::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/11/2016 )
मा. सदस्य, श्री.ए.सी.उकळकर यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ती ही स्व. श्रीकृष्ण रामराव वानखेडे हयांची विधवा पत्नी असून तक्रारकर्ते क्र. 2 ते 4 ही त्यांची मुले आहेत. सर्व तक्रारकर्ते हे मौजा धोत्रा ता. कारंजा, जि. वाशिम येथील रहिवाशी आहेत.
तक्रारकर्तीचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. श्रीकृष्ण रामराव वानखेडे हे दिनांक 08/02/2014 रोजी कामरगाव येथून स्वतःचे काम आटोपून हिरोहोंडा सि.डी. 100 ने घरी परत येत असतांना, सदर गाडी स्लिप झाली व त्यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाली. त्यांनी उपचाराला दाद न दिल्याने त्यांचा त्याच दिवशी म्हणजेच दिनांक 08/02/2014 रोजी अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.
मयत श्रीकृष्ण रामराव वानखेडे हयांनी त्यांचे जिवनकाळात विरुध्द पक्ष क्र. 1 कडून सर्व सुरक्षा विमा पॉलिसी क्र. 2950 2006 2567 9000 000 ही घेतलेली होती. सदर विमा पॉलिसी दिनांक 27/11/2013 ते 26/11/2015 पर्यंत वैध होती व प्रिमीयमपोटी रक्कम रुपये 776/- ही अदा केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ते क्र. 1 ते 4 हे कायदेशीर वारस या नात्याने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक होतात. सदर विमा पॉलिसी अंतर्गत एकूण विमाधन रुपये 2,00,000/- सुरक्षित आहे.
तक्रारकर्त्यांनी मृत्यूदावा हा विरुध्द पक्ष क्र. 1 कडे दाखल केला व त्यापोटी सर्व कागदपत्रे विमा प्रतिनिधीमार्फत देण्यात आली. विरुध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे वारंवार विमाकृत रक्कमेची मागणी करुनही, अदा करण्यात आली नाही. सरतेशेवटी कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्यामुळे, तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 कडे चौकशी केली असता त्यांनी सुचित केले की, सदर प्रकरणात मृतकाचे रासायनिक विष्लेशण अहवाल देण्यात आलेला नसल्यामुळे सदर दावा हा बंद करण्यात आलेला आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर बाब ही तक्रारकर्त्यांना तोंडी कळविली व कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा अधिकृत माहिती दिलेली नाही. म्हणून तक्रारकर्त्यांनी, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना वकिलामार्फत
नोटीस पाठविली. सदर नोटीस मिळूनही विरुध्द पक्ष यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही व नोटीसची दखल घेतली नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्ष यांनी सेवा देण्यात उणीव व अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे.
त्यामुळे, तक्रारकर्तीने सदर तक्रार, या न्यायमंचासमोर, दाखल करुन, तक्रार मंजूर करावी, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीस विमा रक्कम रुपये 2,00,000/- दयावी, तसेच सदर रकमेवर दरसाल, दरशेकडा 18 % दराने व्याज दयावे, मानसिक त्रासाबद्दल रुपये 20,000/-, शारीरिक त्रासाबद्दल रुपये 20,000/-, तक्रारीचा खर्च रुपये 20,000/-, अशी एकूण रुपये 2,60,000/- नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश करावा, अशी विनंती, केलेली आहे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 09 दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत.
2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चा लेखी जबाब - विरुध्द पक्षाने निशाणी-14 प्रमाणे त्यांचा लेखी जबाब मंचासमोर दाखल करुन, तक्रारकर्तीचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनात नमुद केले की, तक्रारकर्तीचे पती हे दिनांक 08/02/2014 रोजी कामरगाव जि. वाशिम येथून स्वतःचे काम आटोपून घरी परत येत असतांना, त्यांचे ताब्यातील दुचाकी हिरोहोंडा सि.डी. 100 स्लिप होऊन खाली पडून त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची बाब विरुध्द पक्षास कळविली. त्यावर विरुध्द पक्षक्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास दिनांक 16/04/2014, 01/05/2014, 08/05/2014, 16/05/2014, 30/05/2014, 07/06/2014 रोजी नोटीसने कळविले की, आपणास जर सर्व सुरक्षा पॉलिसेचे लाभ घ्यावयाचे असल्यास, खालीलप्रमाणे कागदपत्रांची पुर्तता करण्याचे सुचवले होते.
1) क्रम फॉर्म सहीसह
2) पॅन कार्ड, रहिवासी दाखले व वारसाचे प्रमाणपत्र ( KYC DOCUMENTS )
3) एफ.आय.आर. आणि पंचनामा
4) पोस्ट मोर्टेम रिपोर्ट
5) मृत्यू दाखला
6) Treating doctors certificate giving details of injuries and treatments given
7) Viscera report
8) Duly singed NEFT form with cancelled cheque .
वेळोवेळी सुचना देऊन ही तक्रारकर्ते यांनी अपूर्ण कागदपत्रे देऊन त्यांच्याच माहितीमध्ये व कामामध्ये कमतरता असून देखील त्यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 विरुध्द खोटी, बिनबुडाची तक्रार दाखल केली असून, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी कधीही दोषपूर्ण सेवा प्रदान केलेली नाही किंवा अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला नाही. वरील सर्व कारणास्तव तक्रारकर्तीची तक्रार ही खर्चासह खारिज करण्यांत यावी.
विरुध्द पक्षाने त्यांचा जबाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला व दिनांक 28/10/2016 रोजी दस्तऐवज दाखल केलेत.
3) कारणे व निष्कर्ष ::
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिज्ञापत्र व उभय पक्षांचा लेखी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन नमूद केला.
उभय पक्षात वाद नसलेल्या बाबी अशा आहेत की, मयत विमाधारक श्रीकृष्ण रामराव वानखेडे यांनी त्यांच्या जिवनकाळात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडून, सर्व सुरक्षा विमा पॉलिसी नमूद क्रमांकासह विकत घेतली होती. सदर पॉलिसीचा कालावधी व प्रिमीयम राशी याबद्दल वाद नाही. दाखल दस्तांवरुन असे दिसते की, तक्रारकर्ते मयत विमाधारकाचे वारस आहेत व तक्रारकर्ती क्र. 1 ही पॉलिसी नॉमिनी म्हणून आहे. त्यामुळे तक्रारकर्ते विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक/लाभार्थी या संज्ञेत मोडतात, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त जसे की, एफ.आय.आर. प्रत,घटनास्थळ पंचनामा, पोष्टमॉर्टम रिपोर्ट, मयत श्रीकृष्ण वानखेडे यांचे मृत्यू प्रमाणपत्र इ. यावरुन असा बोध होतो की, विमाधारक श्रीकृष्ण रामराव वानखेडे हे दिनांक 08/02/2014 रोजी कामरगाव ता. कारंजा जि. वाशिम येथून त्यांचे वाहन हिरोहोंडा सि.डी. 100 ने येत असतांना, गाडी स्लिप होऊन अपघात झाला होता व त्यात ते जबर जखमी होवून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
तक्रारकर्ते यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्ते यांनी मयताचे वारस या नात्याने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडे, सर्व आवश्यक ते दस्तऐवज लावून मृत्यू दावा दाखल केला असता विरुध्द पक्षाने तो आजतागायत दिला नाही व मृतकाच्या अपघाताचे आवश्यक ते कागदपत्र विरुध्द पक्षाला दिले नाही, असे सुचित करुन दावा बंद केला ही सेवा न्युनता ठरते. त्यामुळे प्रार्थनेनुसार तक्रार मंजूर करावी.
विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा यावर असा आक्षेप आहे की, विरुध्द पक्षाचे कोणतेही कार्यालय वाशीम जिल्हयात नाही. त्यामुळे तक्रारकर्ते यांची तक्रार या न्याय मंचाच्या कार्यक्षेत्रात चालू शकत नाही. परंतु दाखल दस्तावरुन असे आहे की, मयत विमाधारकाने विरुध्द पक्षाची पॉलिसी राहत्या ठिकाणावरुन, विरुध्द पक्षाच्या शाखा कार्यालयातून घेतली होती व अपघातही या न्याय मंचाच्या कार्यक्षेत्रात घडला होता. तक्रारकर्ते यांनी शपथेवर असे कथन केले की, विरुध्द पक्षाचे शाखा कार्यालय वाशिम इथे आहे, त्यामुळे हा आक्षेप गृहीत धरता येणार नाही.
विरुध्द पक्षाचा असा युक्तिवाद आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्ते यांना त्यांचे पत्र दिनांक 16/04/2014, 01/05/2014, 08/05/2014, 16/05/2014, 30/05/2014 व 07/06/2014 अन्वये वारंवार काही आवश्यक ते दस्तऐवज पुरविण्याबाबत कळवले होते. परंतु सुचना देवूनही तक्रारकर्ते यांनी निष्काळजीपणे अपूर्ण कागदपत्रे विरुध्द पक्षाला पुरविली. त्यामुळे यात विरुध्द पक्षाची सेवा न्युनता नाही.
यावर मंचाचे असे मत आहे की, विरुध्द पक्षाने ज्या दस्तांची मागणी केली आहे, त्यातील काही दस्त तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर दाखल केलेले आहेत. विरुध्द पक्षाने ज्या पत्राव्दारे तक्रारकर्त्यांना हे दस्त मागीतले त्याच्या फक्त प्रती विरुध्द पक्षाने रेकॉर्डवर दाखल केल्या, परंतु तक्रारकर्त्यांस मिळाल्याची पोचपावती हे दस्त रेकॉर्डवर दाखल नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाने दस्त मागणी करणारे पत्र, तक्रारकर्त्यास पाठविले का ? यात शंका आहे. तसेच दाखल पोस्टमार्टम रिपोर्ट यावरुन, मृतक विमाधारकाचा मृत्यू कसा झाला होता, याची पूर्ण कल्पना येते. त्यामुळे मृतकाचा रासायनिक विश्लेषण अहवाल पाहीजे हे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे धोरण योग्य नाही व तो मिळाला नाही म्हणून विमा दावा प्रलंबीत ठेवणे हे योग्य नाही. तक्रारकर्त्यांनी मृतक विमाधारका विषयी जे दस्त रेकॉर्डवर दाखल केले, त्यावरुन विरुध्द पक्षाला विमा दावा देण्यास हरकत नाही. त्यामुळे तक्रारकर्ते यांची तक्रार अंशतः मंजूर करुन विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी, वैयक्तीकरित्या वा संयुक्तपणे तक्रारकर्ते / वारस यांना मयत विमाधारकाची पॉलिसी रक्कम अदा करावी तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई, प्रकरण खर्चासह अदा करावी, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. सबब अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार, अंशतः मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी, वैयक्तीकरित्या वा संयुक्तपणे तक्रारकर्ते / वारस यांना मयत विमाधारक श्रीकृष्ण रामराव वानखेडे यांच्या सदरपॉलिसीची सम इन्शुअर्ड रक्कम दयावी. तसेच सेवा न्युनतेमुळे झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई पोटी, प्रकरण खर्चासह रक्कम रुपये 10,000/- ( रुपये दहा हजार फक्त ) दयावे.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यानंतर 45 दिवसाचे आत करावे. अन्यथा आदेशीत रकमेवर आदेश पारित तारखेपासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत दरसाल, दरशेकडा 9 % व्याज आकारणी होईल, याची नोंद घ्यावी.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svg