तक्रारदार : वकील श्री.पी.के.वाघमारे सोबत हजर.
सामनेवाले : वकील श्रीमती ज्योती मिस्त्री मार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही बँक आहे. तर तक्रारदार हे सा.वाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांचे सा.वाले यांचेकडे बचत खाते होते. त्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्ड ज्याचे शेवटचे चार अंग 7133 असे होते ते तक्रारदारांना त्याचा वापर करणेकामी सप्टेंबर,2005 मध्ये दिले. त्यानंतर तक्रारदार त्या क्रेडीट कार्डचा वापर करत होते.
2. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, नोव्हेंबर,2005 मध्ये सा.वाले यांचेकडून त्यांना क्रेडीट कार्ड खात्याची स्टेटमेंट प्राप्त झाली व त्यामध्ये दिनांक 23.10.2005 रेाजी रुपये 5000/- रोख उचल व दिनांक 9.11.2005 रोजी रु.10,000/- रोख उचल असे दोन व्यवहार दिसून आले ते तक्रारदारांनी केलेले नव्हते. व त्या व्यवहाराशी तक्रारदारांचा संबंध नव्हता. तक्रारदारांनी लगेचच ही बाब सा.वाले यांना कळविली व सा.वाले यांनी त्या नोंदी रद्द केल्या.
3. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, मार्च,2007 मध्ये पुन्हा तशाच दोन्ही नोंदी नावे टाकल्याचे क्रेडीट कार्डच्या स्टेटमेंटमध्ये दिसून आले. ही बाब तक्रारदार यांनी सा.वाले यांच्या अधिका-यांना कळविली. त्यानंतर तक्रारदार व सा.वाले यांच्या अधिका-यामध्ये समेट बद्दल चर्चा झाली व संपूर्ण येणे बाकी रक्कम रु.51,098/- च्या ऐवजी तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे रु.29,000/- अदा करावेत असे ठरले. व त्याबद्दल ई-मेल सा.वाले यांनी तक्रारदारांकडे दिनांक 23.5.2006 रोजी पाठविला. त्या ई-मेल संदेशाप्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे रु.4000/- रोखीने जमा केले व शिल्लक देय रक्कम रु.25,000/- मासीक हप्त्याने द्यावयाचे होते.
4. तक्रारदारांचे पुढे असे कथन आहे की, या समेटच्या शर्ती व अटींचे विरुध्द सा.वाले यांनी वर्तन करुन दिनांक 17.6.2006 रोजीच्या क्रेडीट कार्डच्या स्टेटमेंटमध्ये एकूण देय रक्कम रु.50,802.41 दाखविले. प्रत्यक्षात समेटाचे शर्ती प्रमाणे ते रु.25,000/- होते. तक्रारदारांचे पुढे असे कथन आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांना कुठलीही नोटीस न देता त्यांच्या बचत खात्यामधून रु.80,488/- रोखून धरले. या प्रकारे क्रेडीट कार्डच्या व्यवहारा संबंधात सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व तक्रारदारांकडून वसुल केलेली ज्यादा रक्कम रु.78,640.97 तक्रारदारांना अदा करावी तसेच नुकसान भरपाई बद्दल रु.1 लाख अदा करावेत अशी दाद मागीतली.
5. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांना 7133 क्रमांक असलेले क्रेडीट कार्ड त्यांच्या वापराकामी पुरविण्यात आले होते. परंतु दिनांक 25.4.2006 रोजी तक्रारदारांकडून ते क्रेडीट कार्ड गहाळ झाल्याबद्दल सूचना प्राप्त झाल्याने जुने क्रेडीट कार्ड 7133 रद्द करण्यात आले. व त्या ऐवजी दिनांक 25.4.2006 पासून नविन क्रेडीट कार्ड ज्याचे शेवटचे चार क्रमांक 4338 असे होते ते तक्रारदारांना देण्यात आले. त्यानंतर जून्या क्रेडीट कार्ड मधील थकबाकी रु.51,098/- हे नवनि क्रेडीट कार्डच्या खात्यामध्ये दाखविण्यात आले व तशी नोंद दिनांक 17.4.2006 रोजीच्या क्रेडीट कार्ड स्टेटमेंटमध्ये दाखविण्यात आली. सा.वाले यांनी असे कथन केले की, तक्रारदारांकडून दिनांक 24.4.2006 रोजी 7133 क्रमांकाचे क्रेडीट कार्ड हरविल्याची सूचना प्राप्त झाल्याने त्या तारखेपर्यत क्रेडीट कार्डवर झालेल्या सर्व व्यवहार हा तक्रारदारांवर बंधनकारक आहे. तक्रारदारांचे सूचनेवरुन रु.10,000/- व रु.5000/- या व्यवहाराची चौकशी सा.वाले यांनी केली परंतु ते दोन्ही व्यवहार नोयडा, दिल्ली येथे झालेले असल्याने ते तक्रारदारांचे संबंधीत आहेत. या निष्कर्षानुसार त्या नोंदी पुन्हा क्रेडीट कार्ड खात्यामध्ये घेण्यात आल्या.
6. सा.वाले यांनी असे कथन केले की, तक्रारदारांनी समेटाचे कराराप्रमाणे संपूर्ण थकबाकी रक्कम रु.29,000/- सा.वाले यांचेकडे जमा केले नाहीत व केवळ रु.4000/- जमा केले. त्यानंतर सा.वाले यांनी क्रेडीट कार्ड कराराचे शर्ती व अटी प्रमाणे बँकर्स लिन या अधिकाराचा वापर करुन तक्रारदारांच्या बचत खात्यातील रक्कम गोठवून ठेवली. या प्रकारे तक्रारदारांच्या क्रेडीट कार्डच्या खात्याचे संदर्भात सर्व कार्यवाही क्रेडीट कार्डचे शर्ती व अटी प्रमाणे तसेच कायद्याप्रमाणे करण्यात आली अशी भूमिका सा.वाले यांनी घेतली.
7. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले यांनी त्यांचे अधिकारी श्री.मनोज ढल व्यवस्थापक यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच क्रेडीट कार्डच्या खात्याच्या शर्ती व अटी व क्रेडीट कार्डच्या खात्याची स्टेटमेंटच्या प्रती दाखल केल्या. दोन्ही बाजुच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
8. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्ड खात्याच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारदार हे तक्रारीमध्ये मागीतलेली रक्कम व नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही |
3. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
9. तक्रारदारांना सा.वाले यांनी 7133 या क्रमांकाचे क्रेडीट कार्ड त्यांच्या वापराकरीता दिले होते व तक्रारदार त्यांचा वापर सप्टेंबर,2005 पासून करीत होते या बद्दल वाद नाही. तक्रारदारांनी तक्रारीत असे कथन केलेले नाही की, त्यांनी सा.वाले यांना क्रेडीट कार्ड गहाळ झाल्याबद्दल दिनांक 25.4.2006 रोजी कळविले होते. तथापी तक्रारदारांनी आपल्या लेखी युक्तीवदात परिच्छेद क्र.2(III) यामध्ये क्रेडीट कार्ड क्रमांक 7133 गहाळ झाल्याबद्दलची बाब मान्य केलेली आहे. परंतु सा.वाले यांनी 4338 या क्रमांकाचे क्रेडीट कार्ड दिले होते व ते दिनांक 25.4.2006 पासून वापरात होते ही बाब नाकारलेली आहे. तक्रारदारांनी स्वतः सा.वाले यांचेकडून दिनांक 23.5.2006 रोजीचा जो ई-मेल प्राप्त झाला आहे त्यामध्ये क्रेडीट कार्ड क्रमांक 4338 ही नोंद आहे. तो ई-मेल संदेश दिनांक 23.5.2006 निशाणी अ हा सा.वाले यांनी तक्रारदारांना समेटा बद्दल पाठविला होता व तक्रारदार ही बाब मान्य करतात. येवढेच नव्हेतर त्यांची या बद्दल तक्रार नाही. ई-मेल संदेश मजकूर क्रेडीट कार्डवर आधारीत आहे. तरी देखील तक्रारदारांनी क्रेडीट कार्ड क्र.4338 त्यांना कधी वाटप करण्यात आलेले होते व त्याचा वापर ते कसा करीत होते या बद्दल तक्रारीत खुलासा केलेला नाही. या वरुन तक्रारदारांचा अप्रमाणिकपणा दिसून येतेा. पर्यायाने सा.वाले यांचे हे कथन मान्य करावे लागते. तक्रारदारांनी त्यांचे पूर्वीचे क्रेडीट कार्ड क्र.7133 गहाळ झाले या बद्दल दिनांक 24/25-4-2006 जी सा.वाले यांना सूचना दिली होती व क्रेडीट कार्ड क्र.7133 बंद करण्यात आले. व तक्रारदारांना नविन क्रेडीट कार्ड क्र.4338 देण्यात आले. सा.वाले यांनी असे कथन केलेले आहे की, तक्रारदारांना ते क्रेडीट कार्ड दिनांक 25.4.2006 पासून देण्यात आले या कथनाचा अर्थ असा होतो की, ते क्रेडीट कार्ड दिनांक 25.4.2006 पासून वापरात आले असे समजण्यात आले.
10. तक्रारदारांचे संपूर्ण कथन ई-मेल दिनांक 23.5.2006 निशाणी अ या वर आधारीत आहे. त्यावर सा.वाले यांनी असे कळविले होते की, तक्रारदारांचे क्रेडीट कार्ड क्र.4338 या मधील एकूण बाकी रु.91,098/- च्या ऐवजी तक्रारदारांना रु.29,000/- 3 हप्त्यात अदा करावी. व त्यापैकी रु.4000/- दिनांक 25.5.2006 पूर्वी अदा करावेत. क्रेडीट कार्ड स्टेटमेंट दिनांक 17.6.2006 निशाणी ब मधील नोंदी असे दर्शवितात की, तक्रारदारांनी रु.4000/- क्रेडीट कार्ड मधील बाकी बद्दल दिनांक 31.5.2006 रोजी जमा केले. परंतु समेटाचे शर्ती प्रमाणे बाकी रक्कम रु.25,000/- तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे जमा केल्याचे तक्रारदारांचे कथन नाही व तशी क्रेडीट कार्ड खात्यामध्ये नोंदही नाही. या वरुन असा निष्कर्ष काढावा लागतो की, तक्रारदारांनी समेटच्या शर्ती व अटींचा भंग केला व केवळ रु.29,000/- समेटच्या रक्कमेपैकी केवळ रु.4000/- जमा केले परंतु बाकी रक्कम रु.25,000/- जमा केली नाही. सहाजीकच सा.वाले यांनी या शर्ती व अटी व्यर्थ ठरविल्या व जुन्या क्रेडीट कार्ड खात्यामध्ये देय असलेली रक्कम रु.51,098/- त्यावर व्याज वजा रु.4000/- असे एकूण रु.50,802/- नविन क्रेडीट कार्ड क्र.4338 या खात्यामध्ये बाकी दाखविली. यामध्ये सा.वाले यांनी काही चूक केली अथवा तक्रारदारांना क्रेटीट कार्ड खात्याचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे दिसून येत नाही.
