श्री.नरेश बनसोड, मा. सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 31/10/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, तक्राकर्त्याची तक्रारीत गैरअर्जदाराविरुध्द मागणी अशी आहे की, त्याला गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी दिलेल्या त्रुटीपूर्ण सेवेकरीता, मानसिक, शारिरीक व आर्थीक नुकसान भरपाई मिळावी, विमा दाव्याबाबत विमा रक्कम व्याजासह मिळावी.
2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याने गैरअर्जदाराची क्रेडीट कार्ड क्र. 4346771004871142 अन्वये सेवा घेतली होती व या कार्डचा तो वापर करीत होता. तक्रारकर्त्याला क्रेडीट कार्डची आवश्यकता नसल्यामुळे 16.01.2006 ला क्रेडीट कार्ड गैरअर्जदाराला परत केले. सदर क्रेडीट कार्ड परत करतांना सर्व रक्कम देण्यात आली होती.
गैरअर्जदार बँकेने, तक्रारकर्त्याने अर्ज केला नसतांनाही नविन क्रेडीट कार्ड क्र. 4346770048711412 पाठविले. सदर क्रेडीट कार्ड तक्रारकर्त्याने कधीही वापरले नाही. दि.25.05.2009 रोजी गैरअर्जदार बँकेने तक्रारकर्त्याचे खाते क्र. 01021050081255 मध्ये तक्रारकर्त्याला न विचारला रु.16,412/- रक्कम थांबवून ठेवली व चौकशी अंती सांगण्यात आले की, क्रेडीट कार्डचे देणे आहे. तक्रारकर्त्याने ही बाब गैरअर्जदार बँकेला कळविली तरीही त्यांनी त्याचे खात्यातून 12.0.2009 रोजी रु.22,763.78 कपात केले. तक्रारकर्त्याचे मते त्याला बँकेला काही देणे लागत नसतांना रक्कम कपात करुन, गैरअर्जदार बँकेने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. म्हणून त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, कपात केलेली रक्कम ही 15 टक्के व्याजासह , मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाबद्दल भरपाई आणि कार्यवाहीचा खर्च असे एकूण रु.76,563.78 मिळावे अशी मागणी केलेली आहे.
3. सदर तक्रारीत मंचाने सर्व गैरअर्जदारांना नोटीस पाठविली असता गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ला नोटीस मिळूनही ते गैरहजर, त्यांनी लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही, म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश 20.09.2010 रोजी पारित केला. गैरअर्जदार क्र. 4 ने तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले.
4. गैरअर्जदार क्र. 4 ने लेखी उत्तरात, तक्रारीतील सर्व परिच्छेद नाकारुन पुढे विशेष कथनात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याने क्रेडीट कार्डचा वापर हा 2004 ते 2006 पर्यंत केलेला आहे व क्रेडीट कार्डच्या कर्ज खात्याप्रमाणे कधीही रक्कम भरली नाही. तक्रारकर्त्याला दूरध्वनीद्वारे क्रेडीट कार्डच्या वापराबाबत विनंती करण्यात आली होती व तक्रारकर्त्याने दि.01.10.2005 रोजीचे पत्रात क्रेडीट कार्डची सेवा सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. जानेवारी 2006 मध्ये क्रेडीट कार्डची बाकी रक्कम रु.5,259.22 होती आणि नंतर ती भरण्यात न आल्याने 12.06.2007 ला रु.12,000/- झाली. याबाबत बँकेने तक्रारकर्त्याला नोटीस पाठवून सदर रक्कम अदा करण्याबाबत सांगितले. परंतू तक्रारकर्त्याने रक्कम न भरता नोटीसला उत्तर देऊन त्यांनी संपूर्ण रक्कम अदा केल्याचे सांगितले. 16.01.2006 चे आधी तक्रारकर्त्याने दोनदा रु.1730/- रक्कम भरलेली आहे. यानंतर सन 2007, 2008 आणि एप्रिल 2009 पर्यंत रक्कम भरली नाही. तक्रारकर्त्याला 28.05.2009 च्या नोटीसद्वारे क्रेडीट कार्डची रक्कम न भरल्याने त्याचे खात्यातील रक्कम थांबवून ठेवल्याचे सांगितले होते. क्रेडीट कार्ड घेतांना तक्रारकर्त्याला आधीच कळविण्यात आले होते की, जर क्रेडीट कार्डची संपूर्ण रक्कम भरली नाही तर खात्यातून रक्कम काढण्याचे अधिकार बँकेला आहेत. त्यामुळे बँकेने सदर रक्कम काढून घेतली व क्रेडीट कार्डच्या खात्यात जमा केली. तक्रारकर्त्याने संपूर्ण पैसे भरल्याचा कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही.
