निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदाराने दि.28.08.2009 पासून सामनेवाले यांचेकडून Prepaid Internet Connection Plan घेतले होते. त्याचा खाते क्र.532601 असा होता. त्याचे नूतनीकरण प्रत्येक दोन महिन्यांनी करावयाचे होते. दि.30.10.2010 रोजी तक्रारदाराने पुढील दोन महिन्यांसाठी म्हणजे दि.29.12.2010 पर्यंत नूतनीकरण करुन घेतले. परंतु दि.30.11.2010 रोजी सामनेवाले यांनी त्याचे इंटरनेट कनेक्शन बंद केले. म्हणून त्यांनी सामनेवाले यांचे ग्राहक कार्यकारी अधिकारी (Customer Executive) यांचेकडे तक्रार केली. त्या तक्रारीचा क्र.5008445 असा होता. त्यांनी तक्रारदार यांची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ब-याच वेळा तक्रारदाराने त्यांना फोन केला होता. परंतु प्रत्येक वेळी त्याला 5-10 मिनिटं फोनवर वाट पाहावी लागली. प्रत्येकी वेळी त्याला त्याची समस्यां दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले. एकदा सामनेवाले यांचे व्यवस्थापक यांनी सांगितले की, तुमची समस्या दूर केली आहे व आता तुमची कोणतीही तक्रार प्रलंबित नाही, त्यांनी तक्रारदाराला सांगितल्यावर त्याने दि.05.12.2010 रोजी पुन्हा तक्रार केली. परंतु त्यानंतर, वारंवार पाठपुरावा करुनही दि.14.12.2010 पर्यंत त्याचे इंटरनेट कनेक्शन चालू झाले नाही दि.15.12.2010 रोजी ते कनेक्शन सुरु झाले. पंधरा दिवस इंटरनेट कनेक्शन बंद असल्यामुळे पंधरा दिवासांचा फायदा देण्याचे सामनेवाले यांनी आश्वासन दिले व इंटरनेट कनेक्शनचा कालावधी पंधरा दिवसाने वाढविण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र असा वाढीव कालावधी सामनेवाले यांनी दिला नाही व दि.29.12.2010 रोजी त्याचे इंटरनेट कनेक्शन बंद केले. ही सामनेवाले यांच्या सेवेत न्यूनता आहे म्हणून त्याने सदरची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सामनेवाले यांचेकडून त्यांच्या सेवेतील न्यूनतेबद्दल व त्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु.10,000/- नुकसानभरपाई मागितली आहे तसेच मंचाला योग्य वाटेल ती दाद देण्याची विनंती केली आहे. 2 सामनेवाले यांना या तक्रारीची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत, म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फाचा आदेश करण्यात आला. 3 तक्रारदाराने त्याच्या तक्रारीच्या पुष्टीसाठी त्याचे शपथपत्रं व खालील कागदपत्रं दाखल केली आहेत. अ इंटरनेट कनेक्शनची सामनेवाले यांनी दिलेली पावती ब तक्रारदाराने सामनेवाले यांना पाठविलेल्या ई-मेलच्या प्रतीं क तक्रारदाराने सामनेवाले यांना प्रदान केलेल्या रक्कमेचे विवरण तक्रार, तक्रारदाराचे शपथपत्र व त्याने दाखल केलेली कागदपत्रं यावरुन सिध्द होते की, त्यांनी सामनेवाले यांचेकडून प्रिपेड इंटरनेट कनेक्शनची सुविधा घेतली होती व प्रत्येक दोन महिन्याने तो त्याचे नूतनीकरण करुन घेत होता. दि.30.10.2010 रोजी त्याने रक्कम रु.689/- भरुन दोन महिन्यासाठी नूतनीकरण करुन घेतले होते. इंटरनेटचा कालावधी दि.29.12.2010 पर्यंत असताना सामनेवाले यांनी दि.29.11.2010 रोजीच त्याचे कनेक्शन बंद केले. त्याने सामनेवाले यांचेकडे त्याबाबत तक्रार केली व सामनेवाले यांचेकडे पाठपुरावा केला. परंतु पंधरा दिवसांनंतर दि.15.12.2010 रोजी सामनेवाले यांनी त्याचे इंटरनेट कनेक्शन सुरु केले. अशा प्रकारे कारण नसताना पंधरा दिवस तो त्या सुविधेचा उपभोग घेऊ शकला नाही. सामनेवाले यांनी त्याला इंटरनेट कनेक्शनचा कालावधी वाढवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु ते त्यांनी पाळले नाही व दि.29.12.2010 रोजीच त्याचे इंटरनेट कनेक्शन रद्द केले, ही सामनेवाले यांची सेवेत न्यूनता आहे. सामनेवाले यांच्या या सेवतील न्यूनतेमुळे तक्रारदाराला त्यांना वारंवार फोन करावे लागले. त्यामुळे त्याला मानसिक त्रास झाला यासाठी सामनेवाले तक्रारदाराला वाजवी नुकसानभरपाई देण्यास जबाबदार आहे. तसेच त्यांच्या सेवेतील न्यूनतेमुळे तक्रारदाराला सदरची तक्रार करावी लागली व तारखेवर हजर रहावे लागले, म्हणून या तक्रारीचा खर्च देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत. मंचाच्या मते खालील आदेश न्यायाच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहेत. आदेश (1) तक्रार क्र.109/2011 अंशतः मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाले यांनी तक्रारदाराला झालेल्या त्रासापोटी रु.5,000/- नुकसानभरपाई द्यावी व या तक्रारीचा खर्च रु.3,000/- द्यावा. (3) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |