तक्रारदारातर्फे अॅड. श्री शहा हजर
जाबदेणारांतर्फे अॅड. श्रीमती जयश्री कुलकर्णी हजर
*****************************************************************
निकाल
पारीत दिनांकः- 31/05/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी जाबदेणारांकडून इंटरनेटचे कनेक्शन घेतले होते, यासाठी त्यांनी जाबदेणारांना रक्कम रु. 1500/- दिले होते, त्यामध्ये त्यांना फ्री इन्स्टॉलेशन आणि मोडेम इन्स्ट्रुमेंट फ्री मिळणार होते. तक्रारदारांचा मुलगा बारावीमध्ये शिकत असल्यामुळे त्याच्या अभ्यासाकरीता त्यांनी इंटरनेटचे कनेक्शन घेतलेले होते. त्यानंतर तक्रारदार दि. 15/12/2008 पासून इंटरनेटचा उपभोग घेऊ लागले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला जाबदेणारांनी योग्य सर्व्हिस दिली नाही, म्हणून त्यांनी जाबदेणारांच्या कोथरुड ऑफिसमध्ये तक्रार केली, परंतु जाबदेणारांनी त्यांना व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर तक्रारदारांनी पुन्हा दि. 4/2/2009 रोजी जाबदेणारांकडे तक्रार नोंदविली व त्यांनी तक्रार क्र. 2431347 दिला. त्यावर जाबदेणारांनी त्यांचा सर्व्हरच्या कनेक्टीव्हीटीमध्ये प्रॉब्लेम असल्याचे सांगितले व हा प्रॉब्लेम दूर होण्याकरीता कमीत कमी पाच दिवस लागतील असे सांगितले. तक्रारदारांनी पाच दिवस वाट पाहून पुन्हा जाबदेणारांना या संदर्भात फोन करुन तक्रार नोंदविली. त्यानंतर तक्रारदारांनी कधीही ब्रॉड बँड सर्व्हिसेस दुरुस्त करण्यात आल्या नाहीत, परंतु तक्रारदारास न विचारता किंवा त्यांची परवानगी न देता त्यांचे इंटरनेटचे कनेक्शन खंडीत करण्यात आले व त्यांच्या टेरेसवरुन सर्व वायर्स काढून टाकण्यात आल्या. तक्रारदाराचा मुलाला प्रत्येक वेळी बाहेर सायबर कॅफेमध्ये जाऊन इंटरनेटच्या सर्व्हिसेस घ्याव्या लागत होत्या. त्याकरीता त्याला प्रत्येक तासाकरीता रु. 15/- व एका दिवसाकरीता रु. 45/- खर्च करावे लागत होते. या सर्वाचा एकुण खर्च रक्कम रु. 2200/- तक्रारदारास आला. तक्रारदारांनी जाबदेणारांना कायदेशिर नोटीस पाठविल, त्याचाही खर्च तक्रारदार जाबदेणारांकडून मागतात. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 1500/- परत, त्यांनी केलेल्या खर्चाची रक्कम रु. 7200/- द.सा.द.शे. 18% व्याजदराने, रक्कम रु. 2000/- नोटीशीचा खर्च, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार हे दि. 10/4/2007 पासून त्यांचे ग्राहक आहेत व त्यांनी रक्कम रु. 1,684/- भरुन त्यांच्याकडून इंटरनेटचे कनेक्शन घेतले होते. या प्लॅननुसार त्यांना दर 6 महिन्यांनंतर त्यांचे अकाऊंट रक्कम भरुन रिन्यु करावे लागत होते. तक्रारदारांनी सन 2007-2008 पर्यंत अकाऊंट रिन्यु केले होते. जाबदेणारांनी तक्रारदारांना योग्य सर्व्हिस दिली नाही, हे त्यांना मान्य नाही. अनेकवेळा जाबदेणारांचे इंजिनिअर तक्रारदारांच्या घरी जाऊन त्यांना इंटरनेटचा वापर कसा करावा याबद्दल सुचना देत होते, परंतु तक्रारदारांनी त्या सुचनांचे पालन केले नाही. तक्रारदार इंटरनेटच्या केबलवरुन टी.व्ही. पाहत होते, त्यांना अनेक वेळा, इंटरनेटच्या केबलवरुन टी.व्ही. पाहू नका असे सांगूनही त्यांनी ऐकले नाही, म्हणून तक्रारदारांचे इंटरनेट कनेक्शन खंडीत करण्यात आले. याविषयी जाबदेणारांनी दि. 7/2/2009 कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. इंटरनेट कनेक्शन देतेवेळी जाबदेणारांनी तक्रारदारांकडून रजिस्ट्रेशन फॉर्म भरुन घेतला होता व त्यावर तक्रारदारांनी सही केली होती. त्यातील क्लॉज क्र. 13 नुसार याबद्दल कुठलाही वाद निर्माण झाल्यास आर्बिट्रेटरकडे जावे, त्याचबरोबर फक्त मुंबई येथील न्यायालयांनाच सदरचे प्रकरण चालविण्याचे कार्यक्षेत्र आहे. प्रस्तुतची तक्रार दाखल करण्यासाठी कुठलीही घटना घडलेली नाही. शासनाने व इतर प्राधिकार्यांनी इंटरनेट सर्व्हिस देणार्यांकरीता काही नियमाली तयार केलेल्या आहेत, त्या त्यांच्यावर बंधनकारक आहे. तक्रारदार इंटरनेटच्या केबलद्वारे टी.व्ही. पाहून त्याचा गैरवापर करीत होते, हे जाबदेणारांचे मेंटेनन्सचे प्रतिनिधी श्री संजय खडके व श्री बंटी शिंदे यांनी शोधून काढले होते व तक्रारदारांविरुद्ध पोलिस तक्रार केली होती. वरील सर्व कारणांवरुन तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली, त्यामध्ये श्री. संजय खडके यांचे शपथपत्र दाखल केले.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून इंटरनेटच कनेक्शन घेतल होते व त्यांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी त्यांना कोणतीही सुचना न देता त्यांचे इंटरनेटचे कनेक्शन खंडीत केले. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार इंटरनेटच्या केबलद्वारे टी.व्ही. पाहून त्याचा गैरवापर करीत होते. तक्रारदारांनी इंटरनेटच्या वायरला अनधिकृतरित्या फिरवाफिरवी (Tampering) करुन त्याचे कनेक्शन टी.व्ही.स घेतले होते, याची माहिती जाबदेणारांचे मेंटेनन्सचे प्रतिनिधी श्री संजय खडके व श्री बंटी शिंदे यांना तपासणी करताना आढळले. श्री संजय खडके यांनी त्या स्वरुपाचे शपथपत्रही मंचामध्ये दाखल केले आहे. तसेच जाबदेणारांनी कोथरुड पोलिस स्टेशन येथे तक्रारदारांविरुद्ध तक्रार दाखल केली होती, त्याचीही प्रत जाबदेणारांनी दाखल केलेली आहे. या सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदार इंटरनेटच्या केबलद्वारे टी.व्ही. पाहून त्याचा गैरवापर करीत होते, म्हणून जाबदेणारांनी त्यांचे इंटरनेट कनेक्शन खंडीत केले, हे सिद्ध हिते.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.