(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 19 डिसेंबर, 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. तक्रारकर्ता हा MSETCL मध्ये कार्यरत आहे व त्याने नागपुर येथे स्थायी होण्याचे उद्देशाने संबंधीत फ्लॅट क्रमांक 101 व दुकान नंबर 3 हे विरुध्दपक्ष हरीगंगा रियॉलिटी यांचे पलॉट क्रमांक 178 येथील प्रफुल पार्क, खसरा नंबर 322, 323, 326 A, 326 B, 329, 396, 398, पटवारी हलका क्रं.12, मौजा – गोदणी, तह. जिल्हा नागपुर येथील 1 BHK फ्लॅट व दुकान क्र.3 हे पहिल्या माळ्यावर विकत घेण्याचे ठरिवले. त्याचा बिल्टअप एरिया 550 चौरस फुट व दुकानाचे 150 चौरस फुट याची एकूण रक्कम रुपये 16,75,000/- मध्ये विकत घेण्याकरीता दिनांक 29.9.2013 ला करारपत्र केले. करारपत्रा प्रमाणे 3 वर्षामध्ये तक्रारकर्त्यास रक्कम देणे होते व त्यानंतर विरुध्दपक्ष त्याचा ताबा तक्रारकर्त्यास देण्याचे ठरले होते.
3. परंतु, तिन वर्षानंतरही विरुध्दपक्षाने अजुनपर्यंत काम देखील चालु केले नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास आतापर्यंत रुपये 4,18,750/- दिलेले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास यासंबंधी भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु विरुध्दपक्ष त्यांना भेटीकरीता वारंवार टाळत होते. त्यानंतर, विरुध्दपक्षाने आपला ऑफीस बंद केले व ती जागा सोडली, आता विरुध्दपक्षास शोधने खुप कठीण होते. त्यानंतर, तक्रारकर्त्याने दिनांक 29.9.2016 रोजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यामुळे तक्रारकर्त्याने खालीलप्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) तक्रारकर्त्याने आपली जमा रक्कम रुपये 4,18,750/- रक्कम जमा केल्यापासून 21 % व्याज दराने द.सा.द.शे. प्रमाणे मागितले आहे.
2) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासापोटी रुपये 3,00,000/-, तसेच शारिरीक त्रासापोटी रुपये 3,00,000/- व आर्थिक त्रासापोटी रुपये 3,00,000/- मागितले आहे, त्याचप्रमाणे तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,00,000/- मागितले आहे.
4. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. विरुध्दपक्ष आपल्या वकीला मार्फत हजर झाले, परंतु विरुध्दपक्षास वारंवार संधी मिळूनही आपला लेखी जबाब दाखल केला नाही. करीता, सदर प्रकरण विरुध्दपक्षाचे लेखी जबाबाशिवाय पुढे चालविण्याचा आदेश दिनांक 21.6.2017 ला निशाणी क्र.1 वर पारीत केला.
5. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. अभिलेखावर दाखल केलेली तक्रार व दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) आदेश काय ? : अंतिम आदेशा प्रमाणे.
// निष्कर्ष //
6. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या उपरोक्त नमूद प्रफुल पार्क ईमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 101 व दुकान क्रमांक 3 एकूण किंमत रुपये 16,75,000/- मध्ये विकत घेण्याचा करार दिनांक 29.9.2013 ला केला होता, त्या करारनाम्याची प्रत निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.9 वर दाखल आहे. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्यास विरुध्दपक्षाकडे वेगवेगळ्या बांधकामाच्या टप्या-टप्याने पैसे देण्याचे निर्धारीत झाले होते, परंतु आजतागायत विरुध्दपक्षाने सदर जागेवर कोणतेही बांधकाम चालु केलेले नाही. त्यामुळे कंटाळून तक्रारकर्त्याने दिनांक 29.9.2016 रोजी विरुध्दपक्षाविरुध्द पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली, ती निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.10 वर लावली आहे. तसेच, दस्त क्र.1 ते 8 वर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे जमा केलेल्या रकमेच्या पावत्याच्या छायाप्रती लावलेल्या आहेत. मंचा तर्फे विरुध्दपक्षास दिनांक 1.12.2016 ला नोटीस पाठविला, ती नोटीस विरुध्दपक्षाला दिनांक 9.12.2016 ला प्राप्त झाल्याचा अहवाल नमूद आहे. विरुध्दपक्षा तर्फे दिनांक 3.2.2017 रोजी वकील हजर झाले व त्यांनी वकालतनामा दाखल केला. परंतु, त्यांना वारंवार संधी मिळूनही त्यांनी लेखीउत्तर दाखल केले नाही, त्यामुळे प्रकरण त्यांचे लेखी उत्तराशिवाय पुढे चालविण्यात आले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे खालील नमूद ‘परिशिष्ट – अ’ प्रमाणे जमा केले आहे.
‘परिशिष्ट – अ’
अ.क्र. | दिनांक | डीडी/धनादेश क्रमांक | पावती क्रमांक | रक्कम |
1) | 22.08.2013 | 967621 | 130 | 42,000/- |
2) | 28.09.2013 | 025252 | 323 | 12,500/- |
3) | 28.09.2013 | 025253 | 324 | 5,369/- |
4) | 28.09.2013 | 025255 | 327 | 30,000/- |
5) | 28.09.2013 | 025254 | 325 | 37,500/- |
6) | 28.09.2013 | 967623 | 326 | 2,50,000/- |
7) | 28.09.2013 | 025256 | 328 | 11,758/- |
8) | 28.09.2013 | 025251 | 322 | 89,250/- |
| | | एकूण रुपये | 4,78,377/- |
7. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत विरुध्दपक्षाकडे रुपये 4,18,750/- एवढीच रक्कम जमा केल्याचे नमूद केले आहे. परंतु, तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पावत्याचे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दाखल पावत्यावरुन एकूण रक्कम रुपये 4,78,377/- जमा केल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पावत्यांवरुन विरुध्दपक्षाकडे एकूण रक्कम रुपये 4,78,377/- जमा केल्याची ही बाब सिध्द होते.
8. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याकडून एकूण रक्कम रुपये 4,78,377/- दिनांक 28.9.2013 रोजी जमा केली. परंतु, आजतागायत जागेवर बांधकाम चालु केले नाही, यावरुन विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे व सेवेत त्रुटी केल्याचे दिसून येते. करीता, सदर तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याची दाखल पावत्याप्रमाणे जमा रक्कम रुपये 4,78,377/- करारपत्राचा दि. 29.9.2013 पासून द.सा.द.शे. 18% व्याजाने तक्रारकर्त्याच्या हातात मिळेपर्यंत परत करण्यात यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 40,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
दिनांक :- 19/12/2017