निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. अर्जदाराची तक्रार ही गैरअर्जदारने दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळणेसाठीची आहे.
अर्जदारची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. अर्जदार यांनी दिनांक 01.10.2013 रोजी होंडा कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून होंडा एव्हीएटर मोटार सायकल क्रमांक 26 एम 2781 ज्याची किंमत रक्कम रु.56,122/- त्यापैकी रक्कम रु.21,442/- नगदी डाऊनपेमेंट करुन उरलेल्या रक्कमेच्या अंदाजे रक्कम रु.38,000/- गैरअर्जदार यांचेकडून कर्ज घेऊन मोटार सायकलची किंमत फेडून अर्जदार सदरील मोटार सायकल वापरत होता. गैरअर्जदार यांनी रक्कम रु.34,929/- एवढी रक्कम अर्जदाराला गैरअर्जदारास दरमहा रक्कम रु.2020/- हप्त्याप्रमाणे 24 हप्त्यात कर्जाची परतफेड करावयाची होती. त्यापैकी अर्जदार यांनी 10 हप्त्याची परतफेड नियमीतपणे केली. दिनांक 05.10.2015 रोजी शेवटचा हप्ता देणे होता. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे 24 धनादेश सह्या करुन दिलेले होते. अर्जदाराची पत्नी ही गंभीररीत्या आजारी पडल्याने तीच्या औषधोपचारात मोठी रक्कम खर्च झाल्याने अर्जदाराने 3 हप्त्याची परतफेड गैरअर्जदार यांचेकडे वेळेवर केलेली नव्हती. दिनांक 05.12.2014 रोजी अर्जदारास काही सुचना, कल्पना,नोटीस किंवा इशारा न देता अर्जदाराचे घरासमोरुन गैरअर्जदार यांनी मोटार सायकल घेऊन गेले. अर्जदाराने पोलीसांकडे तक्रार केली. दिनांक 06.01.2015 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे जाऊन चौकशी केली असता गैरअर्जदार यांनी सदरील मोटार सायकल अर्जदारास देणेस नकार दिला. गैरअर्जदार यांनी मोटार सायकल जप्त करण्याचा कायदेशीर मार्ग अवलंबलेला नाही, बेकायदेशीररीत्या मोटार सायकल ताब्यातुन नेल्याने अर्जदाराला फार मोठा धक्का बसला आहे. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराला दिलेल्या सेवेमध्ये फार मोठी त्रुटी दिलेली आहे. अर्जदार नियमीतपणे भरलेल्या हप्त्यामध्ये जे काही 2-3 हप्त्याची अनियमीतता झालेली आहे ती रक्कम अर्जदार भरणेस तयार आहे. त्यामुळे अर्जदाराची मोटार सायकल गैरअर्जदाराने ताब्यात परत करणेचा हुकूम करणे गरजेचे आहे. तसेच या प्रकरणात अर्जदारास झालेल्या आर्थिक,मानसिक व शारिरिक त्रासामुळे जे रक्कम रु.एक लाखाचे नुकसान झाले ते गैरअर्जदार यांनी देणे आवश्यक आहे. अर्जदाराने गैरअर्जदार विरुध्द तक्रारीमध्ये अर्जदारास तक्रारीसाठी झालेला खर्च रक्कम रु.5,000/- अर्जदाराची मोटार सायकल क्रमांक 26 एम 2781 ही गैरअर्जदार यांनी अर्जदाराला ताब्यात देणेकरीता आदेश द्यावेत. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.1 लाख व गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून घेतलेले 24 धनादेश अर्जदारास परत करावेत. इत्यादी मागणी अर्जदाराने तक्रारीव्दारे गैरअर्जदार यांचेकडून केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर वकीलामार्फत ते तक्रारीत हजर झाले व गैरअर्जदार यांनी आपला लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराचा अर्ज हा बिनबुडाचा असून अर्जदार हा यांचा ग्राहक नाही. नमूद वाहन गैरअर्जदार यांनी विक्री केलेले असल्याने अर्जदारास अर्जातील कथनाप्रमाणे कोणताही आदेश घेण्याचा अधिकार नाही. गैरअर्जदार ही एक कर्ज पुरवठा करणारी बँक असून अर्जदार हा त्यापैकी एक लाभार्थी आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले होते. सदरील कर्ज घेतेवेळेस लेखी करार केला होता. त्यानुसार अर्जदाराने कराराचे नियम व अटी प्रमाणे सदर कर्ज नियमीतपणे हप्त्यामध्ये भरण्याची हमी दिलेली होती. अर्जदाराने कर्जाची रक्कम थकीत ठेवल्यामुळे गैरअर्जदाराने सदर वाहन जप्त करुन विक्री केलेले आहे. अर्जदाराचे हप्ते थकीत असल्याने वाहन ताब्यात घेतल्याबद्दलची नोटीस दिनांक 05.12.2014 रोजी अर्जदारास पाठविण्यात आली होती. सदर नोटीस ही अर्जदाराला दिनांक 08.12.2014 रोजी मिळाली होती. नोटीशीप्रमाणे दिनांक 20.12.2014 पर्यंत कर्जाची रक्कम देण्याचे नमुद केले होते. परंतु नोटीस मिळूनही हप्ते न भरल्याने दिनांक 24.12.2014 रोजी सदर वाहन ऑनलाईन विक्रीव्दारे विक्री करण्यात आले आहे. सदर वाहन हे विक्री केलेले आहे ही बाब अर्जदारास माहिती झाल्यावरुन अर्जदाराने दिनांक 05.01.2015 रोजी पोलीस स्टेशन इतवारा येथे वाहन चोला गेल्याबद्दलची तक्रार केलेली आहे. अर्जातील सर्व बाबी अर्जदाराने काल्पनिकदृष्टया व मंचाची दिशाभूल करण्याचे उद्देशाने मंचासमोर माडल्या आहेत. बँकेचे सर्व व्यवहार हे लेखी स्वरुपात असून तोंडी स्वरुपाची रुपरेषा अर्जदाराने केलेली काल्पनिक स्वरुपाने मांडली आहे. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज हा कोणत्याही प्रकारच्या त्रुटीबद्दल सिध्द होत नाही. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज दंडासह खारीज करण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदार यांनी लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांची प्रमुख तक्रार अशी आहे की,गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन बेकायदेशीररीत्या जप्त केलेले असून अर्जदार रक्कम भरण्यास तयार असतांनाही गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे पैसे स्विकारलेले नाही व वाहन परत केलेले नाही.
तक्रारीसोबत अर्जदाराने अर्जदाराचे वाहन परत मिळावे यासाठी अंतरीम मनाई हुकूमाचा अर्ज दाखल केला होता. सदरील आदेशामध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे थकीत हप्त्यापोटी रक्कम रु.10,000/- जमा करावे व रक्कम प्राप्त होताच गैरअर्जदाराने अर्जदाराचे वाहन त्वरीत परत द्यावेत असे आदेश दिले होते. त्यानुसार अर्जदार हे दिनांक 13.01.2015 रोजी गैरअर्जदार यांचेकडे गेले असता गैरअर्जदार यांनी मंचाचे नोटीसीवर ‘’ Vehicle sold on date 31.12.2014 in on line auction” अशा स्वरुपाचा शेरा देऊन गैरअर्जदार यांनी सही व शिक्का दिलेला आहे. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन विक्री केलेले असल्याचे दिसून येते.
गैरअर्जदार यांनी कराराची प्रत दाखल केलेली आहे त्यावरुन अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून वाहन खरेदीसाठी कर्ज घेतलेले असून सदरील कर्जाच्या परतफेडीपोटी अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे रक्कम रु.2020/- दरमहा मासिक हप्त्याव्दारे एकूण 24 हप्त्यामध्ये कर्जाची परतफेड करण्याचा करार झालेला असल्याचे दिसून येते. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन अर्जदाराने नोव्हेंबर 2013 पासून नोव्हेंबर 2014 पर्यंत गैरअर्जदार यांचे हप्ते भरलेले असल्याचे दाखल पावत्यावरुन दिसून येते.
दाखल पावत्यांचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी मे-2014,ऑगस्ट-2014 व सप्टेंबर-2014 रोजीचे हप्ते भरलेले नाहीत. परंतु गैरअर्जदार यांनी मे-2014 नंतर जुलैचा हप्ता स्विकारलेला आहे व सप्टेंबर 2014 नंतर आक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा मासिक हप्ता एकदमच भरलेला असून गैरअर्जदार यांनी ही रक्कम स्विकारलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे शेवटचा हप्ता हा दिनांक 21.11.2014 रोजी भरलेला असल्याचे दाखल पावत्यावरुन सिध्द होते. गैरअर्जदाराच्या लेखी जबाबामधील कथनानुसार गैरअर्जदाराने अर्जदाराचे वाहन हप्ते थकीत ठेवलेले असल्यामुळे जप्त केलेले असल्याचे नमुद केलेले आहे. वाहन जप्त केल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 05.12.2014 रोजी नोटीस दिलेली आहे असे कथन लेखी जबाबातील परिच्छेद क्रमांक 7 मध्ये गैरअर्जदार यांनी नमुद केलेले आहे. यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन दिनांक 05.12.2014 पुर्वी जप्त केलेले असल्याचे दिसून येते.
अर्जदार यांनी शेवटचा हप्ता हा दिनांक 21.11.2014 रोजी भरलेला असतांनाही 15 दिवसाचे आंत अर्जदाराचे वाहन कुठलीही पुर्वसूचना,नोटीस न देता अर्जदाराचे वाहन जप्त केलेली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन जप्त केल्यानंतर अर्जदारास दिनांक 05.12.2014 रोजी नोटीस पाठविलेली होती. अर्जदारास सदरील नोटीस दिनांक 08.12.2014 रोजी मिळाली व नोटीसमध्ये दिलेल्या मुदतीत अर्जदाराने थकीत हप्त्याची रक्कम भरलेली नसल्याने अर्जदाराचे वाहन दिनांक 24.12.2014 रोजी विक्री केलेले असल्याचे लेखी जबाबामध्ये नमुद केलेले आहे. त्याच्या पृष्ट्यर्थ गैरअर्जदार यांनी अर्जदारास पाठविलेल्या नोटीसची प्रत दाखल केलेली आहे. सदरील नोटीशीचे अवलोकन केले असता गैरअर्जदार यांनी अर्जदारास पाठविलेली नोटीस ही Address of the borrower: यापुढे Taufikh ahamad S.Sayyad, Old Bridge, Road,Tayear Board,Nanded या पत्त्यावर पाठविलेली आहे. तसेच Authorization letter of repossession agency दिलेल्या पत्राकरीता अर्जदाराचा पत्ता हा वरीलप्रमाणे नमुद केलेला असल्याचे दिसून येते. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे कर्ज मागणेसाठी केलेला अर्ज दाखल केलेला आहे. सदरील अर्जाचे अवलोकन केले असता अर्जदाराने सदरील अर्जामध्ये स्वतःचा पत्ता हा permanent address House No. 8-1-218,Mandai,Nanded असा दिलेला आहे व employer’s details मध्ये अर्जदार देशमुख ऑटो डिल यांचेकडे नोकरी करीत असतांना employer’s Address म्हणून Old Bridge, Road,Tayear Board,Nanded हा पत्ता दिलेला आहे. तसेच गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या लोन-कम-हायपोथीकेशन एग्रीमेंटमध्ये अर्जदाराने त्याचा पत्ता हा House No. 8-1-218,Mandai,Nanded असा नमुद केलेला आहे. असे असतांनाही, गैरअर्जदार यांनी अर्जदारास पाठविण्यात आलेली तथाकथित नोटीसी हया Old Bridge, Road,Tayear Board,Nanded या पत्त्यावर पाठविलल्या असल्याचे दिसून येते.
