निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार काझी अनवर पाशा अझहर पाशा हा वजिराबाद,पोलीस हेडक्वाटर,कॉलनी, नांदेड येथील रहिवासी असून अर्जदार हा एमएच 26/एच2741 या मोटारसायकलचा मालक आहे. अर्जदाराने सदरचे वाहन गैरअर्जदार यांचेकडून कर्ज घेऊन खरेदी केलेले आहे. कर्ज घेतांना गैरअर्जदार बँकेला अर्जदाराने असे सांगितले होते की, त्याचा पगार ठरल्यादिवशी होत नाही. त्यावेळी गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास असे सांगितले की, तुम्ही आमचे ग्राहक आहात, आम्ही तुमचे नुकसान होऊ देणार नाही, तुमचा पगार दरमहिन्याला तुमच्या खात्यात जमा झाल्याचा बघुन चेक वटविण्यासाठी टाकण्यात येईल. गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदारास दिनांक 12.05.2012 ला खाते चालू केले. अर्जदाराने सदर मोटार सायकलची किंमत रक्कम रु.59,000/- असल्याने डाऊन पेमेंट म्हणून रक्कम रु.29,019/- गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे भरले व गैरअर्जदार क्र. 1 ने उर्वरीत रक्कमेचे कर्ज अर्जदारास दिले व दरमहिन्यास व्याजासहीत हप्ता रक्कम रु.1985/- भरणेस सांगितले. अशा पध्दतीचा करार अर्जदार व गैरअर्जदार यांचेत झाला. सदर कराराच्या वेळी गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून एकूण 24 चेक घेतले म्हणजेच 1985X24= 47,640/- याप्रमाणे अर्जदाराला लोन परत करण्याचे ठरले. गैरअर्जदाराने अर्जदारास असेही सांगितले की, जर अर्जदाराचे चेक बाऊंस झाले तर गैरअर्जदाराचे रिकव्हरी एजंट अर्जदाराकडे येऊन बाऊंस चेक बाबत रु.70/- व हप्त्याची रक्कम रु.1985/- असे घेईल व अर्जदाराचे खात्यातून कोणतीही रक्कम काढता येणार नाही. परंतु दिनांक 05.09.2012 ला अर्जदाराचा पगार शासनाकडून खात्यात जमा झाला नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांना माहिती असूनही सदर तारखेस चेक बाऊंस करण्यात आला. गैरअर्जदार क्र. 1 चे रिकव्हरी एजंट अर्जदाराकडे दिनांक 17.09.2012 ला येऊन रुपये 1985+450= 2435 घेऊन त्याची पावती म्हणजेच इ.टी.सी. चार्जेस म्हणून रक्कम रु.450/- जास्त उकळण्यात आले. अर्जदाराचा पगार शासनाकडून पहिल्या हप्त्यात जमा झाल्याने दिनांक 05.10.2012, 05.11.20122, 05,12,2012, 05.01.2013, 05.02.2013 हे चेक अर्जदाराने क्लीअर केले. दिनांक 05.03.2013 ला अर्जदाराचा पगार खात्यात जमा झाला नाही हे गैरअर्जदार क्र. 1 ला माहित असून देखील अर्जदाराचा चेक बाऊंस करण्यात आला. अर्जदाराचा पगार दिनांक 08.03.2013 ला जमा झाल्याने गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदाराच्या खात्यातून दिनांक 11.03.2013 रोजी 1985+472= 2457 म्हणजेच चार्जेस म्हणून रक्कम रु.472/- जास्तीचे घेतले. याचवेळी रिकव्हरी एजंट दिनांक 13.03.2013 ला 1985+200+2185+200 चार्जेस म्हणून जास्तीचे घेतले. अर्जदाराला सदरील बाब कळविल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जाऊन सदर सांगितली त्यावेळी दिनांक 22.03.2013 ला रु.2185/- अर्जदारास परत करण्यात आले. म्हणजेच रु.272/- कमी देण्यात आले. याप्रकारे गैरअर्जदाराने वेळोवेळी अर्जदाराकडून जास्तीची रक्कम घेतली तसेच FEE-TXN DONE AT OTHER BANKS,OVERDUE LOAN,REFUND, REC-FEE, INST-A CHG,EAW DECCHG,EMT-RTN CHARGES विनाकारण लाऊन अर्जदाराच्या खात्यातून रु.175/- काढले व अशाप्रकारे दिनांक 05.07.2013 ला गैरअर्जदाराने अर्जदाराच्या खात्यातून रक्कम रु.2447/- काढून घेतले व रिकव्हरी एजंटने देखील रु.2435/- घेऊन गेले म्हणजेच एकाच हप्तबद्दल दोन वेळा रक्कम घेऊन गेले व त्यात देखील रक्कम रु.450/- जास्तीचे घेतले. ही बाब परत गैरअर्जदार यांना दिनांक 02.08.2013 ला निदर्शनास आणली असता रु.2395/- अर्जदाराचे खात्यात