ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1178/2008
दाखल दिनांक. 15/09/2008
अंतीम आदेश दि. 21/02/2014
कालावधी 05वर्ष, 05 महिने, 06 दिवस
नि. 09
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
देवीचंद हिराचंद जैन, तक्रारदार
उ.व.70, वर्षे धंदा – व्यापार, (अॅड.मंगल र.कुलकर्णी)
रा. 101, जिल्हापेठ, विसनजी नगर,
जळगांव. ता.जि.जळगांव.
विरुध्द
एच.डी.एफ.सी. बँक, लि. सामनेवाला
रजिस्टर ऑफीस – एच.डी.एफ.सी. (एकतर्फा)
बँक हाऊस,
सेनापती बापट मार्ग,
लोअर परेल, मुंबई – 400 013.
(निकालपत्र सदस्य, चंद्रकांत एम.येशीराव यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तुत तक्रार सेवेतील कमतरतेमुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल करण्यात आलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, ते व्यापारी आहेत. सन 2004 मध्ये त्यांनी बचत खाते उघडतांना सामनेवाल्यांचे बँकेचे आंतरराष्ट्रीय क्रेडीट कार्ड सुविधा घेतली होती. त्यांचा कार्ड क्र. 4346781000332510 असा होता. मात्र त्यांनी कार्डाचा वापर न करता देखील सामनेवाल्यांनी त्यांना पाठविलेल्या खाते उता-यात रु. 8,000/- काढल्याचे तसेच काही रक्कम कॅश अॅडव्हान्स व फायनान्स चार्जेस या नावे टाकलेले दिसले. त्यामुळे दि. 14/01/2005 रोजी त्यांनी सामनेवाल्यांना पत्र देवून आपले खाते बंद करुन आंतरराष्ट्रीय गोल्ड कार्ड सुविधा रदद करावी असे कळविले. मात्र, दि. 12/05/2008 रोजी सामनेवाल्यांनी त्यांच्या कडे रु. 26,803/- इतकी रक्कम थकीत असल्याचे कळवून 15 दिवसांत रक्कम भरण्याबाबत कळविले. तसे न केल्यास फौजदारी कारवाई करण्याची धमकी देखील सामनेवाल्यांनी त्यांना दिलेली आहे. त्यामुळे काहीही रक्कम थकीत नसतांना अशा प्रकारे नोटीसा देवून सामनेवाल्यांनी सेवा देण्यात कमतरता केलेली आहे, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. परिणामी खोटया धमक्यापोटी रक्कम रु.75,000/- व शारिरीक व मानसिक त्रासा बददल रु. 75,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 10,000/- मिळावा, अशा तक्रारदारांच्या मागण्या आहेत.
03. मंचाची नोटीस लागूनही सामनेवाले दि. 03/03/2009 रोजी पावेतो मंचात हजर न झाल्यामुळे, आमच्या पुर्वाधिकारी मंचाने प्रस्तुत तक्रार अर्ज त्यांच्या विरुध्द एकतर्फा चालविला जावा, असे आदेश नि. 1 वर पारीत केलेले आहेत.
04. निष्कर्षांसाठींचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? -- होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देतांना
कमतरता केली काय ? -- होय
3. आदेशाबाबत काय ? --अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
05. आपण सामनेवाला बँकेचे ग्राहक आहोत, व दि. 02/07/2004 रोजी आपण सामनेवाल्यांकडे बचत खाते उघडले होते, असे तक्रारदाराचे शपथेवर विधान आहे. त्यांनी नि. 3/1 ला सामनेवाल्यांनी त्यांनी खाते उघडल्या बाबत दिलेले पत्र दाखल केलेले आहेत. त्या पत्रात ए.टी.एम/आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड ही सुविधा तक्रारदारांनी घेतल्या बाबत स्पष्ट उल्लेख आहे. तक्रारदारांनी नि.3/2 ला दाखल केलेले सामनेवाल्यांचे गोल्ड कार्ड स्टेटमेंट दर्शविते की, तक्रारदार सामनेवाल्यांचे ग्राहक आहेत. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
06. गोल्ड कार्डचा वापर केलेला नसतांना सामनेवाल्यांनी दि.18/12/2004 रोजी चाणक्य पुरी, नवी दिल्ली येथून खरेदी करुन रु. 8,625/- इतक्या रक्कमेचा व्यवहार केला, असे गोल्ड कार्ड स्टेटमेंट आपल्याला दिले, असे तक्रारदारांचे शपथेवर विधान आहे. त्यामुळे नाराज होवून आपण दि.14/01/2005 रोजी, गोल्ड कार्ड सुविधा बंद करावी, या बाबत सामनेवाल्यांना पत्र दिले. त्यानंतर दि. 28/10/2005 रोजी सामनेवाल्यांनी आपले गोल्ड कार्ड स्टेटमेंटच्या उता-यात कोणतेही रक्कम थकीत नसल्याचे दाखविले असूनही, दि. 12/05/2008 रोजी रु. 26,803/- इतकी थकबाकी असल्याचे दाखविले. सामनेवाल्यांनी त्यासाठी वकीला मार्फत नोटीस पाठवून फौजदारी कारवाई करण्याची देखील धमकी दिली. सदर विधाने तक्रारदारांनी शपथेवर प्रतिज्ञापत्र नि. 1-अ यात केलेली आहेत. सामनेवाल्यांनी हजर होवून ती नाकारलेली नाहीत. तक्रारदारांनी नि. 3 ला दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे तक्रारदारांच्या विधानांना पुष्ठी देतात. त्यामुळे तक्रारदारांकडे कोणतीही शिल्लक नसतांना सामनेवाल्यांनी रु. 26,830/- थकीत दाखवून, अनिष्ठ प्रथेचा अवलंब करुन, सेवेत कमतरता केलेली आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दाक्र. 2 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.3 बाबतः
07. मुदा क्र. 1 व 2 चे निष्कर्ष स्पष्ट करतात की, तक्रारदार सामनेवाल्यांच्या ग्राहक आहेत. सामनेवाल्यांनी तक्रारदाराकडे कोणतीही रक्कम थकीत नसतांना त्याची मागणी करत कायदेशीर नोटीस पाठविणे व त्यासाठी फौजदारी कारवाई करण्याची धमकी देणे, या बाबी सेवेतील कमतरता आहेत. तक्रारदारांनी त्यापोटी रु. 75,000/- इतकी नुकसान भरपाई मागितलेली आहे. मात्र आमच्या मते, तक्रारदारांची मागणी अवाजवी आहे. सामनेवाल्यांनी केलेल्या अनिष्ठ व्यापारी प्रथेपोटी तक्रारदारांना मानसिक व शारिरीक त्रास झाल्यामुळे रु. 10,000/- मंजूर करणे न्यायास धरुन होईल असे आम्हांस वाटते. त्याचप्रमाणे प्रस्तुत तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- मंजूर करणे देखील न्यायोचित ठरेल, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.3 चा निष्कर्ष पोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारांना रु. 10,000/-
मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान म्हणून अदा करावेत.
2. सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास अर्ज खर्चापोटी रु. 3,000/- अदा करावेत.
3. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगाव
दिनांक - 21/02/2014
(चंद्रकांत एम.येशीराव) (मिलिंद सा.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष