::: आ दे श :::
( पारित दिनांक : 25/02/2015 )
माननिय सदस्या श्रीमती जे.जी. खांडेभराड, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारकर्त्याचे सिटी पोष्ट ऑफीस, वाशिम येथे खालीलप्रमाणे 3 आर.डी. अकाउंटस आहेत.
अकाउंट नंबर नांव मासीक बचत ( रक्कम )
1) 158608 माधव लक्ष्मण पांडे 400/- रुपये
2) 157417 ओंकार माधव पांडे 300/- रुपये
3) 157021 कु. आदिती माधव पांडे 300/- रुपये
2012 चे ऑक्टोंबर महिन्यात दिनांक 09/10/2012 रोजी तक्रारकर्त्याने वरील तिन्ही खात्याचे आर.डी. फॉर्म भरुन, तिन्ही पासबुक सहीत रक्कम रुपये 1,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेकडे रक्कम भरण्याची नोंद होण्याकरिता दिले. त्या कार्यवाहीत विरुध्द पक्ष क्र. 1 ने आर.डी. फॉर्म वर पोष्टाचे शिक्के मारुन तिन्ही फॉर्मचे काऊंटर फाईल व तिन्ही पासबुक तक्रारकर्त्यास परत दिले. पुढील महिन्यात आर.डी. ची रक्कम भरण्याकरिता तक्रारकर्त्याने पासबुक उघडून पाहिले तेंव्हा रक्कम जमा केल्याबद्दल तिन्ही पासबुकवर पोष्टाचा शिक्का नव्हता. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी सरकारी कर्तव्यात त्रुटी निर्माण करुन, अप्रामाणीकपणे तक्रारकर्त्याचे आर.डी. पासबुक मध्ये नोंद न करण्याचे बेकायदेशीर काम केले.
यापुर्वी सुध्दा तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षा विरुध्द तक्रार क्र.74/2010 दाखल केली होती परंतु ती जिल्हा ग्राहक मंच, वाशिम यांचेकडून खारिज झाली. तसेच त्यावर दाखल केलेले अपील क्र.798/2010 सुध्दा मुदतबाहय कारणामुळे राज्य ग्राहक आयोग, नागपूर यांनी खारिज केले.
तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेकडे आर.डी. खात्यात रक्कम जमा न झाल्याबाबत तोंडी तक्रार केली परंतु ते एैकल्यावर विरुध्द पक्ष क्र. 1 ने तक्रारकर्त्यास आर.डी. फॉर्मचे काऊंटर फाईल आणण्यास सांगीतले. तक्रारकर्त्याने आर.डी. फॉर्मचे काऊंटर फाईलचा शोध घेतला परंतु ते तक्रारकर्त्यास सापडले नाहीत. म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 28/10/2013 व 20/01/2014 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठविली व रक्कम रुपये 1,000/- ची व्याजासहीत मागणी केली, परंतु विरुध्द पक्षाने नोटीसचे ऊत्तर दिले नाही. पर्यायाने तक्रारकर्त्यास तिन्ही आर.डी. खात्याची रक्कम रुपये 1,000/- दंडासहीत दिनांक 30/11/2012 रोजी पोष्टात भरावी लागली. अशाप्रकारे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संगनमत करुन बेकायदेशीर कृत्य केले. विरुध्द पक्षांनी सेवा देण्यास कसूर केलेला आहे.
त्यामुळे, तक्रारकर्ता यांनी, सदर तक्रार, या न्यायमंचासमोर, दाखल करुन, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 कडून, तक्रारकर्त्याने दिनांक 09/10/2012 रोजी तिन्ही आर.डी. खात्याची जमा केलेली रक्कम रुपये 1,000/- व त्यावर रक्कम जमा केल्याच्या दिनांकापासून दरसाल, दरशेकडा 20 % दराने रक्कम वसूल होईपर्यंत व्याज व कोर्ट खर्च देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती, सदर तक्रारीचे शेवटी, केलेली आहे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 12 दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत.
