(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक :28/07/2011) 1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 10.08.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. यातील तक्रारकर्तीची म्हणणे आहे की, गैरअर्जदार बँकेत खाते असुन तिचे जवळ धनादेश पुस्तिका आहे. दि.03 मे-2010 रोजी तिचे खात्यातुन रु.9,000/- नावे टाकल्याचा संदेश मोबाईलव्दारे मिळाला, तिने त्वरीत चौकशी केली असता तिचे खात्यातून रु.9,000/- एवढे धनादेशाव्दारे बनावट स्वाक्षरी करुन काढल्याचे लक्षात आले. त्याबाबत तिने तोंडी तक्रार केली, बँकेने त्यावर काही कारवाई केली नाही. म्हणून तिने लिखीत तक्रार दिली त्यावरही बँकेने कोणतीच कारवाई केली नाही व दि.31.05.2010 रोजी लेखी उत्तर दिले आणि त्यावर निष्काळजीपणे धनादेश पुस्तिका हाताळल्याचे आरोप केले. गैरअर्जदाराने बँकेतील तिची सही व धनादेशावरील सही पडताळून न पाहता हा व्यवहार केला आणि त्यामुळे गैरव्यवहार झालेला आहे. म्हणून तिने सदर तक्रार मंचात दाखल करुन रु.9,000/- परत मिळावे, ती वर दि.03.05.2010 पासुन द.सा.द.शे. 18% व्याज मिळावे, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत. 3. गैरअर्जदाराला नोटीस देण्यांत आला असता त्यांनी मंचात हजर होऊन सर्व विपरीत विधाने नाकबुल केली. गैरअर्जदारांचे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्तीने धनादेश पुस्तिका सांभाळून ठेवणे गरजेचे होते. तसेच धनादेशावरील स्वाक्षरी व बँकेतील स्वाक्षरी तपासुन गैरअर्जदारांनी धनादेशाचे शोधन केलेले आहे, यामध्ये बँकेचा कोणताही दोष नाही. तसेच तक्रारकर्तीने ही तक्रार खोटेपणाने केलेली असुन ती खारिज व्हावी असा उजर घेतला आहे. 4. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 3 धनादेश, तक्रारकर्तीचे पत्र व बॅंकेचे पत्र इत्यादी दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत. 5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.19.07.2011 रोजी आली असता तक्रारकर्तीचे वकील गैरहजर, गैरअर्जदारांचे वकील हजर. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. सदर प्रकरणी गैरअर्जदार बँकेला मुळ दस्तावेज दाखल करण्यांस सांगण्यांत आले होते, तो धनादेश त्यांनी मंचाकडे सादर केला आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार, ती सोबत जोडलेले वकीलपत्र, तिने दाखल केलेला प्रतिज्ञालेख. तसेच गैरअर्जदार बँकेने या प्रकरणात तक्रारकर्तीचा दाखल केलेला खाते उघडतानाचा अर्ज या सर्व दस्तावेजांवरील सह्या आणि धनादेशावरील स्वाक्षरी यांची तुलना केली असता दोन्हींमधील सह्यांमध्ये मोठा फरक आढळून येतो व सदर फरक दृष्य स्वरुपाचा आहे. असे असतांना गैरअर्जदार बँकेने सदर धनादेश न वटविणे योग्य होते मात्र बँकेने तो वटविला. या ठिकाणी हे नमुद करणे गरजेचे आहे की, बँकेतर्फे सदर धनादेश ज्या कर्मचा-याने वटविला त्या कर्मचा-याचा प्रतिज्ञालेख गैरअर्जदारांनी दाखल केलेला नाही व त्यांनी योग्य काळजी घेऊन सदर धनादेश वटविला ही बाब सिध्द केलेली नाही किंवा त्याबाबत पुरावा दिलेला नाही. या उलट तक्रारकर्तीने तक्रार केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे कारवाई करणे व तक्रार देणे गरजेचे असतांना अशी कोणतीही कारवाई केलेली नाही व चौकशीही केल्याचे दिसुन येत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता सदर बाब ही गैरअर्जदारांचे व्यवहारातील निष्काळजीपणा आहे हे स्पष्ट होते आणि ही उघडपणे त्यांचे सेवेतील त्रुटी आहे. 7. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करता गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी दिलेली असुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला रु.9,000/- एवढी रक्कम दि. 03.05.2010 पासुन द.सा.द.शे. 6% व्याजासह रकमेच्या अदायगी पावेतो येणारी रक्कम परत करावी. 3. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.1,000/- नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- अदा करावे. 4. गैरअर्जदाराने वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 1 महीन्याचे आंत करावे. अन्यथा द.सा.द.शे. 6% ऐवजी 9% व्याज आकाले जाईल.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |