तक्रारदार : गैर हजर
सामनेवाले 1,3,4 : चे प्रतिनिधी त्यांचे वकील श्री.मेस्त्री हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले 1 ही एचडीएफसी बँक आहे, व सा.वाले क्र.3 व 4 हे बँकेचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक आहेत. सा.वाले क्र.2 ही व्यापारी कंपनी अहो. यापुढे सा.वाले क्र.1,3 व 4 यांना केवळ सा.वाले क्र.1 असे संबोधिले जाईल. तर सा.वाले क्र.2 व्यापारी कंपनी यांना केवळ सा.वाले क्र.2 असे संबोधिले जाईल.
2. सा.वाले क्र.1 बँकेने तक्रारदारांना त्यांचे वापराकामी क्रेडीट कार्ड दिले होते ज्याचे शेवटचे चार अंक 7846 असे होते. तक्रारदार त्याचा वापर करीत होते. तक्रारदारांना क्रेडीट कार्ड बद्दलचे विवरणपत्र प्राप्त झाले व त्यामध्ये दिनांक 10.4.2008 रोजी तक्रारदारांनी रु.25,819/- च्या वस्तु सा.वाले क्र.2 यांचेकडून खरेदी केल्याबद्दल नोंद होती व सा.वाले यांनी तक्रारदारांच्या खात्यामध्ये रु.25,819/- नांवे टाकलेले होते. तक्रारदारांनी दिनांक 21.5.2008 रोजी सा.वाले क्र.1 यांचेकडे आक्षेपाचा अर्ज दिला तसेच वाकोला पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी दिनांक 10.4.2008 रोजी आपल्या क्रेडीट कार्डव्दारे सा.वाले क्र.2 यांचेकडून रु.25,819/- ची खरेदी केलेली नव्हती व त्या बद्दलची नोंद खोटी आहे. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून क्रेडीट कार्डची स्लीप मागविली व तक्रारदारांना असे दिसून आले की, क्रेडीट कार्डचा वापर करणा-यांने त्या व्यवहाराबद्दल सा.वाले क्र.2 यांचेकडील स्लीपवर केलेली सही खोटी आहे. यावरुन तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 बँकेकडे पत्र व्यवहार केला व रु.25,819/- तक्रारदारांचे नांवे टाकण्यात येऊ नये अशी विनंती केली. परंतु सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड खात्यामध्ये तशी दुरुस्ती केली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 5.6.2008 रोजी नोटीस दिली. तरी देखील सा.वाले यांनी आपला निर्णय बदलला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार सा.वाले क्र.1 व 2 यांचे विरुध्द दाखल केली व त्यामध्ये तक्रारदारांकडून दिनांक 10.4.2008 रोजीचे रु.25,819/- च्या नोंदी प्रमाणे वसुली करण्यात येऊ नये अशी दाद मागीतली व नुकसान भरपाई मागीतली.
3. सा.वाले क्र.1 बँकेने आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांना क्रेडीट कार्ड देण्यात आले होते हे तक्रारदारांनी मान्य केले आहे व दिनांक 10.4.2008 रोजी सा.वाले क्र.2 यांचेकडे झालेला व्यवहार हा तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड वर झालेला आहे. एकदा क्रेडीट कार्ड प्राप्त झाल्यानंतर ते व्यवस्थित वापरण्याची व त्याची सुरक्षा घेण्याची जबाबदारी क्रेडीट कार्ड धारकावर असल्याने त्या क्रेडीट कार्डवरुन झालेल्या व्यवहारास क्रेडीट कार्ड धारकच जबाबदार असतो. या प्रमाणे सा.वाले बँकेने क्रेडीट कार्ड चे संदर्भात तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला.
4. सा.वाले क्र.2 यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदारांच्या क्रेडीट कार्डवर झालेल्या व्यवहाराप्रमाणे त्यांना सा.वाले क्र.1 बँकेकडून रु.25,819/- प्राप्त झाले. तसेच सा.वाले यांनी त्या व्यवहाराबाबत कुठलाही खोटेपणा केलेला नाही किंवा अप्रमाणिकपणा केलेला नाही. सबब सा.वाले क्र.2 हे तक्रारदारांनी मागीतलेल्या दादीचे संदर्भात जबाबदार नाहीत असे त्यांनी कथन केले आहे.
5. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तसेच सा.वाले क्र.1 व 2 यांचे कैफीयतीस प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. सा.वाले क्र.2 यांनी त्यांच्या व्यवस्थापकाचे शपथपत्र दाखल केले. तसेच तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड खात्याचे उतारे व तक्रारदारांना दिलेल्या उता-याची प्रत हजर केली. तक्रारदारांनी क्रेडीट कार्डच्या प्रती हजर केल्या. सा.वाले क्र.2 यांनी स्लीपची प्रत हजर केली. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. युक्तीवादाचे दिवशी तक्रारदार हे गैरहजर होते.
6. प्रस्तुत मंचाने सा.वाले यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 10.4.2008 रोजीच्या क्रेडीट कार्डच्या व्यवहाराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय? | नाही. |
2 | तक्रारदार हे सा.वाले क्र.1 बँकेने दिनांक 10.4.2008 रोजीच्या व्यवहाराबद्दल तक्रारदारांकडून सा.वाले बँकेने रु.25,819/- वसुली करु नये असे निर्देश मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
8. सा.वाले क्र.1 बँकेने तक्रारदारांना 7846 या क्रमांकाचे क्रेडीट कार्ड दिनांक 15.2.2007 रोजी दिले होते व तक्रारदार त्या क्रेडीट कार्डवर काही व्यवहार करीत होते या बद्दल वाद नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या क्रेडीट कार्डच्या खात्यामधून दिनांक 10.4.2008 रोजी रु.25,819/- या व्यवहाराबद्दल वाद निर्माण केलेला आहे. व तक्रारदारांच्या कथना प्रमाणे तक्रारदारांनी सा.वाले क्र.2 यांचेकडून दिनांक 10.4.2008 रोजी क्रेडीट कार्डचे आधारे रु.25,819/- ची खरेदी केलेली नव्हती व ती नोंद चुकीची आहे.
9. या संदर्भात तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी अ येथे क्रेडीट कार्डच्या दोन्ही बाजुची छायांकित प्रत हजर केलेली आहे. त्या क्रेडीट कार्डचेवर मागील बाजूस तक्रारदारांची सही दिसून येते. त्यानंतर तक्रारदारांनी निशाणी ड येथे क्रेडीट कार्डच्या खात्याचे विवरणपत्र दाखल केलेले आहे. त्यातील नोंद असे दर्शविते की, सा.वाले क्र.1 बँकेने दिनांक 10.4.2008 रोजी अल्पा, मुंबई (सा.वाले क्र.2) यांचे व्यवहाराबद्दल रु.25,819/- तक्रारदारांचे नांवे दाखविले आहे. त्याच प्रकारची नोंद पुढील विवरणपत्रामध्ये दिसून येते.
10. तक्रारदारांचे असे कुठेही कथन नाही की, त्यांचे क्रेडीट कार्ड दिनांक 10.4.2008 रोजी अथवा त्यापूर्वी 1,2 दिवस चोरीला गेले होते अथवा गहाळ झाले होते व अन्य व्यक्तीने अनाधिकाराने तक्रारदारांच्या क्रेडीट कार्डचा वापर करुन दिनांक 10.4.2008 रोजीचा व्यवहार केलेला आहे. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 बँकेकडे कधीही त्यांचे क्रेडीट कार्डचा वापर थांबविण्यात यावा अशी विनंती केली नव्हती. यावरुन असे दिसते की, तक्रारदार हे मान्य करतात की, दिनांक 10.4.2008 रोजी तक्रारदारांचे क्रेडीट कार्ड तक्रारदारांकडेच होते. सहाजिकच दिनांक 10.4.2008 रोजी तक्रारदारांचे क्रेडीट कार्ड तक्रारदारांकडे असेल तर त्या दिवशी क्रेडीट कार्डवर होणा-या व्यवहाराची जबाबदारी तक्रारदारांची रहाते व त्याबद्दल बँक किंवा व्यापारी यांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही. या संदर्भात सा.वाले यांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्रात निशाणी ब येथे सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांना दिनांक 5.6.2008 रोजी पाठविलेल्या पत्राची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये सा.वाले क्र.1 बँकेने क्रेडीट कार्ड धारकांना क्रेडीट कार्ड वापरण्याचे संदर्भात बँकेने जी मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली होती त्यापैकी काही नोटीसीमध्ये उधृत केलेली आहेत. त्या मार्गदर्शक तत्वामध्ये असे नमुद आहे की, क्रेडीट कार्ड धारकांचे क्रेडीट कार्ड हरवले, गहाळ झाले असेल तर क्रेडीट कार्ड धारकाने लगेचच दूरध्वनीव्दारे बँकेस सूचना करावी, अन्यथा झालेल्या गैरसोईबद्दल बँक जबाबदार असणार नाही. त्या सूचनेमध्ये अशी सूचना आहे की, क्रेडीट कार्ड गहाळ झाल्याचे क्रेडीट कार्ड धारकाकडून सूचना प्राप्त होईपर्यत क्रेडीट कार्डवर झालेल्या व्यवहारास खातेदार जबाबदार असतील, ती बँकेची जबाबदारी असणार नाही. थोडक्यामध्ये क्रेडीट कार्ड गहाळ झाले असेल किंवा अन्य व्यक्तीच्या हातात गेले असेल व तसे क्रेडीट कार्ड धारकास दिसून आले तर त्यांनी बँकेस लगेच दूरध्वनीवर सूचना देणे आवश्यक आहे. व त्या सूचनेप्रमाणे बँकेने ते क्रेडीट कार्ड रद्द/स्थगित (Block) करणे आवश्यक असते. क्रेडीट कार्डचे संदर्भात या पेक्षा अधिक जबाबदारी बँकेवर येऊ शकत नाही. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदारांच्या तक्रारीत किंवा शपथपत्रामध्ये असे कोठेही कथन नाही की, त्यांचे क्रेडीट कार्ड गहाळ झाले होते अथवा अन्य व्यक्तीच्या ताब्यात गेले होते. त्यामुळे सा.वाले क्र.1 बँकेवर काही जबाबदारी येण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