2) या प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी मंचाची नोटीस मिळूनसुध्दा त्यांचा लेखी जवाब मंचासमोर दाखल केलेला नाही. म्हणून दिनांक 28/11/2014 रोजी त्यांचेविरुध्द आदेश पारित करण्यात आला की, विरुध्द पक्ष क्र. 2 नोटीस बजाविल्यानंतर देखील गैरहजर, तरी प्रकरण विरुध्द पक्ष क्र. 2 विरुध्द एकतर्फी चालविण्यांत यावे.
3) विरुध्द पक्ष क्र. 1 चा लेखी जबाब -
निशाणी क्र. 5 प्रमाणे विरुध्द पक्ष क्र. 1 ने त्यांचा लेखी जवाब मंचासमोर दाखल केलेला आहे. विरुध्द पक्षाने त्यामध्ये नमुद केले की, तक्रारकर्ता श्री. माधव पांडे यांच्या नावे वाशिम सिटी पोस्ट ऑफीस मध्ये तीन आर.डी. चे खाते आहेत. ते अनुक्रमे खाते क्र. 158608 रुपये 400/-, 157417 रुपये 300/- व 157021 रुपये 300/- अशा प्रकारचे काढलेले आहेत. सदर तक्रारदार आर.डी. चे पैसे भरण्याकरिता स्वत: येतात व पैसे भरतात. कार्यालयीन पूर्ण रेकॉर्ड तपासून पाहिले असता वरील खात्यात दिनांक 09/10/2012 तारखेला कोणत्याच प्रकारचा भरणा केलेला नाही. आर.डी. चे पैसे भरल्यानंतर पासबुकामध्ये पैसे भरले किंवा नाही, हे तपासणे खातेदाराची नैतीक जबाबदारी आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने केलेली तक्रार विरुध्द पक्षास मान्य नाही.
या अगोदरसुध्दा तक्रारकर्त्याने अशाच प्रकारची तक्रार केलेली होती, त्या तक्रारीच्या निकालाची प्रत सोबत जोडीत आहे.
सदर जबाब, विरुध्द पक्ष यांनी, शपथेवर, सादर केला.
4) कारणे व निष्कर्ष ::
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 चा लेखी जबाब, उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिऊत्तर व लेखी युक्तिवाद, तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 चा तोंडी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला तो येणेप्रमाणे.
या प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 2 यांना नोटीस बजाविल्यानंतर देखील ते गैरहजर राहिलेले आहेत. त्यामुळे प्रकरण विरुध्द पक्ष क्र. 2 विरुध्द एकतर्फी चालविण्यांत आले.
या प्रकरणात तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र. 1 यांना मान्य असलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्ता यांचे सिटी पोष्ट ऑफीस, वाशिम येथे 3 आर.डी. खाते आहेत. ते अनुक्रमे खाते क्र. 158608 - 400/- रुपये,खाते क्र. 157417 - 300/- रुपये व खाते क्र. 157021 - 300/- रुपये अशा प्रकारचे काढलेले आहेत.
तक्रारकर्त्याच्या मते दिनांक 09/10/2012 रोजी सदर आर.डी. खात्यात तक्रारकर्त्याने तिन्ही पासबुक सहीत रक्कम रुपये 1,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 कडे रक्कम भरण्याकरिता दिली होती. विरुध्द पक्ष क्र. 1 ने रक्कम भरुन घेऊन तिन्ही पासबुक तक्रारकर्त्याला वापस दिली. मात्र त्यानंतर ते पासबुक तक्रारकर्त्याने न तपासता ठेवून दिले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2012 महिन्यात पुन्हा आर.डी. रक्कम भरण्याकरिता जेंव्हा तक्रारकर्त्याने पासबुक उघडून पाहिले त्यावेळेस त्यावर ऑक्टोंबर महिन्यात रक्कम जमा केल्याबाबतचा पोष्टाचा शिक्का नव्हता. त्यामुळे तक्रारकर्त्यास तिन्ही खात्याची आर.डी. रक्कम रुपये 1,000/- दंडासहीत दिनांक 30/11/2012 रोजी पोष्टात भरावी लागली. अशाप्रकारे विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याची, पासबुकात पैसे भरल्यानंतरही तशी नोंद न करुन, फसवणूक केली व सरकारी कर्तव्यात त्रुटी निर्माण केली. त्यामुळे तक्रारकर्त्याने रक्कम रुपये 1,000/- ही दिनांक 09/10/2012 पासुन दरसाल, दरशेकडा 20 % व्याजदराने वसूल करुन देण्यात यावी.
यावर विरुध्द पक्षाचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्ता आर.डी. ची रक्कम भरण्याकरिता स्वत: येतात व रक्कम भरतात. कार्यालयीन पूर्ण रेकॉर्ड तपासून पाहिले असता, वरील खात्यात दिनांक 09/10/2012 रोजी कोणत्याच प्रकारचा भरणा तक्रारकर्त्याने केलेला नाही. आर.डी. चे पैसे भरल्यानंतर पासबुकामध्ये पैसे भरले किंवा नाही, हे पाहणे खातेदाराची नैतीक जबाबदारी आहे.
उभय पक्षांचा हा युक्तिवाद ऐकल्यानंतर व रेकॉर्डवरील दस्त तपासले असता, मंचाला असे दिसून आले की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द कथन जरी फसवणूकीचे केले असले तरी, त्याबद्दलची कोणतीही कैफीयत पोलीस स्टेशनला विरुध्द पक्षाविरुध्द दिलेली नाही. त्यामुळे या वैयक्तीक गुन्हयाकरिता ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतूदी उपयोगी पडत नाही. विरुध्द पक्षाने रेकॉर्डवर तक्रारकर्ता यांनी सन 2010 मध्ये या विरुध्द पक्षा विरुध्द मंचात दाखल केलेल्या तक्रारीच्या निकालाची प्रत ( तक्रार प्रकरण क्र. 74/2010 निकाल ता. 29/09/2010 ) दाखल केली आहे. त्यामध्ये देखील तक्रारकर्ता यांनी अशाच प्रकारची तक्रार या विरुध्द पक्षा विरुध्द केली होती. पुन्हा सन 2014 मध्ये दिनांक 09/10/2012 रोजीचे तक्रारीस कारण दाखवून अशाच प्रकारची तक्रार तक्रारकर्त्याने मंचात दाखल केली आहे. एकदा अशा प्रकारची घटना घडल्यानंतर तक्रारकर्त्याची ही जबाबदारी होती की, दिनांक 09/10/2012 रोजी भरलेल्या आर.डी. च्या रक्कमेची नोंद ही पासबुकामध्ये झाली आहे की, नाही ? हे तपासणे. कारण रेकॉर्डवर कोणतेही असे दस्तऐवज उपलब्ध नाही की, ज्यावरुन विरुध्द पक्षाची सेवेतील त्रुटी सिध्द होते. तसेच या तक्रारीमध्ये तक्रारकर्त्याची प्रार्थना अशी आहे की, त्यांनी दिनांक 09/10/2012 रोजी विरुध्द पक्षाच्या कार्यालयात जमा केलेली रक्कम रुपये 1,000/- ही सव्याज वसूल करुन द्यावी. तक्रारकर्त्याची ही प्रार्थना म्हणजे
“ Recovery of Amount Due ” या दिवाणी दाव्यासारखी आहे. त्यामुळे देखील मंचाला ही तक्रार चालविण्याचे कार्यक्षेत्र उपलब्ध नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करणे योग्य राहील, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. म्हणून, अंतिम आदेश पारित केला तो पुढीलप्रमाणे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबद्दल कोणतेही आदेश पारित नाहीत.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
गिरी एस.व्ही.