द्वारा मा. श्री. श्रीकांत. म. कुंभार, सदस्य
** निकालपत्र **
(26/03/2013)
प्रस्तुतची तक्रार, तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे जाबदेणारांविरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे.
1] तक्रारदार यांच्या कथनाप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सिटी सर्व्हे क्र. 255, सोमवार पेठ, पुणे येथील क्षेत्रफळ 120.40 चौ. मी. ही मिळकत श्री. शंकर विष्णु आव्हाड, श्री. सोनबा विष्णु आव्हाड व श्री. भालचंद्र विष्णु आव्हाड यांची 1/3 याप्रमाणे मालकीची होती. सदर मिळकतीपैकी 1/3 हिस्सा श्री. सोनबा विष्णु आव्हाड यांच्या वारसाकडून सौ. संजिवनी शौनक जांभोळकर यांनी दि. 17/04/2002 रोजी खरेदीखतान्वये खरेदी केली व त्याचा दस्त दुय्यम निबंधक हवेली क्र. 11 यांचे कार्यालयामध्ये 160/02 या क्रमांकाद्वारे नोंदविला. त्यानंतर सौ. संजिवनी शौनक जांभोळकर यांनी सदरच्या मिळकतीचेज यांच्या नावे कुलमुखत्यारपत्र दिले. सदरचे कुलमुखत्यारपत्र हे दुय्यम निबंधक हवेली क्र. 11 यांचे कार्यालयामध्ये 3176/02 या क्रमांकाद्वारे नोंदविला. श्री. शंकर विष्णु आव्हाड व श्री. भालचंद्र विष्णु आव्हाड यांनी सदर मिळकतीतील प्रत्येकी 1/3 हिस्सासंदर्भात जाबदेणार यांचेबरोबर विकसन करारनामा केला व सदरचा करारनामा दुय्यम निबंधक हवेली क्र. 11 यांचे कार्यालयामध्ये 1048/02 या क्रमांकाद्वारे नोंदविला. जाबदेणार यांनी सदर मिळकत विकसीत करुन त्यावर इमारत उभारलेली आहे. या इमारतीमधील तिसर्या मजल्यावरील 199.08 चौ. फु. म्हणजे 18.50 चौ. मी. क्षेत्रफळ असलेली सदनिका क्र. 6 जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 1,30,000/- इतक्या मोबदल्यामध्ये दि. 02/06/2005 रोजीच्या खरेदीखताद्वारे विक्री केली व सदरचा दस्त हा दुय्यम निबंधक हवेली क्र. 11 यांचे कार्यालयामध्ये 3008/2005 या क्रमांकाद्वारे नोंदविला गेला. या खरेदीखताद्वारे तक्रारदार हे सदनिका क्र. 6 चे कायदेशिर धारक आहेत. तक्रारदारांच्या कथनानुसार, जाबदेणार यांनी सदनिका विक्री करतेवेळी खरेदीखतातील अटी व शर्ती यांचे पालन केले जाईल असे मान्य व कबुल केले होते, परंतु तक्रारदार यांनी सदनिकेपोटी संपूर्ण मोबदला देऊनही जाबदेणार यांनी खरेदीखतामधील अटी व शर्तींची पुर्तता केली नाही. यातील जाबदेणार यांनी सदरच्या मालकी हक्काची नोंद सिटी सर्व्हे कार्यालयामध्ये तसेच तक्रारदार यांच्या नावे विद्युत मीटर केले नाही. त्याचप्रमाणे सदनिकेचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे केले आहे. जाबदेणार यांनी इमारतीवर वॉटर प्रुफिंग करणे गरजेचे होते, ते जाबदेणारांनी केले नाही. अशाप्रकारे जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्या मालकी हक्काची नोंद सिटी सर्व्हे कार्यालयामध्ये न घेऊन, विद्युत मीटर त्यांच्या नावे न करुन तसेच सदनिकेवर वॉटर प्रुफिंग न करुन सदोष व दोषपूर्ण सेवा दिलेली आहे व सेवेमध्ये कमतरता केलेली आहे. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणारांविरुद्ध सदरील तक्रार दाखल केलेली आहे. यातील तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडून, सदनिकेची मालकी हक्काची नोंद पुणे महानगरपालिका तसेच सिटी सर्व्हे कार्यालयामध्ये विना मोबदला करुन द्यावी, सदनिकेतील विद्युत मीटर तक्रारदार यांच्या नावे विनामोबदला करुन द्यावा, सदनिकेवर केलेल्या वॉटर प्रुफिंगचा दर्जा सुधारुन अथवा वॉटर प्रुफिंग केले नसल्यास विनामोबदला करुन द्यावे तसेच जाबदेणार यांच्याकडून झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु. 1,00,000/- व इतर दिलासा मागतात.
