जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 69/2010. तक्रार दाखल दिनांक : 16/02/2010. तक्रार आदेश दिनांक :28/04/2011. श्री. अनंत काशिनाथ चौधरी, वय सज्ञान, व्यवसाय : नोकरी, रा. 140, विशाल नगर, महाराष्ट्र बँकेजवळ, जुळे सोलापूर. तक्रारदार विरुध्द एच.डी.एफ.सी. बँक लि., रा. सन प्लाझा, 8516/11, लकी चौक, सोलापूर. (नोटीस शाखा व्यवस्थापक यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एन.डी. जोशी विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : एस.व्ही. न्हावकर आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी बजाज डी.एल.एक्स. सी.टी.100 दुचाकी वाहन क्र.एम.एच.13/ए.डी.1075 खरेदी केली असून त्याकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.27,741/- कर्ज घेतलेले आहे. वाहन खरेदी करताना त्यांनी रु.10,000/- डाऊन पेमेंटचा भरणा केला आहे. कर्ज देताना विरुध्द पक्ष यांनी वाहनाचे मुळ आर.सी. बूक व एक चावी तारण म्हणून ठेवून घेतली. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या कर्जाचे संपूर्ण हप्ते वेळोवेळी भरणा केलेले असून त्याबाबत बेबाक दाखलाही त्यांना दिलेला आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी तारण-गहाण मूळ आर.सी. बूक व चावीची मागणी केली असता विरुध्द पक्ष टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांच्याकडून वाहनाचे मूळ आर.सी. बूक व चावी मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- मिळावा, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी आहेरकर अटोमोबाईल्स यांच्याकडून दुचाकी खरेदी केली आहे आणि त्यांच्याकडेच वाहनाचे रजिस्ट्रेशन करुन घेतलेले आहे. तक्रारदार यांनी त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे दिलेली नाहीत. तरीही तक्रारदार यांनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणा-या कागदपत्रांवर स्वाक्ष-या केल्यास रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट उपलब्ध करुन दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले आहे. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून दुचाकी खरेदी करण्यासाठी कर्ज घेतल्याचे व कर्जाची संपूर्ण परतफेड झाल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, कर्जाची परतफेड झाल्यानंतर तक्रारदार यांना वाहनाचे मूळ आर.सी. बूक व चावी देण्यात आलेली नाही, अशी त्यांनी तक्रार आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे दिलेली नाहीत आणि तरीही तक्रारदार यांनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणा-या कागदपत्रांवर स्वाक्ष-या केल्यास रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट उपलब्ध करुन दिले जाईल, असे नमूद केले आहे. 5. तक्रारदार यांनी अहेरकर अटोमोबाईल्स, सोलापूर यांचे पत्र दाखल केले आहे. त्या पत्राचे अवलोकन करता, त्यांनी तक्रारदार यांच्या वाहनाचे विरुध्द पक्ष यांचे नांवे गहाणखतानुसार रजिस्ट्रेशन केल्याचे व रजिस्ट्रेशन बूक विरुध्द पक्ष यांना दि.23/11/2006 रोजी सादर केल्याचे नमूद केले आहे. अशा परिस्थितीत, विरुध्द पक्ष यांच्या ताब्यात तक्रारदार यांच्या वाहनाचे आर.सी. बूक असल्याचे सिध्द होते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांनी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणा-या कागदपत्रांवर स्वाक्ष-या केल्यास रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट उपलब्ध करुन दिले जाईल, असे नमूद केले आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना कर्ज परतफेड झाल्यानंतर वाहनाची मूळ कागदपत्रे परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केली आहे, या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत. 6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या वाहनाचे मूळ आर.सी. बूक व एक चावी या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत परत करावी. आवश्यकतेनुसार तक्रारदार यांनी आर.सी. बूक मिळविण्याकरिता लागणा-या कागदपत्रांवर स्वाक्ष-या कराव्यात. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/25411)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |