Maharashtra

Mumbai(Suburban)

2008/188

MR. DEEPAK JAYENDRA MEHTA, - Complainant(s)

Versus

HDFC BANK LTD - Opp.Party(s)

19 Oct 2015

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG, NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN , BANDRA (E), MUMBAI-400051
 
Complaint Case No. 2008/188
 
1. MR. DEEPAK JAYENDRA MEHTA,
5,B-W,NARENDRA COMPLEX, S.V.ROAD, DHAI KHADI, CROSS VAISHALI NAGAR, DAHISAR (E)MUMBAI
...........Complainant(s)
Versus
1. HDFC BANK LTD
RETAIL ASSETS DIVISION, 3 RD FLOOR, TRADE STAR BLDG, OPP. J.B.NAGAR, ANDHERI KURLA RD, ANDHERI (E) M
2. M/S. OM SAI MOTORS PVT. LTD.
JYOTI PLAZA, S.V.ROAD, KANDIVALI (W)MUMBAI
Mumbai(Suburban)
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. A.Z.TELGOTE PRESIDENT
 HON'ABLE MR. S.R.SANAP MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

मा. श्री. ए. झेड. तेलगोटे, अध्‍यक्ष

      मा. शां. रा. सानप, सदस्‍य 

       तक्रारदारातर्फे वकील          - श्री. दिपक नाईक,

      सामनेवाले 1 व 2 तर्फे वकील  -  श्री. पाटील,

       सामनेवाले क्र 3 करीता        - श्रीमती. बिंदु जैन,

 

आदेश - मा. श्री. ए. झेड. तेलगोटे, अध्‍यक्ष ः-         ठिकाणः बांद्रा

 

  निकालपत्र

  (दिनांक 19/10/2015 रोजी घोषित)

 

1.   मा. राष्‍ट्रीय आयोग नवी दिल्‍ली यांनी रिव्‍हीजन पिटीशन नं. 2544/2011 मध्‍ये दि. 14/01/2013 रोजी पारीत केलेल्‍या आदेशान्‍वये उभयपक्षांना जिल्‍हा मंचासमोर पुरावा सादर करण्‍याची संधी देऊन प्रस्‍तुत तक्रारीची फेरसुनावणी घेण्‍याचे निर्देश मंचाला दिले व त्‍यानूसार प्रस्‍तुत तक्रारीची फेरसुनावणी घेण्‍यात आली.

2.  सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली असा आरोप करून तक्रारदाराने प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.

3.    तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार खालीलप्रमाणे आहे.