5. तक्रारकर्त्याने आपल्या प्रतिउत्तरात म्हटले की, तक्रारीत क्रेडीट कार्ड क्र. 4477460042889008 चा उल्लेख नसल्यामुळे, त्या संदर्भात कुठलेही कथन तक्रारकर्त्याला लागू होत नाही. तक्रारकर्त्याने 16.01.2006 पर्यंत सर्व सेवेचा मोबदला दिला. त्यामुळे कुठलीही थकबाकी त्यांचेवर नाही असे नमूद केले आहे.
6. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यानंतर मंचाने गैरअर्जदार क्र. 4 चे वकिलांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारकर्त्यांचे वकील उपस्थित असूनही त्यांनी युक्तीवाद केला नाही. मंचाने सदर प्रकरण दाखल तक्रार, लेखी उत्तर, प्रतिउत्तर, शपथपत्रे व दाखल दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
6. तक्रारकर्त्याचे गैरअर्जदार बँकेत चालू खाते होते व त्याचेशी संलग्न क्रेडीट कार्ड क्र. 4346770048711412 घेतले होते. त्यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
7. गैरअर्जदाराने त्यांचे उत्तराचे परि.क्र. 2 मध्ये क्रेडीट कार्ड क्र. 4477460042889008 चा उल्लेख केला. जेव्हा की, त्या क्रेडीट कार्डचा काही संबंध असल्याचे तक्रारकर्त्याने प्रतीउत्तरात नाकारले व सदर क्रेडीट कार्डबाबत कुठलेही दस्तऐवजावर पत्रव्यवहारावर उल्लेख नाही. त्यामुळे मुळ तक्रारीस कलाटणी देण्याचा व मंचाची दिशाभूल करण्याचा एकमेव प्रयत्न आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने पृष्ठ क्र. 17 वर दाखल केलेल्या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, 01.10.2005 ला गैरअर्जदारास तक्रारकर्त्याने नष्ट केलेले कार्ड प्राप्त झालेले होते. त्याच गैरअर्जदाराच्या पत्रात नमूद आहे की, तक्रारकर्त्याने नविन क्रेडीट कार्डसंबंधी विचारणा केलेली आहे आणि त्यायोगे तक्रारकर्त्यास नविन क्रेडीट कार्ड पाठविण्यात येत आहे. तक्रारकर्त्यानुसार त्यांनी कोणतीही लेखी वा तोंडी विनंती गैरअर्जदारास केलेली नसतांना सुध्दा गैरअर्जदार नविन क्रेडीट कार्ड पाठविले. त्यामुळे गैरअर्जदाराने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याचे 16.01.2006 च्या पत्राचा उल्लेख केला आणि त्यानुसार म्हटले आहे की, तक्रारकर्ता हा Pending dues clear करणार होता, परंतू त्यांनी Pending dues clear केले नाही. गैरअर्जदाराने अनुक्रमे पृष्ठ क्र. 81 वर दाखल केलेल्या तक्रारकर्त्याच्या 16.01.2006 च्या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने त्याच्या क्रेडीट कार्ड समर्पित केले होते व “I have clear all my pending dues, kindly accept and acknowledge” असे स्पष्ट नमूद आहे, त्यामुळे वि.प.चे म्हणणे तथ्यहीन ठरते. तसेच तक्रारकर्त्याचे अनुक्रमे पृष्ठ क. 18 वरील पत्रात खालीलप्रमाणे नमूद आहे.
“I am quite perturb the kind statements I have received from your side from last so many months. After paying payments through my HDFC debit cards. I have been charge late fees and when I have brought to the noticed to your customer care then it was given a credit, two to three times it has happened.
With a very disheartened I am surrendering your both the cards. I am really thankful to you for your some kind of promt services.
I will clear my two emi of Rs.1730.87 and other actual amounts within a months.”