परत वळते करण्यात आले. त्यावेळी देखील रु.52/- कमी देण्यात आले. अशाचप्रकारे गैरअर्जदाराने अर्जदाराचे खात्यातून वेळोवेळी जास्तीची रक्कम दिनांक 28.10.2013, 07.11.2013, 09.12.2013, 06.02.2014, 13.03.2014, 06.05.2014 रोजी देखील जास्तीची रक्कम काढण्यात आली शेवटी अर्जदार गैरअर्जदार यांचेकडे शेवटचा हप्ता भरुन वाहनाची एनओसी मागणेसाठी गेला असता गैरअर्जदाराने अर्जदारास रक्कम रु.10,000/- चार्जेस भरणेस अर्जदारास सांगितले व त्यानंतरच एनओसी देण्यात येईल असे सांगितले. याबाबत गैरअर्जदारास विचारणा केली असता चेक बाऊंस चार्जेस व पेमेंट चार्जेस हे सर्व रक्कम रु.10,000/- मध्ये सामाविष्ठ आहेत असे सांगितले. गैरअर्जदाराने अर्जदाराचे खात्यातून FEE-TXN DONE AT OTHER BANKS,OVERDUE LOAN,REFUND, REC-FEE, INST-A CHG,EAW DECCHG,EMT-RTN CHARGES असे एकूण रु.7572/- विनाकारण काढून घेतले. अर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, गैरअर्जदाराने विनाकारण काढून घेतलेले रु.7572/- द.सा.द.शे. 18टक्के व्याजासहीत गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच अर्जदारास विनाकारण दिलेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी रु.15,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराचा अर्ज हा बिनबुडाचा व ग्राहक संरक्षण कायद्याच्या सज्ञेत बसत नाही. अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा ग्राहक होत नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुध्द अर्जदारास कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याचा अधिकार नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून अर्जातील मोटारसायकल खरेदी करणेसाठी कर्ज घेतले होते व कर्ज घेतेवेळेस करार केला होता. त्या कराराप्रमाणे अर्जदाराचे कर्ज खाते क्रमांक 22042587 असा आहे. कराराच्या अटी व नियमाप्रमाणे सदर कर्ज हे नियमित हप्त्यामध्ये भरण्याची हमी सुध्दा अर्जदाराने कर्ज घेतेवेळेस दिली होती व नियमित हप्ता न भरल्यास दंड व्याजही भरण्याची हमी दिली होती. अर्जदाराने कराराप्रमाणे नियमित हप्ते भरलेले नसल्यामुळे ब-याच वेळेस दंड व व्याज लागले होते. अर्जदार यांनी दिलेले पोस्ट डेटेड चेक्स न वटल्यामुळे दंड रक्कम बँके बचत खात्यामधून ट्रँझँक्शन स्वरुपात रक्कम कपात झाली होती. सदर प्रकरणात अर्जदाराचा हप्ता व दंड व्याजाची रक्कम भरावयाची नसल्याने सदर प्रकरण दाखल केलेली दिसते. म्हणून अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात यावा. अर्जदाराने करार करतेवेळी कराराच्या सर्व बाबी स्वतः वाचून समजून सहया केलेल्या आहेत. त्यामुळे अर्जदार हा चेक न वटल्यामुळे व रक्कम उशीरा भरल्यामुळे दंड भरणेस जबाबदार आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचे गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे तक्रारीतील बहूतांश कथन अमान्य केलेले आहे. म्हणणे अमान्य केलेले आहे व मंचास विनंती केलेली आहे की, अर्जदाराचा अर्ज रक्कम रु.10,000/- खर्चासह फेटाळण्यात यावा.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे व अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून मोटारसायकल खरेदी करणेसाठी रक्कम रु.30,000/- कर्ज घेतले होते हे गैरअर्जदारास मान्य आहे. अर्जदारास रक्कम रु.1985/- प्रतिमाह असे 24 हप्त्यामध्ये सदर कर्जाची परतफेड करावयाची होती हे अर्जदार व गैरअर्जदार यांना मान्य आहे. अर्जदाराचे म्हणणे आहे की, जेव्हा अर्जदाराचा चेक बाऊंस झाला त्यावेळी गैरअर्जदाराच्या रिकव्हरी एजंटने अर्जदाराकडे येऊन चेकची रक्कम व दंड नगदी नेले व नंतर परत गैरअर्जदाराने अर्जदाराच्या खात्यात रक्कम असतांना सदरचा चेक वटवून घेतला व त्याबद्दल delay