4.    मे. गुरूदेव ट्रॅव्‍हल कनेक्‍शन हया फर्मशी संबधीत असलेले एजंट श्री. विलास सावंत हे ऑगष्‍ट 2005 मध्‍ये तक्रारदाराकडे आले व त्‍यांनी तक्रारदाराला टाटा इंडिगो एल.एक्‍स कार खरेदी करण्‍यास प्रवृत केले व सदर  कारचा चांगला परतावा देऊ केला. सदर, एजंट श्री. विलास सावंत यांच्‍या प्रलोभनाला बळी पडून तक्रारदाराने त्‍यांना डाऊन पेमेंटपोटी रू.1,40,000/-दिले. त्‍यानंतर, तक्रारदाराला सामनेवाले क्र 3 च्‍या जे चारचाकी वाहनाचे डिलर आहेत, ऑफिसमध्‍ये नेण्‍यात आले ज्‍याठिकाणी तक्रारदाराकडून काही कागदपत्रे करून घेण्‍यात आली. सदर एजंटने सामनेवाले क्र 3 यांना डाऊन पेमेंटची रक्‍कम रू. 1.40,000/-,अदा केली खरेदीची उर्वरीत रक्‍क्‍म अदा करण्‍यासाठी तक्रारदाराला सामनेवाले क्र 1 व 2 बॅकेकडून कर्ज मिळण्‍यासाठी अर्ज करण्‍यास सांगण्‍यात आले. त्‍यानूसार तक्रारदाराने सामनेवाले क्र 1 व 2 बॅकेकडे अर्ज सादर केला सामनेवाले क्र 1 व 2 यांनी तक्रारदाराला कार लोन मंजूर केले व त्‍याबाबत दि.24/10/2005 रोजी पत्राद्वारे कळविले. तक्रारदाराने कर्जाची परतफेड दरमहा रू. 9,507/-,याप्रमाणे करावयाची होती. तक्रारदाराने कर्जाची परतफेड त्‍यांच्या डेकन मंर्चंट को.ऑ. बँक लि. दहीसर (पू.) यांच्‍याकडे असलेल्‍या खात्‍यामधून करण्‍याची व्‍यवस्‍था केली. कर्ज मंजूर झाल्‍यानंतर दुस-या महिन्यापासून सामनेवाले क्र 1 व 2 यांनी तक्रारदाराकडून कर्जाचे हप्‍ते वसुल करण्‍यास सुरूवात केली त्‍यांनी तक्रारदाराकडून एकुण 14 हप्‍त्‍याची रक्‍कम वसुल केली. मात्र, या 14 महिन्‍याच्‍या कालावधीत सामनेवाले क्र 1 ते 3 यांनी तक्रारदाराच्‍या ताब्‍यात वाहन दिले नाही व त्‍याऐवजी त्‍यांनी तक्रारदाराला केवळ त्‍याच्‍या वाहनाचा तपशिल कळविला. तक्रारदाराने सामनेवाले क्र 1 व 2 यांच्‍याकडून कर्ज घेऊन सामनेवाले क्र 3 कडून टाटा इंडिगो एल.एक्‍स कार नोंदणी क्र एम.एच 04/सीई/3680 खरेदी केली होती. तथापी, सदर कार सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या ताब्‍यात दिली नाही. म्‍हणून तक्रारदाराने सदर एजंटच्‍य ऑफिसमध्‍ये जाऊन चौकशी केली असता सदर एजंटने त्‍यांचे ऑफिस बंद केल्‍याचे व तो फरार असल्‍याचे आढळून आले. तक्रारदाराने ही बाब सामनेवाले क्र 1 व 2 यांना दि. 01/11/2006 रोजी पत्राद्वारे कळविले. सामनेवाले क्र 1 व 2 यांनी कोणतीही चौकशी न करता तक्रारदाराकडून कर्जाचे हप्‍ते वसुल करणे चालु ठेवले. तक्रारदाराने नंतर आर.टी.ओ कार्यालयामध्‍ये जाऊन कागदपत्रांची तपासणी केली त्‍यावेळी सदरचे वाहन सामनेवाले क्र 1 ते 3 यांनी संगनमत करून श्री. दिपक देवेंद्र मेहता राहणार- भोईसर ठाणे या इसमाच्‍या ताब्‍यात दिल्‍याचे आढळून आले. त्‍यानंतर तक्रारदाराने दि.14/01/2008 रोजी सामनेवाले क्र 1 व 2 यांना वरील बाब पत्राद्वारे कळविली व कर्ज वसुली बंद करण्‍याची विनंती केली. तथापी, सामनेवाले क्र 1 व 2 यांनी त्‍यांची कोणतीही दखल घेतली नाही व तक्रारदाराकडून कर्ज वसुली करणे सुरू ठेवले. सामनेवाले क्र 1 व 2 यांनी तक्रारदाराकडून रू. 1,33,098/-,वसुल केले व अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली तसेच अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला ज्‍यामुळे तक्रारदाराला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला व त्‍यांच्‍या व्‍यवसायावर परिणाम झाला म्‍हणून सामनेवाले यांच्‍याकडून  नुकसान भरपाई मिळण्‍यास तसेच वसूल केलेली रक्‍कम परत मिळण्‍यास ते पात्र आहेत. सामनेवाले यांना वकीलामार्फत नोटीस पाठवूनही त्‍यांनी तक्रारदाराची विनंती मान्‍य केली नाही शेवटी त्‍यांना प्रस्‍तुतची तक्रार दाखल करावी लागली.

