार क्र.2 व 3 हे त्यांची मुले आहेत. पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांनी सामनेवाला क्र.2 बँकेकडून दि.22/01/2019 रोजी रक्कम रु.3,00,000/- इतके वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेतले होते. सदर कर्जाचा मासिक हप्ता रक्कम रु.10,547/- इतका होता व सदर कर्ज दि.06/06/2022 पर्यंत फेडावयाचे होते. सामनेवाला क्र.2 चे अधिकारी यांनी तक्रारदाराचे कर्जखाते क्र.64533128 वर क्रेडीट प्रोटेक्ट प्रिमिअम म्हणून रक्कम रु.15,742/- भरुन कर्जाची विमासुरक्षा घेण्यास सांगितले होते. तशी रक्कम दि.22/01/2019 रोजी भरलेली होती.
परंतु पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांचे दि.23/08/2020रोजी Cardio Respiratory Failure IHD या आजाराने निधन झाले. त्यानंतर सामनेवाला क्र.2 चे सुचनेनुसार दि.27/11/2020 रोजी विहीत नमुन्यातील क्लेम फॉर्म भरुन सोबत पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांचे मृत्यू दाखल्याची प्रत व अन्य आवश्यक कागदपत्रे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे सादर करण्यात आले होते. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांच्या विम्याची रक्कम कर्जखात्यात भरणा करुन कर्ज खाते बंद करणे न्यायाचे दृष्टीने अत्यंत आवश्यक होते परंतु सामनेवाला यांनी विमा रकक्म अदयापपर्यंत जमा केलेली नाही. याउलट दि.06/02/2021 रोजीपर्यंत तक्रारदार क्र.2 यांचेकडून कर्जापोटी दरमहा रक्कम रु.10,547/- प्रमाणे एकूण रक्कम रु.21,094/- इतकी वसुल केली. पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांचे कर्जखातेमध्ये रक्कम रु.1,79,884/- इतकी कर्जाची देय रक्कम म्हणून प्रलंबीत आहे. तसेच सिक्युरिटी म्हणून घेऊन ठेवलेल्या धनादेशाचा गैरवापर करुन तक्रारदार क्र.2 यांचे विरुध्द निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्टचे सेक्शन 138 नुसार नोटीस पाठविली. तदनंतर तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांना वकील अमोल शिंदे यांचेमार्फत दि.02/11/2021 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून कर्जखाते बंद करण्याबाबत कळविले. सदर नोटीसला सामनेवाला क्र.2 यांनी दि.02/12/2021रोजी खोटे व खोडसाळ उत्तर पाठवून स्वत:वरील जबाबदार फेटाळून लावली. परंतु सामनेवाला क्र.1 यांना नोटीस मिळूनदेखील त्यांनी सदर नोटीसला कोणतेही उत्तर पाठविले नाही. अशाप्रकारे सामनेवाला यांनी जाणूनबुजून अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन सेवेत त्रुटी ठेवली आहे व तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे. त्यामुळे प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज्र मंजूर करुन सामनेवाला यांचेकडून पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांचे कर्जखाते क्र.64533128 मधील उर्वरित कर्जाची रक्कम रु.1,79,884/- नुकसान भरपाई म्हणून तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्चाची रक्कम रु.15,000/- अशी एकूण रक्कम रु.2,09,884/- मिळावी अशी विनंती केली आहे. तसेच वैकल्पिकरित्या सामनेवाला क्र.1 कडे कर्ज खाते क्र.64533128 विमाकृत नसल्याचे शाबीत झाल्यास तक्रारदार यांनी कर्जखाते विमाकृत होणेसाठी जमा केलेली रक्कम रु.15,742/-व्याजासहीत तक्रारदारास परत मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने त्याचे तक्रार अर्जात केली आहे.
2. तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडे 19 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये तक्रारदार क्र.1 यांना तक्रारदार क्र.2 व 3 यांनी दिलेले मुखत्यारपत्र, पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांचा मृत्यू दाखल व आधार कार्ड, तक्रारदार क्र.1, 2 व 3 चे आधार कार्ड, कर्ज मागणी फॉर्म, कर्जखाते क्र.64533128 चे दि.14/01/2019 ते 27/04/2022 पर्यंतचा खातेउतारा, क्लेम फॉर्म, तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांना पाठविलेले ई-मेल्स, वकीलांमार्फत सामनेवाला यांना पाठविलेली नोटीसची प्रत, नोटीस परत आलेचा लखोटा व पोष्टाची पोहोच पावती व रिसीट तसेच सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास पाठविलेले नोटीसचे उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.16 कडे तक्रारदार यांचे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.20 कडे तक्रारदाराचा पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.27 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. तसेच नि.28 कडे लेखी युक्तीवाद हाच तोंडी युक्तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली आहे.
3. सामनेवाला क्र.1 यांनी सदर कामी वकीलांमार्फत हजर होऊन नि.10 कडे त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत दाखल केलेले आहे सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराच्या तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. सामनेवाला हे तक्रारदाराचे तक्रार अर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
(i) तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
(ii) सामनेवाला क्र.2 बँकेकडून Group Credit Protect Plus Insurance Plan या ग्रुप स्किममध्ये तीन लोन अकौन्ट नं.64533128A, 64533128B, 64533128C सदर सामनेवाला यांना प्राप्त झाले व त्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने सदर तीन कर्जाच्या तीन ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीज काढल्या होत्या. सामनेवाला विमा कंपनीकडे आलेल्या प्रपोजल फॉर्ममध्ये नमुद केलेली माहिती व भरलेल्या प्रिमियमनुसार विमा कंपनी विमेदारास पॉलिसी अदा करते. वर नमुद तीन लोन अकौन्ट पैकी लोन अकौन्ट क्र. 64533128A मध्ये क्लेमची कागदपत्रे सदर सामनेवाला यांना मिळाली व त्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने क्लेम स्विकारुन क्लेमची रक्कम रु.1,00,000/- NEFT व्दारे दि.30/03/2021 रोजी तक्रारदारास अदा केलेले आहेत. परंतु लोन नं. 64533128B व 64533128C च्या क्लेमची कोणतीही कागदपत्रे तक्रारदाराने अदयाप पाठविलेली नसलेने प्रलंबीत आहेत. त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास दयावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
4. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणेसोबत पॉलिसीचे प्रमाणपत्र अटी व शर्तीसह व बेनेफिट शेडयूलसह दाखल केले आहे तसेच क्लेम इंन्टीमेशन फॉर्म दाखल केला आहे. नि.25 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तसेच नि.25/1 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.नि.26 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे.
5. सामनेवाला क्र.2 यांनी सदर कामी वकीलांमार्फत हजर होऊन नि.12 कडे त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.2 त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराने सदरची तक्रार खोटया, खोडसाळ व लबाडीच्या कथनांआधारे दाखल केलेली असलेने खर्चासह फेटाळण्यात पात्र आहे असे कथन केले आहे. सामनेवाला क्र.2 पुढे कथन करतात, तक्रारदार क्र.1 यांच्या पत्नी पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांनी सामनेवाला क्र.2 बँकेकडून ARC Unsecured Loan या प्रकारचे रक्कम रु.3,00,000/- इतके कर्ज घेतले असून त्यास यातील तक्रारदार क्र.2 हे सहकर्जदार आहेत. त्यांचा कर्ज खाते क्र.64533128 होता व कर्जाची मुदत ही दि.06/03/2019 ते दि.06/06/2022 अखेर होती. तथापि, कर्ज घेतेवेळी कर्जदाराने त्यांचे स्वेच्छेने सदर कर्जाचे सुरक्षतितेसाठी सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे सदर कर्जाचा विमा उतरविला होता. सदर कर्जखातेस दि.27/04/2022 अखेर एकूण रक्कम रु.1,75,586/- इतकी रक्कम येणे बाकी आहे. सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडून तक्रारदाराचे कर्जखातेस विम्यापोटी कोणतीही रक्कम जमा करण्यात आलेली नाही. विम्याचे अटी व शर्तीप्रमाणे विमेदाराचा विमा नाकारणे अथवा मंजूर करणे हा पूर्णपणे विमा कंपनीचा अधिकार असून त्यामध्ये सामनेवाला क्र.2 बँकेचा कोणताही संबंध नाही. जर मे. आयोग तक्रारदार हे सदर विम्याची रक्कम मिळणेस पात्र आहेत यास निष्कर्षाप्रत आलेस, सदर विमा रक्कम तक्रारदाराचे सामनेवाला क्र.2 बँकेकडील कर्जखातेस जमा करणेबाबत विमा कंपनीस योग्य ते आदेश व्हावेत. सबब सदरची तक्रार सामनेवाला क्र.2 बँकेविरुध्द खर्चासह नामंजूर करुन तक्रारदाराकडून सामनेवाला क्र.2 बँकेस रक्कम रु.20,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती सामनेवाला क्र.2 यांनी सदर आयोगस केली आहे.
6. सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.13 कडे सामनेवाला बँकेचा ठराव व तक्रारदार क्र.2 यांचेसोबत झालेले कर्जकरारपत्र दाखल केले आहे. नि.19 कडे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. नि.22 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.30कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
7. वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे व लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांचे म्हणणे व उभयतांचा तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. सामनेवाला क्र.1 यांनी |
3 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून विमा क्लेमची रक्कम व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. सामनेवाला क्र.1 यांचेकडून |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न –
मुद्दा क्रमांकः 1 ते 3 –
8. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणेसोबत दाखल केलेल्या तक्रारदार क्र.2 यांनी भरलेल्या क्लेम फॉर्मचे आयोगाने अवलोकन केले असता तक्रारदार क्र.1 यांच्या पत्नी व तक्रारदार क्र.2 व 3 यांच्या आई पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांनी सामनेवाला क्र.2 बँकेकडून दि.22/01/2019 रोजी रक्कम रु.3,00,000/- इतके वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेतलेचे व सदर कर्जाचा कर्जखाते क्र.64533128 असलेचे स्पष्ट दिसून येते. तसेच सदर कर्जास विमासुरक्षा घेण्यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडे क्रेडीट प्रोटेक्ट प्रिमिअम म्हणून रक्कम रु.15,742/- भरुन कर्जाची विमासुरक्षा घेतली होती. सदरची बाब सामनेवाला क्र.1 विमा कंपनी व सामनेवाला क्र.2 बँकेने त्यांचे लेखी म्हणणेमध्ये मान्य केलेली असून उभयतांमध्ये त्याबाबत कोणताही वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे व सामनेवाला विमा कंपनी ही सेवापुरवठादार असलेची बाब निर्विवादपणे सुस्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुददा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
9. तक्रारदार क्र.1 यांच्या पत्नी पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांनी सामनेवाला क्र.2 बँकेकडून दि.22/01/2019 रोजी रक्कम रु.3,00,000/- इतके वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेतले होते त्याचा कर्जखाते क्र.64533128 असा होता. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 कडे क्रेडीट प्रोटेक्ट प्रिमिअम रक्कम रु.15,742/- भरुन सदर कर्जाच्या सुरक्षिततेसाठी विमा उतरविलेला होता. परंतु पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांचे दि.23/08/2020रोजी Cardio Respiratory Failure IHD या आजाराने निधन झाले. त्यानंतर तक्रारदार क्र.2 यांनी दि.27/11/2020 रोजी विहीत नमुन्यातील क्लेम फॉर्म भरुन सोबत पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांचे मृत्यू दाखल्याची प्रत व अन्य आवश्यक कागदपत्रे सामनेवाला यांचेकडे सादर करण्यात आले होते. तथापि सामनेवाला क्र.2 यांनी नि.30 कडे दाखल केलेल्या लेखी युक्तीवादामध्ये सदर कर्जखात्यामध्ये दि.27/04/2022 अखेर एकूण रक्कम रु.1,75,586/- येणे बाकी असलेचे कथन केले आहे. तसेच तक्रारदार क्र.2 हे सदर कर्जास सहकर्जदार असलेने सामनेवाला क्र.2 यांनी कर्जरक्कम वसुलीसाठी उपलब्ध कायदेशीर तरतुदीनुसार निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्टचे कलम 138 प्रमाणे तक्रारदार क्र.2 यांचे विरुध्द कारवाई चालू केलेली होती. परंतु तक्रारदार यांचे कर्ज खातेस दि.18/05/2023 रोजी रक्कम रु.1,00,000/- व दि.12/06/2023 रोजी रक्कम रु.83,991.23/- इतक्या रक्कमा ऑनलाईन पध्दतीने जमा झालेल्या असल्याने तक्रारदाराचे कर्जखाते बंद झालेने सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारविरुध्दची कायदेशीर कारवाई मागे घेतली असे कथन केले आहे. यावरुन तक्रारदार क्र.1 यांची पत्नी व तक्रारदार क्र.2 व 3 यांचे आई पै.