निकालपत्र
(दि.20.07.2015)
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
1. अर्जदार सुभद्राबाई ही मयत सिद्धेश्वर पि.लक्ष्मणराव बिंदगे याची आहे. अर्जदाराचा मुलगा सिद्धेश्वर याने गैरअर्जदार क्र. 1 यांचे बँकेत बचत खाते काढले होते,त्याचा खाते क्रमांक 50100000398145 असा आहे. सदरील खाते काढतांना अर्जदाराचे मुलास डेबीट कार्ड देण्यात आले होते. डेबीट कार्ड अंतर्गत कार्डधारकाला गैरअर्जदार क्र. 1 यांनी 5 लाख रुपयाचा अपघाती विमा संरक्षण गैरअर्जदार क्र. 2 यांचकडे दिलेले आहे. मयत सिद्धेश्वर हा दिनांक 17.08.2013 रोजी जीप क्रमांक एमएच 26/एल 426 ने धडक दिल्यामुळे जागीच मरण पावला. पोलीस स्टेशन लोहा यांनी गुन्हा क्रमांक 67/2013 कलम 279,337,304(अ) भा.द.वि.प्रमाणे नोंदवून घटनास्थळ पंचनामा केला. मुलाच्या मृत्यु नंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 15.09.2013 रोजी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह क्लेम फॉर्म दाखल कला. तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांचे बचत खात्यात असलेली रक्कम रु.10,000/- मागणी केली. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तुमची क्लेम रक्कम लवकरच मिळेल असे आश्वासन दिले. परंतु आजपर्यंत पॉलिसीची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांनी अर्जदारास डेबीट कार्ड अंतर्गत वैयक्तीक अपघात विमा पॉलिसीची रक्कम रु.5,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह देण्याचा आदेश द्यावा तसेच गैरअर्जदार यांचेकडे असलेली खातयावरील रक्कम रु.10,000/- व अर्जदार यांना झालेल्या मानसिक,आर्थिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- व दावा खर्च रक्कम रु.10,000/- देण्याचा गैरअर्जदारास आदेश करावा अशी विनती तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
4. गैरअर्जदार क्र. 1 यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. इंशुरन्सचे सर्व संबंधीत अधिकार व कार्यक्षेत्र गैरअर्जदार क्र. 1 यांचे आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांचा सदरील प्रकरणाशी संबंध नसल्याने तक्रार फेटाळण्यात यावी. खाते उघडणेसंबंधीच्या मजकुराबद्दल गैरअर्जदार क्र. 1 यांना आक्षेप नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे गैरअर्जदार क्र. 1 यांनी विमा पॉलिसी काढलेली असल्याचे मान्य केलेले आहे. अर्जदाराने विम्याची रक्कम ही गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे मागणे आवश्यक आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना कोणतीही रक्कम मागीतलेली नाही अथवा नोटीसही दिलेली नाही. त्यामुळे सदरील तक्रारीतील मजकूर चुकीचा असल्याने अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी जबाबामध्ये केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
5. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराच्या तक्रारीतील सुपूर्ण मजकूर अमान्य केलेला असून गैरअर्जदार क्र. 2 चे म्हणणे असे आहे की, सदरील विमा हा इंशुरन्स कायदा,1938 मधील पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन विमा पॉलिसीची पुष्टी करणेस अधीन राहून दाखल केलेला आहे. अर्जदार हा मंचासमोर जाणूनबुजून काही बाबी आणित नाही. अर्जदाराने मुलाच्या मृत्यु नंतर गैरअर्जदार क्र. 2 याचेकडे कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे अर्जदाराचा कुठलाही क्लेम आलेला नाही. त्यामुळे सदरील तक्रार ही प्रिम्युच्युअर्ड आहे. अर्जदाराने मुलाचे मृत्युचा क्लेम गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे दाखल केलेला असल्यास गैरअर्जदार क्र. 1 यांनी कोणताही क्लेम गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे पाठविलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 हा अर्जदाराचे क्लेमवर कोणतीही कारवाई करु शकलेले नाहीत. प्रकरणाची सर्व सत्य परिस्थिती लक्षात घेऊन अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार क्र. 2 यांचेविरुध्द फेटाळण्यात यावा अशी विनती गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपल्या लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
7. अर्जदाराचा मुलगा सिद्धेश्वर याने गैरअर्जदार क्र. 1 या बँकेमध्ये खाते उघडलेले असून बँकेने मयत सिद्धेश्वर यास इंटरनॅशनल डेबीट कार्ड दिलेले आहे, सदरील डेबीट कार्डचा क्रमांक 6031237101821971 असा असल्याचे अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. सदरील डेबीट कार्ड काढल्यानतर गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचे मुलाचा विमा गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे उतरविलेला असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. सदरील विम्याची रक्कम ही रक्कम रु.5,00,000/- आहे असे अर्जदाराचे म्हणणे आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्या लेखी जबाब व शपथपत्रातील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये अर्जदाराचे वरील म्हणणे मान्य केलेले आहे. मयत सिद्धेश्वर यांचे मृत्यु नंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे विमा रक्कम मिळणेसाठी क्लेम फॉर्म दाखल केलेला असल्याबद्दलचा कुठलाही कागदोपत्री पुरावा दिलेला नाही. अर्जदाराने तक्रारीसोबत एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे अपघातासंदर्भात दाखल केलेले आहे. यावरुन मयत सिद्धेश्वर याचा मृत्यु अपघातीच झालेला असल्याचे सिध्द होते.
मयत सिद्धेश्वर यांचे बचत खात्यावर गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे रक्कम रु.10,000/- असल्याचे अर्जदाराचे म्हणणे गैरअर्जदार क्र. 1 यांनी युक्तीवादाच्या वेळी मान्य केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांनी दाखल केलेल्या लेखी जबाबाचे अवलोकन केले असता गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराचा क्लेम गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे आलेला नाही असे सांगितलेले आहे. अर्जदाराने त्याबद्दलचा पुरावा दाखल केलेला नाही. वास्तविक पाहता अर्जदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रानुसार क्लेम फॉर्म गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे देणे क्रमप्राप्त होते. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचा क्लेम फॉर्म गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. परंतु अर्जदाराने क्लेम फॉर्म दाखल केलेला असल्याबद्दलचा पुरावा दिलेला नसल्यामुळे मंच खालील आदेशानुसार निर्देश देत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश पारीत करीत आहे. आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 1 यांनी मयत सिद्धेश्वर यांचे खात्यामध्ये असलेली रक्कम रु.10,000/- अर्जदारास प्रचलित व्याजासह आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावी.
3. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे 8 दिवसाच्या आत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह विमा रक्कम मिळणेसाठी क्लेम फॉर्म दाखल करावा. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचा क्लेम त्वरीत गैरअर्जदार क्र. 2 यांचकडे पाठवावा, गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदाराचा क्लेम प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत गुणवत्तेवर निर्णय घ्यावा.
4. खर्चाबाबत आदेश नाहीत.
5. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात
दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
6. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.