5.    सामनेवाले यांनी वसुल केलेली रक्‍कम परत मिळावी, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाईपोटी रू.1,00,000/-,व्‍यवसायातील नुकसानीबद्दल रू.2,00,000/-, व तक्रारीचा खर्च सामनेवाले यांच्‍याकडून मिळावा तसेच सामनेवाले क्र 1 व 2 यांनी थकबाकीदाराच्‍या यादीत टाकलेले तक्रारदाराचे नाव काढून टाकावे, तक्रारदाराकडून पुढील कर्जाची वसुली थांबवावी व तक्रारदाराविरूध्‍द विविध न्‍यायालयात दाखल केलेली प्रकरणे मागे घ्‍यावीत अशी विनंती तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीत केली.

6.    तक्रार दाखल करून घेतल्‍यनंतर सामनेवाले यांना नोटीस पाठवून लेखीजबाब दाखल करण्‍याचे निर्देश दिले. नोटीस, प्राप्‍त झाल्‍यानंतर सामनेवाले क्र 1 व 2 यांच्‍यातर्फे प्रतिनीधी श्री. प्रमोद कापडी यांनी तर सामनेवाले क्र 3 तर्फे प्रतिनीधी श्री. उदय शेट्टी यांनी मंचासमक्ष हजर होऊन लेखीजबाब दाखल केला. सामनेवाले क्र 1 व 2 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीमध्‍ये त्‍याची फसवणुक झाल्‍याबद्दल तक्रार उपस्थित केली आहे. तथापी, अशी तक्रार ग्रा.सं.कायदयाच्‍या कक्षेत येत नसल्‍यामूळे ती चालविण्‍याचा  अधिकार ग्राहक मंचाला नाही व या कारणास्‍तव ती फेटाळण्‍यास पात्र आहे. सामनेवाले क्र 1 व 2 यांनी पुढे असेही कथन केले आहे की, तक्रारदाराने मुख्‍यतः श्री. विलास सावंत यांच्‍याविरूध्‍द तक्रार केली आहे. तसेच त्‍यांनी  श्री. विलास सावंत, श्री. संदिप कादंलकर, श्री. अजित सावंत यांच्याविरूध्‍द फसवणुक केल्‍याबाबत पेालीसस्‍टेशनमध्‍ये एफ.आय.आर दाखल केला. सदर इसमाशी सामनेवाले क्र 1 व 2 यांचा कोणताही संबध नाही. तक्रारदाराने एफ.आय.आर मध्‍ये सामनेवाले क्र 1 व 2 विरूध्‍द कोणतेही आरोप केले नाहीत. अशा परिस्थितीत सामनेवाले क्र 1 व 2 विरूध्‍द प्रस्‍तुतची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. सामनेवाले क्र 1 व 2 यांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदाराने कार खरेदी करण्‍यासाठी त्‍यांच्‍याकडे कार लोनसाठी अर्ज सादर केला होता. सामनेवाले बँकेने तक्रारदाराला रू.04,51,000/-,एवढे कर्ज मंजूर केले व कर्ज मंजूर करतांना सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्‍यात आली होती. कर्ज मंजूर झाल्‍याबाबत सामनेवाले बँकेने तक्रारदाराला दि.24/10/2005 रोजी पत्राद्वारे कळविले. तक्रारदाराने दरमहा रू. 9,507/-,याप्रमाणे कर्जाची परतफेड करावयाची होती व त्‍यानूसार सामनेवाले क्र 1 व 2 यांनी तक्रारदाराच्‍या सूचनेवरून त्‍यांच्‍या खात्‍यातुन कर्जाची वसुली केली. तक्रारदाराला कारचा ताबा देण्‍याशी सामनेवाले बँकेशी संबध नाही. सामनेवाले बँकेने तक्रारदाराला कधीही दोषपूर्ण सेवा दिली नाही किंवा अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला नाही. तथापी, तक्रारदाराने खोटे आरोप करून प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे जी फेटाळण्‍यास पात्र आहे असे कथन करून शेवटी तक्रार फेटाळण्‍यात यावी अशी विनंती सामनेवाले क्र 1 व 2 यांनी केली.