payment charges ही वसल केले. म्हणजे एकाच चेकसाठी दोन वेळा वसुली केली व ते गैरअर्जदाराच्या निदर्शनास आणल्यानंतर चेकची रक्कम परत खात्यात जमा केली. सदरचे अर्जदार यांचे म्हणणे योग्य दिसते. कारण अर्जदार यांनी दाखल केलेल्या स्टेटमेंट ऑफ अकाऊंटचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होत आहे. दिनांक 05.03.2013 रोजी अर्जदाराचा चेक ज्याचा क्रमांक 52204258717 बाऊंस झालेला आहे. त्यानंतर अर्जदाराचा पगार दिनांक 08.03.2013 रोजी त्याच्या खात्यात जमा झाला. त्यानंतर दिनांक 11.03.2013 रोजी गैरअर्जदार यांनी सदरचा चेक वटवून घेतला. त्यासाठी दिनांक 11.03.2013 च्या transation मध्ये “ रु.1103/- overdue loan-22042587 recovered” असे लिहिलेले आहे व रक्कम रु.2457/- अर्जदाराच्या खात्यातुन वळते करण्यात आले. तसेच दिनांक 13.03.2013 रोजी रिकव्हरी एजंटने अर्जदाराकडून रु.2185/- वसुल केले. त्याबद्दल अर्जदारास पावती देखील दिली ज्याचा क्र.29318021 व दिनांक 13.03.2013 अशी आहे व त्यात रक्कम रु.1985/- चा हप्ता रु.200/- चेक बाऊंस चार्जेस घेतले. तसेच अर्जदाराने तक्रार दिल्यावर गैरअर्जदाराने दिनांक 22.03.2013 रोजी रु.2185/- अर्जदाराच्या खात्यावर परत जमा केले. त्याबद्दल स्टेटमेंट ऑफ अकाऊंटमध्ये पुढील प्रमाणे नोंद आहेः- ‘’22042587- Refund Anavar Pasha Ajhahar pasha”.
नंतर चेक क्रमांक 22042587/11 हया चेक संदर्भात देखील गैरअर्जदाराने वरील प्रमाणे पुनरावृत्ती केली. दिनांक 05.07.2013 ला चेक बाऊंस झाला,त्यानंतर अर्जदाराचा पगार दिनांक 27.07.2013 ला झालेला आहे व तो खात्यात जमा झालेला आहे. नंतर दिनांक 29.07.2013 रोजी “2907-overdue loan-22042587” अशी नोंद करुन रक्कम रु.2447/- अर्जदाराच्या खात्यातून वळते करुन धेतले. नंतर दिनांक 02.08.2013 रोजी ‘’22042587- Refund Anavar Pasha Ajhahar pasha” अशी नोंद करुन रक्कम रु2395/- अर्जदाराच्या खात्यात जमा केले व त्याच हप्त्याबद्दल गैरअर्जदाराच्या रिकव्हरी एजंटने अर्जदाराकडून रक्कम रु.2435/- नगदी घेतले. त्यात रु. रक्कम रु.1985/- व रु.450/- बाऊंसींग चार्जेस घेतले. गैरअर्जदाराने त्याबद्यल पावती देखील दिली आहे ज्याचा पावती क्र. 30188535 व दिनांक 29.07.2013 आहे. यावरुन असे दिसते की, गैरअर्जदाराने अर्जदाराकडून एकाच हप्त्यासाठी दोनदा रक्कम वसुल केलेली आहे. तसेच चेक बाऊंसींग चार्जेस देखील मनमानीप्रमाणे घेतलेले आहे. दिनांक 05.03.2013 रोजीच्या चेक बाऊंसींगसाठी रु.472/- घेतले, त्याच चेकसाठी रिकव्हरी एजंटने रु.200/- बाऊंसींग चार्जेस घेतले. त्याचप्रमासणे दिनांक 05.07.2013 ला चेक बाऊंस झाल्यानंतर रु.462/- बाऊंसींग चार्जेस घेतले. व त्याच चेकसाठी रिकव्हरी एजंटने रु.450/- बाऊंसींग चार्जेस घेतले. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या Terms & conditions 2013 प्रमाणे चेक रिटर्न चार्जेस या सदरात “ First cheque return in a quarter” समोर रु.350/- दर्शविले आहे. यावरुन गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. तसेच चेक वटवून घेतल्यानंतर देखील रिकव्हरी एजंटकडून त्याच चेकसाठी नगदी पैसे वसुल करुन अर्जदारास मानसिक त्रास दिलेला आहे. गैरअर्जदाराने त्यांच्या म्हणणेच्या पृष्टयर्थ मा. राज्य आयोग, मुंबई यांचा निर्णय क्रमांक First Appeal No. 387 of 2012 dt. 26.11.2014 ची प्रत दाखल केलेली आहे. परंतु प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थिती भिन्न असल्यामुळे सदरचा निर्णय प्रस्तुत प्रकरणात लागू होत नाही असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
5. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
6. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.