(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 19/03/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.24.03.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार क्र.2 यांनी चार चाकी वाहनाचा लिलाव केला, त्यापैकी एक वाहन 1110 इचर क्र.एम.एच. 40/4974 हे वाहन एकूण रक्कम रु.3,95,000/- एवढया रकमेची बोली लाऊन लिलावात खरेदी केले. लिलावाच्या वेळी गैरअजदार क्र.2 चे शाखा प्रबंधक यांनी सदर वाहनावर तक्रारकर्त्याचे नाव चढवुन देण्याचे तसेच मालकी हक्काचे स्थानांतरणासाठी लागणारे संपूर्ण आवश्यक कागदपत्रे जसे शासकीय परवानगी, आर.टी.सी. मधे नामांतरण व सर्व ना-हरकत प्रमाणपत्र तक्रारकर्त्यास देण्यांचे आश्वासन दिले.
3. तक्रारकर्त्याने सदर वाहनाचे आर.टी.ओ. ऑफीसात नामांतरणसाठी अर्ज केला असता आर.टी.ओ. अधिका-याने सदर वाहनाच्या पुर्वीच्या मालकाने सदर वाहन गैरअर्जदार क्र.2 यांनी जबरीने ओढून नेले असे म्हटले व सदर वाहनाच्या मालकी हक्काबाबत आक्षेप होता, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या नावावर सदर वाहन हस्तातरीत करण्यांत आले नाही, असे सांगितले. म्हणून तक्रारकर्त्याने संबंधीत बाबी संदर्भात गैरअर्जदार क्र.2 यांना भेटून सांगितले असता त्यांना एका आठवडयाच्या आत पुर्वीच्या मालकाकडून ना-हरकत प्रमाणपत्र आणुन देऊन सदरी वाहन तक्रारकर्त्याचे नावावर चढवुन देण्याचे मान्य केले. परंतु वारंवार मागणी करुनही व नोटीस पाठवुनही गैरअर्जदारांनी सदरचे वाहन तक्रारकर्त्याचे नावावर करुन दिले नाही. त्यामुळे सदरच्या वाहनाचा उपभोग तक्रारकर्त्यास घेता आला नाही व ते वाहन गॅरेजमधे उभे केले, व त्यासाठी तक्रारकर्त्यास खर्च करावा लागत आहे.
4. वास्तविक तक्रारकर्त्याने सदरच्या वाहनाची किंमत गैरअर्जदारांना दिली तसेच वाहनाच्या विम्यापोटी रु.27,000/- व रोड करापोटी रु.23,700/- सुध्दा भरले, असे असतांना देखील सदर वाहन तक्रारकर्त्याचे नावे झाले नाही. त्यामुळे सदरचे वाहन तक्रारकर्त्यास उभे ठेवावे लागल्यामुळे प्रतिदिन रु.1,000/- चे नुकसान सहन करावे लागत आहे, ही गैरअर्जदारांची कृति सेवेतील कमतरता असुन तक्रारकर्त्याने सदरीची तक्रार मंचात दाखल करुन आर.टी.ओ. मधे नामांतरणाकरीता लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे आणून द्यावे, तसेच गाडीच्या मालकाकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’, आणून द्यावे. मानसिक-शारीरिक व आर्थीक नुकसानीपोटी रु.13,90,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
5. तक्रारकर्त्यानी प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 5 च्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
6. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता गैरअर्जदार क्र.1 यांना पाठविलेली नोटीस 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पोचपावती आली नाही, यास्तव ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 28(अ)(3) प्रमाणे त्यांना नोटीस मिळाल्याचे घोषीत केल्याचा आदेश मंचाने दि.20.12.2011 रोजी पारित केला. तसेच गैरअर्जदार क्र.2 यांना पाठविलेल्या नोटीसची पोचपावती प्रकरणात दाखल आहे मात्र त्यांचा पुकारा केला असता सतत गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द मंचाने दि.16.09.2011 रोजी त्यांचे विरुध्दचे प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व तक्रारकर्त्याने वकीलामार्फत केलेल्या युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
- // नि ष्क र्ष // -
7. तक्रारकर्त्याचे शपथेवरील कथन व दस्तावेज क्र.1 वर दाखल पावत्या यावरुन या मंचाच्या असे निदर्शनांस येते की, गैरअर्जदारांनी चारचाकी वाहनांच्या लिलावातील एक वाहन 1110 इचर क्र. एम.एच.40/4974 रु.3,95,000/- एवढी बोली लावुन दि.29.12.2008 रोजी खरेदी केले. तक्रारकर्त्याच्या शपथपत्रावरुन हे ही दिसुन येते की, तक्रारकर्त्याने सदर वाहनाच्या विमा रकमेपोटी व वाहनाचे व वाहनाचे रोड करापोटी अनुक्रमे रु.27,000/- व रु.23,700/- उदा केलेले होते.
8. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची महत्वाची तक्रार अशी आहे की, सदर वाहनाचे पुर्वीचे मालक यांनी मालकी हक्काबाबत आक्षेप घेतल्यामुळे आर.टी.ओ. अधिकारी यांनी सदरचे वाहन तक्रारकर्त्याच्या नावे हस्तांतरीतम केले नाही. तक्रारकर्त्याने वारंवार मागणी करुनही गैरअर्जदारांनी पुर्वीचे मालकाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ तक्रारकर्त्यास दिले नाही. गैरअर्जदारांनी या मंचासमोर आक्षेप घेऊन त्यांनी तक्रारकर्त्याचे म्हणणे नाकारले नाही अथवा सदरचे म्हणणे नाकारण्यासाठी पुरावाही सादर केला नाही.
9. दस्तावेज क्र.32 वर तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या आर.सी.बुकचे अवलोकन करता असे निदर्शनांस येते की, दि.28.02.2011 रोजी सदरचे वाहन तक्रारकर्त्याच्या नावे हस्तांतरीत झाले. सदरचे वाहन जरी दि.28.02.2011 रोजी तक्रारकर्त्याचे नावे नोंदणीकृत झाले तरी सदर वाहनाचा मोबदला गैरअर्जदारांना दि.29.12.2008 रोजी प्राप्त झाला होता. तसेच त्याने आर.टी.ओ. टॅक्स व विमा रकमेपोटी देखील रक्कम भरलेली होती. गैरअज्रदारांनी सदर वाहन तक्रारकर्त्याचे नावे हस्तांतरीत होण्यासाठी लागणारे कागदपत्राच्या पुर्ततेस विलंब केल्यामुळे तक्रारकर्त्याचा सदर वाहन त्याचे नावे नोंदणी करण्यांस विलंब झाला. त्यामुळे ही गैरअर्जदारांची कृति सेवेतील कमतरता आहे व त्यास गैरअर्जदार क्र.2 हे जबाबदार आहे. तक्रारकर्त्याचा संपूर्ण व्यवहार हा गैरअर्जदार क्र.2 यांचेशी झाल्यामुळे ते तक्रारकर्त्याच्या नुकसान भरपाईस जबाबदार आहेत. तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र.1 यांचा ‘ग्राहक’, नाही त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 यांना तक्रारकर्त्याचे नुकसान भरपाईस जबाबदार धरता येणार नाही. तक्रारकर्त्याने मागणी केलेल्या नुकसानभरपाई एवढी रक्कम पुराव्या अभावी या मंचाला मान्य करता येणार नाही.
वरील वस्तुस्थिती पाहता हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदार क्र.2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास नुकसान भरपाईपोटी रु.10,000/- द्यावे.
3. गैरअर्जदार क्र.2 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- अदा करावे.
4. गैरअर्जदार क्र.1 विरुध्द कुठलाही आदेश नाही.
5. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्यथा पुढील कालावधीकरीता आदेश क्र.2 मधील रकमेवर द.सा.द.शे.9% व्याज देय राहील.