Final Order / Judgement | विद्यमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग,अमरावती यांचे समोर तक्रार दाखल दिनांकः 20/09/2019 आदेश पारित दिनांकः 12/01/2021 तक्रार क्रमांक. : 207/2019 तक्रारकर्ता : श्री राहुल रमेश राजोटे वय – 24 वर्षे, व्यवसाय – खाजगी, रा. साधना कॉलनी, दस्तुर नगर, जुना बायपास, अमरावती -: विरुद्ध :- विरुध्द पक्ष : हरी ओम ट्रॅव्हर्ल्स एजन्सी होंडा शोरुम जवळ, बनसोड कॉम्प्लेक्स, दस्तुर नगर, अमरावती तक्रारकर्त्यातर्फे : अॅड. डॉ. आर. यु. मराठे वि.प. तर्फे : अॅड. एस. एम. राठी गणपूर्ती : श्री. एस. पी. देशमुख - मा. अध्यक्ष श्रीमती शुभांगी कोंडे - मा. सदस्य न्यायनिर्णय घोषित करणार श्रीमती शुभांगी कोंडे, मा. सदस्या -// आ दे श //- (दिनांक 12 जानेवारी, 2021) तक्रारदाराने तत्कालिन उपभोक्ता संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे. - तक्रारदाराचे कथन आहे की, तो जि.अमरावती येथील राहणार असुन, पुणे येथील सॉफ्टवेअर कंपनीमध्ये अभियंता म्हणून कामावर आहे. विरुध्द पक्ष ही ट्रॅव्हल्स एजन्सी असुन, अमरावती-पुणे व पुणे-अमरावती दरम्यान खाजगी बससेवा चालवितात. तक्रारदाराचा पुणे मुक्कामी असतांना अपघात झाला असता प्राथमिक उपचार त्याने पुणे येथे घेतला व पुढील उपचार अमरावती येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. चंद्शेखर कुळकर्णी यांचेकडे घेत आहे. त्याकरीता तक्रारदाराला काही काळ अमरावती येथे वास्तव्य करावयाचे असल्या कारणाने त्याने विरुध्द पक्षाकडे पुणे-अमरावती स्वतःच्या प्रवासाकरीता रक्कम रुपये 1,000/- व पुण्यावरुन स्वतःची दुचाकी अमरावती येथे आणायची असल्याने त्याकरीता अतिरिक्त रक्कम रुपये 1500/- असे एकूण रक्कम रुपये 2500/- दिनांक 15/8/2019 रोजी जमा करुन दिनांक 18/8/2019 च्या पुणे-अमरावती प्रवासाचे तिकीट 4 वाजताचे काढले.
- तक्रारदार कथन करतो की, त्याने दिनांक 18/8/2019 रोजी विरुध्द पक्षाने सांगितलेल्या वेळी त्याची दुचाकी निगडी येथे पुणे—अमरावती नेण्याकरीता आणली, परंतु विरुध्द पक्षाच्या कर्मचा-यांनी ती गाडी पुणे-अमरावती ज्या गाडीत तक्रारदार प्रवास करणार होता, त्यात नेण्यास असमर्थता दर्शविली. सदर बाबीची सुचना तक्रारदाराने विरुध्द पक्षाला दिली असता त्यांनीही असमर्थता दर्शविली. त्यामुळे तक्रारदाराला नाईलाजाने दुसरी कडून व्हि आर एल कारगेर सेफ मुव्हर्स येथून दिनांक 18/8/2019 रोजी वेळेवर दुचाकी अमरावती पोहोचवण्याकरीता रक्कम रुपये 3,500/- गाडी नेणे व अमरावती येथे गाडी उतरवण्याची रक्कम रुपये 1,500/- अदा करावे लागले. विरुध्द पक्षाने गाडी नेण्याकरीता रक्कम स्विकारुनही तक्रारदाराला हवी ती सेवा दिली नाही. त्याला अपघातग्रस्त असतांनाही शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. करीता विरुध्द पक्षाविरुध्द दाद मागावयास त्याला आयोगात यावे लागले.
- तक्रारदाराची प्रार्थना आहे की, विरुध्द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असून तक्रारदाराला दयावयाच्या सेवेत त्रृटी केली आहे, असे मंचाने घोषीत करावे व त्याकरीता नुकसान भरपाई रक्कम रुपये 66,500/- द.सा.द.शे. 13% व्याजासह देण्यात यावी व तक्रारीचा खर्च तक्रारदाराला देण्यात यावा.
- तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत एकुण 04 दस्तं दाखल केले आहेत. तक्रारदाराची कथनं सदर दस्तांवर आधारित असल्याचे दिसून येते.
- विरुध्द पक्षाने आपल्या लेखी जबाबात त्याची ट्रॅव्हर्ल्स एजन्सी आहे व ते अमरावती-पुणे, पुणे-अमरावती खाजगी बस चालवितात, ही बाब मान्य करुन तक्रारदाराच्या तक्रारीतील उर्वरीत संपुर्ण कथन नाकारलीत. विरुध्द पक्षाने नमुद केले की, तक्रारदाराने नव्हे तर त्याच्या वडीलांनी दिनांक 15/8/2019 रोजी पुणे ते अमरावती येण्याकरीता दिनांक 18/8/2019 रोजीचे एक आसनाकरीता रक्कम रुपये 1,000/- व पुण्याहून दुचाकी अमरावती येथे आणण्याकरीता रक्कम रुपये 15,00/- विरुध्द पक्षाला देवून आरक्षित केले होते. त्याकरीता विरुध्द पक्षाने त्यांना तक्रारदाराच्या नावाचे राहुल राजोटे असे तिकीट दिले होते. दिनांक 18/8/2019 रोजी ज्या बसने तक्रारदार पुणे-अमरावती येणार होता, त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विरुध्द पक्षाने दिनांक 18/8/2019 रोजी दुस-या बसची व्यवस्था केली. त्या बसची डिक्की लहान असल्यामुळे तक्रारदाराची दुचाकी त्या बसच्या डिक्कीमध्ये येत नसल्याने विरुध्द पक्षाने पर्यायी व्यवस्था केली होती. विरुध्द पक्षाने तक्रारदाराला त्याची दुचाकी आकाश ट्रॅव्हर्ल्सची संगमवाडी येथून सुटणा-या बसमध्ये घेवून जाण्यास सांगितले. परंतु तक्रारदाराने नकार दिला व तो स्वतः विरुध्द पक्षाच्या बसमध्ये बसून अमरावती येथे आला.
- विरुध्द पक्षाचा जबाब आहे की, त्याने तक्रारदाराच्या वडीलांना दुचाकी पुणे येथून अमरावतीला न आणल्याने दिनांक 19/8/2020 रोजी त्याकरीता घेतलेली रक्कम रुपये 1500/- परत केली आहे. तक्रारदाराने विरुध्द पक्षा विरुध्द फ्रेजरपुरा पोलीसमध्ये तक्रार केली होती, मात्र विरुध्द पक्षाने दुचाकी आणण्याची रक्कम परत केली असल्याचे पोलीस स्टेशनला स्पष्ट केल्याने त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. तक्रारदाराने ही बाब प्रकरणात लपवून ठेवली आहे की, त्याच्या वडीलांनी त्याच्या नांवाने तिकीट घेतले होते. तक्रारदाराचे वडीलांनी दुचाकी आणण्याची रक्कम परत घेतली आहे. तक्रारदाराने प्रकरणात त्यांना पक्षकार केले नाही. तक्रारीचे कारण पुणे येथे घडलेले आहे, त्यामुळे या मंचास प्रकरण चालविणेचा अधिकार नाही, करीता तक्रार खारीज करण्यात यावी.