7.   सामनेवाले क्र 3 यांनी आपल्‍या लेखीजबाबात असे कथन केले आहे की, त्‍यांचा व्‍यवहार तक्रारदाराशी झाला नसून तो श्री. दिपक देवेंद्र मेहता रा. भोईसर ठाणे या इसमाशी झाला आहे. सामनेवाले क्र 3 यांचा तक्रारदारांशी काहीही संबध नाही व तक्रारदार हे त्‍यांचे ग्राहक देखील नाहीत. अशा परिस्थितीत सामनेवाले क्र 3 यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा देण्‍याचा प्रश्‍नच उद्दभवत नाही व या एकमेव कारणास्‍तव तक्रार फेटाळण्‍यास पात्र आहे. सामनेवाले क्र 3 यांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारीमधील कथनांवरून तक्रारीमध्‍ये उपस्थित केलेला वाद हा दिवाणी व फौजदारी न्‍यायालयाच्‍या कक्षेत येत असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते सदर वादावर निर्णय देण्‍याचा अधिकार ग्राहक मंचाला नाही व याही कारणास्‍तव तक्रार फेटाळयास पात्र आहे. तक्रारदाराने तक्रारीत केलेले इतर आरोप सामनेवाले क्र 3 यांनी फेटाळून लावत असे कथन केले आहे की, सामनेवाले यांना केवळ त्रास देण्‍याच्‍या उद्देशाने तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केली आहे. ती फेटाळण्‍यास पात्र आहे. सबब, ती फेटाळण्‍यात यावी अशी विनंती सामनेवाले क्र 3 यांनी केली.

8.    तक्रार सिध्‍द करण्‍यासाठी तक्रारदाराने आपले पुराव्‍याचे शपथपत्र व निशाणी 3 सोबत काही कागदपत्रे अभिलेखावर दाखल केली. सामनेवाले क्र 1 व 2 तर्फे प्रतिनीधी श्री. रणजीत दाश व सामनेवाले क्र 3 तर्फे श्री.उदय शेट्टी यांनी पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले सामनेवाले यांचेतर्फे काही कागदपत्रे अभिलेखावर दाखल करण्‍यात आली. याव्‍यतिरीक्‍त, उभयक्षांनी आपला लेखीयुक्‍तीवाद दाखल करण्‍यात आली. उभयपक्षाच्‍या विधिज्ञांचा तोंडीयुक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. या सर्वाचे मंचाकडून अवलोकन करण्‍यात आले.

9.  तक्रारदाराची तक्रार सामनेवाले यांचा लेखी जबाब तसेच उभयपक्षांतर्फे उपस्थित करण्‍यात आलेले मुद्दे लक्षात घेता प्रस्‍तुत तक्रारीच्‍या निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात. मंचाने त्‍यावर आपला निष्‍कर्ष पुढील प्रमाणे नोंदविला आहे.  

             मुद्दे

      निष्‍कर्ष

1. सामनेवाले यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली हे तक्रारदाराने सिध्द केले आहे काय ?

      नकारार्थी

2. तक्रारदार हे सामनेवाले  यांचेकडून तक्रारीत मागितलेली  दाद मिळविण्‍यास पात्र आहेत काय?                                 

     नकारार्थी 

3. काय आदेश?                            

   अंतिम आदेशाप्रमाणे

                  

                      कारणमिमांसा

मुद्दा क्र.1 व 2

10.    सामनेवाले क्र 1 व 2 ही बँक आहे तर सामनेवाले क्र 3 ही चारचाकी वाहनाचे डिलर आहेत. तक्रारदाराने सामनेवाले क्र 3 कडून ऑगष्‍ट 2005 मध्‍ये टाटा इंडिगो एल.एक्‍स कार खरेदी केली जिचा रजि. नं. एम.एच/04/सीई/3680 असा आहे हया बाबी तक्रारीमधील कथनावरून स्‍पष्‍ट होतात. तक्रारदाराच्‍या पुराव्‍यावरून असे दिसते की, सदर कार खरेदी करण्‍यासाठी त्‍यांनी सामनेवाले क्र 1 व 2 बँकेकडून रू.4,51,000/-,एवढे कार लोन घेतले आहे. सामनेवाले क्र 1 व 2 बँकेने तक्रारदाराला दि.24/10/2005 रोजी कर्ज मंजूरी पत्र पाठविले आहे ज्‍याची प्रत तक्रारदाराने निशाणी ‘ए’ वर दाखल केली आहे. तक्रारदाराच्‍या पुराव्‍यावरून पुढे असे दिसते की, त्‍यांनी मे. गुरूदेव ट्रॅव्‍हलचे एजंट श्री. विलास सावंत यांच्‍यामार्फत सामनेवाले क्र 3 यांना डाऊन पेमेंटची रक्‍कम रू. 1.40,000/-,अदा केली. तक्रारदाराने पुराव्‍यात असे कथन केले आहे की, सामनेवाले यांनी सदरची कार तक्रारदाराच्‍या ताब्‍यात दिली नाही.

11.   तक्रारदाराच्‍या विधिज्ञांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदाराने सामनेवाले क्र 3 कडून खरेदी केलेली कार तक्रारदाराच्‍या ताब्‍यात न देता सामनेवाले यांनी ती श्री. दिपक देवेंद्र मेहता नावाच्‍या इसमाच्‍या ताब्यात दिली. सदर कारची नोंदणी आर.टी.ओ कडील रेकार्डमध्‍ये श्री. दिपक देवेंद्र मेहता या इसमाच्‍या नावानी झालेली आहे. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून कर्जाची बरीच मोठी रक्‍कम वसुल करूनही कार तक्रारदाराच्‍या ताब्‍यात दिली नाही व अशाप्रकारे सामनेवाले यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली व म्हणुन मागीतलेली दाद मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत.

12.   सामनेवाले क्र 1 व 2 यांच्‍या विधिज्ञांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदाराने खरेदी केलेली कार ही तक्रारदाराने स्‍वतः मे. गुरूदेव ट्रॅव्‍हल यांना चालविण्‍यासाठी दिली व त्‍याद्वारे तक्रारदार हे उत्पन मिळवतात. असे असतांनाही तक्रारदाराने सामनेवाले यांच्‍या विरूध्‍द खोटे आरोप करून प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने मे. गुरूदेव ट्रॅव्‍हल या कंपनीला पक्षकार म्‍हणून तक्रारीत सामील केले नाही. तक्रारदाराने सामनेवाले बँकेला कर्जाच्‍या एकुण 14 हप्‍त्‍यांची परतफेड केली आहे व या कालावधीमध्‍ये तक्रारदाराने कार ताब्‍यात मिळाली नाही अशी तक्रार कधीही केली नाही यावरून तक्रारदाराची तक्रार खोटी असल्‍याची सिध्‍द होते. सामनेवाले क्र 1 व 2 बँकेकडून कार खरेदी करण्‍यासाठी तक्रारदाराने कर्ज घेतले व ते वसुल करण्‍याचा अधिकार बँकेला आहे अशा परिस्थितीत तक्रार फेटाळण्‍यास पात्र आहे.

13.   सामनेवाले क्र 3 यांच्‍या विधिज्ञांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदाराने सामनेवाले क्र 3 यांना रक्‍कम अदा केल्‍याबाबत कोणताही पुरावा तक्रारदाराने सादर केला नाही त्‍यामुळे तक्रारदार हे सामनेवाले क्र 3 चे ग्राहक होऊ शकत नाही. शिवाय, तक्रारदाराने सामनेवाले क्र 3 विरूध्‍द तक्रारीमध्‍ये कोणतीही दाद मागीतली नाही. म्‍हणुन सामनेवाले क्र 3 विरूध्‍द तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. सामनेवाले क्र 3 च्‍या विधिज्ञांनी मा. राष्‍ट्रीय आयोगाने रिव्‍हीजन पिटीशन नं 4895/2012 (श्री. राजेंद प्रसाद त्रिपाठी विरूध्‍द मॅनेजर अग्रवाल मोटर्स  व इतर) यामध्‍ये दि.10/04/2013 रोजी व तक्रार क्र. 76/2014 (कुमारी. संगिता तुकारामजी रोकडे विरूध्‍द युनियन ऑफ इंडिया व इतर) दि. 16/05/2014 रोजी दिलेल्‍या न्‍यायनिर्णयांचा संदर्भ दिला.

14.   उभयपक्षातर्फे उपस्थित करण्‍यात आलेले मुद्दे मंचाकडून विचारात घेण्‍यात आले. तसेच उभयपक्षांनी अभिलेखावर सादर केलेल्‍या पुराव्‍याचे व कागदपत्रांचे मंचाकडून बारकाईने अवलोकन करण्‍यात आले. तक्रारदाराने कार खरेदी करण्‍यासाठी सामनेवाले क्र 1 व 2 बँकेकडून कार लोन घेतले हे तक्रारदाराच्‍या तोंडी पुराव्‍यावरून व त्‍यांनी निशाणी ‘ए’  वर दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरून सिध्‍द होते. सामनेवाले क्र 1 व 2 बँकेने तक्रारदाराला कार लोनपोटी रू.4,51,000/-,एवढे कर्ज मंजूर केले व त्‍याबाबत तक्रारदाराला दि. 24/10/2005 रोजी पत्राद्वारे कळविले. सदर पत्राची प्रत तक्रारदाराने निशाणी ‘ए’ वर दाखल केली आहे. तक्रारदाराने टाटा इंडिगो एल.एक्‍स कार जिचा रजिस्‍ट्रेशन. नं. एम.एच/04-सीई/3680 असा आहे, ही सामनेवाले क्र 3 डिलरकडून खरेदी केली. सामनेवाले क्र 3 यांनी ही बाब जरी नाकारली असली तरी तक्रारदाराने सादर केलेल्‍या पुराव्‍यावरून ती निर्विवादपणे सिध्‍द होते. सामनेवाले क्र 1 व 2 यांनी तक्रारदाराला कर्ज मंजूर केल्‍यानंतर सदरची रक्‍कम सामनेवाले क्र 1 व 2 बँकेने तक्रारदाराच्‍या वतीने परस्‍पर सामनेवाले क्र 3 यांना अदा केल्‍याचे उपलब्‍ध कागदपत्रांवरून दिसून येते. एवढेच नव्‍हे तर सामनेवाले क्र 1 व 2 यांनी तक्रारदाराकडून कर्जाच्‍या एकुण 14 हप्‍त्‍यांची रक्‍कम देखील वसुल केली आहे.

15.  तक्रारदाराची मुख्‍य तक्रार अशी आहे की, सामनेवाले यांनी त्‍यांच्‍याकडून कार खरेदीची रक्‍कम वसुल करूनही सदरची कार ही त्यांच्‍या ताब्‍यात कधीच दिली नाही. सामनेवाले यांनी संगनमत करून सदरची कार ही श्री. दिपक देवेंद्र मेहता रा. भोईसर ठाणे या इसमाच्‍या ताब्‍यात दिली. तक्रारीमधील कथनाचे व तक्रारदाराने स्‍वतः अभिलेखावर दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे बारकार्इने अवलोकन केल्‍यानंतर असे निदर्शनास येते की, तक्रारदाराने वस्‍तुस्थिती लपवून ठेवली व आपल्‍या सोयीप्रमाणे तक्रारीत कथने केली. त्‍यांनी निशाणी‘बी’ व निशाणी ‘सी’ वर दाखल केलेल्‍या कागदपत्राचे बारकाईने अवलोकन केले असता हे सिध्‍द होते की, तक्रारदाराने सामनेवाले क्र 3 कडून खरेदी केलेली कार तक्रारदाराच्‍या ताब्‍यात देण्‍यात आली व त्‍यानंतर तक्रारदाराने सदरची कार नफा कमविण्‍याच्‍या उद्देशाने मे. गुरूदेव ट्रॅव्‍हल कनेक्‍शन या कंपनीला चालविण्‍यास दिली. तक्रारदाराने निशाणी ‘बी’ वर सादर केलेला दस्‍त हा तक्रारदाराने समानेवाले क्र 1 व 2 बँकेला दि. 01/11/2008 रोजी लिहीलेले पत्र आहे ज्‍यामध्‍ये तक्रारदाराने असे नमूद केले आहे की, त्‍यांच्‍यामध्‍ये व मे. गुरूदेव ट्रॅव्‍हल कनेक्‍शनमध्‍ये करार झाला व त्‍या करारानूसार व मे. गुरूदेव ट्रॅव्‍हल यांनी दिलेल्‍या वचनानूसार तक्रारदाराने सामनेवाले बँकेकडून कार लोन घेतले. करारानूसार सदरची कार ही तक्रारदाराच्‍या नावे खरेदी करून ती मे. गुरूदेव ट्रॅव्‍हल कनेक्‍शन या कंपनीकडे चालवायला दयावयाची होती व त्‍या मोबदल्‍यात सदर कंपनीने तक्रारदाराला ठरावीक रक्‍कम अदा करावयाची होती. सदर पत्रामध्‍ये तक्रारदाराने पुढे असेही नमूद केले आहे की, मे. गुरूदेव ट्रॅव्‍हल कनेक्‍शनच्‍या कंपनीचे मालक श्री. संदिप कांदलकर यांनी सदर कारचा वापर केला व काही दिवस तक्रारदाराला कारच्‍या मोबदल्‍याची रककम अदा केली. तथापी, काही कालावधीनंतर श्री. संदिप कांदलकर यांनी तक्रारदाराला सदर कारच्‍या वापराबाबत रक्‍कम अदा करणे बंद केले व सदरची कार तक्रारदाराला परत केली नाही. तक्रारदार हे श्री. संदिप कांदलकर यांच्‍या ऑफिसमध्‍ये गेले असता सदरचे ऑफिस बंद झाल्‍याचे तक्रारदाराच्‍या लक्षात आले व त्‍यानंतर तक्रारदाराची फसवणुक झाल्‍याची जाणीव त्यांना झाली. तक्रारदार हे सदर कंपनीविरूध्‍द सक्षम न्‍यायालयामध्‍ये  लवकरच प्रकरण दाखल करीत आहेत. अशाप्रकारे सदर पत्रात वस्‍तुस्थिती नमूद करून तक्रारदाराकडून कर्जापोटी होत असलेली वसुली थांबविण्‍यात यावी अशी विनंती तक्रारदाराने सामनेवाले बँक व तक्रारदाराचे बँकर यांना केली आहे. सदर पत्रातील मजकुरावरून हे स्‍पष्‍ट होते की, वादग्रस्‍त कार ही तक्रारदाराच्‍या ताब्‍यात मिळाली होती व त्‍यानंतर त्‍यांनी ती नफा कमविण्‍याच्‍या उद्देशाने मे. गुरूदेव ट्रॅव्‍हल कनेक्‍शन या कंपनीकडे सुपूर्द केली. तक्रारदाराने मात्र ही वस्‍तुस्थिती लपवून ठेवली.

16.   तक्रारदाराने निशाणी ‘सी’  वर दाखल केलेल्‍या दि.14/01/2008 च्‍या पत्राचा देखील उल्‍लेख करणे महत्‍वाचे आहे. सदरचे पत्र तक्रारदाराने दि.14/01/2008 रोजी सामनेवाले बँकेला पाठविले आहे. ज्‍यामध्‍ये त्यांनी असा उल्‍लेख केला आहे की, ते कार संदर्भात चौकशी करण्‍यासाठी आर.टी.ओ. कार्यालयात गेले असता, सदरची कार ही श्री. दिपक देवेंद्र मेहता रा. भोर्इसर ठाणे या इसमाच्‍या नावे नोंद असल्‍याचे आढळून आले व तसा दाखला आर.टी.ओ कार्यालयाने दि. 09/01/2008 रोजी तक्रारदाराला दिला. त्‍यांनी सदर पत्रात पुढे असे नमूद केले आहे की, त्‍यांनी सामनेवाले बँकेकडून कार खरेदीसाठी कर्ज घेतले नाही व त्‍यांना केवळ बळीचा बकरा बनविण्‍यात आले आहे त्‍यांनी सदर पत्रात पुढे असे नमूद केले आहे की, कार खरेदी केली तेव्‍हा बँकेने किती व केव्‍हा कर्ज मंजूर केले याबाबत त्‍याला कोणतीही माहिती नाही. वरीलप्रमाणे उल्‍लेख करून तक्रारदाराकडून कर्जाची वसुली थांबविण्‍यात यावी अशी विनंती तक्रारदारानी सदर पत्राद्वारे सामनेवाले बँकेला केली आहे. 

