निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार यांनी दिनांक 11/03/2011 रोजी इंडिका व्हीस्टा कार जिचा रजि. क्र. एमएच-26/व्ही-5282 ही खरेदी केलेली आहे. त्यासाठी गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम रु. 4,98,775/- एवढे अर्थसहाय्य केले. त्यावर एकमुस्त व्याज रु. 2,02,985/- एवढे लावून कर्जाची रक्कम रु. 7,01,760/- केली. सदर रक्कम एप्रिल 2011 पासून पुढील 60 महिन्यापर्यंत म्हणजेच दिनांक 07/02/2016 पर्यंत परतफेड करण्याचे ठरले. प्रत्येक हप्ता हा रक्कम रु. 11,696/- असा होता. अर्जदाराने आजपर्यंत गैरअर्जदार यांच्याकडे रक्कम रु. 1,84,014/- एवढा भरलेला आहे. अर्जदाराचे दोन ट्रक ऑक्टोबर व डिसेंबर 2011 मध्ये अपघातग्रस्त होवून त्याचे नुकसान झाले त्यामुळे सदर कारचे हप्ते अर्जदार वेळेवर भरु शकलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास हप्ता वेळेवर भरलेला नाही म्हणून कार जप्त करण्यात येईल अशी धमकी दिली त्यामुळे अर्जदाराने आपली कार घरामध्ये बंद करुन ठेवली. अर्जदार हा फक्त EMI भरण्यास तयार होता परंतू गैरअर्जदार यांनी जास्तीची रक्कम मागणी केली व बेकायदेशीर दंड व व्याज लावले. अर्जदाराने गैरअर्जदार यांना ठरवून दिलेले हप्त्याप्रमाणे रक्कम स्विकारावी अशी विनंती केली परंतू गैरअर्जदार यांनी अर्जदाराची विनंती फेटाळली. त्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी अर्जदाराचा अर्ज खर्चासह मंजूर करावा तसेच गैरअर्जदार यांना अर्जदाराचे वाहन जप्त न करणे बाबत आदेश दयावेत. अर्जदारास उर्वरीत रक्कमेबाबत बँकेचे स्टेटमेंट/ अॅग्रीमेंट व त्यातील व्याज दंड माफ करुन अर्जदाराकडून EMI अॅडजस्ट करुन देण्याचा आदेश पारीत करावा. तसेच मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/-, दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
4. गैरअर्जदार यांच्याकडे जो कोणी व्यक्ती आर्थिक मदतीसाठी विनंती करतो त्या व्यक्तींना आर.बी. आय. ने निर्देशीत केलेल्या नियमाप्रमाणे लेखी स्वरुपात करारकरुन वित्तीय सहाय्य केले जाते. उभय पक्षात क्षतीपूर्तीचा करारकरुन ठराविक व्याज दरावर वित्त सहाय्य केले जाते. उभयपक्षात झालेला करार हा उभयपक्षावर बंधकारक असतो. प्रस्तुत तक्रारीतील अर्जदाराचा मासिक हप्ता हा 11,696/- असून उभयपक्षातील करार हा 60 मासिक हप्त्याचा आहे. परतफेडीचा प्रथम हप्ता हा दिनांक 11/03/2011 पासून सुरु झाल्यापासून तक्रार दाखल करेपर्यंत एकूण 27 हप्ते होत आहेत. कराराच्या आधीन राहून अर्जदाराने 27 मासिक हप्त्याची रक्कम रु.3,15,792/- भरणे बंधनकारक होते. परंतू अर्जदाराने रक्कम भरलेली नाही. अर्जदाराने तक्रारीसोबत मंचाकडे अंतरिम मनाई हुकूमाचा आदेश होवून देखील आदेशान्वये आदेशीत तारखेपासून 8 दिवसात रक्कम रु. 75,000/- गैरअर्जदाराकडे जमा केलेली नाही. यावरुन अर्जदारास तक्रार दाखल करण्याचे कोणतीही कारण नसतांना केवळ मासिक हप्त्याची परतफेड टाळण्यासाठी व विलंब करण्याच्या वाईट हेतुने तक्रार दाखल केलेली आहे. वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता अर्जदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून वाहन खरेदीसाठी रक्कम रु. 5,14,000/- वित्तीय सहाय्य केलेले असल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या रिपेमेंट शेडयुलवरुन दिसून येते. अर्जदारास कर्जाच्या परतफेडीपोटी रक्कम रु. 11,696/- मासिक हप्ता अशा एकूण 60 हप्त्यामध्ये कर्जाची परतफेड करण्याचा करार अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये झालेला होता. अर्जदार यांच्या तक्रारीतील परिच्छेद क्र. 3 मध्ये अर्जदार यांच्या दोन ट्रकचा अपघात झाल्यामुळे त्याचे नुकसान झाले व त्यामुळे सदर कारच्या कर्जाचे हप्ते अर्जदार वेळेवर भरु शकलेला नाही असे कथन केलेले आहे. त्या संदर्भात अर्जदाराने कुठलाही पुरावा मंचासमोर दिलेला नाही. वास्तविक पाहता ट्रकच्या झालेल्या अपघातामुळे कारचे हप्ते भरु शकलेला नाही या गोष्टीचा अर्थबोध होत नाही. तक्रारीसोबत अर्जदाराने अंतरिम मनाई हुकूमाचा अर्ज दाखल केलेला होता त्यावर दिनांक 04/05/2013 रोजी मंचाने आदेश पारीत करुन अर्जदार यांनी 8 दिवसांच्या आत थकीत हप्त्यापोटी रक्कम रु. 75,000/- गैरअर्जदार यांच्याकडे जमा करावे, असा आदेश दिलेला होता परंतू अर्जदार यांनी रक्कम जमा केलेला पुरावा मंचासमोर दिलेला नाही. याउलट दिनांक 10/02/2015 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदाराने अंतरिम आदेशानुसार रक्कम जमा केलेली नाही असा अर्ज दिला. त्यानंतरही अर्जदाराने पैसे भरलेले असल्याचा पुरावा किंवा पावती मंचासमोर दाखल केलेली नाही. यावरुन अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे रक्कम जमा केलेली नाही ही बाब सिध्द होते.
7. वरील सर्व गोष्टीवरुन अर्जदार हा करारानुसार गैरअर्जदार यांच्याकडे हप्ते भरण्यात असमर्थ ठरलेला आहे व करारातील नियम व अटी दोन्ही पक्षावर बंधनकारक असल्यामुळे मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.