Dated the 11 Aug 2016
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. तक्रारदार एक मध्यमवर्गीय कुटूंबातील असुन ठाणे येथे वर नमुद पत्यावर रहातात. सामनेवाले ही एच.डी.एफ.सी. हया बॅंकेची घोडबंदर रोड,ठाणे हया पत्यावर असलेली क्रेडिट कार्ड शाखा आहे. एच.डी.एफ.सी. बॅंक ही त्यांच्या ग्राहकांना बँकिंगच्या इतर सेवांबराबर क्रेडिट कार्ड बाबतची सेवाही पुरवते. एच.डी.एफ.सी. ने तक्रारदार यांना सन-जुलै-2003 पासुन क्रेडिट कार्ड सुविधा पुरवली. सुरवातीला सामनेवाले यांनी एच.डी.एफ.सी. क्रेडिट कार्ड गोल्ड मास्टर या योजनेचे 4346781000110395 या क्रमांकाचे क्रेडिट कार्ड दिले त्याच्या क्रेडिटची मर्यादा रु.75,000/- होती. तक्रारदाराच्या वेळोवेळी रक्कम अदा करण्याच्या इतिहासामुळे सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डची मर्यादा रु.1,69,000/- पर्यंत वाढवली.
2. तक्रारदार ऑक्टोंबर-नोव्हेंबर-2005 मध्ये त्यांच्या कुटूंबियांसह राजस्थान येथे फीरण्यास गेले होते, तक्रारदार यांनी तेव्हा त्यांच्यासोबत काही रोख रक्कम प्रवासखर्च, वैदयकीय खर्च, तेथे हॉटेलिंग, अन्न इत्यादि बाबत होणा-या खर्चासाठी राखुन ठेवली होती, व इतर खर्चासाठी तक्रारदार क्रेडिट कार्ड वापरुन ती रक्कम संबंधीत ठिकाणी वापरत असत. तक्रारदार माऊंट आबू येथील “सवेरा” या हॉटेलमध्ये कुटूंबियांसह रहात होते. हॉटेल सोडून निघतांना तक्रारदार यांनी हॉटेलच्या काऊंटरवर ता.23.10.2005 रोजी दयावयाचे बिलाच्या रकमेची चौकशी केली असता तक्रारदार यांना हॉटेल स्टे चार्जेस रु.800/-, रु.400/- बस तिकीट, 374/- अन्न खरेदी, व रु.22/- चहापान इत्यादि बाबत झालेल्या खर्चापोटी एकूण रु.1,596/- हॉटेलवाल्यांना अदा करायचे असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदार यांनी हॉटेलच्या वास्तव्याबाबतचे बील खर्च रु.800/- तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डव्दारे करण्यास हॉटेलच्या स्टाफला विनंती केली, व उर्वरीत रक्कम (रु.1596 – 800) रोख रकमेव्दारे अदा करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार सवेरा हॉटेलच्या स्टाफ पैंकी श्री.पुखराज यांनी तक्रारदाराचे क्रेडिट कार्ड घेऊन ईडीसी मशिनमध्ये दोनवेळा स्वाईप (Swipe) केले. परंतु सदर रकमेबाबत “ट्रान्झॅक्शन वॉज नॉट गेटिंग प्रोसेस” असे सांगण्यात आले. तक्रारदार तेव्हा ईडीसी मशिनपासुन पाच सहा फूट अंतरावर उभे होते. त्यानंतर तक्रारदार यांनी हॉटेलच्या श्री.पोखराज यांना कार्ड स्वाईप (Swipe) होत नसल्याने सदर “ट्रान्झॅक्शन” रद्द करण्याची विनंती केली, त्यानुसार श्री.पुखराज यांनी काऊंटरवर पुन्हा जाऊन ईडीसी मशिनमधील काही बटणे दाबून तक्रारदार यांनी रु.800/- चे केलेले “ट्रान्झॅक्शन” रद्द झाल्याची खात्री केली. त्यामुळे सदर रु.800/- च्या व्यवहाराबाबत ईडीसी मशिनचा वापर झाल्यावर कोणतीही “प्रिंट” व्यवहाराचा तपशील तक्रारदार यांना प्राप्त झाली नाही. तक्रारदार यांना लवकरात लवकर जीपमध्ये बसण्यासाठी ट्रॅव्हलिंग कंपनीचा माणूस बोलवावयास आल्याने तक्रारदार यांनी सवेरा हॉटेलच्या सदर बीलाची रक्कम रु.1,596/- पुर्णपणे रोख रकमेच्या स्वरुपात अदा केली, व त्याबाबत हॉटेलच्या श्री.पुखराज यांनी तक्रारदार यांना सदर रक्कम अदा केल्याबाबत बील दिले. हे बील हीच तक्रारदार यांनी सदर रक्कम अदा केल्याची पावती आहे, असे तक्रारदार म्हणतात. ईडीसी मशिन सुस्थितीत ठेऊन ती चालू होण्यासाठी योग्य ती खबरदारी सामनेवाले यांनी न घेतल्याने तक्रारदारांच्या व्यवहारासंदर्भात (रु.800/-) चार्ज स्लिपची प्रिंट निघाली नाही, त्यामुळे सवेरा हॉटेलच्या स्टे चार्जेसबाबत इतर खर्चासह तक्रारदार यांनी एकूण रु.1596/- रोख रकमेच्या स्वरुपात दिले, असे असुनही सामनेवाले बँक यांनी सदर रक्कम तक्रारदार यांनी क्रेडिट कार्डव्दारे अदा केल्याचे तक्रारदार यांना सांगून सदर रक्कम व्याजासह परत भरण्यास तक्रारदार यांना सांगितले, तक्रारदार यांना न कळविता त्यांच्या आकाऊंट खात्यातुन ता.17.06.2009 रोजी रु.6,144.42 (सदर रु.800/- च्या ता.23.10.2005 रोजीच्या ट्रान्झॅक्शनबाबत) परस्पर वळते करुन घेतले. त्यामुळे सामनेवाले यांचेविरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे प्रार्थना / मागण्या केल्या आहेत. (प्रार्थना कलम-12 ए ते 12 एच)
3. सामनेवाले यांना नोटीस प्राप्त झाल्यावर हजर होऊन कैफीयत, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद इत्यादि आवश्यक कागदपत्रांसह दाखल केले आहेत.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची तक्रार मंचास चालविण्याचे अधिकार नाहीत, व ती खोटी असुन, तक्रारदार यांनी हॉटेल सवेरा यांना तक्रारीत पक्षकार केले नसल्याचे नमुद करुन प्रस्तुत तक्रार फेटाळण्याची मागणी केली आहे.
5. उभयपक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करुन तक्रारीच्या निराकरणार्थ मंचाने खालील बाबींचा विचार केला.
मुद्दे निष्कर्ष
अ.तक्रारदार सामनेवाले यांचे ग्राहक आहे का ?.......................................होय.
ब.तक्रार विहीत मुदतीत दाखल केली आहे का ?.....................................होय.
क.सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिली आहे का ?..........होय.
ड.तक्रारदार सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासाची नुकसानभरपाई
व न्यायिक खर्च मिळण्यास पात्र आहेत का ?......................................होय.
इ.तक्रारीत काय आदेश ?................................................तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
6.कारण मिमांसा
अ. सामनेवाले हे बँकिंगची सेवा तसेच क्रेडिट कार्डची सेवा भारतामधील लोकांना पुरवितात, तक्रारदार देखील सामनेवाले यांचे 4346781000110395 या क्रमांकान्वये क्रेडिटकार्ड होल्डर आहेत. (रु.75,000/- मर्यादा) ते सदर कार्ड नंतर “टिटॅनिअम मास्टर कार्ड लिमिटेड एडिशन” या कार्डचे क्रमांक-528945100111464 अन्वये कार्ड होल्डर आहेत. त्याची कमाल मर्यादा रु.2,61,000/- अशी आहे. सदर सेवा पुरवितांना सामनेवाले यांना तक्रारदार फायनान्स चार्ज, लेट फी चार्जेस, प्रोसेस फी, ट्रॅक्सेस इत्यादि अदा करतात, व सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेकडून रु.6,144.42, ता.17.06.2009 रोजी तक्रारदाराच्या खात्यातुन वसुल केले असल्याने सामनेवाले यांचे सदर कार्डच्या सेवा सुविधेबाबत ग्राहक आहेत. (HDFC Bank Ltd., V/s Praveen Solanki- RP-737/11 Order Dt.18-04-2011 NCDRC)
ब. सामनेवाले यांनी रक्कम रु.6,144/- तक्रारदाराच्या करंट आकाऊंट खात्यातुन क्रेडिट कार्डच्या रकमेबाबत ता.17.06.2009 रोजी वळती करुन घेतले, त्याबद्दल सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता.18.06.2009 रोजी कळवले ते पत्र तक्रारदार यांना ता.22.04.2009 रोजी प्राप्त झाले, व तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार ता.02.06.2011 रोजी दाखल केली असल्याने ती तक्रारीचे कारण घडल्यापासुन दोन वर्षांच्या मुदतीत दाखल केली असल्याने, विहीत मुदतीत दाखल केलेली आहे.