वास्तविक पाहता अर्जदाराने त्याचे कर्जाची मागणी अर्जामध्ये दिलेला permanent address वर गैरअर्जदार यांनी नोटीस पाठविणे बंधनकारक होते. गैरअर्जदार यांनी तसे न करता अर्जदारास सदरील नोटीस ही चुकीच्या पत्त्यावर पाठविलेली असल्याचे दिसून येते. परंतु सदर नोटीस अर्जदारास प्राप्त झाल्याचा पुरावा दिलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन जप्त करण्यापुर्वी अर्जदारास कुठलीही सुचना दिलेली नव्हती. अर्जदाराने दिनांक 21.11.2014 रोजी गैरअर्जदार यांचेकडे रक्कम रु.4950/- जमा केलेले आहे व त्यानंतर 15 दिवसाच्या आत गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन जप्त करुन विक्री केलेले आहे.
गैरअर्जदार यांनी मे-2014 चा हप्ता थकल्यानंतर अर्जदाराकडून नोव्हेंबर-2014 पर्यंत हप्ते स्विकारलेले आहेत. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम स्विकारण्यापुर्वी थकीत हप्तापोटी सूचना,नोटीस देणे बंधनकारक होते. अर्जदाराने भरलेले हप्ते गैरअर्जदार यांनी स्विकारलेले आहेत. हप्त्याची रक्कम भरल्यानंतर 15 दिवसाच्या आतच वाहन कोणतीही पूर्व सुचना न देता जप्त करुन गैरअर्जदार यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. तसेच वाहन जप्त करतांना कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केलेला नाही. तसेच रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचना पाळलेल्या नाहीत. त्यामुळे गैरअर्जदार यांचे सदरील कृत्य बेकायदेशीर आहे. त्यामुळे निश्चितच अर्जदारास आर्थिक,मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागलेला आहे असे मंचाचे मत आहे.
गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन विक्री केलेले असल्याचे नमुद केलेले असून Car. Tread Exchange चे कागदपत्रे दाखल केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून घेतलेल्या कर्ज परतफेडीपोटी एकूण रक्कम रु.48,480/- परतफेड करावयाची होती. अर्जदार यांनी दाखल केलेल्या पावत्यावरुन अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे एकूण रक्कम रु.24,170/- एवढी जमा केलेली असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन रक्कम रु.35,600/- एवढया किंमतीस विकलेले असल्याचे Car. Tread Exchange च्या कागदपत्रावरुन दिसून येते. म्हणजेच गैरअर्जदार यांचेकडे अर्जदाराच्या कर्जफेडीपोटी गैरअर्जदार यांचेकडे एकूण रु.24,170 + रु. 35,600 = 60,310 एवढे जमा झालेले आहेत. अर्जदारास घेतलेल्या कर्जापोटी एकूण रक्कम रु.48,480/- व्याजासह संपूर्ण कर्ज परतफेड करावयाचा करार झालेला होता. परंतु अर्जदाराच्या कर्ज परतफेडीपोटी रु.60310 – रु. 48480 = रु.11,830/- एवढी रक्कम गैरअर्जदार यांचेकडे जास्तीची जमा असल्याचे दाखल कागदपत्रावरुन सिध्द होते. त्यामुळे सदर रक्कम अर्जदारास गैरअर्जदार यांनी परत करणे बंधनकारक आहे. अर्जदाराचे वाहन विक्री केलेले असल्याने वाहन अर्जदारास परत करावे असा आदेश करणे योग्य होणार नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहन कायदेशीर प्रक्रीयेचा अवलंब न करता बेकायदेशीर मार्गाने जप्त करुन विक्री केलेले असल्याने अर्जदारास निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास जास्तीची रक्कम रु. 11,830/-आदेश कळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावी.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रक्कम रु.2500/- आदेश कळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.