नि.1 खालील आदेश
द्वारा - मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष
1. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून वाहन खरेदीसाठी रक्कम रु. 5,00,000/- इतक्या रकमेचे कर्ज घेतले आहे. सदरचे वाहन त्यांनी उदरनिर्वाहासाठी खरेदी केले होते. सदर वाहनावर त्यांनी श्री अमोल चंदू उर्फ चंद्रकांत पवार यांस ड्रायव्हर म्हणून कामास ठेवले होते. त्याने विश्वासाचा गैरफायदा घेवून वाहनाचे काही पार्टस बदलून दुस-या जुन्या वाहनाचे पार्टस बसविल्याचे दिसले. तदनंतर जाबदार यांनी सदरचे वाहन ओढून नेले. वाहनाच्या पार्टसमध्ये फेरबदल केल्याचे कारणावरुन तक्रारदारांनी ड्रायव्हर व जाबदार यांचेविरुध्द फलटण येथील फौजदारी न्यायालयात फौजदारी खटले दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी जाबदार यांना वकीलामार्फत नोटीस पाठवून वाहन ताब्यात देणेचे व कर्जाची कागदपत्रे देणेची मागणी केली. त्यास जाबदार यांनी नोटीस उत्तर दिले असून त्यामध्ये त्यांनी तक्रारदार यांचे वाहन दि. 24/5/2022 रोजी ऑनलाईन पध्दतीने लिलाव करून विक्री केलेचे तक्रारदारास कळविले आहे. जाबदार यांनी तक्रारदारास लिलावापूर्वी नोटीस दिली नाही. तक्रारदार हे नियमितपणे हप्ते भरणेस तयार होते. परंतु जाबदार यांनी त्यांना कोणतीही सूचना दिली नाही. सबब, जाबदार यांनी केलेला ऑनलाईन लिलाव रद्द व्हावा व तक्रारदाराचे वाहन ताब्यात मिळावे, मानसिक त्रासापोटी रु. 15,000/- मिळावेत, जाबदार यांच्या ताब्यात वाहन असलेच्या कालावधीचे कर्जाचे व्याज माफ व्हावे, तक्रारदाराचे झालेल्या खर्चापोटी रु. 2,50,000/- व अर्जाचा खर्च रु. 10,000/- मिळावेत म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्ठयर्थ शपथपत्र, कागदयादीसोबत तक्रारदाराचे आधारकार्डची प्रत, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, तक्रारदार यांनी जाबदार यांना दिलेली नोटीस, जाबदार यांनी तक्रारदारांना दिलेली उत्तरी नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. सदरकामी जाबदार यांना दाखलपूर्व नोटीसचे आदेश झाले. जाबदार यांनी याकामी हजर होवून आपले म्हणणे दाखल केले. तक्रारदाराने त्याचे मजूरी या व्यवसायासोबत इतर व्यवसायासाठी वाहन खरेदी केल्याचे दिसून येत असलेने तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत. तक्रारदार यांनी सदरचे वाहन हे उदरनिर्वाहासाठी घेतलेले नसून ते त्रयस्थ व्यक्ती श्री अमोल पवार यास चालविण्यासाठी दिले होते. त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेत येत नाही. तक्रारदाराचे कथनानुसार त्याचे ड्रायव्हरने वादातील वाहनाचे काही भाग बदलून ते जुन्या वाहनाचे बसविले होते. यावरून तक्रारदार व त्याचे ड्रायव्हर यांनी जाबदार कंपनीला नुकसान व्हावे म्हणून जुन्या वाहनाचे भाग वादातील वाहनास बसविले असल्याचे निष्पन्न होते. तक्रारदार व त्याचे ड्रायव्हर यांनी बनाव करुन जाबदारविरुध्द फौजदारी खटला दाखल केला आहे. जाबदार हे वादातील वाहन लिलावाद्वारे विक्री करणार असल्याची माहिती तक्रारदारास होती. तक्रारदार हे स्वच्छ हाताने या आयोगासमोर आलेले नाहीत, जाबदार कंपनीकडून घेतलेले कर्ज बुडविण्याच्या उद्देशाने तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रार दाखल करून घेण्यात येवू नये व ती नामंजूर करण्यात यावी अशी मागणी जाबदार यांनी केली आहे.
4. जाबदार यांनी याकामी म्हणण्यासोबत वाहन ताब्यात घेणेपूर्वी पोलिस स्टेशनला कळविल्याबाबतचे पत्र, गाडीच्या इन्व्हेंटरीची यादी, गाडी ताब्यात घेतलेनंतर पोलिस स्टेशनला कळविल्याबाबतचे पत्र, गाडीचा व्हॅल्यूएशन रिपोर्ट, गाडीची विक्रीपूर्व नोटीस, नोटीस परत आलेला लखोटा, गाड़ी विक्री केलेनंतर दिलेली नोटीस व त्याची पोचपावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. सदरकामी उभय पक्षांतर्फे विधिज्ञांचा यांचा दाखलपूर्व युक्तिवाद ऐकला. तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले.
6. तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथन पाहता, तक्रारदाराने वादातील वाहन जाबदारांनी ऑनलाईन लिलावाद्वारे विक्री केलेचे व लिलाव करणेपूर्वी तक्रारदारास जाबदारांनी नोटीस दिली नसल्याचे कथन केले आहे. तथापि जाबदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता जाबदारांनी तक्रारदारास गाडीची विक्री करणेपूर्वी दि.2/05/2022 रोजी दिलेल्या नोटीसची प्रत दाखल केली आहे. सदर नोटीसची इंटीमेशन तक्रारदारास देवूनही तक्रारदारांनी सदरची नोटीस स्वीकारली नसल्याबाबतच्या लखोटयाची प्रत जाबदारांनी दाखल केली आहे. सदरची बाब विचारात घेता, जाबदारांनी तक्रारदारांना विक्रीपूर्व नोटीस दिली होती ही बाब दिसून येते. सदरचे विक्रीपूर्व नोटीसीत जाबदारांनी तक्रारदारास थकीत रक्कम भरण्याबाबत कळविले होते. परंतु तक्रारदारांनी थकीत रक्कम भरण्याबाबत कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. तदनंतर जाबदारांनी तक्रारदारास वाहनाची विक्री केलेनंतरची नोटीस दि. 17/8/2022 रोजी पाठविल्याचे दिसून येते. यावरून तक्रारदारास वाहन विक्री केलेबाबतची माहिती होती ही बाब दिसून येते. तक्रारदाराने जाबदारांकडे कर्जाचे हप्ते नियमित भरल्याबाबत कोणतेही कथन केले नाही अथवा त्याअनुषंगाने कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे थकबाकीदार होते व त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदाराचे वाहन ओढून नेले व त्याची लिलावाद्वारे विक्री केली ही बाब स्पष्ट होते. यामध्ये जाबदार यांनी तक्रारदारास सेवात्रुटी दिली असे म्हणता येणार नाही. तक्रारदाराचे वाहन जाबदारांनी लिलावाद्वारे विक्री केल्यानंतर ते वाहन जाबदारांनी तक्रारदारास परत करण्याचा आदेश या आयोगास करता येणार नाही, सबब, जाबदार यांनी तक्रारदारास सेवेत त्रुटी दिली ही बाब तक्रारदाराने शाबीत केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
7. तक्रारदार हे थकबाकीदार होते व त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदाराचे वाहन ओढून नेले व त्याची लिलावाद्वारे विक्री केली आहे. लिलावाद्वारे वादातील वाहनाची विक्री करणेपूर्वी जाबदारांनी तक्रारदारास विक्रीपूर्व नोटीस दिलेली होती. सदरचे नोटीसीस तक्रारदारांनी कोणताही प्रतिसाद दिल्याचे दिसून येत नाही. तदनंतर वाहनाची विक्री झालेनंतरही जाबदार यांनी तक्रारदारास नोटीस दिली होती. तरीही तक्रारदार यांनी जाबदार यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. सबब, वाहनाची रितसर लिलावाद्वारे विक्री करणेपूर्वी जाबदारांनी तक्रारदारास कर्जाची थकबाकी भरणेसाठी पुरेशी संधी दिली होती ही बाब याकामी स्पष्टपणे दिसून येते. परंतु तक्रारदार यांनी कर्जाची थकबाकी भरणेबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. जाबदारांनी रितसर लिलावाद्वारे वाहनाची विक्री केलेनंतर सदर वाहनाची मालकी हस्तांतरीत झालेली आहे. सदरची बाब विचारात घेता, प्रस्तुतची तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही असे या आयोगाचे मत आहे.
8. तक्रारदारानी सदर वाहनावर त्यांनी श्री अमोल चंदू उर्फ चंद्रकांत पवार यांस ड्रायव्हर म्हणून कामास ठेवले होते. त्याने विश्वासाचा गैरफायदा घेवून वाहनाचे काही पार्टस बदलून दुस-या जुन्या वाहनाचे पार्टस बसविल्याचे दिसले तसेच तक्रारदार यांना ड्रायव्हरकडून कर्जाचे हप्ते थकलेबाबत समजले असे कथन केले आहे. तक्रारदाराचे वरील कथनांचा विचार करता तक्रारदार यांनीच त्यांचे कर्जाचे हप्ते भरलेबाबत निष्काळजीपणा केला असलेची बाब अधोरेखित होते. सबब, तक्रारदार यांचे चुकीबद्दल जाबदार यास जबाबदार धरणे उचित होणार नाही असे या आयोगाचे मत आहे. तसेच तक्रारदार व त्याचा ड्रायव्हर यांचेमधील वाहनाचे पार्ट्स बदलण्याच्या कथित वादाबाबत तक्रारदाराने फौजदारी खटला दाखल केला आहे. सबब, या वादावर निष्कर्ष काढण्याचे अधिकारक्षेत्र या आयोगास नाही असे या आयोगाचे मत आहे.
9. वरील सर्व कारणांचा विचार करता प्रथमदर्शनी जाबदारांचे सेवेत कोणतीही त्रुटी दिसून येत नसलेने प्रस्तुतची तक्रार दाखल करुन घेण्यापूर्वीच फेटाळणेत येत आहे. सबब, खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार दाखल करुन घेण्यापूर्वीच फेटाळण्यात येते.
2. तक्रारदाराने दाखल केलेला तूर्तातूर्त मनाई अर्ज निकाली काढण्यात येतो.
3. खर्चाबाबत आदेश नाहीत.