क. तक्रारदार सामनेवाले यांचे वर नमुद केल्याप्रमाणे गोल्ड मास्टर कार्डबाबत सन-2003 पर्यंत ग्राहक आहेत, व सन-2006 मध्ये सदर कार्ड ऐवजी तक्रारदार यांना टिटॅनिअम मास्टर कार्ड लिमिटेड एडिशन हे कार्ड देण्यात आले, त्याची मर्यादा रु.2,61,000/- आहे. तक्रारदार राजस्थान येथे कुटूंबियांसोबत फीरण्यासाठी गेले असता त्यांनी तेथील “सवेरा” या हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते, व तेथून निघतांना तक्रारदार यांना सवेरा हॉटेलच्या काऊंटरवर ता.23.10.2005 रोजी अन्न, स्टे चार्जेस, टी चार्जेस इत्यादि बाबत झालेल्या एकूण रु.1,596/- हे एकूण बील झाल्याचे सांगण्यात आले त्या बिलापैंकी हॉटेल स्टे चार्जेसची रक्कम रु.800/- हॉटेलच्या श्री.पुखराज यांना तक्रारदार यांनी क्रेडिट कार्डव्दारे घेण्यास सांगितली, त्यानुसार त्यांनी दोनवेळा तक्रारदाराचे क्रेडिट कार्ड स्वाईप कार्ड केले,परंतु दोन वेळा Swipe Card करुनही ट्रान्झॅक्शन यशस्वी न झाल्याने तक्रारदार यांनी सदर संपुर्ण रक्कम (रु.800/- हॉटेल स्टे चार्जेससह) रु.1596/- श्री.पुखराज यांना रोख रकमेच्या स्वरुपात दिली, व सवेरा हॉटेलचे श्री.पुखराज यांनी तक्रारदार यांना रु.1596/- चे बील दिले, परंतु वेगळी पावती दिली नाही. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे हॉटेलच्या बीलांचा भरणा केल्यावर त्याची प्रत पावती म्हणून देण्याची पध्दत रेस्टॉरन्ट, ट्रॅव्हलिंग कंपनी इत्यादि ठिकाणी वापरतात, त्यामुळे तक्रारदार यांनी सवेरा हॉटेलला सदर रक्कम रोख स्वरुपात दिल्यानंतरच सवेरा हॉटेलच्या लोकांनी तक्रारदार यांना हॉटेलमधुन जाऊ दिले ही गोष्ट सत्य आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून वारंवार सदर रु.800/- च्या अदा केलेल्या रकमेबाबत तक्रारदाराकडून वारंवार पावतीची मागणी केली. तक्रारदार यांनी त्याबाबतचे बील सामनेवाले यांना पाठवूनही सामनेवाले यांनी पावतीची मागणी करणे चालू ठेवले, व तक्रारदार यांनी सदर वादग्रस्त रक्कम रु.800/- व्यतिरिक्त इतर सर्व रक्कम सामनेवाले यांना भरुन देखील सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून सदर रक्कम रु.800/- बाबत व्याज, दंड मिळून रक्कम रु.6,144.42 तक्रारदार यांनी सामनेवाले यांना देय असल्याचे सांगितले, व सात दिवसांत सदर रकमेचा भरणा करण्यास सांगितले. तक्रारदार यांनी सदर रक्कम वादग्रस्त असल्याचे सांगुनही सामनेवाले यांनी सदर रक्कम तक्रारदार यांना न कळविता त्यांच्या आकाऊंटमधुन परस्पर वळती केली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी राजस्थान येथे सवेरा हॉटेलमध्ये रु.800/- हे शुल्क सदर हॉटेलमधील वास्तव्याबाबत तक्रारदाराच्या क्रेडिटकार्डव्दारे भरल्याचा कोणताही पुरावा, चार्ज स्लिप इत्यादि सादर केलेला नाही, व तक्रारदार यांनी सवेरा हॉटेलच्या बिलाची प्रत पावती म्हणून ग्राहय धरावी असे वारंवार कळवूनही तक्रारदाराकडून सदर रकमेबाबत पावती देण्याचे पालुपद चालु ठेवले, व एकीकडे सदर रकमेवर व्याज, दंड इत्यादि वाढ करुन तक्रारदाराच्या नांवे मोठी रक्कम येणे असल्याचे दाखवले. वास्तवीक पाहता क्रेडिट कार्ड अँग्रिमेंटमध्ये कार्डाने पैसे अदा केल्याबद्दल पुरावा म्हणून पावती सादर करण्याचा उल्लेख नाही. त्यामध्ये केवळ माहिती