यावरुन तक्रारकर्त्याने संपूर्ण क्रेडीट कार्डची बाकी रक्कम clear केली होती हे स्पष्ट होते व त्याबाबत गैरअर्जदाराने केलेले कथन पूर्णतः चुकीचे व खोडसाळ आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारकर्त्याने पृष्ठ क्र. 18 वर दाखल केलेले 16.01.2006 च्या पत्रात नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने HDFC debit card द्वारे पेमेंट केल्यानंतरसुध्दा विलंब शुल्क लावले होते. सदर बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तक्रारकर्त्याच्या खात्यास विलंब शुल्काची रक्कम जमा करण्यात आली होती आणि ही बाब 2, 3 वेळी घडलेली आहे व क्रेडीट कार्ड जमा केले नाही नमूद आहे. त्यात EMI 1730.87 जमा करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे अनुक्रमे पृष्ठ क्र. 81 वर गैरअर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारकर्त्याच्या पत्रास पूर्णतः विपर्यास केलेला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. ज्याअर्थी, तक्रारकर्त्याकडे क्रेडीट कार्डची कुठलीही रक्कम बाकी नसतांना व दुसरे क्रेडीट कार्डचा वापर वापर न करतांना गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचे खात्यात वळती केलेली रक्कम रु.23,412/- एवढी मोठी रक्कम पूर्वसुचना न देता परस्पर वळती करणे (debit) ही गैरअर्जदाराची ग्राहक सेवेतील गंभीर स्वरुपाची त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे.
8. दस्तऐवजांचे अवलोकन केले असता 06.02.2006 नंतर गैरअर्जदाराचे 29.05.2009 चा पत्रव्यवहार दिसत आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, 06.02.2006 नंतर 3 वर्षाचे नंतर गैरअर्जदाराने 28.05.2009 चा पत्रव्यवहार केलेला आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, 06.02.2006 पासून 28.05.2009 पर्यंत तक्रारकर्त्याने क्रेडीट कार्डचा कुठलाही वापर केलेला नसल्यामुळे व 3 वर्षाचे अवधीनंतर गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास थकीत रकमेबाबत कळविले आहे. त्यामुळे Limitation Act च्या नुसार गैरअर्जदाराची सदर मागणी ही barred by limitation अंतर्गत मोडते, त्यामुळे सुध्दा गैरअर्जदार ती रक्कम वसुल करणे गैरकायदेशीर असून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे गंभीर स्वरुपाची ग्राहक सेवेती त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे.
9. गैरअर्जदाराने आपले लेखी कथनात म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने क्रेडीट कार्डसंबंधी अर्ज भरलेला होता आणि क्रेडीट कार्डच्या अटी आणि शर्ती तक्रारकर्त्याची त्यावर सही केलेली होती ही बाब तक्रारकर्त्याने पूर्णपणे नाकारली व म्हटले की, सदर अर्ज हा त्याच्या हस्ताक्षरात नसून गैरअर्जदाराचे कर्मचा-याने त्याच्या सोईप्रमाणे केलेली आहे. हा गैर प्रकार आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात क्रेडीट कार्डच्या अटी आणि शर्तीचा उल्लेख केला. या अटी व शर्ती अनुक्रमे पृष्ठ क्र. 85 ते 89 वर आहे. परंतू अटी आणि शर्ती हे एक वेगळे कागदपत्र असल्यामुळे व त्यावर तक्रारकर्त्याचे हस्ताक्षर नसल्यामुळे त्या अटी व शर्तीस करारनाम्याचे स्वरुप प्राप्त होत नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
10. वरील विवेचनावरुन हे स्पष्ट झाले की, तक्रारकर्त्याने 16.01.2006 ला व त्यानंतर 08.02.2006 ला सर्व रकमेचा भरणा करुनसुध्दा आणि क्रेडीट कार्ड समर्पित करुनसुध्दा, तसेच नव्याने पाठविलेल्या क्रेडीट कार्डचा वापर न करता तक्रारकर्त्याचे खात्यातून 25.05.2009 ला चालू खात्यातून रु.23,412/- वळती केलेली रक्कम गैरकायदेशीर असल्यामुळे व गैरअर्जदाराचे सेवेत त्रुटी असल्यामुळे, तसेच गैरअर्जदाराने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्यामुळे गैरअर्जदार हे रु.23,412/- रक्कम 25.05.2009 पासून तक्रारकर्त्याचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने परत घेण्यास बाध्य आहेत असे मंचाचे मत आहे. वरील सर्व विवेचनावरुन गैरअर्जदाराचे ग्राहक सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पध्दती अवलंब सुध्दा झाल्यामुळे निश्चित तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे व त्याकरीता नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- देणे संयुक्तीक होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे व तक्रारीचा खर्चाबाबत रु.2,000/- देणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश.
10.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारास आदेश देण्यात येते की, दि.25.05.2009 ला तक्रारकर्त्याचे खात्यातील वळती करण्यात आलेली रक्कम रु.23,412/- दि.25.05.2009 पासून तक्रारकर्त्याचे हातात पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजाने परत करावे.
3) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- व तकारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
4) उपरोक्त आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांनी संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे अन्यथा उपरोक्त रकमेवर द.सा.द.शे. 9 टक्केऐवजी 12 टक्के व्याज देय राहील.