उपस्थिती तक्रारकर्ता व त्यांचे वकील गैरहजर
विरुध्द पक्ष 1 तर्फे अधिवक्ता चैतन्य वैगड हजर
विरुध्द पक्ष 2 तर्फे अधिवक्ता श्रीराम देवरस हजर.
विरुध्द पक्ष 3 तर्फे अधिवक्ता अहमद गैरहजर
( आदेश पारित द्वारा मा. सदस्या, श्रीमती गीता रा. बडवाईक)
-- निकालपत्र --
( पारित दि. 16 मार्च 2012)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीबद्दल दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
1 तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 कडून दि. 3.7.2010 ला कर्ज (लोन करार नं. 16904357) घेऊन टी.व्ही.एस. अपाची कंपनीची गाडी खरेदी केली. सदर गाडीची संपूर्ण किंमत 76,174/- रुपये असून या रक्कमे पैकी रुपये 23,174/- डाऊन पेमेंट म्हणून विरुध्द पक्ष 2 यांच्याकडे भरली व उर्वरित रक्कम रुपये 53,000/- विरुध्द पक्ष 1 ने फायनान्स केले. कर्जाच्या परतफेडीसाठी तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष 1 कडे प्रतिमाह रुपये 1,945/- एवढी किस्त जमा करायची होती. दि. 21.07.2011 ला विरुध्द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्याला गाडीचे रजिस्ट्रेशन करुन गाडीचा ताबा दिला व गाडीचे मोफत सर्व्हिसिंगसाठी विरुध्द पक्ष 3 यांच्याकडे जाण्यास सांगितले. तक्रारकर्ता दर महिन्याला विरुध्द पक्ष 3 यांच्याकडे मोफत सर्व्हिसिंगसाठी गाडी देत असे. दि. 4.9.2011 ला विरुध्द पक्ष 3 यांनी तक्रारकर्त्याला दुरुस्तीसाठी दिलेली गाडी परत देण्यास नकार दिला व रुपये 53,000/- ची मागणी करु लागले. तक्रारकर्त्याने चौकशी केली असता विरुध्द पक्ष 1 ने विरुध्द पक्ष 2 ला रुपये 53,000/- दिले नाही असे त्यास कळले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 2 व 3 यांना समजाविण्याचा प्रयत्न केला की, त्यानी विरुध्द पक्ष 1 कडे गाडी तारण ठेवली व ते महिन्याची किस्त देत आहे. विरुध्द पक्ष 2 व 3 यांनी तक्रारकर्त्याचे म्हणणे ऐकून न घेता गाडी जबरदस्तीने जप्त केली. वि.प. 2 व 3 यांनी गाडी जप्त करण्यापूर्वी तक्रारकर्त्याला लेखी सूचना दिली नाही. वि.प. क्रं. 1 व 2 यांच्यातील गैर समजुतीमुळे वि.प. 2 ने तक्रारकर्त्याची गाडी जप्त केली. वि.प. 1 ने रुपये 53,000/- ही कर्जाची रक्कम वि.प. 2 ला दिली नाही व तक्रारकर्त्याची फसवणूक केली. विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता गैरकायदेशीररित्या व ऐकमेकाशी संगनमत करुन तक्रारकर्त्याची गाडी जप्त केली ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी आहे असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.
2 तक्रारकर्ता व्यापारी असून त्यास आपल्या दैनदिन कामाकरिता गाडीचा उपयोग होत असतो. परंतु विरुध्द पक्षाने गाडी जप्त केल्यामुळे त्याला आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
3 तक्रारकर्ता हा गोंदिया शहरातील धनवान व्यक्ति आहे. विरुध्द पक्षाने जबरदस्तीने फसवणूक करुन तक्रारकर्त्याचे वाहन जप्त करुन तक्रारकर्त्याची समाजात मानहानी झाली. त्यामुळे त्यास मानसिक त्रास सहन करावा लागला.
4 तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, तो कर्जाची शिल्लक किस्त भरण्यास तयार आहे. परंतु नोटीस न देता गाडी जप्त करणे ही गैरकायदेशीर आहे. तक्रारकर्त्याच्या मुलाने दि. 21.09.2011 ला पोलिस स्टेशनला विरुध्द पक्षाच्या विरुध्द तक्रार दिली. त्यामुळे तक्रारीचे कारण अद्याप सुरु आहे. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत गाडी परत करावी व त्यास झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाबद्दल रुपये 50,000/- ची मागणी केली आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाची सुध्दा मागणी केली आहे.
5 आपल्या तक्रारीच्या पृष्ठयार्थ तक्रारकर्त्याने दस्ताऐवज दाखल करण्याच्या यादी प्रमाणे पृष्ठ क्रं. 26 ते 29 पर्यंत एकूण 4 दस्त दाखल केले.
6 मंचाची नोटीस विरुध्द पक्षांना प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्षानी आपले लेखी उत्तर दाखल केले आहे.
7 विरुध्द पक्ष 1 चे म्हणणे की, त्याच्या मध्ये व तक्रारकर्त्या मध्ये लोन करार नं. 16904357 दि. 2.7.2011 ला टी.व्ही.एस. अपाची आर.टी.आर. 180 ही दोन चाकी गाडी खरेदी करण्याचा करार झाला होता. त्याबद्दल दि. 3.7.2010 ला विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्त्यास प्रि अप्रोअल लेटर दिले होते व तक्रारकर्त्यास सांगितले होते की, त्यांनी शर्ती व अटी प्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता तसेच पुढील तारखेचे धनादेश मिळाल्यानंतरच सदरहू कर्ज तक्रारकर्त्यास देण्यात येणार होते. परंतु तक्रारकर्त्याने दि. 3.7.2010 च्या पत्रानंतर कुठल्याही अटीचे व कागदाची पूर्तता केली नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष 1 ने तक्रारकर्त्याला कुठल्याही प्रकारचे कर्ज दिले नाही. विरुध्द पक्ष 1 चे पुढे असे म्हणणे आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याची गाडी जप्त केली नाही. त्यामुळे नोटीस देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच तक्रारकर्त्याला कोणत्याही प्रकारचे कर्ज दिले नसल्यामुळे त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची किस्त घेतली नाही. विरुध्द पक्ष क्रं. 1 चा तक्रारकर्त्याशी कुठलाही संबंध नसल्यामुळे तसेच कोणत्याही प्रकारचे कर्ज तक्रारकर्त्याला दिलेले नसल्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्ष 1 च्या विरोधात तक्रार चालवू शकत नाही. त्यामुळे तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
8 विरुध्द पक्ष 2 चे म्हणणे आहे की, त्यांनी तक्रारकर्त्यास दि. 21.07.2011 रोजी गाडी दिली व ती गाडी पंजिकृत देखील केली. तक्रारकर्त्याला गाडी वि. प. 3 च्या मार्फत देण्यात आली. कारण वि.प. 3 हे वि.प. 2 चे सब डिलर आहेत. वि.प. 2 ने तक्रारकर्त्याची गाडी जप्त केली नाही. तक्रारकर्त्याने स्वतः वि.प. 3 यांच्याकडे गाडी सर्व्हिसिंग करण्याकरिता दिली व त्यानी गाडी त्यांच्याकडून नेली नाही. तक्रारकर्त्याला सदर तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याची गाडी जप्त केलेली नसल्याने तक्रारकर्त्यास मंचासमक्ष तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारकर्त्याने सदर तक्रार त्याची गाडी विरुध्द पक्ष 1 यांनी जप्त करु नये या हेतूने दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 2 यांना गाडीची संपूर्ण रक्कम दिलेली नाही. विरुध्द पक्ष 2 यांना गाडीची रक्कम वि.प. 1 यांच्याकडून घेणे असल्याने वि.प. 2 यांना तक्रारकर्त्याची गाडी जप्त करण्याचे काहीही कारण नाही. तक्रारकर्त्याच्या गैर व्यवहारामुळे वि.प. 2 हे स्वतः तोटा सहन करीत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
9 वि.प. 3 चे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्यास दि. 21.07.2011 रोजी गाडी देण्यात आली व त्यानंतर ती गाडी रजिस्ट्रेशन करण्यात आली. दि. 7.9.2011 रोजी वि.प. 3 यांनी तक्रारकर्त्याची गाडी देण्यास नकार दिला हे खोटे असून या उलट वि.प. 3 च्या कडे सर्व्हिसिंग न झाल्यामुळे त्यांनी तक्राकरर्त्याशी संपर्क साधला व वि.प. 2 यांच्याकडे सर्व्हिसिंगकरिता गाडी दिल्याचे सांगितले व सर्व्हिसिंग झाल्यावर रक्कम देऊन गाडी घेऊन जाण्यास सांगितले. परंतु वारंवांर सूचना देऊन देखील तक्रारकर्त्याने गाडी परत नेली नाही व तक्रारकर्त्याची गाडी आज ही वि.प. 2 यांच्या वर्क शॉप मध्ये उभी आहे. गाडी दुरुस्ती झाल्यावर देखील तक्रारकर्त्याने गाडी न नेल्यामुळे वि.प. 2 यांच्या वर्कशॉप मध्ये एका गाडीची जागा अडून आहे व त्यासाठी तक्रारकर्ता वि.प. 2 यांना प्रतिदिन पार्किंग चार्जेस रुपये 100/- देण्यास जबाबदार आहे. वि.प. 1 व 2 तसेच तक्रारकर्ता यांच्यामध्ये काय व्यवहार झाला त्याबाबत वि.प. 3 यांचा काहीही संबंध नसल्यामुळे त्यांनी तक्रारकर्त्याची गाडी जप्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तक्रारकर्त्याने नेमक्या कोणत्या कारणाने गाडी परत नेली नाही. याबाबत वि.प. 3 ला माहिती नाही. तक्रारकर्त्याने तक्रार हेतुपुरस्सर दाखल केली आहे. त्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी. वि.प. 3 ने तक्रारकर्त्याची गाडी जप्त केली नाही. त्यामुळे सदर तक्रार दाखल करण्याचे कारण उद्भवलेले नाही. विरुध्द पक्षाच्या सेवेत न्यूनता नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून पैसे मिळविण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल केली. त्यामुळे तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
10 तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्द पक्षाचे लेखी उत्तर तसेच विरुध्द पक्ष क्रं. 1 व 3 चा लेखी युक्तिवाद तसेच विरुध्द पक्ष 2 च्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो.
प्र. 1 तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय ?
कारणमिमांसा
11 तक्रारकर्त्याची तक्रार दि. 21.10.2011 रोजी मंचाने दाखल केली. दि. 30.11.2011 ला तक्रारकर्त्याचे वकील हजर होते, त्यानंतर तक्रारकर्ता व त्यांचे वकील प्रत्येक तारखेला गैरहजर होते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 व 3 ने दाखल केलेल्या लेखी युक्तिवादाची देखील प्रत घेतलेली नाही. युक्तिवादाच्या दिवशी सुध्दा तक्रारकर्ता व तक्रारकर्त्याचे वकील गैरहजर होते. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या अनुपस्थित तक्रार खारीज न करता मंच तक्रारीच्या गुणवत्तेवर आदेश पारित करीत आहे.
12 तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की, विरुध्द पक्ष 1 च्या रुपये 53,000/- चे लोनवर त्यांनी वि.प. 2 कडून टी.व्ही.एस. अपाची ही मोटर सायकल खरेदी केली आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीच्या परिच्छेद 4 मध्ये नमूद केले आहे की, वि.प. 1 ने वि.प. 2 यांना 53,000/- रुपये दिलेले नाही. तसेच वि.प. 1 ने आपल्या लेखी उत्तरात तसेच लेखी युक्तिवादा मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे त्यांनी तक्रारकर्त्यास लोन दिले नाही. याचा अर्थ तक्रारकर्त्याच्या वाहनाची पूर्ण किंमत रुपये 76,174/- वि.प. 2 यास प्राप्त झालेली नाही. वि.प. 2 ने वि.प. 1 च्या अप्रुअल लेटरला ग्राहय मानून तक्रारकर्त्यास दिनांक 21.07.2011 ला वाहनाचा ताबा दिला. तसेच वाहनाचे रजिस्ट्रेशन देखील करुन दिले. तक्रारकर्त्याने तक्रारी मध्येच नमूद केले आहे की, त्यांनी दि. 4.9.11 ला गाडी वि.प. 3 कडे दुरुस्तीकरिता दिली असता त्यांनी ती देण्यास नकार दिली व 53,000/- ची मागणी केली. तसेच तक्रारकर्त्याने वि.प. 1 यांच्याकडे गाडी तारण ठेवली आहे व तो त्यांना महिन्याची किस्त देत आहे. तक्रारकर्त्याने वि.प. 2 यास गाडीचे पूर्ण किंमत रु.76,174/- दिली तसेच वि.प. 1 ला मासिक किस्तची रक्कम दिले याबाबत कोणताही दस्त दाखल केलेला नाही. या उलट वि.प. 1 चे म्हणणे आहे की, त्यांनी तक्रारकर्त्यास लोनच दिले नाही. तक्रारकर्त्याला जर लोन दिले नसेल तर त्यास वि.प. 1 ला महिन्याची किस्त देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
13 तक्रारकर्त्याने मंचा पासून अनेक बाबी लपवून ठेवलेल्या आहेत. तक्रारकर्ता हा स्वच्छ हाताने मंचासमोर उपस्थित झालेला नाही. तक्रार सिध्द करण्याची जबाबदारी ही तक्रारकर्त्याची असतांना देखील तक्रारकर्ता मंचासमोर उपस्थित राहिला नाही व त्यांनी आपली तक्रार सिध्द केली नाही.
14 तक्रारकर्ता विरुध्द पक्षाच्या सेवे मधील त्रृटी सिध्द करण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
करिता आदेश.....
आदेश
1 तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
2 खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.