श्री. हेमंतकुमार पटेरीया, सदस्य यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक – 13 जुलै, 2017)
1. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारकर्तीची संक्षिप्त तक्रार अशी आहे की, त्याने वि.प.लक्ष्मी महिला बिगरशेतकी सहकारी संस्थेत खालीलप्रमाणे मुदतीठेवीची रक्कम ठेवलेली आहे आणि संस्थेने तक्रारकर्त्यास मुदत ठेव पावत्या दिलेल्या आहेत.
अ.क्र. | ठेव रक्कम | ठेवीचा दिनांक | मुदतपूर्ती दिनांक | व्याज दर |
1 | रु.2,80,000/- | 12.02.2016 | 12.08.2016 | 12.5% |
एकूण ठेवी रु.2,80,000/- मुदत पूर्तीची रक्कम ठेवीवर 12.5% व्याजासह.
सदर मुदत ठेवीवर 12.5 टक्के व्याज तक्रारकर्तीच्या बचत खाते क्र. 1483 मध्ये रु.2917/- प्रती महिना वि.प. जमा करणार होते. त्याप्रमाणे वि.प.ने सदर व्याजाची रक्कम मे 2016 पर्यंत तक्रारकर्तीच्या बचत खात्यात जमा केली. वरील ठेवीची मुदतपूर्ती झाल्यावर मुदत पूर्तीच्या रकमेची तक्रारकर्त्याने वि.प.कडे मागणी केली असता वि.प.ने ती नाकारली. तक्रारकर्त्याने दि.12.08.2016 रोजी अर्ज पाठवून मुदतपूर्तीची रक्कम रु.2,80,000/- देण्याची मागणी केली. सदर अर्ज मिळूनही वि.प.ने पूर्तता केली नाही किंवा उत्तरही दिले नाही. सदरची बाब ठेवीदार ग्राहकाप्रती सेवेतील न्यूनता असल्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.
- वि.प.ने ठेवींच्या मुदतपूर्तीची एकूण रक्कम रु.2,80,000/- द.सा.द.शे. 12.5 टक्के व्याजासह जून 2016 पासून देण्याचा आदेश व्हावा.
तक्रारीचे पुष्ट्यर्थ तक्रारकर्तीने मुदत ठेव प्रमाणपत्राची प्रत, बचत पासबूक खात्याची प्रत व वि.प.ला दिलेल्या अर्जाची प्रत दाखल केलेली आहे.
2. वि.प.क्र. 1 व 2 ने लेखी जवाब दाखल केला असून तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्तीने वि.प. संस्थेत मुदती ठेवी ठेवल्या असल्याचे मान्य केले आहे. संस्थेच्या सभासदांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली नसल्याने तक्रारकर्तीस मुदत ठेवीची रक्कम परत करता आली नसल्याचे आणि संस्था एकमुस्त मुदत ठेवीची परिपक्वता राशी परत करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. संस्थेची सभासदांकडून जशी वसूली होईल तशी तक्रारकर्तीस देणे रक्कम प्राधान्याने परत करण्यांत येईल असेही म्हटले आहे. संस्थेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अर्जदाराची ठेव रक्कम द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दराने परत करण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
3. तक्रारीच्या निर्णितीसाठी खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व कारण खालीलप्रमाणे –
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय? | अंशतः |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | अंतिम आदेशाप्रमाणे तक्रार अंशतः मंजूर. |
- कारणमिमांसा –
4. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- तक्रारकर्तीने तक्रारीत परिच्छेद क्र. 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे वि.प.कडे एकूण रु.2,80,000/- मुदती ठेवीत ठेवले असून ठेवींचे परिपक्वता मुल्य रु.2,80,000/- तक्रारकर्तीने दि.12.08.2016 रोजी अर्जाद्वारे मागणी करुनही वि.प.ने ती रक्कम आणि 12.05.2016 पासूनचे व्याज तक्रारकर्तीस परत केली नसल्याची बाब देखिल वि.प.ने मान्य केली आहे. वि.प. ही ठेवीदारांच्या ठेवी स्विकारुन त्यावर व्याज देणारी आणि सभासदांना कर्ज देऊन त्यावर व्याज घेणारी सहकारी पत संस्था आहे. सदर संस्थेने सभासदांना दिलेले कर्ज वसूल करण्याची सर्वस्वी जबाबदारी सदर संस्थेची असून सभासदांनी कर्ज वसूली दिली नाही म्हणून ठेवीदारांना मुदत पूर्तीनंतर ठेवीची व्याजासह रक्कम परत न करण्याची वि.प.ची कृती ही ठेवीदार ग्राहकांप्रती निश्चितच सेवेतील न्यूनता आहे, म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
5. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- वि.प.संस्थेने तक्रारकर्तीकडून द.सा.द.शे. 12.5 टक्के व्याजाने रु.2,80,000/- ची ठेव स्विकारली असून मुदत पूर्तीनंतर ठेवीची परिपक्वता राशी रु.2,80,000/- देण्याची वि.प.ची कायदेशीर जबाबदारी आहे. परंतू वि.प.ने सदर रक्कम आणि त्यावर 12.05.2016 पासूनचे देय व्याज मागणी करुनही तक्रारकर्तीस दिले नसल्याने मुदतपूर्ती नंतर तक्रारकर्ती सदर रक्कम दि.12.05.2016 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत ठेवीच्या व्याज दराईतक्या म्हणजे द.सा.द.शे. 12.5 टक्के दराने व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय, शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.5,000/- आणि तक्रारखर्च रु.3,000/- मिळण्यास देखिल तक्रारकर्ती पात्र आहे, म्हणून मुद्दा क्र. 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
-आदेश-
1. तक्रारकर्तीचा ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 खालील तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यांत येत आहे.
2. वि.प.ने तक्रारकर्तीस एकूण रु.2,80,000/- ठेवीची परिपक्वता राशी रु.2,80,000/- दि.12.05.2016 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12.5 टक्के व्याजासह द्यावी.
3. वि.प.ने तक्रारकर्तीस शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.5,000/- आणि तक्रार खर्च रु.3,000/- द्यावा.
4. आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5. आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य देण्यांत यावी.
6. प्रकरणाची ब व क फाईल तक्रारकर्त्यास परत करावी.