तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही बँक आहे, तर तक्रारदार हे सा.वाले यांचे ग्राहक आहेत. सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांचे वापरणेकामी क्रेडीटकार्ड दिले होते. व तक्रारदारांनी त्या क्रेडीट कार्डाचे माध्यमातुन विमा पॉलीसी एच.डी.एफ.सी.इरगो कंपनीची घेतली होती. व विम्याचा हप्ता क्रेडीट कार्डव्दारे अदा केला होता. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदार विशाखापट्टनम येथे सप्टेंबर, 2010 मध्ये गेले असताना अचानक आजारी पडले व त्यांना इस्पीतळामध्ये दाखल होऊन इलाज करुन घ्यावा लागला व त्याकामी खर्च करावा लागला. तक्रारदारांनी मुंबई येथे परत आल्यावर सा.वाले यांचेकडे विमा कराराप्रमाणे मागणी केली व सा.वाले यांनी विमा कंपानीशी संपर्क प्रस्तापित करुन माहिती देण्यात येईल असे कळविले. तथापी सा.वाले यांनी तक्रारदारांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्ती बद्दल कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांनी तक्रारदारांना दिलेल्या क्रेडीट कार्डच्या देय रक्कमेची काही रक्कम रोखुन धरली व विम्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय क्रेडीट कार्डवरील देय रक्कम देणार नाही अशी भुमिका घेतली. तरी देखील सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्डवरील देय रक्कमेबद्दल तगादा सुरुच ठेवला. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे दिनांक 14.6.2011 रोजी पत्र पाठवून आपली भुमिका स्पष्ट केली. तरी देखील सा.वाले यांनी काहीच कार्यवाही केलेली नसल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार मंचा समोर दाखल केली व त्यामध्ये तक्रारदारांच्या दिनांक 14.6.2011 चे पत्राप्रमाणे सा.वाले यांनी कार्यवाही केल्याशिवाय तक्रारदार क्रेडीट कार्डवरील देय बाकी अदा करणार नाही अशी दाद मागीतली.
2. तक्रारीची नोटीस सा.वाले यांना पाठविण्यात आली होती. ती नोटीस प्राप्त होऊन देखील सा.वाले गैरहजर राहील्याने त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा करण्यात आले.
3. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
4. प्रस्तुत मंचाचे तक्रार, शपथपत्र, कागदपत्र, यांचे वाचन केले व त्यानुसार तक्रारीच्या निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात..
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्डच्या देय बाकीच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2. | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
5. तक्रारदारांनी सा.वाले यांनी क्रेडीट कार्ड सुविधा दिली होती ही बाब तक्रारदारांनी जी क्रेडीट कार्डची स्टेटमेंट दाखल केली त्यावरुन दिसून येते. तक्रारदारांनी एच.डी.एफ.सी.इरगो कंपनी कंडून विमा पॉलीसी घेतली होती ही बाब देखील विमा प्रमाणपत्र पृष्ट क्र.10 या वरुन दिसून येते. तक्रारदारांनी विम्याचा पहीला हप्ता रु.9,613/- क्रेडीट कार्डव्दारे अदा केला होता ही बाब दिनांक 12.6.2010 रेाजीचे क्रेडीट कार्डचे देयक यातील नोंदीवरुन दिसून येते. तक्रारदारांनी तक्रारीसोबत विशाखापट्टनम येथील इस्पीतळात इलाज करुन घेतल्या बाबतची काही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदारांनी मुंबई येथे परत आल्यानंतर सा.वाले यांना विमा कराराअंतर्गत प्रतिपुर्तीची मागणी करणारे पत्र लिहीले होते व सा.वाले यांनी त्यांचे दिनांक 28.6.2011 चे पत्राव्दारे तक्रारदारांना असे कळविले की, विमा कंपनीकडून माहिती घेऊन तक्रारदारांना उत्तर देण्यात येईल.
6. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले यांनी विमा कंपनीकडून कुठलीही माहिती घेतली नाही. अथवा तक्रारदारांना कुठलेही उत्तर दिले नाही. परीणामतः तक्रारदारांनी क्रेडीट कार्ड खात्यातील देय रक्कम अडवून ठेवली. तक्रारदारांनी तक्रारीसोबत क्रेडीट कार्ड देयकांच्या प्रती हजर केलेल्या आहेत. त्याचे वाचन केले असतांना असे दिसून येते की, तक्रारदारांनी दिनांक 14.6.2011 चे पत्रासोबत रु.21,544/- क्रेडीटकार्ड खात्यामध्ये जमा केले व तक्रारदारांचे त्या पत्रातील कथना प्रमाणे तक्रारदारांना रु.35,418/- देणे होते. तक्रारदारांचे असे कथन आहे की, तक्रारदारांनी त्यांची विमा कराराअंतर्गत केलेली मागणी मान्य होईपर्यत विमा हप्त्याची रक्कम रु.9,613/- अधिक व्याज रु.1,730/- अडवून ठेवले होते. परंतु देयकांची पहाणी केली असतांना असे दिसून येते की, त्यापेक्षा अधिक रक्कम तक्रारदार हे क्रेडीट कार्ड खात्याअंतर्गत सा.वाले यांना देणे लागत होते. क्रेडीट कार्ड देयकांच्या ज्या प्रती दाखल केलेल्या आहेत, त्यावरुन पुढील तपशिल दिसून येतो.
अ.क्र. | देयक दिनांक | एकूण देय रक्कम | अदा केलेली रक्कम | खरेदी रक्कम वित्त भार व एकूण देय रक्कम. |
1. | 12.6.2011 | 37,274/- | 4,387/- | 1,212/- + 525=34,625/- |
2. | 12.7.2011 | 34,625/- | 21,544/- | 2,364/- + 358=15,804/- |
3. | 12.8.2011 | 15,804/- | 0 | 605/- +528 =16,938/- |
4. | 12.9.2011 | 16,938/- | 0 | 609/- +565 =18,113/- |
5. | 12.10.2011 | 18,113/- | 0 | 611/- +584 =19,310/- |
6. | 12.11.2011 | 19,310/- | 0 | 617/- +644 =20,572/- |
7. सा.वाले बँकेने दिनांक 3.10.2011 पत्र पृष्ट क्र.26 व्दारे तक्रारदारांकडून रु.18,113.84 येणे बाकी आहे असे तक्रारदारांना कळविले होते. त्यानंतर सा.वाले बँकेने तक्रारदारांना दिनांक 11.10.2011 रोजी नोटीस दिली होती. व देय रक्कम अदा करण्याची सूचना केली होती. तरी देखील तक्रारदारांनी पुढील देय रक्कम अदा केली नाही.
8. तक्रारदारांनी दिनांक 14.6.2011 पत्र पृष्ट क्र.17 व्दारे सा.वाले यांना क्रेडीट कार्डाची संपूर्ण रक्कम अदा केल्याचे कळविले. तक्रारदारांनी त्या पत्राव्दारे अदा केलेली रक्कम रु.21,544/- ही सा.वाले यांनी क्रेडीट कार्ड खात्यामध्ये जमा केलेली आहे. तरी देखील वर दर्शविलेली तालीकेतील नोंदी असे दर्शवितात की, तक्रारदारांनी क्रेडीट कार्डाची संपूर्ण देय रक्कम अदा केली नव्हती व क्रेडीट कार्डाचा वापर पुढे चालुच ठेवला. खरेदी केली परंतु कुठलीच रक्कम अदा केली नाही, त्यामुळे देय बाकी वाढत राहीली.
9. त्यातही महत्वाची बाब म्हणजे तक्रारदारांची विमा कराराअंतर्गतची मागणी जर सा.वाले विमा कंपनीने मान्य केली नसेल तर तक्रारदारांनी विमा कंपनीचे विरुध्द कार्यवाही करणे आवश्यक होते. प्रस्तुतचे प्रकरणामध्ये तक्रारदारांनी विमा कंपनीस पक्षकार केले नाही, तर तक्रार केवळ सा.वाले बँके विरुध्द दाखल केली. सा.वाले बँकेने दिलेल्या क्रेडीट कार्डाचा वापर व त्या वापरापोटी सा.वाले बँकेस देय असलेली रक्कम हा मुद्दा व तक्रारदारांनी एच.डी.एफ.सी.इरगो कंपनी कडून घेतलेली विमा पॉलीसी व त्या अंतर्गत केलेली मागणी हा मुद्दा हे दोनही मुद्दे वेगळे असून तक्रारदारांनी मात्र त्याची गुंतागुंत केलेली आहे. व विमा करारा अंतर्गतचे मागणीसाठी क्रेडीट कार्डची रक्कम अडकून ठेवली आहे. ही बाब कुठल्याही दृष्टीने समर्थनीय नाही.
10. वरील परिस्थितीत सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्डचे देय रक्कमेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढता येत नाही.
11. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 573/2011 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 28/08/2013