(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर प्र. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 22 मार्च, 2018)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये, ही तक्रार विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द त्याच्या चोरी गेलेल्या वाहनाचा विमा दावा मंजुर न केल्यामुळे दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हा चारचाकी टीप्पर ज्याचा नोंदणी क्रमांक MH – 31- M- 8199 चा मालक आहे. हे वाहन विरुध्दपक्ष क्र.2 विमा कंपनी मार्फत दिनांक 28.12.2009 ते 27.12.2010 या कालावधीसाठी विमाकृत करण्यात आले होते. त्यानुसार, तक्रारकर्त्याला विमा पॉलिसीची प्रत देण्यात आली. दिनांक 12.5.2010 ला त्या वाहनाला खापा-पारशिवनी रस्त्यावर अपघात झाला, त्याची सुचना पोलीस स्टेशन खापा, तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 च्या कार्यालयाला त्याचदिवशी देण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.2 ने सर्व्हेअरची नमणुक केली आणि त्याने घटनास्थळ आणि अपघातग्रस्त वाहन तपासून तक्रारकर्त्याला ते वाहन विरुध्दपक्ष क्र.3 च्या गॅरेजमध्ये नेण्यात आले. विरुध्दपक्ष क्र.3 ने दुरुस्तीच्या खर्चाचा अंदाजपत्रक दिला त्याची प्रत विरुध्दपक्ष क्र.2 ला देण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.2 ने वाहन दुरुस्तीला मंजुरी दिली. दुरुस्तीसाठी तक्रारकर्त्याला रुपये 2,33,070/- खर्च आला, त्याने ती रक्कम विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 कडून मागितली. परंतु, तक्रारकर्त्याला असे सांगण्यात आले की, त्याच्या सदरहू वाहनाची पॉलिसी पूर्वीच म्हणजेच दिनांक 28.9.2009 ला संपलेली होती. चौकशी अंती तक्रारकर्त्याला अशी माहिती पडले की, त्याला बनावट आणि खोटी पॉलिसी देवून त्याची फसवणुक करण्यात आली आहे. विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 यांनी त्याच्या विमा दाव्यावर किंवा कुठल्याही अर्जावर कार्यवाही न केल्यामुळे त्यांनी आपल्या सेवेत कमतरता ठेवली. म्हणून या तक्रारी व्दारे त्याने विमा अंतर्गत दुरुस्तीचा खर्च व्याजासह मागितला असून, झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च सुध्दा मागितला आहे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्षांना मंचा मार्फत नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 यांनी आपल्या लेखी जबाबात तक्रारकर्त्याचे सदरहू वाहन दिनांक 28.12.2009 ते 27.12.2010 या कालावधीसाठी त्यांचेकडून विमाकृत करण्यात आले होते हे स्पष्टपणे नाकारले. तक्रारकर्ता म्हणतो त्याप्रमाणे त्याला कुठलीही विमा पॉलिसी त्यांनी दिली नव्हती. जी पॉलिसी तक्रारकर्त्याने दाखल केली आहे ती बनावट आणि खोटी आहे आणि ती त्यांच्या कार्यालया मार्फत देण्यात आली नाही. त्याचप्रमाणे, वाहनाला झालेला अपघात, त्यानंतर सर्व्हेअरची नेमणुक, वाहन दुरुस्तीची परवानगी या सर्व बाबी विरुध्दपक्षाने नाकबुल केल्या आहेत. त्यांच्या तर्फे सदर वाहनाची पॉलिसी देण्यात आली नसल्याने त्यांना अपघाताची सुचना सुध्दा दिली नसल्याने त्यांना वाहन दुरुस्तीच्या खर्चाची जबाबदारी त्यांचेवर येत नाही. पुढे असे नमुद केले की, सदरहू वाहन हे मालवाहू व्यावसायीक वाहन (Goods Carrying Commercial Vehicle) होते आणि जी पॉलिसी अभिलेखावर दाखल केली आहे, ती सदरहू वाहनासाठी दिली जात नाही आणि म्हणून तो पॉलिसीचा दस्ताऐवज खोटा आहे. त्याच्या सेवेत कमतरता होती हे नाकबुल करुन तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली आहे.
4. विरुध्दपक्ष क्र.3 ला नोटीस मिळूनही हजर न झाल्याने प्रकरण त्याचेविरुध्द एकतर्फा ऐकण्यात आले.
5. सुनावणीच्या दरम्यान तक्रारकर्ता तर्फे कोणीही हजर झाले नाही. हे प्रकरण मागील दोन वर्षापासून युक्तीवादाकरीता प्रलंबित होत आहे, त्यामुळे आम्हीं विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 च्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. अभिलेखावर दाखल केलेले लेखी बयाण, दस्ताऐवजाचे अवलोकन केले, त्यावरुन खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
6. ज्याअर्थी तक्रारकर्त्याचा विमा दावा या कारणास्तव नाकारण्यात आला की, ज्या पॉलिसीच्या आधारे त्यांनी दावा केला होता ती पॉलिसी सपशेल खोटी आणि बनावट होती आणि ती विरुध्दपक्ष क्र.1 किंवा 2 तर्फे देण्यात आली नव्हती, म्हणून ही बाब सिध्द करण्याची प्रथम जबाबदारी विरुध्दपक्ष क्र.1 व 2 वर येते. परंतु, ही बाब सुध्दा लक्षात घेणे जरुरी आहे की, तक्रारकर्त्याने हे स्वतः कबुल केले आहे की, त्याला देण्यात आलेली सदरहू पॉलिसी बनावट आहे. त्या पॉलिसीच्या संदर्भाबाबतची कुठलिही नोंद विरुध्दपक्ष क्र.1 किंवा 2 च्या कार्यालयात नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.2 ला याबद्दलची तक्रार केली होती, ज्याची प्रत दस्ताऐवज क्रमांक 10 म्हणून दाखल आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, ती पॉलिसी बनावट असून त्याची फसवणुक करण्यात आली आहे. परंतु, तक्रारकर्त्याचा असा आरोप आहे की, विरुध्दपक्ष क्र.2 ने त्याला बनावट पॉलिसी जारी करुन त्याची फसवणुक केली आहे. परंतु, हे मात्र स्पष्ट आहे तसे याबद्दल वाद सुध्दा नाही की, सदरहू पॉलिसी ज्यावर तक्रारकर्त्यने दावा केला होता ती खोटी आणि बनावट आहे.
7. या व्यतिरिक्त जर दाखल पॉलिसीचे अवलोकन केले तर असे दिसून येते की, त्यावर पॉलिसी नंबर लिहिला असून तो (VS00009858000101) असा आहे. विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 आपल्या लेखी जबाबात या पॉलिसी नंबर बाबत खुलासा केला आहे. विरुध्दपक्षा तर्फे जी पॉलिसी जारी करण्यात येते त्याचा नंबर 16 अंकी असतो. ज्यामध्ये दोन वर्णमाला (Alphabet) असते जे वाहनाचा प्रकार दर्शवितात. वाहनाचा पॉलिसी नंबर खालीलप्रमाणे दर्शविल्या जाते.
VP - Private Car
VC - Commercial - Passenger Carrying
VG - Commercial - Goods Carrying
VM - Motors Cycle
VS - Miscellaneous
त्या 16 अंकी नंबर मधील शेवटचे तिन अंक खालीलप्रमाणे दर्शवितात.
For New Business - VP00000000000100
For First Renewal - VP00000000000101
Second Renewal - VP00000000000102
8. तक्रारकर्त्याचे सदरहू वाहन हे Goods Carrying Commercial Vehicle या प्रकरणामध्ये नोंदणीकृत करण्यात आले होते. त्यामुळे त्या वाहनाच्या पॉलिसीमध्ये पॉलिसीनंबर मधील वर्णमाला VS ऐवजी VG असा असायला हवा होता. कारण VS हे इतर प्रकारचे वाहन दर्शविते. तसेच, ही पॉलिसी विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 याच्या कार्यालयीन प्रक्रीयेनुसार नाही.
9. तक्रारकर्त्याने हे कुठेही स्पष्ट केले नाही की, त्याने या विम्याचा हप्ता कुणाला दिला होता. हप्ता भरल्याची पावती सुध्दा दाखल केली नाही. विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 ने अर्ज करुन तक्रारकर्त्याला विमा हप्ता भरल्याची पावती अभिलेखावर दाखल करण्यास सांगितले होते, परंतु आजपर्यंत पावती दाखल केलेली नाही. असे दिसून येते की, तक्रारकर्त्याला कोणीतरी इसमाने तो विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 चा प्रतिनीधी आहे असे खोटी बतावणी करुन त्याचेकडून रक्कम वसुल केली आणि बनावट पॉलिसी त्याला दिली. परंतु, यासाठी विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 ला कुठल्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही. तसेच, तक्रारकर्त्याच्या वाहनाला झालेल्या अपघातामुळे जे नुकसान झाले त्याची भरपाई करुन देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष क्र.1 आणि 2 याचे वर येत नाही.
सबब, ही तक्रार खारीज करुन पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कुठलाही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
दिनांक :- 22/03/2018