तक्रार क्र. CC/ 12/ 68 दाखल दि. 31.08.2012
आदेश दि. 10.10.2014
तक्रारकर्ता :- श्री अमरदिप अशोक चवरे,
वय – 32 वर्षे, धंदा वकिली
रा.शहापुर, ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. एच.पी.गॅस
ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा,कर्मचारी सहकारी
पतसंस्था लिमीटेड, जवाहरनगर मार्फत
यांचे व्यवस्थापक, ता.जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा.सदस्य हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्ता स्वतः
वि.प.एकतर्फी
.
(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 10 ऑक्टोंबर 2014)
1. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने घरगुती गॅस सिलेंडर मिळणेसाठी नोंदणी करुन सुध्दा सिलेंडर 7 महिन्यापर्यंत न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या, विरुध्द नुकसान भरपाई मिळण्यासाठी सदरहू प्रकरण दाखल केले आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्ता जिल्हा व सत्र न्यायालय, भंडारा येथे वकीली व्यवसाय करीत आहे. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. विरुध्द पक्ष हा एच.पी.कंपनीचा अधिकृत डिलर आहे.
तक्रारकर्त्याने दिनांक 3/1/2012 ला गॅस सिलेंडर घरपोच मिळण्यासाठी विरुध्द पक्षाच्या नियमानुसार त्यांच्याकडे नोंदणी (Booking) केली. विरुध्द पक्षाने एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतरही तक्रारकर्त्यास गॅस सिलेंडर न दिल्यामुळे तक्रारकर्ता स्वतः विरुध्द पक्षाचे जवाहरनगर येथील गोडाऊनवर गेला असता त्याला गॅस सिलेंडर देण्यात आले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने 10/2/2012 ला विरुध्द पक्षाकडे तक्रार केली व दिनांक 17/4/2012 ला माहितीच्या अधिकारात विरुध्द पक्षाकडे सिलेंडरच्या Available Cylender Stock बद्दल माहिती घेतली.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास नियमाप्रमाणे वेळेत सिलेंडर न दिल्यामुळे त्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सिलेंडर नियमानुसार घरपोच सेवा न देवून विरुध्द पक्षाने सिलेंडरचा स्टॉक बेकायदेशीररित्या गावामधील चौकामध्ये वितरित केला. त्यामुळे त्यांनी Unfair Trade Practices व सेवेमध्ये त्रृटी केलेली आहे. करीता नुकसान भरपाई म्हणून विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास 90,000/- व तक्रारीच्या खर्चासाठी 10,000/- व्याजासह देण्यासाठी सदरहू तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
4. तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन दिनांक 31/8/2012 ला विरुध्द पक्षास नोटीस पाठविण्यात आल्या.
5. विरुध्द पक्षास नोटीस मिळून सुध्दा हजर न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द सदरहू प्रकरण एकतर्फी चालविण्यात आले.
6. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये विरुध्द पक्षाने दिलेले रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पान न.10 वर दाखल केले आहे. विरुध्द पक्षाने दिलेली Consumer No diary पान नं.15 वर दाखल केली आहे. विरुध्द पक्षास केलेली तक्रार दिनांक 10/2/2012 पान नं.18 वर, माहिती अधिकारात मागितलेली माहिती पान न.19 वर दाखल केली आहे. शहापुर येथील गॅस सिलेंडरचे फोटोग्रॉफस् पान नं.22 ते 24 वर दाखल केले आहे. तसेच भोजनालयाचे बिल पान नं.39 ते 40 वर दाखल केले आहे.
7. तक्रारकर्त्याच्या वकीलांनी युक्तीवाद की तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक असून त्याने एच.पी.गॅस सिलेंडर मिळण्याकरीता नोंदणी केली होती. विरुध्द पक्षाने 7 महिन्यापर्यंत तक्रारकर्त्याची मागणी मान्य केली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक 10/2/2012 ला लेखी तक्रार केली तसेच माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये केलेल्या तक्रारीबद्दल माहिती, गॅस सिलेंडर पुरवठा करण्यात आल्याबद्दलची माहिती मागितली होती. तक्रारकर्त्याने वेळोवेळी गॅस सिलेंडर मिळण्यासाठी विनंती व वारंवार विरुध्द पक्षाकडे स्वतः जाऊन गॅस सिलेंडरची मागणी केली. तरीसुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला 7 महिन्यापर्यंत गॅस सिलेंडर दिले नाही. तक्रारकर्त्याने गॅस सिलेंडर नियम 2004 नुसार तक्रारकर्त्याला वेळेत सिलेंडर न दिल्यामुळे तसेच विरुध्द पक्षाने सार्वजनिक ठिकाणी चौकामध्ये बेकायदेशीररित्या सिलेंडर नांव नोंदणी न केलेल्या लोकांना वाटप केल्यामुळे विरुध्द पक्षाने सेवेमध्ये त्रृटी केली आहे. तक्रारकर्त्याने सार्वजनिक ठिकाणी शहापुर येथे इंदिरा गांधी पुतळयासमोर सिलेंडर वाटप केल्याचे फोटोग्रॉफस् पान नं.22 ते 24 वर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याला व्यावसायिक नुकसान झाल्याबद्दल तसेच त्याला वेळेवर सिलेंडर न मिळाल्यामुळे हॉटेलमध्ये जेवणासाठी जावे लागले व बील पान न.39,40 वर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याने कांचन बागडे हिचे शपथपत्र सदर प्रकरणात दाखल केले आहे. त्यानुसार विरुध्द पक्ष हा बेकायदेशीररित्या गाडीद्वारे सिलेंडर वाटप करीत असून ते सिलेंडर दर बुध्वारी शहापूर येथे बसस्टॉप चौकात बेकायदेशीररित्या वाटप करतो असे म्हटले आहे. तक्रारकर्त्याने Consumer No तसेच शहापूर ता.जि.भंडारा येथील गॅस धारकांना बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचे वाटप केल्या जात असल्याबद्दलची तक्रार तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडे केली होती, त्याच्या प्रती पान न.59,60,61 वर दाखल केल्या आहेत. तक्रारकर्त्याला वेळोवेळी विनंती करुन सुध्दा गॅस सिलेंडर न देणे म्हणजेच सेवेमधील त्रृटी होय.
8. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, कागदपत्रे तसेच तक्रारकर्त्याचे वकील अॅड.अमरदिप चवरे यांचा युक्तीवाद यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.
1. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – होय.
कारणमिमांसा
9. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये एच.पी.गॅस सिलेंडरचे Consumer No प्रपत्र तसेच तक्रारकर्त्याचे Consumer No Booklet दाखल केले आहे, त्यावरुन तक्रारकर्त्याचा Consumer No.610152 असा असल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे सिलेंडर मिळण्यासाठी नोंदणी दिनांक 3/1/2012 ला केली होती व त्याचा नोंदणी क्रमांक 498 असा आहे. तक्रारकर्त्याला सिलेंडर मिळण्यासाठी नोंदणी केल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीत सिलेंडर न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे दिनांक 10/2/2012 ला लेखी तक्रार दाखल केली. तरी सुध्दा विरुध्द पक्षाने गॅस सिलेंडर तक्रारकर्त्याला न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 17/4/2012 ला माहितीच्या अधिकारात दिनांक 3/1/2012 पासून किती सिलेंडर वाटप केले व किती लोकांना घरपोच दिले याबद्दल माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. तो अर्ज सदरहू प्रकरणात पान नं.19 वर दाखल केला आहे.
10. तक्रारकर्त्याने सिलेंडर बुकींग पावती सुध्दा सदरहू प्रकरणात पान न.17 वर दाखल केली आहे तसेच शहापूर येथील इंदिरा गांधी पुतळयाजवळील चौकात बेकायदेशीररित्या वाटप करण्यात आलेल्या सिलेंडरचे फोटोग्रॉफस् सदरहू प्रकरणात दाखल केले आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 3/1/2012 ला सिलेंडर मिळण्यासाठी बुकींग करुन सुध्दा त्याला 7 महिन्यापर्यंत सिलेंडर न देणे तसेच सिलेंडर न देण्याबद्दल कुठलेही संयुक्तिक कारण न देणे म्हणजेच सेवेमधील त्रृटी होय.
11. तक्रारकर्त्याने दिनांक 10/2/2012 ला सिलेंडर पुरविण्यासाठी लेखी अर्ज देवून सुध्दा तसेच माहितीच्या अधिकाराखाली ग्राहकाला किती सिलेंडर दिले व दिनांक 3/1/2012 पासून विरुध्द पक्षाने शहापूर येथील किती लोकांना घरपोच सिलेंडर दिले याची माहिती तसेच त्यांची बीले, ही माहिती तक्रारकर्त्यास न देणे म्हणजेच सेवेमधील त्रृटी होय.
12. विरुध्द पक्षाने गॅस सिलेंडर नियम 2004 च्या कलम 20 प्रमाणे Loading, Unloading & Transport Of Cyclinders या कलमाचे उल्लंघन केल्यामुळे व शहापूर येथील बसस्टॉप चौकात गांधी पुतळयाच्यामागे लोकांना व रहदारीला त्रास होईल याचा विचार न करता बेकायदेशीररित्या सिलेंडर वाटप करणे याबद्दल तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या सौ.कांचन बागडे,सरपंच, रा.शहापुर यांचे शपथपत्रावरुन व शहापुर येथील रहिवाशी यांनी विरुध्द पक्षाकडे तक्रारीच्या आधाराने विरुध्द पक्ष हा गॅस सिलेंडर हे योग्य ठिकाणी वाटप न करीत असल्यामुळे विरुध्द पक्षाने गॅस सिलेंडर नियम 2004 च्या नियमाचे उल्लंघन करणे म्हणजेच Unfair Trade Practices होय.
13. तक्रारकर्ता हा व्यवसायाने वकील असल्यामुळे व त्याला कुठलेही संयुक्तिक कारण न देता व गॅस सिलेंडर स्टॉक बद्दल माहिती न देणे, वेळेत सिलेंडर न देणे म्हणजेच विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी आहे. विरुध्द पक्षाने 7 महिन्यापर्यंत गॅस सिलेंडर न देणे म्हणजेच तक्रारकर्त्याला होणा-या मानसिक व आर्थिक त्रासासाठी विरुध्द पक्ष हा सर्वस्वी जबाबदार आहे. करीता विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास गॅस सिलेंडर विहीत मुदतीत कुठलेही संयुक्तिक कारण न देता न देणे, म्हणजेच सेवेतील त्रृटी आहे असे मंचाचे मत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासासाठी नुकसान भरपाई रुपये 25,000/-(पंचवीस हजार) दयावे.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- (दहा हजार) दयावे.
4. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी तक्रारकर्त्यास सदर आदेशाची प्रत नियमानुसार विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.