11. तक्रारदारांचे अन्य कथन असे आहे की, त्यांचे क्रेडीट कार्ड खात्यामध्ये दाखविलेले रु.5000/-दिनांक 23.10.2005 व रु.10,000/-दिनांक 9.11.2005 हे दोन्ही व्यवहार त्यांचे क्रेडीट कार्डवर केलेले नव्हते. व तो व्यवहार त्यांचे संबंधात नव्हता. तक्रारदारांनी या स्वरुपाची तक्रार केल्यानंतर सा.वाले यांनी त्या दोन्ही व्यवहाराच्या नोंदी रद्द केल्या व ती रक्कम तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड खात्यामध्ये जमा दाखविल्या. या स्वरुपाच्या नोंदी क्रेडीट कार्ड स्टेटमेंट दिनांक 17.12.2005 ई-मेल यामध्ये दिसून येतात. त्यानंतर सा.वाले यांनी चौकशी केली व तक्रारदार हे नोयडा, दिल्ली येथे रहात असल्याने तो व्यवहार तक्रारदारांचा असे गृहीत धरुन ती रक्कम पुन्हा तक्रारदारांच्या खात्यामध्ये नांवे टाकली व या प्रकारच्या नोंदी क्रेडीट कार्ड स्टेटमेंट दिनांक 17.3.2006 निशाणी ग यामध्ये दिसून येतात. क्रेडीट कार्ड स्टेटमेंट दिनांक 17.5.2005,17.2.2006 व दिनांक 17.3.2006 या मधील नोंदी असे दर्शवितात की, तक्रारदार हयांचा त्या कालावधीमध्ये पत्ता डिझाईन पार्क, सेक्टर-62,नोयडा असा होता. वरील दोन्ही व्यवहार रु.10,000/- व रु.5000/- हे नोयडा येथे झाल्याचे दिसून येतात. क्रेडीट कार्ड खात्याच्या करारातील शर्ती व अटी प्रमाणे क्रेडीट कार्ड सांभाळण्याची जबाबदारी ही खातेधारकाची असते. व त्या खात्यातील सर्व व्यवहारास तो खातेदार स्वतः जबाबदार असतो. क्रेडीट कार्ड खातेधारकांनी क्रेडीट कार्ड गहाळ झाल्या बद्दलची सूचना बँकेला देईपर्यतच्या त्यावर होणारा सर्व व्यवहार त्या खातेधारकांनी केलेला आहे असे समजले जाते. व तसी तरतुद क्रेडीट कार्ड खात्याच्या करारनाम्याचे अटी व शर्तीमध्ये आहे त्याची प्रत सा.वाले यांनी आपल्या पुराव्याच्या शपथपत्रासोबत दाखल केलेली आहे. यावरुन तक्रारदार रु.10,000/- व रु.5000/- च्या नोंदी नाकारु शकत नाहीत.
12. तक्रारदारांनी असेही कथन केलेले आहे की, सा.वाले यांनी नांवे बाकी बद्दल त्यांच्या बचत खात्यातील रक्कम रु.80,000/-अडवून ठेवली व ती कृती सा.वाले यांनी अनाधिकाराने केली. वर सदर्भ दिलेल्या क्रेडीट कार्डची स्टेटमेंट असे दर्शविते की, तक्रारदारांनी आपल्या क्रेडीट कार्ड खात्यामध्ये बरीच बाकी ठेवली होती. त्यांनी नियमितपणे रक्कमेची परतफेड केली नाही. त्यावरुन क्रेडीट कार्ड खात्यामध्ये व्याज व दंड व्याज आकारावे लागेल परीणामतः ती रक्कम देणेबाकी रक्कमेमध्ये वाढ होत राहील. भारतीय कराराचा कायदा कलम 171 प्रमाणे बँकेला खातेदाराकडून येणे बाकी रक्कमेबद्दल त्यांच्या अन्य कुठल्याही खात्यावर टाच लावण्याचा अधिकार आहे. या परिस्थितीत सा.वाले यांनी तक्रारदारांच्या बचत खात्यातील रक्कम रु.80,000/- अथवा त्यापैकी अधिक अडवून ठेवले असले तरी ती सा.वाले यांची कृती अनाधिकाराची आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.
13. उपलब्ध पुराव्यावरुन तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने प्रामाणीकपणाची नसून तक्रारदार सत्य परिस्थिती लपवत आहेत असे दिसून येते. सबब सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्ड खात्याचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढता येत नाही.
14. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 224/2010 रद्द करण्यात येतात.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.