17.    तक्रारदाराच्‍या तक्रारीमधील कथने व त्‍यांनी सादर केलेला कागदोपत्री पुरावा एकमेकांशी पूर्णपणे विसंगत असल्‍याचे उपरोक्‍त चर्चेवरून सिध्‍द होते. एका बाजूला तक्रारदाराने सामनेवाले बँकेकडून कार खरेदी करण्‍यासाठी कर्ज घेतल्‍याचे तक्रारीत कथन केले आहे तर दुस-या क्षणी त्‍यांनी सामनेवाले बँकेकडून कोणत्‍याही प्रकारे कर्ज घेतले नाही असे निशाणी ‘सी’ वर असलेल्‍या पत्रात नमूद केले आहे. तसेच, कर्ज घेतांना को-या फॉर्म वर कागदपत्रावर सहया करण्‍यास त्‍यांना श्री. संदिप कांदलकर व त्‍याच्‍या साथीदारानी भाग पाडल्‍याचा आरोप तक्रारदाराने निशाणी ‘सी’  वरील पत्रात केला आहे. तथापी, तक्रारीमध्‍ये कुठेही असा आरोप केल्‍याचे दिसत नाही. यावरून तक्रारदाराने मंचासमक्ष वस्‍तुस्थिती समोर न आणता, महत्‍वाच्‍या बाबी लपवून केवळ आपल्‍या सोयीप्रमाणे तक्रारीमध्‍ये कथने केली आहेत. तथापी, तक्रारदाराची तक्रार ही धाधांत खोटी असल्‍याचे त्‍यांनीच सादर केलेल्‍या कागदोपत्री पुराव्‍यावरून सिध्‍द होते. सामनेवाले यांनी तक्रारदाराला त्‍यांच्‍या कारचा ताबा कधीही दिला नाही हा तक्रारदाराचा आरोप निराधार असल्‍याचे त्‍यांच्‍याच पुराव्‍यावरून सिध्‍द झाले आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली किंवा अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असे म्‍हणता येणार नाही.

18.    अभिलेखावर उपलब्‍ध असलेल्‍या पुराव्‍याचे बारकाईने अवलोकन केल्‍यानंतर, असे निदर्शनास येते की, सामनेवाले क्र 3 कडून कारचा ताबा मिळाल्‍यानंतर तक्रारदाराने सदरची कार नफा कमविण्‍याच्‍या उद्देशाने मे. गुरूदेव ट्रॅव्‍हल कनेक्‍शन या कंपनीकडे सुपूर्द केली जिच्‍या मोबदल्‍यात तक्रारदाराला काही दिवस नफ्याच्‍या स्‍वरूपात ठराविक रक्‍कम मिळत गेली काही कालावधीनंतर सदर कंपनीने तक्रारदाराला रक्‍कम देणे बंद केले. तथापी, सामनेवाले बँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्‍याची जबाबदारी टाळण्‍याच्‍या उद्देशाने तक्रारदाराने वस्‍तुस्थिती लपवून ठेवली व सामनेवाले विरूध्‍द खोटे आरोप केले. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली व अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला हे तक्रारदाराने सिध्‍द केले नसल्‍यामूळे तक्रार फेटाळण्‍यास पात्र आहे. सामनेवालेकडून कोणतीही दाद मिळण्‍यास तक्रारदार पात्र ठरत नाही. सबब, मंचाकडून मुद्दा क्र 1 व 2 चा निष्‍कर्ष नकारार्थी नोंदविण्‍यात आला  असून मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.         

                              आदेश

1.   ग्राहक तक्रार क्रमांक 188/2008 फेटाळण्‍यात येते.

6.   उभयपक्षांनी आपआपला खर्च सोसावा.

7.   उभयपक्षकारांना  न्‍यायनिर्णयाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात  यावी.

npk/-

 
 
[HON'BLE MR. A.Z.TELGOTE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.R.SANAP]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.