मुसर्रत जावीद कोतवडेकर यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडून घेतलेले कर्ज पूर्ण फेड झालेचे स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास दयावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी ठेवली नसलेचे स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द कोणतेही आदेश करणे योग्य होणार नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
10. सामनेवाला क्र.1 यांनी नि.15 कडे दाखल केलेल्या त्यांचे लेखी म्हणणेमध्ये व नि.25/1 कडील लेखी युक्तीवादामध्ये तक्रारदाराने क्लेम फॉर्म दाखल केल्यानंतर तक्रारदाराच्या कर्जखाते क्र.64533128A मध्ये दि.30/03/2021 रोजी NEFT व्दारे रक्कम रु.1,00,000/- जमा केलेचे कथन केले आहे. तसेच तक्रारदाराच्या कर्जखाते क्र.64533128B व क्र.64533128C या कर्जखातेच्या क्लेमची कागदपत्रे तक्रारदाराने दाखल न केलेने त्याची विमा रक्कम तक्रारदारास अदा केलेली नाही असे कथन केले आहे. परंतु तक्रारदार यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे एकच कर्जखाते असून त्याचा कर्जखाते क्र.64533128 असा आहे. सामनेवाला क्र.1 यांनी कथन केलेप्रमाणे तक्रारदाराचे कर्जखाते क्र.64533128A, 64533128B व 64533128C असा कधीही नव्हता असे कथन केले आहे. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या तक्रारदाराचे दि.27/11/2020 रोजीच्या क्लेम फॉर्मचे अवलोकन केले असता त्यावर कर्जखाते क्र.64533128 असा असलेचा दिसून येतो. Section V-Delaration by the Master Policyholder (a) Sum Assured for which the member of the Group Insurance Policy was insured Rs.3,00,000/- तसेच (e) Balance Claim Amount (Amount Payable to nominee) Rs.1,83,991/-असे नमुद असताना सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास रक्कम रु.1,00,000/- अदा करुन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र.1 यांचेकडून उर्वरित विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर या आयोगाने होकारार्थी दिले आहे.
11 सबब तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 कडून कर्जखाते क्र.64533128 मधील उर्वरित कर्जाची रक्कम रु.1,79,884/- ची मागणी केली आहे, परंतु बँकेने सदरची कर्जरक्कम जमा झालेने ते कर्जखाते अभिलेखावर बंद झालेचे कथन केले आहे. त्याकारणाने तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 कंपनीकडून विमा दाव्याची रक्कम मिळणेस पात्र आहेत. त्यामुळे सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडून क्लेम रक्कम रु.1,83,991/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास विमा दाव्याची पूर्ण रक्कम न दिल्यामुळे झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्रदा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांकः 4 –
12. सबब, वरील सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,83,991/- (रुपये एक लाख त्याऐंशी हजार नऊशे एक्यान्नव फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % दराने व्याज अदा करावे.
3) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
6) विहीत मुदतीत सामनेवाला क्र.1 यांनी आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.