मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक :08/07/2011) 1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 06.12.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. यातील तक्रारकर्ते हे मृतक किरण लोखंडे यांचे वारस आहेत. किरण लोखंडे यांनी दि.02.04.2009 रोजी, गैरअर्जदार जे स्थावर मालाची देवाण-घेवाण (प्रॉपर्टी डिलींग) करतात, त्यांचेसोबत ‘पुष्पकमल अपार्टमेंट’ मधील अपार्टमेंट नं.304, तिस-या मजल्यावरील एक फ्लॅट विकत घेण्याचा सौदा केला होता. त्यांनी गैरअर्जदाराला एकूण रु.2,22,000/- एवढी रक्कम दिली होती व गैरअर्जदार त्या मालमत्तेचे विक्रीपत्र करुन देण्यांस असमर्थ ठरले. म्हणून तक्रारकर्तीने दिलेली रक्कम परत मागितली असता, गैरअर्जदारांनी दोन धनादेश रु.1,50,000/- व रु.72,000/- चे तक्रारकर्तीला दिले, मात्र ते वटले नाही. म्हणून तक्रारकर्तीने गैरअर्जदाराला नोटीस दिली असता गैरअर्जदाराने सदर नोटीसला उत्तर देऊन लवकरात-लवकर रक्कम देण्यास तयार आहे असे कळविले. मात्र अद्यापही रक्कम दिलेली नाही, म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल केलेली असुन ती व्दारे रु.2,22,000/- द.सा.द.शे.12% व्याजासह मिळावे, झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु.50,000/- मिळावे व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.10,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत. 3. गैरअर्जदारांना नोटीस देण्यांत आली असता त्यांना नोटीस मिळूनही ते मंचात उपस्थित झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि.12.05.2011 रोजी पारित केला आहे. 4. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात पतिच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, पावती, रु.1,50,000/- चे धनादेशाची प्रत, रु.51,000/- दिल्याची पावती, करारनामा, बँकेचे खाते विवरण, नोटीस, पोष्टाच्या पोच पावत्या इत्यादींच्या छायांकीत प्रती जोडलेल्या आहेत. 5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.27.06.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्याचे वकील हजर त्यांचा युक्तिवाद ऐकला, गैरअर्जदारा विरुध्द दि. 12.05.2011 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. यातील गैरअर्जदारांना नोटीस मिळूनही ते उपस्थित झाले नाही, त्यांनी आपला कोणत्याही प्रकारे बचाव केला नाही. तक्रारकर्तीच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदार हे प्रॉपर्टी डिलींग करतात आणि मृतक किरण लोखंडे याचेसोबत सदनिकेबाबतचा सौदा केला आणि रु.2,22,000/- एवढी रक्कम स्विकारली, याबाबत तक्रारकर्तीने आपला प्रतिज्ञालेख आणि तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांव्दारे सिध्द केलेले आहे. इतकेच नव्हे तर गैरअर्जदारांनी दि.29.03.2010 रोजी तक्रारकर्तीचे नोटीसला वकीला मार्फत उत्तर देऊन या सर्व बाबी कबुल केल्या व रक्कम लवकरात-लवकर परत देण्याबाबत मान्य केले. मात्र त्यांनी अद्यापही तक्रारकर्तीला रक्कम परत दिलेली नाही व मृतक किरण लोखंडे यांचेसोबत झालेला करारही पूर्ण केला नाही. थोडक्यात तक्रारकर्तीने आपली तक्रार योग्य पुराव्याव्दारे सिध्द केलेली आहे आणि गैरअर्जदारांनी त्यांच्या सेवेत त्रुटी दिल्याचे दिसुन येते. वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना रु.2,22,000/- एवढी रक्कम ती स्विकारल्यापासुन म्हणजेच दि.02.04.2009 पासुन द.सा.द.शे.9% व्याजासह परत करावी. 3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.1,000/- द्यावे. 4. गैरअर्जदारांनी वरील आदेशाचे पालन 1 (एक) महीन्याचे आत करावे, अन्यथा द.सा.द.शे.9% ऐवजी 12% व्याज देय राहील.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |