जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 196/2014.
तक्रार दाखल दिनांक : 20/08/2014.
तक्रार आदेश दिनांक : 19/12/2015. निकाल कालावधी: 01 वर्षे 04 महिने 00 दिवस
सौ. शोभा रमेश घाडगे,
रा. गाळा नं.6, सोहम प्लाझा, सैफूल, विजापूर रोड, सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
(1) हायर (Haier) इलेक्ट्रॉनिक्स् कंपनी तर्फे व्यवस्थापक,
हायर (Haier) एक्सपेरिअन्स सेंटर, 10/13,
हिराचंद नेमचंद कॉम्प्लेक्स, ऐश्वर्या हॉटेलसमोर,
मुरारजी पेठ, सोलापूर – 413 001.
(2) व्यवस्थापक, श्री एंटरप्रायजेस,
अधिकृत हायर सर्व्हीस सेंटर, हायर इलेक्ट्रॉनिक्स्, 25,
हुतात्मा स्मृति मंदिर, पार्क चौक, सोलापूर – 413 001. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. मिलिंद बी. पवार (हिरुगडे), अध्यक्ष
श्री. ओंकारसिंह जी. पाटील, सदस्य
सौ. बबिता एम. महंत (गाजरे), सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एन्.आर. जंगाले
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे अधिकृत प्रतिनिधी : प्रमोद उंब्रजकर
आदेश
श्री. ओंकारसिंह जी. पाटील, सदस्य यांचे द्वारा :-
1. तक्रारदार यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, त्या उदरनिर्वाहाकरिता ‘गणेश ट्रेडर्स’ नांवे कोन्ड्रींक्स्, बेकरी पदार्थ, आईस्क्रीम, पनीर, चीज इ. खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात. त्या व्यवसायाकरिता त्यांनी दि.27/2/2013 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून रु.19,000/- किंमतीचा व (HCF 345 HTQ HAIER DREF 088) Serial No. BF0G20E0B00BUCCW0066 वर्णनाचा फ्रिजर खरेदी केला. फ्रिजर खरेदी केल्यानंतर 1-2 महिन्यात त्याचा कॉम्प्रेसर खराब झाला आणि विरुध्द पक्ष यांनी तो वॉरंट कालावधीमध्ये बदलून दिला. त्यानंतर फ्रिजरमध्ये चोक-अप व गॅस चार्जिंग समस्या उदभवली. तक्रारदार यांच्याकडून शुल्क आकारणी करुन त्याची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर दि.21/6/2014 रोजी पुन्हा फॅन, चोक-अप व गॅस चार्जिंग समस्या उदभवली. त्यामुळे तक्रारदार यांनी तो फ्रिजर दुरुस्तीसाठी विरुध्द पक्ष यांच्याकडे जमा केला. फ्रिजर सातत्याने बंद राहिल्यामुळे तक्रारदार यांचे व्यवसायिक नुकसान झालेले आहे आणि ज्यामुळे रु.35,000/- रकमेचा आईस्क्रीम माल कंपनीकडे परत पाठवण्यात आला. तसेच कोन्ड्रींक्स्, बेकरी पदार्थ, पनीर, चीज इ. पदार्थांचे नुकसान झाले. अशाप्रकारे तक्रारदार यांचे एकूण रु.90,000/- किंमतीच्या मालाचे नुकसान झालेले असून त्याकरिता विरुध्द पक्ष जबाबदार आहेत. विरुध्द पक्ष यांनी त्रुटीयुक्त सेवा दिल्याच्या कारणास्तव तक्रार दाखल करुन वादविषयक फ्रिजर बदलून मिळण्यासह रु.1,00,000/- व्यवसायिक नुकसान भरपाई मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले असून तक्रारीतील विधाने व मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारदार यांनी फ्रिजरच्या वॉटर लिकेजबाबत तक्रार केल्यानंतर तात्काळ दुरुस्ती करुन तक्रारीचे निराकरण केलेले आहे. तसेच दि.21/6/2014 रोजी पुन्हा कुलिंग प्रॉब्लेम निर्माण झाल्याची तक्रार आल्यानंतर त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात आली. परंतु तक्रारदार हे फ्रिजर परत घेण्याऐवजी नवीन फ्रिजरची मागणी करीत आहेत. फ्रिजर वॉरंटी कालावधीमध्ये नसल्यामुळे सर्व्हीस टेक्निशियनने त्यांची मागणी अमान्य केली. तक्रारदार यांच्या मान्यतेने कॉम्प्रेसर बदलून देण्यात आला आणि त्यामध्ये गॅस भरण्याकरिता शुल्क आकारणी केले. तक्रारदार यांनी कुलिंग प्रॉब्लेमबाबत तक्रार केल्यानंतर सर्व्हीस इंजिनिअर व सर्व्हीस टेक्नीशियनने तपासणी केली असता फ्रिजर सुस्थितीत होता आणि कमी-जास्त विद्युत दाबामुळे फ्रिजरचे अंतर्गत भाग वारंवार खराब होत असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत तक्रारदार यांना माहिती दिली. तक्रारदार यांनी फ्रिजरमध्ये उत्पादकीय दोष असल्याबाबत स्वतंत्र तज्ञाचा पुरावा दाखल केलेला नाही. तसेच नुकसान भरपाईबाबत भक्कम पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार हे ‘ग्राहक’ संज्ञेत येत नाहीत. शेवटी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी अभिलेखावर पुरसीस दाखल करुन विरुध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी उत्तर स्वीकारल्याचे नमूद केलेले आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच उभय विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विक्री केलेल्या फ्रिजरमध्ये
दोष असल्याचे व सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारदार नवीन फ्रिजर बदलून मिळण्यास व नुकसान भरपाई
मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्र. 1 व 2 :- प्रामुख्याने तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून वादविषयक फ्रिजर खरेदी केल्याबाबत व त्यामध्ये दोष निर्माण झाल्याबाबत उभयतांमध्ये वाद नाही. तक्रारदार यांचे वादकथन व त्यांच्या व्यवसायाचे स्वरुप पाहता ते उपजिविका चालविण्याकरिता व्यवसाय करीत असल्याचे व त्याकरिता वादविषयक फ्रिजर खरेदी केल्याचे ग्राह्य धरावे लागते आणि ते ‘ग्राहक’ संज्ञेत येतात.
6. वादविषयक फ्रिजरमध्ये चोक-अप व गॅस चार्जिंगचे दोष निर्माण झाल्याचे अभिलेखावर दाखल कागदपत्रांवरुन निदर्शनास येते. विरुध्द पक्ष यांनी वादविषयक फ्रिजरचा कॉम्प्रेसर बदलून दिल्याबाबत उभयतांमध्ये वाद नाही. दि.17/1/2014 रोजीचे डिलेव्हरी चलन पाहता त्यामध्ये चोक-अप व गॅस चार्जिंग हे दोष नमूद केलेले आहेत. तसेच दि.21/6/2014 रोजीचे डिलेव्हरी चलन पाहता त्यामध्येही गॅस चार्जिंग व चोक-अप हे दोष नमूद केलेले आहेत. त्याबाबत विरुध्द पक्ष यांचा प्रतिवाद असा आहे की, सर्व्हीस इंजिनिअर व सर्व्हीस टेक्नीशियनने फ्रिजरची तपासणी केली असता फ्रिजर सुस्थितीत होता आणि कमी-जास्त विद्युत दाबामुळे फ्रिजरचे अंतर्गत भाग वारंवार खराब होत असल्याचे निदर्शनास आले. वास्तविक पाहता विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत प्रतिवादापृष्ठयर्थ संबंधीत अभियंता व तंत्रज्ञाचे प्रतिज्ञापत्र किंवा त्यांचा तपासणी अहवाल अभिलेखावर दाखल केलेला नाही. उलटपक्षी तक्रारदार यांनी विद्युत मांडणीचा चाचणी अहवाल दाखल केला असून प्रत्युत्तारासाठी त्या अहवालाचे विरुध्द पक्ष यांच्याद्वारे खंडन करण्यात आलेले नाही. तसेच दि.21/6/2014 पासून वादविषयक फ्रिजर विरुध्द पक्ष यांच्या ताब्यात असताना त्यामध्ये उत्पादकीय दोष नाही, असाही पुरावा विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे उत्पादकीय दोषाबाबत तज्ञ अहवाल आणण्याचे तक्रारदार यांच्यावर बंधन येऊ शकत नाही. वादविषयक फ्रिजरमध्ये सातत्याने निर्माण होणारे दोष पाहता त्यामध्ये केवळ उत्पादकीय दोष असल्याचे ग्राह्य धरावे लागते. वादविषयक फ्रिजरची वॉरंटी पूर्ण झालेली आहे, हे विरुध्द पक्ष यांचे कथन पुराव्याअभावी मान्य करता येत नाही. उपरोक्त विवेचनावरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विक्री केलेला फ्रिजर दोषयुक्त असल्याचे सिध्द होते आणि विक्रीपश्चात सेवा देण्यामध्ये विरुध्द पक्ष यांनी त्रुटी केलेली आहे, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. त्यामुळे तक्रारदार हे नवीन फ्रिजर बदलून मिळण्यास पात्र आहेत.
7. तक्रारदार यांनी अभिलेखावर नुकसान भरपाई मिळण्यासाठी फोटोग्राफ व खाद्यपदार्थ खरेदीच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. त्या पावत्यांचे अवलोकन केले असता माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे 2014 मध्ये खाद्यपदार्थ खरेदी केल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांचा फ्रिजर दि.21/6/2014 खराब झाल्यामुळे त्यापैकी एकूण किती वस्तू तक्रारदार यांनी विक्री केल्या ? याचा बोध होत नाही. अभिलेखावर दाखल कागदपत्रे व फोटोग्राफ यांचा विचार करता तक्रारदार हे रु.2,000/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत, असे या मंचाचे मत झाले आहे. उपरोक्त विवेचनावरुन आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देत असून शेवटी खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना वादविषयक फ्रिजरसारखा नवीन फ्रिजर द्यावा आणि त्यावेळी तक्रारदार यांनी वादविषयक फ्रिजर विरुध्द पक्ष यांना परत करावा.
किंवा
उपरोक्त आदेशाची पूर्तता करणे अशक्य असल्यास विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना वादविषयक फ्रिजरची किंमत रु.19,000/- परत करावी आणि त्या रकमेवर दि.21/6/2014 पासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज द्यावे. तसेच प्रस्तुत आदेशाची पूर्तता होताना तक्रारदार यांनी वादविषयक फ्रिजर विरुध्द पक्ष यांना परत करावा.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाईकरिता रु.2,000/- द्यावेत.
3. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
4. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क द्यावी.
(श्री. ओंकारसिंह जी. पाटील) (सौ. बबिता एम. महंत-गाजरे) (श्री. मिलिंद बी. पवार÷-हिरुगडे)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
-00-
(संविक/स्व/1616)