म्हणजे Information देण्याबाबत नमुद आहे. तसेच तक्रारदार यांनी सदर ट्रॅन्झॅक्शन (रु.800/- हॉटेल सवेरा) रद्द झाल्याचे त्यांना सांगण्यात आल्याने व चार्ज स्लिप तयार होऊन प्रिंट न झाल्याने सदर ट्रान्झॅक्शनबाबत कोणतीही चार्जस्लिप स्वाक्षरीत केलेली नाही. तसेच सामनेवाले यांनी चार्जस्लिप बाबत माहिती मिळवण्यासाठी Merchant बॅंकर्सकडे काय पाठपुरावा केला याचा खुलासा न करता, तक्रारदाराकडून मोठया प्रमाणात रक्कम अदा करण्याचे राहिले असल्याचे भासवून परस्पर तक्रारदाराच्या खात्यातुन रु.6,144.42 ही रक्कम वळती करुन घेतली ही सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेली सदोषपुर्ण सेवा आहे.
तक्रारदार यांनी रोख स्वरुपात सवेरा हॉटेल येथे रक्कम रु.800/- भरल्याची खात्री करुन न घेता, किंवा सदर रु.800/- बाबत तक्रारदाराचे कार्ड स्वाईप (Swipe) केल्याने सामनेवाले यांना त्यांच्या बँकेतुन संबंधीत Merchant Dealer यांना रक्कम अदा करावी लागल्याचा कोणताही पुरावा न देता सामनेवाले यांनी वेळी अवेळी तक्रारदाराच्या घरी सदर रक्कम व्याजासह रु.6,144.42 वसुल करण्यासाठी फोन करुन, ई-मेल पाठवून, फोन व्दारे धमकावून अनेकवेळा नोटीसेस पाठवून तक्रारदार यांना व त्यांच्या कुटूंबियांना त्रास देणे चालूच ठेवल्याने तक्रारदार यांना जो मानसिक त्रास झाला त्याची नुकसानभरपाई म्हणून तक्रारदार सामनेवाले यांचेकडून रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) मिळण्यास पात्र आहेत, (सदर ई-मेल, फोन नोटीसेस इत्यादिचा तपशील अभिलेखात उपलब्ध आहे.) सामनेवाले विरुध्द तक्रारदार यांना सदर तक्रार ग्राहक मंचात दाखल करावी लागल्याने झालेल्या खर्चापोटी सामनेवालेकडून तक्रारदार रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार) मिळण्यास पात्र आहेत. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदाराचे “रिडिम” केलेले क्रेडिट पॉईंटस “2568” तक्रारदार यांना परत करावे, (रु.100 =2 Points) कारण त्यासाठी तक्रारदार यांनी रक्कम रु.1,28,000/- खर्च केलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.6,144.42, ता.17.06.2009 पासुन दरसाल दर शेकडा 6 टक्के व्याजासह परत करावी, तक्रारदारांचे नांव CIBIL मध्ये टाकले असल्यास ते काढून टाकावे. वरील आदेशांचे पालन सामनेवाले यांनी आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत करावे.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-306/2011 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना (रक्कम रु.1,28,000/-) “2568 पॉईंटस” तक्रारदार यांना
परत करावे.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रु.6,144/- ही रक्कम ता.17.06.2009 पासुन 6 टक्के
व्याजासह परत करावी.
5. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये
दहा हजार), व न्यायिक खर्चापोटी रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) दयावेत. वरील
आदेशाचे पालन सामनेवाले यांनी आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यांत करावे.
6. तक्रारदाराचे नांव CIBIL मधुन काढून टाकावे.
7. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
8. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.11.08.2016
जरवा/