Final Order / Judgement | ::: आ दे श ::: ( पारीत दिनांक :13.02.2017 ) आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार सदर प्रकरणात उभय पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे व लेखी युक्तीवादाचे अवलोकन करुन, तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 चा तोंडी युक्तीवाद ऐकुन काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला. - दाखल दस्तांवरुन, तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ची ग्राहक असल्याचे स्पष्ट निदर्शनास येत असल्याने व या मुद्द्यावर विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा कोणताही आक्षेप नसल्याने, तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांची ग्राहक असल्याचे, हे मंच ग्राह्य धरत आहे.
- तक्रारकर्तीच्या तक्रारी नुसार तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडून प्रकृतीचा विमा उतरविला आहे, ज्याचा कार्ड क्रमांक 2952200917949700000 हा आहे, सदरहु कार्ड हे दि. 28/11/2014 ते 27/11/2015 पर्यंत मुदतीत आहे. दि. 18/2/2015 रोजी तक्रारकर्तीस खोकला जास्त वाढल्यामुळे तिने घरात असलेले घरगुती औषध घेतले, परंतु त्याचा विपरीत परिणाम होऊन तक्रारकर्ती ही बेशुध्द झाली. तक्रारकर्तीस प्रथम डॉ. सोनोने यांच्या हॉस्पीटल मध्ये भरती केले, परंतु योग्य तो प्रतिसाद तक्रारकर्ती देत नसल्यामुळे, तक्रारकर्तीस आयकॉन हॉस्पीटल, अकोला मध्ये भरती करण्यात आले व तिची प्रकृती चांगली झाल्यानंतर दि. 9/3/2015 रोजी तिला सुटी देण्यात आली. तक्रारकर्तीने दि. 18/2/2015 ते 9/3/2015 या कालावधीचे वैद्यकीय बिले विरुध्दपक्षाकडे दाखल केलीत, त्याच प्रमाणे दि. 14/3/2015 ते 20/3/2015 या कालावधीची देयके, जी तक्रारकर्तीस आयकॉन हॉस्पीटल मधून देण्यात आली होती, ती देयके तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे सादर केली. सदर देयके विरुध्दपक्षाकडे दाखल केल्यानंतर विरुध्दपक्षाने केवळ रु. 41,946/- तकारकर्तीस उपरोक्त कालावधीच्या देयकापोटी दिले, परंतु उर्वरित रक्कम विरुध्दपक्ष यांनी दिली नाही. तक्रारकर्तीस एकुण रु. 2,38,625/- एवढा खर्च आला. त्यानंतर तक्रारकर्तीची प्रकृती आणखी खालावली व तिला स्वाईन-फ्लु आजार झाला, त्या आजाराचे रु. 41,946/- चे देयक विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्तीस दिले, तक्रारकर्तीस हॉस्पीटल मध्ये भरती राहावे लागले, त्याकरिता तक्रारकर्तीस रु. 50,000/- खर्च आला, तसेच तक्रारकर्तीस जो मानसिक त्रास झाला, त्यापोटी रु. 50,000/- ची मागणी तक्रारकर्तीने केलेली आहे. तक्रारकर्तीने दि. 3/10/2015, त्याच प्रमाणे दि. 7/12/2015 व दि. 5/3/2016 रोजी विरुध्दपक्ष यांना वकीलामार्फत रजिस्टर पोष्टाद्वारे नोटीस पाठविली, परंतु विरुध्दपक्ष यांनी सदर नोटीसचे उत्तर दिले नाही. तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्तीची तक्रार मंजुर व्हावी व विरुध्दपक्षाकडून तक्रारकर्तीस एकूण रु. 3,38,625/- व्याजासह मिळावे, तसेच तक्रारीचा खर्च रु. 20,000/- विरुध्दपक्षाकडून देण्याचा आदेश व्हावा.
- यावर विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांच्या जबाबात असे नमुद केले की, तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून तक्रारीत नमुद प्रकृती विमा पॉलिसी काढली होती. तक्रारकर्तीला स्वाईन फ्ल्यु झाल्याबाबत विरुध्दपक्ष क्र. 1 कडे क्लेम मिळण्याबाबत अर्ज सादर केला होता, त्यानुसार तिला रु. 41,946/- इतकी रक्कम देण्यात आली होती. त्यानंतर तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे परत एक क्लेम सादर केला. सदर क्लेम रु. 2,38,000/- इतक्या रकमेचा होता. पंरतु सदर क्लेम बाबत कंपनीचा तपासणी अहवाल कंपनीच्या तपासणी अधिका-यांनी दिला असून, त्यानुसार तक्रारकर्तीस दि. 19/2/2015 रोजी जास्त प्रमाणात विष प्राशन केल्याबद्दल भरती करण्यात आले होते. दवाखान्याची कागदपत्रे सुध्दा अशाच प्रकारे दर्शविण्यात आली असून, विरुध्दपक्षाच्या चौकशी अधिका-यास आयकॉन हॉस्पीटल मधील संबंधीत डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. परंतु सदर हॉस्पीटलमध्ये डॉ. भारती यांनी असे म्हटले की, चुकून इतक्या जास्त प्रमाणात विष घेतल्या जावू शकत नाही. तक्रारकर्तीस सुरुवातीला सोनोने हॉस्पीटल येथे भरती केले असल्याने विरुध्दपक्षाच्या अधिका-यांनी सोनोने हॉस्पीटलला सुध्दा भेट दिली असता, त्यांनी विरुध्दपक्षाच्या अधिका-यांना एवढेच सांगीतले की, तक्रारकर्ती, तिचे पोट स्वच्छ करुन घेण्यासाठी दवाखान्यात भरती झाली होती. विरुध्दपक्षाच्या अधिका-यांनी तक्रारकर्तीच्या घरी जाऊन तिची भेट घेतली, परंतु प्रत्येक वेळी तक्रारकर्ती व तिचे पती कोणत्याही प्रकारे चौकशीस सहकार्य करीत नव्हते. विरुध्दपक्ष कंपनीस चौकशी अधिका-यांचा अहवाल प्राप्त झाला, त्यानुसार डॉ. संजय भारती यांनी म्हटल्यानुसार कोणताही व्यक्ती चुकून एवढया मोठया प्रमाणात विष प्राशन करु शकत नाही व हा अपघात असू शकत नाही, त्यामुळे तक्रारकर्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, हे सिध्द झाले आहे. त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न या पॉलिसीशी संबंधीत नाही. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पेशंटला बरोबर करण्यासाठी केलेल्या उपचाराचा खर्च या पॉलिसी मध्ये कव्हर्ड नाही. त्यामुळे तक्रारकर्ती कोणत्याही प्रकारे दावा मिळण्यास पात्र नाही. म्हणून तक्रारकर्तीची तक्रार, दंड लावून खारीज करण्यात यावी.
- विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या म्हणण्यानुसार, ते या प्रकरणात केवळ नाममात्र पक्ष असून, विरुध्दपक्ष क्र. 2 कडे तक्रारकर्तीचे खाते आहे व सदर खात्यातून त्यांनी कथीत विम्याचे हप्ते भरले होते. या व्यतिरिक्त तक्रारीतील मजकुर व तक्रारकर्तीची मागणी या बाबत विरुध्दपक्ष क्र. 2 चा काहीही संबंध नाही. त्यामुळे सदर तक्रार विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द दंडासह खारीज करण्यात यावी.
- उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने दाखल दस्तांचे अवलोकन केले. तक्रारकर्तीने नमुद केलेली तक्रारच, विरुध्दपक्षाने जबाबात, पुराव्यात व इतर दस्तांसह घेतलेल्या आक्षेपांचे खंडन न करता, पुन्हा लेखी युक्तीवाद म्हणून व तक्रारकर्तीचा पुरावा म्हणून जशीच्या तशी दाखल केली आहे. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्तीने प्रमाणापेक्षा जास्त विषाचे सेवन केल्याने, तक्रारकर्तीची प्रकृती गंभीर झाली होती. त्यासाठी त्यांनी त्यांचा सर्व्हेअरचा रिपोर्ट मंचासमोर दाखल केला. त्यानुसार विरुध्दपक्षाच्या चौकशी अधिका-यांनी, तक्रारकर्तीला उपचार देणा-या डॉ. संजय भारती यांचा उल्लेख करुन, चुकुन इतक्या जास्त प्रमाणात विष घेतल्या जाऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटल्याचे नमुद केले. तसेच तक्रारकर्तीचा क्लेम नाकारलेल्या दि. 13/8/2015 रोजीच्या विरुध्दपक्षाच्या पत्रात तक्रारकर्तीने Organophosphate ( ऑरगॅनोफॉस्फेट ) हे विष घेतल्याने, त्यासाठी उपचाराचा खर्च देता येणार नसल्याचे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. तरीही वरील आक्षेप तक्रारकर्तीने खोडून न काढता, त्यावर सोईस्करपणे मौन बाळगले आहे. तसेच ज्या खोकल्याच्या औषधाने तक्रारकर्तीला एवढा त्रास झाला, त्या औषधाचे नाव, कंपनी, याचा कोणताही उल्लेख तक्रारकर्तीने तक्रारीत केलेला नाही अथवा वरील प्राणघातक औषधाच्या कंपनी विरुध्द कोणती कारवाई तक्रारकर्तीने केली, याचाही उल्लेख तक्रारीत नाही. तसेच तक्रारकर्तीने आयकॉन हॉस्पीटल मध्ये भरती होण्याआधी डॉ. सोनोने यांच्या दवाखान्यात सर्वप्रथम उपचार घेतले. विरुध्दपक्षाच्या म्हणण्यावरुन तेथील डॉक्टरांनी, तक्रारकर्तीने तिचे पोट स्वच्छ करुन घेतले, एवढेच सांगितले. परंतु तेथील उपचाराचे कुठलेही कागदपत्र तक्रारकर्तीने मंचासमोर दाखल केलेले नाही.
- त्याच प्रमाणे विरुध्दपक्षाने त्यांच्या लेखी युक्तीवादात असे म्हटले आहे की, त्यांना मिळालेल्या माहीती प्रमाणे तक्रारकर्तीने विष प्राशन केल्यानंतर, त्याचा रिपोर्ट देण्यात आला होता व पोलिसांमार्फत तक्रारकर्तीची जबानी सुध्दा नोंदविण्यात आली होती. परंतु सदर बाब तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्र. 1 पासून व मंचापासून लपवून ठेवली.
- विरुध्दपक्ष क्र. 1 च्या या आक्षेपाचेही तक्रारकर्तीने खंडन केलेले नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्यांच्या जबाबात, प्रतिज्ञालेखात व युक्तीवादात घेतलेल्या आक्षेपांचे खंडन तक्रारकर्तीकडून न झाल्याने, विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सगळया आक्षेपात मंचाला तथ्य आढळते. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांच्या पॉलिसीच्या अटी शर्तीतील Clause No. 9CII नुसार तक्रारकर्तीचा दावा नाकारुन कुठल्याही अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला नसल्याचे व तक्रारकर्तीला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली नसल्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे.
- सबब योग्य पुराव्यासह तक्रारकर्ती तिची तक्रार सिध्द करु न शकल्याने, ही तक्रार खारीज करण्यात येत आहे.
सबब अंतीम आदेश येणे प्रमाणे... - तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- न्यायीक खर्चाबाबत कुठलेही आदेश नाही.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या. | |