11. क्रेडीट कार्डचे वापरानंतर दिनांक 10.4.2008 रोजी सा.वाले क्र.1 यांचेकडे जी माहिती प्राप्त झाली त्या आधारे सा.वाले क्र.1 यांनी सा.वाले क्र.2 व्यापारी यांना रु.25,819/- अदा केले. सा.वाले क्र.2 यांचे संदर्भात तक्रारदार असे कथन करतात की, सा.वाले क्र.2 यांनी दिनांक 10.4.2008 चे व्यवहारा संदर्भात त्यांचे मशिनवर जी क्रेडीट कार्डची स्लीप फाडली त्यावर क्रेडीट कार्ड धारकाने केलेली सही व क्रेडीट कार्डचे मागील बाजूस असलेली तक्रारदारांची सही खूपच फरक असल्याने सा.वाले क्र.2 यांनी दिनांक 10.4.2008 चा व्यवहार पूर्ण करावयास नको होता आणि त्या संबंधात निष्काळजीणा केला. तक्रारदार असेही कथन करतात की, सा.वाले क्र.2 तसेच सा.वाले क्र.1 बँकचे अधिकारी यांचे दरम्यान हातमिळवणी असल्याने तक्रारदारांची क्रेडीट कार्डचे स्लीपवर सही नसताना देखील तो व्यवहार बँकेने स्विकारला. तक्रारदारांनी त्यांच्या क्रेडीट कार्डची छायाकित प्रत निशाणी अ वर तर क्रेडीट कार्ड स्लीपची छायांकित प्रत निशाणी क वर हजर केलेली आहे. क्रेडीट कार्ड चे मागील बाजूस असलेली तक्रारदारांची सही व क्रेडीट कार्ड स्लीपवर असलेली सही यामध्ये निश्चीतच फरक आहे. परंतु तो सही मधील फरक दोन सहींची काळजीपूर्वक पडताळणी केल्यानंतर नजरेस येतो. सर्वसाधारणतः क्रेडीट कार्डचे व्यवहारामध्ये दुकानदाराचे कौन्टरवर ग्राहकांकडून क्रेडीट कार्ड हजर केले जाते व ते हजर केल्यानंतर मशिनमध्ये ते फीरविले जाते व क्रेडीट कार्ड धारकानी स्लीपवर सही केल्यानंतर त्याची एक प्रत क्रेडीट कार्ड धारकास दिली जाते व दुसरी प्रत व्यापारी यांचेकडे रहाते. या स्वरुपाचा व्यवहार होत असतांना क्रेडीट कार्ड धारकाची मागील बाजूस असलेली सही व स्लीप वरील सही यामध्ये फरक तपासून पाहिला जात नाही. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये त्या सहीमध्ये फरक दिसत असला तरीही तो अगदीच ठळक नव्हता व काळजीपूर्वक निरीक्षणानंतर नजरेस येणारा होता. त्यातही आपले क्रेडीट कार्ड सांभाळण्याची जबाबदारी ही तक्रारदारांची होती व आपले क्रेडीट कार्ड अन्य व्यक्तीच्या ताब्यात जाऊ न देणे व त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही तक्रारदार यांचेवर होती. त्यामुळे केवळ स्वाक्षरीत असलेल्या किरकोळ फरकावरुन तक्रारदार दिनांक 10.4.2008 रोजीचा रु.25,819/-चा व्यवहार नाकारु शकत नाही.
12. त्यातही महत्वाची बाब म्हणजे तक्रारदार रहात असलेल्या निवासस्थानाचा पत्ता प्रभात कॉलनी, सांताक्रृझ (पूर्व),असा आहे. तर सा.वाले क्र.2 व्यापारी यांचा पत्ता विले-पार्ले(पश्चिम) असा आहे. येथे एक बाब नमुद करावी लागते की, सांताक्रृझ व विले-पार्ले ही दोन्ही उपनगरे पश्चिम रेल्वेने जोडली गेलेली असून ती अगदी लगद किंबहुना ती लोकलने 5 मिनिटाचे अंतरावर आहेत. प्रस्तुतचा व्यवहार हा तक्रारदार मुंबईचे एका टोकाचे उपनगरामध्ये रहात आहेत व व्यवहार हा मुंबईच्या दुस-या टोकाच्या उपनगरामध्ये झाला आहे असे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदारांनी हा व्यवहार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
13. वरील सर्व परिस्थितीत सा.वाले यांनी तक्रारदारांचे क्रेडीट कार्ड खात्यावरील दिनांक 10.4.2008 रोजीच्या व्यवहाराचे संदर्भात तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हा आरोप तक्रारदार सिध्द करु शकत नाहीत.
14. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 379/2008 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.