- तक्रारदाराने विरुध्द पक्षाच्या लेखी जबाबाला प्रतीउत्तर दिले की, तक्रारदाराने स्वतः दिनांक 15/8/2019 रोजी विरुध्द पक्षाचे बसचे आसनाचे आरक्षण केले होते. तक्रारदाराचे वडीलांनी जर तक्रारदाराच्या नावाचे बसचे आरक्षण केले असते तर विरुध्द पक्षाने तिकीटावर तशी नोंद घेतली असती. विरुध्द पक्षाने त्याची गाडी खराब झाल्याबाबत कोणतीही लेखी अथवा मौखीक सुचना तक्रारदाराला दिली नव्हती व गाडी नेण्याकरीता पर्यायी व्यवस्था केली नाही. विरुध्द पक्षाने तक्रारदाराच्या वडीलांना गाडी नेण्याची रक्कम परत केली नाही, त्यामुळे त्यांना पक्षकार करणे गरजेचे नाही. तक्रारदाराने विरुध्द पक्षा विरुध्द पोलीस स्टेशनला कुठलीही तक्रार नोंदविली नाही व या आयोगाला सदर तक्रार चालविणेचा अधिकार आहे.
- तक्रारदाराने दिनांक 29/11/2019 रोजी स्वतःचा पुरावा सादर केला, त्यांत तक्रारीतील कथनं व प्रतीउत्तरातील मजकुर नमुद आहे.
- विरुध्द पक्षातर्फे बन्सीलाल तायचंद लुल्ला यांचा पुरावा सादर. त्यांत त्यांनी जबाबातील कथन शपथेवर सादर केले.
- सदर प्रकरणी विरुध्द पक्षाला वारंवार संधी देवूनही त्यांनी आपला लेखी युक्तीवाद अथवा तोंडी युक्तीवाद न केल्याने प्रकरण न्यायनिर्णयाकरीता लावण्यात आले.
- तक्रारदाराची तक्रार, त्याने अभिलेखावर दाखल केलेले दस्त, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, त्याचे दाखल पुरावे व दस्तं तसेच तोंडी युक्तीवाद विचारात घेता आयोगाने न्यायनिर्णया करीता खालील मुद्दे विचारात घेतलेत. प्रत्येक मुद्दयाच्या विरुध्द बाजुस आमचे निष्कर्ष त्या खालील कारणांच्या आधारे नोंदलेत.
मुद्दे निष्कर्ष 1. | तक्रारदाराने हे सिध्द् केले काय की, विरुध्द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असून तक्रारदाराला सेवा देण्यात कसुर केल्यामुळे त्याला हानी झाली ? | होय. | 2. | तक्रारदार मागतो त्या अनुतोषास पात्र आहे, हे त्याने सिध्द केले का? | अंशतः होय. | 3. | अंतीम आदेश व हुकूम काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा - कारणे मुद्दा क्र. 1 करीता – ही बाब वादातीत नाही की, विरुध्द पक्षाची ट्रॅव्हर्ल्स एजन्सी आहे व ते अमरावती-पुणे, पुणे-अमरावती दरम्यान खाजगी बससेवा चालवितात. तक्रारीचे अवलोकन केले असता असे आढळून येते की, तक्रारदाराने ज्या सेवेकरीता म्हणजेच त्याला स्वतःला दुचाकीसह पुणे-अमरावती जाणेकरीता विरुध्द पक्षाकडून तिकीट काढले, परंतु ऐनवेळी विरुध्द पक्षाने त्याची दुचाकी पुणे-अमरावती नेण्यास असमर्थता दर्शविली व त्याला योग्य सेवा दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराला दुचाकी आणण्याकरीता पर्यायी व्यवस्था करुन अतिरिक्त खर्च सोसावा लागला.
- तक्रारदाराने आपल्या कथनाच्या पृष्टर्थ्य तक्रारी सोबत दस्तं क्र.1 विरुध्द पक्षाने तक्रारदाराला पुणे-अमरावतीजाण्याचे दिलेले तिकीट दिनांक 15/8/2019 आहे. त्याचे अवलोकन केले असता त्यावर तक्रारदाराचे नांव आहे. प्रवास दिनांक 18/8/2019 वेळ दुपारी 4 वाजता. आसन क्र.9 विरुध्द पक्षाने तक्रारदाराचे आसनाकारीता रक्कम रुपये 1,000/- व दुचाकी नेण्याकरीता रक्कम रुपये 1,500/- स्विकारल्याचे नमुद आहे. खाली विरुध्द पक्षाची सही आहे. दस्तं क्र.2 तक्रारदाराने दिनांक 18/8/2019 रोजी त्याची दुचाकी दुस-या मार्फत म्हणजेच व्हि आर एल कारगो सेफ मुव्हर्स यांचे मार्फत रक्कम रुपये 1,500/- देवून पुणे ते अमरावती नेण्याकरीता काढलेली पावती आहे. ज्यावरुन तक्रारदाराने विरुध्द पक्षामार्फत त्याची गाडी पुणे-अमरावती न पाठविण्याचे स्पष्ट होते.
- विरुध्द पक्ष वकीलांचा युक्तीवाद आहे की, तक्रारदाराने नव्हे तर त्याच्या वडीलांनी तक्रारदाराकरीता व दुचाकी नेण्याकरीता पुणे-अमरावती प्रवासाचे तिकीट काढले होते. दिनांक 18/8/2019 रोजी ज्या बसमध्ये तक्रारदार प्रवास करणार होता, त्यामध्ये तांत्रिक बिघाड आल्याने व तक्रारदाराकरीता पर्यायी बस व्यवस्था केलेल्या बसमध्ये डिक्की लहान असल्याने विरुध्द पक्षाने दुचाकी नेण्यास नकार दिला व संगमनेर येथून आकाश ट्रॅव्हर्ल्समध्ये दुचाकी पाठविण्यास सांगितले. तक्रारदाराने त्यास नकार दिला. विरुध्द पक्षाने तक्रारदाराच्या वडीलांना दुचाकी नेण्याची रक्कम परत केली आहे, परंतु सदर बाब तक्रारदाराने प्रकरणात लपवून ठेवली व वडीलांना पक्षकार केले नाही. तक्रारदाराचा व्यवहार पुणे येथे झाल्याने सदर प्रकरण चालविण्याचा या मंचास अधिकार नाही.
- आयोगाच्या मते तक्रारदाराला विरुध्द पक्षाने दिलेल्या तिकीटाचे अवलोकन केले असता तेथे कुठेही तक्रारदाराच्या वडीलांचे नांव अथवा त्यांच्या मार्फत तिकीट काढल्याचे नमुद नाही. त्यांची त्यावर सही नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या वडीलांनी त्याच्याकरीता तिकीट काढले होते, हे विरुध्द पक्षाचे कथन खोटे आहे, असे आयोगास वाटते. दिनांक 18/8/2019 रेाजी पुणे-अमरावती ज्या बसमध्ये तक्रारदार प्रवास करणार होता, त्यामध्ये तांत्रिक बिघाड आला होता. याबाबत कोणताही दस्तं अथवा पुरावा विरुध्द पक्षाने प्रकरणात सादर केला नाही. तक्रारदाराची दुचाकी नेण्याकरीता पर्यायी व्यवस्था संगमनेर वरुन केली होती. याबाबत कोणताही पुरावा विरुध्द पक्षाने दाखल केला नाही. विरुध्द पक्षाचा युक्तीवाद जर असा आहे की, त्याने गाडी पुणे-अमरावती नेण्याची रक्कम तक्रारदाराच्या वडीलांना परत केली, त्यामुळे त्यांनी सेवेत त्रृटी केली नाही तर रक्कम रुपये 1,500/- परत केल्याचे तिकीटावर कोठेही नमुद दिसून येत नाही अथवा कोणताही लेखी दस्तं त्याबाबत विरुध्द पक्षाने दाखल केला नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाची ही बाब विश्वासहार्य वाटत नाही, असे आयोगाचे मत आहे. विरुध्द पक्षाने हया आयोगास प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही असा युक्तीवाद केला, त्याबाबत आयोगास असे आढळून येते की, तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडून पुणे-अमरावती प्रवासाचे काढलेले तिकीट अमरावती येथील विरुध्द पक्षाच्या कार्यालयातून आहे त्या तिकीटावर विरुध्द पक्षाच्या अमरावती कार्यालयाचा पत्ता आहे व तिकीटाची रक्कम येथेच स्विकारली आहे. म्हणजे विरुध्द पक्ष अमरावती येथे राहतो. तक्रारदाराच्या वडीलांनी तक्रारदाराच्या वतीने व करीता प्रवासाचे तिकीट काढले असे जरी मानले तरी तो लाभार्थी ठरतो. त्यामुळे सदर प्रकरण चालविण्याचा अधिकार आयोगास आहे, असे स्पष्ट होते.
- विरुध्द पक्षाने तक्रारदाराकडून त्याची दुचाकी पुणे-अमरावती आणण्याकरीता रक्कम स्विकारुन ऐनवेळी असमर्थता दर्शविली व रक्कम परत केली नाही, ही अनुचित व्यापारी प्रथा व सेवेतील त्रृटी होय, असे आयोगाचे मत आहे.
करीता मुद्दा क्र. 1 करीता तक्रारदाराच्या लाभात होकारार्थी निष्कर्ष नोंदवित आहोत. - कारणे मुद्दा क्र. 2 व 3 करीता – सदर प्रकरणी विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी व अनुचित व्यापारी प्रथा सिध्द झाल्याने तक्रारदाराने प्रार्थनेत नमुद केलेली मागणी विचाराधीन होते. तक्रारदाराने प्रार्थना क्र.2 मध्ये रक्कम रुपये 66,500/- 13 टक्के व्याजासह नुकसान भरपाई मागणी केली आहे. ज्याचे विश्लेषण तक्रारीतील परिच्छेद क्र.3 मध्ये आहे. ज्यामध्ये रक्कम रुपये 6,500/- दुचाकी अमरावती आणण्याकरीता खर्च केलेली रक्कम रुपये 50,000/- शारीरिक, मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- असे एकुण रुपये 66,500/- दिसून येते.
- तक्रारदाराने दाखल दस्त क्र.2 त्याची दुचाकी व्हिआरएल कारगो सेफ मुव्हर्स मार्फत पाठविल्याची पावती आहे. त्यावर रक्कम रुपये 1,500/- नमुद आहे तसेच वाहन नेणे व उतरविण्याचा खर्च रुपये 1,500/- तक्रारीत नमुद आहे. परंतु त्याबाबत ठोस पुरावा नाही. तक्रारदाराने गाडी पुणे-अमरावती आणली, ती चढविणे व उतरविणे करीता खर्च येणे साहजिकच आहे. व त्याकरीता रक्कम रुपये 1,000/- योग्य आहे, असे आम्हांस वाटते तसेच विरुध्द पक्षाने तक्रारदाराकडून दुचाकी नेण्याकरीता स्विकारलेली रक्कम परत केली नाही, हे स्पष्ट झाले. करीता रक्कम रुपये 1,500/- असे एकूण रुपये 4,000/- विरुध्द पक्षाने तक्रारदाराला देणे उचित होईल.
- तक्रारदाराचा पुणे येथे अपघात झाला तेथे त्याने प्राथमिक उपचार घेतले, त्याचा दस्तं क्र.3 प्रकरणात दाखल आहे व उर्वरीत उपचार अमरावती येथे सुरु असल्याचा दस्तं क्र.4 डॉ. चंद्रशेखर कुळकर्णी यांचे हॉस्पीटलचा दस्त आहे. तक्रारदाराला दुखापत झाली असतांनाही विरुध्द प्क्षाच्या गैरवर्तणुकीमुळे त्याला ऐन वेळेवर दिनांक 18/8/2019 रोजी दुचाकी पुणे-अमरावती आणण्याकरीता धावपळ करावी लागली, त्याकरीता अतिरीक्त रक्कम मोजावी लागली. त्यामुळे त्याला शारीरिक, मानसिक त्रास झाला हे स्पष्ट होते. तक्रारदाराने त्याकरीता रक्कम रुपये 50,000/- मागणी केली असली तरी ती त्याने रक्कम कशी निष्पन्न केली, हे स्पष्ट केले नाही, करीता रक्कम रुपये 15,000/- शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून आयोग निष्पन्न करीत आहे.
- तक्रारदाराला तक्रार दाखल करणेकरीता दस्तं गोळा करावे लागले, वकील नेमावा लागला, खर्च करावा लागला, करीता रक्कम रुपये 10,000/- तक्रार खर्च देणे उचित होईल, असे आयोगास वाटते.
- तक्रारदाराने प्रार्थना क्र.2 मध्ये नमुद रक्कम रुपये 66,500/- द.सा.द.शे. 13% व्याजासह मागणी केले आहे, ज्याचे स्पष्टीकरण तक्रारीतील परिच्छेद क्र.3 मध्ये नमुद आहे, परंतु जसे की शारीरिक, मानसिक त्रास, तक्रार खर्च व इतर व्यवस्थेमार्फत गाडी पाठविल्याचा खर्च, या रकमांवर द.सा.द.शे 13% व्याज कायदयाच्या कोणत्या तरतुदीनुसार देता येईल, हे विरुध्द पक्षाने स्पष्ट केले नाही.
- विरुध्द पक्षाने तक्रारदाराची दुचाकी पुणे-अमरावती नेण्याकरीता स्विकारलेली रक्कम त्यास परत केली नाही. त्या रकमेचा लाभ उठविला. करीता रक्कम रुपये 1,500/- वर फक्त बुकींग दिनांकापासून म्हणजेच दिनांक 15/8/2019 पासून 10% द.सा.द.शे.व्याज देणे योग्य होईल, असे आयोगास वाटते.
करीता मुद्दा क्र.2 व 3 करीता अंशतः होकारार्थी निष्कर्श नोंदवित आहोत. याद्वारे खालील आदेश - अंतीम आदेश – -
- , असे आयोग घोषित करते.
- पक्षाने तक्रारदाराची दुचाकी पुणे-अमरावती नेण्याकरीता स्विकारलेली रक्कम रुपये 1,500/- व तक्रारदाराला गाडी पाठविण्याकरीता दुस-या पर्यायी व्यवस्थेकरीता लागलेला खर्च रुपये 2,500/- असे एकूण रक्कम रुपये 4,000/- परत करावे.
4. विरुध्द पक्षाने तक्रारदाराची दुचाकी पुणे-अमरावती नेण्याकरीता स्विकारलेल्या रक्कम रुपये 1,500/- वर दिनांक 15/8/2019 पासून ते प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 10% व्याज दयावे. 5. विरुध्द पक्षाने तक्रारदाराला शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये 15,000/- (पंधरा हजार) दयावे. 6. विरुध्द पक्षाने तक्रारदाराला तक्रार खर्च रुपये 10,000/- (दहा हजार) दयावा. 7. तक्रारदाराच्या इतर मागण्या नामंजुर. 8. विरुध्द पक्षाने आयोगाचे आदेशाचे पालन आदेशाची प्रत उपलब्ध झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांचे आंत करावे. 9. निर्णयाची केवळ पहिली प्रत दोन्ही पक्षकारास मागणीनुसार विना शुल्क दयावी. | |