निकालपत्रः- श्री.ग.ल.चव्हाण, सदस्य ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारदार हे सामनेवाले यांचे वेतनखातेदार आहेत. त्याचा खाते क्र.0015105003952 असा आहे. या खात्याला रक्कम काढून घेण्यासाठी एटीएमची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यानुसार, दि.05.03.2008 रोजी तक्रारदाराने एटीएमव्दारा रक्कम रु.2,500/- काढली. त्यानंतर त्याच्या खात्यात रु.1,48,404.48पैसे इतकी रक्कम शिल्लक राहीली. दि.08.03.2008 रोजी तक्रारदाराने त्याच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याची पाहणी केली, त्यावेळी त्याच्या खात्यातून रक्कम रु.1,45,000/- काढून घेतल्याचे दिसून आले, म्हणून ही बाब सामनेवाले यांचे हेल्पलाईनवरुन सामनेवाले क्र.1 व 2 यांना कळविले. त्याचा तक्रार क्र.196070169 असा आहे. त्याच दिवशी दुपारी 2 वाजता तक्रारदाराने ही बाब सामनेवाले यांच्या निर्देशनास आणून तक्रारदाराने ही रक्कम काढली नाही असे सांगितले. ही रक्कम तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे श्री.मोतीलाल शिसोदीया यांच्या खात्यात हस्तांतरीत झालेली होती. या प्रकरणी सामनेवाले यांनी तक्रारदाराचे हितसंरक्षण करावे व त्यासाठी त्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी विनंती तक्रारदाराने सामनेवाले यांना केली. दि.08 व 09 मार्च, 2008 रोजी सुट्टया होत्या म्हणून तक्रारदाराने दि.10.03.2008 रोजी सामनेवाले यांची भेट घेऊन दि.08.03.2008 चे पत्राची पोच घेऊन सामनेवाले यांना दिले. प्रस्तुत प्रकरणी झालेल्या गैरव्यवहाराबद्दल तक्रारदाराने त्याचा आक्षेप सामनेवाले यांचेकडे नोंदविला व संबंधीत रक्कम तक्रारदाराचे खात्यात पुन्हा जमा करावी अशी विनंती केली. सदरहू रक्कम तक्रारदाराच्या खात्यातून काढण्यात आल्याबाबत बँकेच्या विवरणपत्राची प्रत सोबत जोडली आहे. तक्रारदाराचे म्हणणे कि, ही रक्कम त्याने स्वतः काढलेली नाही किंवा श्री. मोतीलाल सिसोदिया यांचेकडे हस्तांतरीत केलेली नाही. त्या व्यक्तीशी तक्रारदाराचा काहीही संबंध नाही, त्या व्यक्तीला तक्रारदार ओळखत नाही, असे त्यांनी सामनेवाले यांना सांगितले. तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे आक्षेप नोंदवून देखील गैरव्यवहाराने काढण्यात आलेली रक्कम 48 तासाच्या कालावधीमध्ये त्यांच्या खात्यात जमा केली नाही, यामध्ये सामनेवाले यांचे सेवेत कमतरता असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. 2 तक्रारदाराच्या खात्यात रु.2,000/- ते 3,000/- ची रक्कम शिल्लक राहिली. अशा परिस्थितीत आर्थिक कुंचबना झाली म्हणून त्यांनी दि.12.03.2008 च्या पत्राने सामनेवाले यांना पुन्हा विनंती करुन ती काढण्यात आलेली रक्कम खात्यात जमा करण्यास विनंती केली तसेच या प्रकरणाचा शोध घ्यावा अशीही विनंती केली. यावेळी त्यांनी त्यांना मिळालेला ई-मेल सामनेवाले यांच्या निर्देशनास आणला. तरी देखील सामनेवाले यांचेकडून तत्काळ कार्यवाही करण्यात आली नाही. मार्चच्या शेवटच्या आठवडयात सामनेवाले यांचेकडून दिलगिरी व्यक्त केल्याचे पत्र मिळाले. त्यानंतर, संबंधित खात्यातुन रक्कम रु.7,244/- ची रक्कम काढण्यात आल्याची माहिती सामनेवाले यांचेकडून देण्यात आली. सामनेवाले यांनी केलेल्या चौकशी प्रमाणे वरील रक्कम ही श्रीमती तनुजा ज्ञानदोरिया हिच्या नावे हस्तांतरीत झाली होती आणि या रक्कमेवर तिने तिचा हक्क सांगितला. म्हणून सामनेवाले यांनी तक्रारदाराला पोलीस तक्रार करण्यासाठी विनंती केली. त्याप्रमाणे, तक्रारदाराने श्री. मोतीलाल सिसोदिया नावाने पोलीस तक्रार नोंदविली. तक्रारदाराने या प्रकरणी सामनेवाले यांचेशी सातत्याने संपर्क ठेवून विनंती केली, दुरध्वनीवरुन देखील सातत्याने प्रयत्न केला, प्रत्येक वेळी थोडा वेळ थांबा असे सांगण्यात आले. परंतु सामनेवाले यांचेकडून काहीही सांगण्यात आलेले नाही किंवा लेखीही देण्यात आलेले नाही किंवा गैरमार्गाने काढण्यात आलेली रक्कम खात्यात जमा करण्यात आलेली नाही. नंतर, दि.15.04.2008 रोजी अनाधिकृतपणे काढण्यात आलेल्या रक्कमेपैकी रु.1,37,750/- एवढी रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात आली. त्यावेळी काही कागदपत्रं करुन देण्याबाबत तक्रारदारांना सांगण्यात आले. सदरहू कागदपत्रांची पाहणी व अवलोकन करुन सामनेवाले हे आपली कातडी बचाव धोरण स्विकारल्याचे थोडक्यात या प्रकरणी तक्रारदार हे जबाबदार असल्याचे सामनेवाले यांनी गृहीत धरुन स्वतःचा बचाव कसा करता येईल याकरिता त्यांनी काही कागदपत्रांवर सहया करण्यासाठी तक्रारदाराला विनंती केली परंतु तक्रारदाराला हे मंजूर नव्हते, म्हणून तो प्रस्ताव तक्रारदाराला मान्य झाला नाही म्हणून त्यांनी नाकारला. त्यामुळे सामनेवाले यांनी खात्यात जमा केलेली रक्कम गोठवून ठेवली. त्यानंतर, एप्रिल 2008 चे विवरणपत्र तक्रारदाराला मिळाले, त्यामध्ये दि.15.04.2008 रोजी रक्कम रु.1,37,750/- तक्रारदाराच्या नावे जमा केल्याचे दिसून आले. परंतु ही रक्कम तक्रारदाराला वापरता येणार नव्हती, म्हणजेच सदरहू रक्कम गोठवून ठेवण्यात आली होती. म्हणून या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून तक्रारदाराने तक्रार अर्ज दाखल करुन खालीलप्रमाणे विनंत्या केल्या. अ सामनेवाले यांचे सेवेत कमतरता आहे तसेच त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे हे घोषित करण्यात यावे. ब सामनेवाले यांनी रक्कम रु.1,45,000/- तक्रारदाराच्या खात्यात जमा करावी व त्यावर 18% दराने व्याज द्या क तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासापोटी व गैरसोयीबद्दल नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/- द्यावी व या अर्जाचा खर्च रु.25,000/- मिळावा व अन्य दाद मिळावी. 3 सामनेवाला यांनी कैफियत दाखल करुन तक्रार अर्जातील आरोप नाकारले. तक्रार खोटी, बिनबुडाची, बेकायदेशीर व गैरसमजुतीवर आधारलेली असून तक्रारदाराने बरेच मुद्दे या मंचापासून लपवून ठेवले आहेत. सदरची तक्रार ही दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे, ती खर्चासह रद्द करण्यात यावी अशी सामनेवाला यांची विनंती आहे. 4 तक्रारदाराने त्यांच्या म्हणण्याच्या पृष्ठर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार हे सामनेवाले यांचे खातेदार असल्याचे त्यांना मान्य आहे. हे खाते दि.15.07.2002 रोजी सुरु केलेले असून त्यासाठी त्यांना एटीएमची सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, त्यांना इंटरनेट बँकींगची सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना युनिक कस्टमर आयडी नंबर व पासवर्ड देण्यात आलेला आहे. इंटरनेट बँकींगच्या विशिष्ट अशा कार्यप्रणालीनुसार तक्रारदाराने इंटरनेट बँकींगचा व्यवहार करावयाचा आहे, त्यांना देण्यात आलेला पासवर्ड व गुप्त, कोड नंबरची माहिती तक्रारदाराव्यतिरिक्त अन्य कुणाला मिळणार नाही याची दक्षता तक्रारदाराने घ्यावयाची आहे. या कार्यप्रणालीमध्ये Dual verification system ची सोयही तक्रारदारांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, त्यानुसार, इंटरनेट बँकीगचा वापर करताना तक्रारदाराने आवश्यक ती दक्षता घेऊन हा व्यवहार करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांना दिलेला पासवर्ड /गुप्तकोड क्रमांक व त्यांच्या खात्याच्या संदर्भात आवश्यकती तपशीलवार माहिती त्यांनी गुप्त ठेवून ती अन्य कोणाला कळणार याची दक्षता घेणे ही तक्रारदाराची जबाबदारी आहे. तक्रारदाराने त्याच्या खात्यातून रक्कम रु.1,45,000/- इंटरनेट बँकींगच्या माध्यमातून दि.08.03.2008 रोजी अपहार केल्याबाबतची तक्रार सामनेवाला यांचेकडे करण्यात आली, त्यानुसार बँकेने चौकशी केल्यानंतर ही रक्कम तक्रारदाराचा पासवर्ड वापरून ती रक्कम श्री.मोहीतलाल सुसोदिया अजमेर, (ऊ.प्र.) यांचे नावे हस्तांतरीत झाल्याचे दिसून आले. त्यापैकी रक्कम रु.7,500/- ही रक्कम कुमारी तनुजा हिच्या नावे वर्ग झाली होती आणि तिचा त्यावर पूर्ण अधिकार होता असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. सामनेवाला यांच्या प्रयत्नानंतर तक्रारदाराच्या खात्यातून अपहार झालेल्या रक्कमेतून रक्कम रु.1,37,500/- ही त्याने परत मिळविली. ही रक्कम सामनेवाला यांनी परत मिळविली नसती तर तक्रारदाराचे नुकसान झाले असते म्हणून यामध्ये त्यांचे सेवेत कमतरता नाही असे त्यांचे म्हणणे आहे. 5 तक्रारदारांनी त्यांच्या इंटरनेट बँकींगच्या संदर्भात आवश्यक ती गोपनीयता ठेवून व्यवहार करणे ही त्यांची जबाबदारी आहे, यामध्ये बँकेची कोणतीही जबाबदारी येत नसल्यामुळे त्यासाठी तक्रारदार इंटरनेट बँकींगची कार्यप्रणाली लक्षात घेता, सामनेवाला यांना जबाबदार धरु शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रारदार यांच्या खात्यातून इंटरनेट बँकींग माध्यमातून संबंधीत रक्कमेचा अपहार झाल्यानंतर तक्रारदाराने त्याबाबतची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविणे ही त्याची जबाबदारी होती परंतु सामनेवाला यांच्या सांगण्यावरुन त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली. सामनेवाला यांनी तक्रारदार यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदरहू प्रसंगीचा त्यांनी शोध घेऊन रक्कम रु.1,37,500/- सामनेवाला यांनी ताब्यात घेतली परंतु ही रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यापूर्वी सामनेवाला यांना तक्रारदाराकडून काहीही दस्तऐवज बँकेच्या हिताच्या दृष्टीने करुन घ्यायचा होता व तसा दस्तऐवज तक्रारदाराने बँकेच्या हिताच्या दृष्टीने करून द्यावा अशी त्याने तक्रारदाराला विनंती केली परंतु तक्रारदाराने सामनेवाला यांची विनंती अमान्य केली. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या खात्यात परत मिळविलेली रक्कम जमा केली परंतु तक्रारदाराने आवश्यकती कागदपत्रं करुन न दिल्यामुळे ती रक्कम गोठवून ठेवली, त्यांच्या सेवेत कमतरता नाही असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून सदर तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी असे सामनेवाला यांची विनंती आहे. 6 तक्रार अर्ज व त्यासोबत अनुषांगिक कागदपत्रं, प्रतिनिवेदन, लेखी युक्तीवाद, सामनेवाला यांची कैफियत, इत्यादी कागदपत्रांची पाहणी व अवलोकन करुन वाचन केले. उभय पक्षकारांचा युक्तीवाद ऐकला. 7 तक्रारदार हे सामनेवाला यांचे खातेदार असून त्यांचा खात्याचा क्र.0015105003952 असा आहे. हे खाते जुलै, 2002 पासुन चालु करण्यात आले आहे. या खात्याला एटीएम व इंटरनेट बँकींगच्या सवलती सामनेवाला यांचेकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तक्रारदाराने दि.05.03.2005 रोजी एटीएमचा वापर करुन रु.2,500/- काढले. दि.08.03.2008 रोजी त्याच्या खात्यात रक्कम किती शिल्लक आहे याची पाहणी करण्यासाठी तक्रारदार गेला असता त्या दिवशी सकाळी त्याच्या खात्यातून रक्कम रु.1,45,000/- काढल्याचे दिसून आले, याप्रकरणी सामनेवाला यांचेकडून हेल्पलाईनवरुन तक्रार नोदंविली, त्याचा तक्रार क्र.196070169 असा आहे. त्यानंतर, तक्रारदारांनी त्यांच्या दि.08.03.2008 च्या अर्जाने दि.10.03.2008 च्या अर्जाने सामनेवाला यांचेकडे त्याच्या खात्यातून अपहार झाल्याची लेखी तक्रार सामनेवाला यांचेकडे दाखल केली. तसेच दि.14.03.2008 रोजी या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. सामनेवाला यांचेकडे त्याच दिवशी तक्रार करून देखील, सामनेवाला यांचेकडून तक्रारदाराला काहीही प्रतिसाद मिळालेला नाही किंवा त्यांनी तक्रारदाराच्या अपहार झालेल्या रक्कमेचा शोध 48 तासांत घेतलेला नाही. यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदाराने त्यांच्या खात्यातून रक्कम रु.1,45,000/- काढून घेतल्याबाबतचे विवरणपत्र दाखल केले आहे, त्यावरुन हे सिध्द होते कि, इंटरनेट बँकेचा वापर करुन कोणीतरी सदर रक्कमेचा अपहार केले आहे. परंतु या प्रकरणी, सामनेवाला बँकेची निश्चित काय जबाबदारी आहे याविषयी तक्रारदाराने कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही त्यामुळे त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य असल्याचे दिसून येत नाही. 8 दि.08.03.2008 रोजी तक्रारदार यांच्या खात्यातून रक्कम रु.1,45,000/- काढून घेतल्याचे संबंधित विवरणपत्रांवरून दिसून येते. ही घटना दि.08.03.2008 रोजी घडली. त्याबाबतची, तक्रार सामनेवाला यांचेकडे केल्यानंतर, सामनेवाला यांनी त्याचा शोध घेतल्यानंतर इंटरनेट बँकेच्या माध्यमामधून तक्रारदाराच्या खात्यातून वरील रक्कम श्री.मोहितलाल सिसोदिया अजमिर, (उ.प्र.) या सामनेवाला यांच्या अजमिर येथील खातेदाराकडून या रक्कमेचा अपहार झाल्याची बाब निर्देशनास आली. त्यानंतर, त्यांनी त्या खातेदाराचे खाते गोठविण्याची कार्यवाही केली परंतु त्यावेळी, रक्कम रु.7,500/- एवढी रक्कम कुमारी तनुजा हिच्या नावे वर्ग केल्याचे निर्देशनास आले या रक्कमेवर कुमारी तनुजा तिचा हक्क सांगत होती, त्यामुळे ती रक्कम सामनेवाला यांना गोठविता आली नाही. परंतु श्री.मोहितलाल सिसोदिया अजमिर, (उ.प्र.) यांच्या खात्यातून गोठविण्यात आलेल्या रक्कमेवर संबंधित खातेदाराकडून ही रक्कम त्याची असल्याचा हक्क त्याने दाखविलेला नाही, म्हणून सामनेवाला यांनी श्री.मोहितलाल सिसोदिया अजमिर, (उ.प्र.) याचे खात्यातून परत मिळविलेली रक्कम रु.1,37,500/- ही तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यापूर्वी काही कागदपत्रांवर तक्रारदाराने बँकेच्या हिताच्या दृष्टीने सहया करुन देण्याचा प्रस्ताव तक्रारदारासमोर ठेवण्यात आला परंतु तक्रारदाराने सामनेवाला यांचा हा प्रस्ताव नाकारला, त्यामुळे सामनेवाला यांनी वरील रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा केली परंतु ही रक्कम त्यांनी गोठवुन ठेवली, कारण या प्रकरणी भविष्यात काही परिस्थिती निर्माण झाल्यास सदरहू रक्कम ही तक्रारदाराचीच आहे याबाबतची शहानिशा करण्याच्या दृष्टीने व बँकेच्या प्रशासनाच्या हिताच्या दृष्टीने सामनेवाला यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे आवश्यकत्या दस्तऐवजांवर तक्रारदाराने सहयां करुन देणे ही त्यांची जबाबदारी होती परंतु त्यानुसार, त्यांनी कृती केली नाही म्हणून सामनेवाला यांनी सदरहू रक्कम त्याच्या खात्यात जमा करुन देखील ती गोठवून ठेवली, यामध्ये सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता असल्याचे म्हणता येणार नाही, कारण बँकेच्या हिताच्या दृष्टीने अशी दक्षता घेणे ही सामनेवाला यांची जबाबदारी आहे हे प्राप्त परिस्थितीत नाकारता येणार नाही. 