न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी दि. 23/3/2018 रोजी लॉईड या ब्रँडचा 40 इंची एलईडी टीव्ही वि.प.क्र.2 यांचेकडून खरेदी केला आहे. त्याचा मॉडेल क्र. GL40FOZs/LLOYD असा आहे. सदर टीव्हीसाठी वि.प. यांनी तीन वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी दिली होती. तक्रारदार हे सदर टीव्हीचा वापर करीत असताना त्यामध्ये बिघाड झालेने त्यांनी वि.प.क्र.2 यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी वि.प.क्र.1 यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदविणेस सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी दि. 8/2/2021 रोजी तक्रार नोंदविली. त्यावेळी सदर टीव्हीचा डिस्प्ले उपलब्ध नसल्याचे तक्रारदारास सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांनी पुन्हा दि. 17/2/21 रोजी तक्रार नोंदविली. त्यावेळी तक्रारदार यांनी टीव्ही रिप्लेस करुन मागितला असता तसे करण्यास वि.प. यांनी नकार दिला. त्यावेळी वि.प. यांनी नवीन टीव्हीच्या किंमतीच्या 50 टक्के रक्कम भरुन नवीन टीव्ही घेणेबाबत तक्रारदारांना सांगितले. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराने वि.प. यांचेकडून रक्कम रु. 29,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.15,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत टीव्ही खरेदीचे बिल, ऑनलाईन व र्इमेलवर नोंदविलेल्या तक्रारीच्या प्रती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. प्रस्तुतकामी वि.प.क्र.1 यांनी मुदतीत म्हणणे दाखल केले नसलेमुळे नो से आदेश करण्यात आला. वि.प.क्र.2 यांना नोटीस लागू होवूनही सदर कामी सातत्याने गैरहजर असलेमुळे त्यांचेविरुध्द दि.18/10/2021 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तथापि वि.प.क्र 1 यांनी ता. 25/5/2022 रोजी सदरचा नो से आदेश रद्द होवून मिळणेसाठी अर्ज दिला. प्रस्तुत वि.प. क्र.1 यांनी रक्कम रु.700/- ची कॉस्ट तक्रारदार यांना अदा करणेचे अटीवर सदरचा नो से आदेश रद्द करण्यात आला व वि.प. क्र.1 यांचे म्हणणे दाखल करुन घेण्यात आले.
4. वि.प.क्र.1 यांचे कथनानुसार, ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीप्रमाणे टीव्हीमध्ये दोष असलेची बाब तक्रारदाराने शाबीत केलेली नाही. टीव्ही सदोष असलेबाबत तक्रारदाराने कोणत्याही तज्ञाचा अहवाल याकामी दाखल केलेला नाही. तक्रारदाराने सदर टीव्हीचा वापर तीन वर्षे केलेला आहे. यावरुन त्यामध्ये उत्पादित दोष नव्हता हे दिसून येते. वि.प. हे तक्रारदाराच्या टीव्हीमधील दोष दूर करणेत तयार आहेत. परंतु सदरचे टीव्हीचे मॉडेल हे कालबाहय झाले असलेने त्याचे पार्टस उपलब्ध नाहीत. वादातील टीव्हीचे मॉडेल उपलब्ध नसल्यास वि.प. हे त्याचे अपग्रेड मॉडेल तक्रारदारास देण्यास तयार आहेत परंतु त्यासाठी तक्रारदारास त्याची वाढीव किंमत अदा करावी लागेल. सबब, तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी मागणी वि.प.क्र.1 यांनी केली आहे.
5. वि.प.क्र.1 यांनी याकामी पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.
6. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे टीव्हीची खरेदी किंमत परत मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 व 2 –
7. तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 कंपनीने उत्पादित केलेला लॉईड या ब्रँडचा 40 इंची एलइडी टीव्ही वि.प. क्र.2 यांचे दुकानामधून खरेदी केलेला होता. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सदर वि.प. क्र.2 यांचेकडून ता. 29/3/2018 रोजी लॉईड या ब्रँडचा एलइडी टीव्ही खरेदी केलेची पावती दाखल केली आहे. सदरची खरेदी पावती वि.प. यांनी नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
8. तक्रारदार यांनी मॉडेल नं. क्र. GL40FOZs/LLOYD असा एलईडी टीव्ही वि.प. क्र.2 यांचेकडून खरेदी केलेनंतर सदरच्या कंपनीकडून सदर एलइडी टीव्हीकरीता तीन वर्षाची वॉरंटी दिलेली होती. सदरचे टीव्हीचा वापर करीत असताना टीव्हीच्या डिस्प्लेमध्ये बिघाड झाला. त्यावेळी तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांच्या युनिटमध्ये जावून खरेदी केलेल्या ठिकाणी विचारणा केली असता सदर वि.प. क्र.2 यांचे दुकानातून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदविणेस तक्रारदार यांना सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी दि.8/2/21 रोजी तक्रार नोंदविली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार यांना टीव्हीचा डिस्प्ले उपलब्ध नसलेचे सांगण्यात आले. तदनंतर तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडीवर मेलद्वारे ता. 17/2/21 रोजी तक्रार नोंदविली. वि.प. यांच्या अधिक-यांशी संपर्क साधला असता एलइडी डिस्प्ले उपलब्ध नसलेबाबत तक्रारदार यांना सांगण्यात आले. तसेच एलईडी टीव्ही.च्या रिप्लेसमेंट आज रोजीच्या नवीन किंमतीचा 50 टक्के रक्कम भरुन नवीन एलईडी टीव्ही घेणेबाबत वि.प. यांनी तक्रारदार यांना कळविले. सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे अधिकृत वेबसाईटवर तसेच ईमेलआयडीवर सदर वादातील एलईडी टीव्हीचा डिस्प्ले बदलून देणेबाबत वेळोवेळी तक्रार नोंदविली असताना देखील वि.प. यांनी सदरच्या एलईडी टीव्ही.ची वॉरंटी असतानादेखील सदर एलईडी टीव्हीचा डिस्प्ले न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्याअनुषंगाने
दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 यांचेकडून एलईडी टीव्ही खरेदी केलेचे बिल दाखल केले आहे. तसेच ता. 8/2/2021 व 17/2/212 रोजी वि.प. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदविल्याची प्रत दाखल केली आहे.
9. वि.प.क्र.1 यांनी तक्रारदाराच्या तक्रारीस ता. 25/5/2022 रोजी म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी त्यांच्या कथनांचे अनुषंगाने वादातील एलईडी टीव्हीमध्ये उत्पादित दोष असलेचे अनुषंगाने कोणत्याही तज्ञांचा अहवाल दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी ता. 29/3/2018 रोजी एलईडी टीव्ही खरेदी केलेला असून त्याअनुषंगाने दि.8/2/21 रोजी म्हणजेच तब्बल तीन वर्षांनी पॅनेलमध्ये तांत्रिक समस्या (Technical issue in panel ) उद्भवल्याची तक्रार वि.प. याचेकडे नोंद केली आहे. सदरचा कालावधीमध्ये एलईडी टीव्ही हा वापरामध्ये होता. वि.प. यांनी तक्रादार यांना कोणतीही सेवा देण्यास नाकारलेले नाही. वि.प. हे वॉरंटी मधील अटी व शर्तीनुसार तक्रारदार यांना सेवा देणेस तयार आहेत. तथापि तक्रारदार यांनी खरेदी केलेले मॉडेल हे कालबाहय झालेले असून किंवा त्याचे पार्टस उपलब्ध नसलेने वि.प. कंपनीने सदरचा वादाचे निराकरण करणेकरिता वॉरंटीच्या पॉलिसीप्रमाणे तक्रारदार यांचा हक्क अबाधीत ठेवून तक्रारदार यांना upgrade मॉडेलचा एलईडी टीव्ही देण्याची तयारी दर्शविली होती. ग्राहकाने सदरचा टीव्ही हा ब-याच कालावधीकरिता वापरला असल्यामुळे तसेच त्याच्यामध्ये कोणताही उत्पादित दोष सिध्द होत नसल्यामुळे सदरचा टीव्ही विनाशुल्क बदलून देणेची मागणी तक्रारदारास करता येणार नाही. सदरच्या नवीन एलईडी टीव्हीची किंमतीतून जुन्या एलईडी टीव्हीची किंमत वजा करुन उर्वरीत किंमत तक्रारदाराने अदा करावी असे तक्रारदारास सांगण्यात आले. तथापि तक्रारदार यांनी सदरची उर्वरीत रक्कम अदा करण्यास नकार दिला असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केले आहे. सबब सदर तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी अ.क्र.2 ला ता. 8/2/2021 रोजी वि.प. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार केलेची प्रत दाखल केली आहे. सदर प्रतीचे अवलोकन करता
Warranty (Valid upto)
March 28, 2023
असे नमूद आहे. यावरुन सदरच्या एलईडी टीव्हीचा वॉरंटी पिरेड हा 2023 पर्यंत असलेची बाब सिध्द होते. तसेच वि.प. यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. यांचेकडे वादातील एलईडी टीव्हीचे मॉडेल हे कालबाहय झालेले असल्याने अथवा त्याचे पार्टस मिळत नसलेने सदरचा एलईडी टीव्ही वॉरंटी पिरेडमध्ये बदलून देणे अशक्य असल्याचे कथन केलले आहे. वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदार यांनी सदरचा एलईडी टीव्हीचा वापर हा तीन वर्षे करुन त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे दि.8/2/21 रोजी सदरची तक्रार केली आहे असे जरी कथन केले असले तरी दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांच्या वादातील एलईडी टीव्ही मध्ये तीन वर्षांचे कालावधीत दोष उत्पन्न झाला होता ही बाब सद्यपरिस्थितीत नाकारता येत नाही. सदर दोष उत्पन्न झाला असल्यामुळेच वि.प. यांनी तक्रारदार यांना नवीन एलईडी टीव्हीची किंमतीतून जुन्या एलईडी टीव्हीची किंमत वजा करुन उर्वरीत किंमत तक्रारदाराने अदा करावी असे सांगितले हे वि.प. यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. तथापि वि.प. यांनी वादातील एलईडी टीव्हीचे पार्ट्स वि.प. यांचेकडे उपलब्ध नसलेचे वि.प. यांनीच मान्य केले आहे. सदरचे वॉरंटी कालावधीत पार्ट्स बदलून देणे वि.प. यांचेवर कायद्याने बंधनकारक आहे. प्रस्तुतकामी वि.प. क्र.2 यांना संधी असून देखील वि.प. क्र.2 यांनी तक्रारदाराच्या तक्रारीतल कथने पुराव्यनिशी नाकारली नाहीत तसेच वि.प. क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्याच्या अनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. वि.प. यांनी त्यांची कथने पुराव्यानिशी शाबीत केलेली नाहीत. या सर्व बाबींचा विचार करता व दाखल कागदपत्रांचा विचार करता तक्रारदार यांनी वि.प. कंपनी यांना ता. 8/2/21 व ता. 17/2/21 रोजी वि.प. कंपनीच्या अधिकृत ईमेलवर तक्रारी केल्या असताना देखील व सदर दोष वॉरंटी पिरेडमध्ये असताना देखील वि.प. यांनी तक्रारदार यांना टीव्ही रिप्लेसमेंट करण्यास नकार दिला अथवा सदर टीव्हीच्या किंमतीत 50 टक्के रक्कम भरुन टीव्ही घेणेस तक्रारदार यांना सांगून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 व 4
10. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. या कारणाने तक्रारदार हे वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून संयुक्तिकरित्या वादातील एलइडी टीव्हीची खरेदी रक्कम रु.29,000/- मिळणेस पात्र आहेत. तथापि सदरचे एलइडी टीव्ही तक्रारदार यांनी तीन वर्षे वापर केला असलेमुळे सदर रकमेवर व्याज मिळणेस तक्रारदार हे अपात्र आहेत. परंतु वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 व 4 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रक्कम रु.29,000/- अदा करावी.
- वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|