सदर तक्रारदार यांनी याकामी शपथपत्र, सेल डीडची प्रत, पुणे महानगरपालिकेचा बांधकाम चालू करण्याचा दाखला, जाबदेणार यांना पाठविलेली कायदेशिर नोटीस, त्याच्या आर. पी. ए. डी. च्या पावत्या इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
2] सदर प्रकरणातील जाबदेणार यांनी दि. 27/01/2009 रोजी त्यांची लेखी कैफियत व शपथपत्र दाखल केले. जाबदेणारांच्या कथनानुसार, तक्रारदारांनी काही बाबी मंचापासून दडविलेल्या आहेत. तक्रारदार हे सिटी सर्व्हे क्र. 255, सोमवार पेठ, पुणे येथील भाडेकरु होते. तक्रारदार यांच्याकडे नव्याने बांधत असलेल्या इमारतीमध्ये सदनिका घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे जाबदेणार यांनी तक्रारदारांना सवलतीच्या दरामध्ये विषयांकित सदनिका क्र. 6 विकत दिली. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार ‘ग्राहक’ नाहीत, त्यामुळे प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे या मंचास अधिकार नाही, असे जाबदेणारांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात. तसेच जाबदेणार हे खरेदीखतातील अटी व शर्तींनुसार पुर्तता करण्यास आहेत, असे त्यांनी त्यांच्या कैफियतीमध्ये नमुद केले आहे.
प्रस्तूतच्या प्रकरणामध्ये जाबदेणार हे त्यांची कैफियत दाखल केल्यानंतर कधीही मंचामध्ये उपस्थित राहिले नाही, त्यामुळे तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रे, त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी दाखल केलेली कैफियत, त्यांचे शपथपत्र व तक्रारदारांनी केलेल्या युक्तीवादाचा विचार करुन गुणवत्तेवर निर्णय देण्यात येत आहे.
3] तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील कथने, कागदपत्रे व युक्तीवादाचा विचार करता खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदर मुद्ये व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे-
मुद्ये निष्कर्ष
[अ] जाबदेणार यांनी तक्रारदार यांना कबुल :
केल्याप्रमाणे सदनिकेसोबत अनुषंगिक सेवा :
न देऊन सदोष सेवा दिलेली आहे का ? : होय
[ब] जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान :
भरपाई व मागणी केल्या प्रमाणे सेवा :
देण्यास जबाबदार आहेत का ? : होय
[क] अंतिम आदेश काय ? : तक्रार अंशत: मंजूर
कारणे :-
4] प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार यांनी याकामी शपथपत्र, सेल डीडची प्रत, पुणे महानगरपालिकेचा बांधकाम चालू करण्याचा दाखला, जाबदेणार यांना पाठविलेली कायदेशिर नोटीस, त्याच्या आर. पी. ए. डी. च्या पावत्या इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरची तक्रार मंचामध्ये प्रलंबीत असताना दि. 21/03/2013 रोजी तक्रारदार यांनी पुरशिस दाखल करुन मंचास असे कळविले की, त्यांच्या नावे टॅक्स बील व विद्युत बील आले आहे. तक्रारदारांनी त्यांच्या नावावर आलेल्या टॅक्स बीलाची व विद्युत बीलाची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांची तक्रार वॉटर प्रुफिंगच्या मागणीबबत आणि मानसिक त्रासाच्या खर्चाच्या मागणीबाबत मर्यादीत ठेवावी अशी मागणी केली आहे. तक्रारदारांनी प्रस्तुतच्या तक्रारीकामी इमरतीच्या वॉटर प्रुफिंगबाबत फोटोग्राफ्स दाखल केलेले आहेत. सदरच्या फोटोग्राफ्सची पाहणी केली असता, सदनिकेस ओल आल्याचे स्पष्ट निदर्शनास येते, त्याचप्रमाणे टेरेसवरील बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे दिसून येते. जाबदेणार यांनी त्यांच्या कैफियतीमध्ये याबाबत कुठलाही खुलासा केलेला नाही. तसेच जाबदेणार यांनी उत्कृष्ट दर्जाचे वॉटर प्रुफिंग केले आहे, याबाबत कुठलाही स्वतंत्र पुरावा मंचामध्ये दाखल केलेला नाही. त्यामुळे मंचास तक्रारदारांची ही मागणी योग्य व कायदेशिर वाटते. त्याचप्रमाणे तक्रारदार यांना त्यांच्या मागण्यांकरीता वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठवावी लागली, तसेच मंचामध्ये प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली व त्या अनुषंगाने वेळ व पैसा खर्च करावा लागला, त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रक्कम रु. 3,000/- व तक्रारीचा खर्च रु. 2,000/- मिळण्यास पात्र आहेत, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
:- आदेश :-
1] तक्रारदारांची तक्रार ही अंशत: मंजूर करण्यात येते.
2] यातील जाबदेणार यांनी तक्रारदार यांना, त्यांना या आदेशाची
प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आत सदनिका क्र. 6
सर्व्हे क्र. 255, सोमवार पेठ, पुणे चे उत्कृष्ट दर्जाचे वॉटरप्रुफिंग
विनामोबदला करुन द्यावे.
3] यातील जाबदेणार यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 3,000/-
(रु. तीन हजार फक्त) मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई
म्हणून व रक्कम रु. 2,000/- (रु. दोन हजार फक्त) तक्रारीच्या
खर्चापोटी त्यांना या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा
आठवड्यांच्या आत द्यावी.
4] यातील जाबदेणार यांनी नुकसान भरपाईची रक्कम व तक्रारीच्या
खर्चाची रक्कम आदेशाची प्रत मिळाल्यासून सहा आठवड्यांच्या
आत अदा न केल्यास, तक्रारदार सदर रक्कमेवर द.सा.द.शे 9 %
दराने रक्कम फिटेपर्यन्त व्याजमिळण्यास पात्र आहेत.
5] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.