9 तक्रारदार हे सामनेवाला यांचे खातेदार झाल्यानंतर त्यांना एटीएम व इंटरनेट बँकींगची सवलत देण्यात आली होती. इंटरनेट बँकींग वापरताना विशिष्ठ अशी कार्यप्रणाली लक्षात घ्यावी लागते व त्यानुसार, इंटरनेट बँकींगचा वापर संबंधितांना करावा लागतो अशी कार्यप्रणाली अवलंबिताना त्या संबंधीचा पासवर्ड व अनुषांगिक तपशील याबाबतची माहिती संबंधितांनी स्वतः शिवाय अन्य कोणाला कळणार नाही याबाबतची दक्षता त्यांनी घेणे ही त्यांची जबाबदारी आहे. म्हणून इंटरनेट बँकींगचा वापर करताना त्या संबंधीची गोपनीयता बाळगणे ही तक्रारदाराची जबाबदारी आहे. कारण याबाबतचा व्यवहार हा संबंधित खातेदाराकडून वैयक्तिकरित्या करण्यात येतो, त्यामुळे त्यांना यासाठी सामनेवाला यांना जबाबदार धरता येणार नाही, यामध्ये सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. 10 तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे तक्रार नोंदविल्यानंतर त्याच बँकेच्या अजमेर येथील श्री.मोहितलाल सिसोदिया अजमिर, (उ.प्र.) यांच्या खात्यामध्ये तक्रारदाराच्या खात्यातील रक्कम वर्ग झाल्याचे दिसून आल्यानंतर रक्कम रु.7,500/- वगळता रक्कम रु.1,37,500/- सामनेवाला बँकेने परत मिळविली. ही रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यापूर्वी तक्रारदाराकडून बँकेच्या हिताच्या दृष्टीने काही संबंधित कागदपत्रांवर तक्रारदाराच्या सहया करुन घ्यायच्या होत्या म्हणून तसा प्रस्ताव तक्रारदाराला दिला परंतु तक्रारदाराने तो प्रस्ताव अमान्य केला. सामनेवाला बँकेने या प्रकरणी बँकेच्या हिताच्या दृष्टीने भविष्यात काही प्रश्न निर्माण झाल्यास या प्रकरणी शहानिशा करण्याच्या दृष्टीने व बँकेच्या हिताच्या दृष्टीने संबंधित दस्तऐवज तक्रारदार यांचेकडून करून घेणे हे गैरवाजवी आहे असे म्हणता येणार नाही. 11 तक्रारदाराने सामनेवाला यांचे सेवेत कमतरता असल्याचे सिध्द केलेले नाही, परंतु सामनेवाला यांनी संबंधित प्रकरणाचा छडा लावल्यानंतर, अजमेर येथील त्याच बँकेच्या खातेदाराकडे या रक्कमेचा शोध लागला. त्यानंतर, तक्रारदार यांचेकडून वचननामा घेऊन संबंधित रक्कम तक्रारदाराच्या खात्यात तात्काळ जमा करणे ही त्यांची जबाबदारी होती. परंतु सामनेवाला यांच्या प्रयत्नाप्रमाणे तक्रारदाराने या प्रकरणी आवश्यक त्या कागदपत्रं करुन देण्याबाबत नकार दिल्यामुळे सामनेवाला यांनी संबंधित रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा करुन देखील ती रक्कम आर्थिक व्यवहारापासून गोठवून ठेवली, ही सामनेवाला यांची कृती चुकीची आहे असे म्हणता येणार नाही. उक्त विवेचन लक्षात घेता, तक्रार अर्जामध्ये काही तथ्य असल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे या प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतो. आदेश (1) तक्रार क्र.60/2011(368/2008) रद्दबातल करण्यात येते. (2) या प्रकरणी उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. (3) आदेशाच्या प्रमाणिंत प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |