::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 07.09.2015 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्ता हा विद्यार्थी असून त्याचे खाते क्र. 60095523998 हे विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे बँकेमध्ये आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून वाहन कर्ज घेतले व त्याच्या परतफेडीसाठी विरुध्दपक्ष क्र. 1 ने, तक्रारकर्त्याकडून, विरुध्दपक्ष क्र. 2 या बँकेचे 24 धनादेश घेतले, त्यापैकी 23 धनादेश हे व्यवस्थितरित्या वटविल्या गेले, एक धनादेश क्र. 950238 रक्कम रु. 1990 हा महाराष्ट्र बँक अकोला येथून दि. 5/11/2013 ला वटविल्या गेल्याने पासबुक एंट्रीवरुन दिसून येते. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दि. 5/11/2013 ला सदर धनादेश बँकेत वटविण्यासाठी लावलेलाच नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दि. 18/11/2013 ला सदर चेक वटविण्याकरिता लावला व तो दि. 19/11/2013 ला अनादरित होवून परत आला. या सर्व कारणांसाठी तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष दोन्ही बँकेमध्ये वारंवार जावे लागत असून, त्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील एक वर्षापासून दोन्ही विरुध्दपक्ष तक्रारकर्त्याला मानसिक, आर्थिक त्रास देत आहेत. त्यासंबंधीत तक्रारकर्त्याने दि. 30/3/2015 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 शी पत्रव्यवहार केला त्याची प्रतीलिपी विरुध्दपक्ष क्र. 1 ला दिली. परंतु दोन्ही विरुध्दपक्ष स्वत:चे मतावर ठाम आहेत. अशा प्रकारे विरुध्दपक्षांनी निष्काळजीपणा केलेला आहे, म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर व्हावी व विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास रु. 40,000/- नुकसान भरपाई, तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रु. 40,000/- व्याजासह देण्याचा आदेश व्हावा.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून पुरावा म्हणून तक्रारीसोबत एकुण 6 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 चा लेखी जवाब
2. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जबाब दाखल करुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल केली आहेत व पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने दि. 26/4/2012 रोजी एकूण रु. 37,200/- वाहन कर्ज घेतले असून त्याची परतफेड त्याला दि. 2/6/2012 ते 2/5/2014 या 24 महिन्याच्या कालावधीत, प्रतिमाह रु. 1990/- च्या मासिक हप्त्यात करावयाची होती व त्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना विरुध्दपक्ष क्र. 2 बँकेचे एकूण 24 धनादेश, आपल्या स्वाक्षरीने दिलेले होते. तक्रारकर्त्याने दिलेल्या 24 धनादेशापैकी फक्त 22 धनादेश आदरीत झाले असून, धनादेश क्र. 950223 हा दि. 4/6/2013 रोजी अनादरीत झाला व त्याबाबत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना दंडात्मक रकमेसह मासिक हप्त्याची रक्कम दिलेली आहे. त्यानंतर वादातीत धनादेश क्र. 950238 हा दि. 5/11/2013 रोजी वटविण्याकरिता दिला होता, तो दि. 6/11/2013 रोजी पुरेशी रक्कम नसल्या कारणास्तव अनादरीत झाला. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 यांना तक्रारकर्त्याकडून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम दंडात्मक रक्कम रु. 450/- सह घेण्याचा अधिकार आहे. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास त्याबाबत रितसर मागणी केली. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 बँकेने त्यांच्या सेवेत कुठेही त्रुटी केलेली नाही. तक्रारअर्जात नमुद केल्याप्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याच्या खात्यात पुरेशी रक्कम असतांना, वादातील धनादेश अनादरीत केला असल्याचे सिध्द होत असेल तर, तक्रारकर्त्याला फक्त विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 चा लेखी जवाब
विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर प्रकरणात लेखी जवाब दाखल केला आहे. त्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारीतील बहुतांश बाबी नाकबुल करुन अधिकचे कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 2 चा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याचा चेक क्र. 950238 रु. 1990/- दि. 5/11/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी लावून विरुध्दपक्ष क्र. 2 च्या पुणे सेवा शाखेकडे वटविण्यास लावला असता, त्यांनी तक्रारकर्त्याच्या खात्यातून रु. 1990/- एच.डी.एफ. सी. बँकेला वळते केले. विरुध्दपक्ष क्र. 1 ने दि. 19/11/2013 ला सदर चेक क्र. 950238 रु. 1990/- विरुध्दपक्ष क्र. 2 च्या मुंबई सेवा शाखा कडे वटविण्यास पाठविला, त्या दिवशी खातेदाराचे खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो परत केला असला तरी सदर चेक त्यावेळी दुस-यांदा लावला गेला असल्याचे दिसून येते, जेंव्हा की तो पहील्यांदा वटल्यावर दुस-यांदा लावण्याचा प्रश्नच येत नाही. पुर्वी वटलेला चेक दुस-यांदा लागु शकत नाही, कारण तो चेक मुळ बँकेकडे जमा होई, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे चेक त्रांकेषण प्रणालीने ( Chaque truncation system CTS ) वटविले जातात, यात मुळ चेक खातेदार ज्या बॅकेकडे जमा करतो, त्यांचेकडेच असतो, यालाच इमेज क्लिअरिंग असेही म्हणतात. ही प्रणाली या प्रकरणात वापरण्यात आली आहे. त्यामुळे चेक हा विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे ताब्यात असून विरुध्दपक्ष क्र. 2 मुळ चेक करिता जबाबदार नाहीत. या संदर्भात विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी आपले मुंबई सेवा शाखेकडे दि. 7/3/2015 ला ईमेलद्वारे विचारणा केली असता, यासाठी दि. 5/11/2013 ला चेक विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे सेवा शाखा पुणे यांनी क्लीअर केल्याचे त्यांचे दि. 26/6/2015 चे ईमेलने स्पष्ट होते. विरुध्दपक्ष क्र. 2 च्या संगणकीय रेकॉर्ड मध्ये सदर चेक आला व तो वटून परत गेला असल्याचे संगणकात रेकॉर्ड झाले असून ते खरे आहे. त्यामुळे या प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 ची कोणतीही चुक नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर जवाब हे प्रतिज्ञालेखावर दाखल करुन त्यासोबत संबंधीत दस्तऐवज जोडले.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तांचे अवलोकन करुन व उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकून काढलेल्या मुद्यांचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.
- सदर प्रकरणात दाखल दस्तांवरुन तक्रारकर्ता, विरुध्दपक्ष क्र. 2 या बँकेचा खातेधारक असल्याने व तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडून वाहनासाठी कर्ज घेऊन, विहीत मुदतीत ठराविक हप्ता भरुन सव्याज फेडण्याचे कबुल करुन, व विरुध्दपक्ष क्र. 1 च्या अटी शर्ती मान्य करुन करार केला असल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा “ग्राहक” असल्याचे सिध्द होत आहे, त्यामुळे तका्रकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा “ग्राहक” असल्याचे ग्राह्य धरण्यात येत आहे.
- तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडून घेतलेल्या वाहनाच्या कर्जाच्या परतफेडीपोटी विरुध्दपक्ष क्र. 2 या बँकेचे 24 धनादेश विरुध्दपक्ष क्र. 1 ला दिले होते. त्यापैकी 23 धनादेश व्यवस्थीत वटले. परंतु धनादेश क्र. 950238 रु. 1990/- चा धनादेश हा विरुध्दपक्ष क्र. 2, या बँकेतून दि. 5/11/2013 रोजी वटवला गेल्याचे पासबुक एंट्रीवरुन दिसून येते. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे म्हणण्यानुसार त्यांनी दि. 5/11/2013 रोजी सदर धनादेश वटवण्यासाठी लावलेलाच नाही. त्यांनी तो चेक दि. 18/11/2013 रोजी वटवण्यासाठी लावला व सदर चेक दि. 19/11/2013 रोजी अनादरीत होऊन परत आला. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडे वारंवार जाऊनही त्यांनी तक्रारकर्त्याला कुठलाच खुलासा न केल्याने तक्रारकर्त्याचे शैक्षणीक व शारीरिक, आर्थिक, मानसिक नुकसान होत असल्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला रु. 40,000/- द.सा.द.शे 12 टक्के व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे आदेश मंचाने करावेत, अशी विनंती तक्रारकर्त्याने केली आहे.
- यावर विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांच्या जबाबात असे नमुद केले आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 ने सदरचा चेक दि. 5/11/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 च्या पुणे सेवा शाखेकडे वटवण्यास लावला असता, सदर पुणे शाखेने रु. 1990/- तक्रारकर्त्याच्या खात्यातून विरुध्दपक्ष क्र. 1 ला वळते केले. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 ने सदरचा धनादेश पुन्हा दि. 19/11/2013 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 च्या मुंबई सेवा शाखा, मुंबई यांचेकडे वटवण्यासाठी लावला असता, तक्रारकर्त्याच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने, सदर धनादेश अनादरीत होऊन परत केला गेला. सदर धनादेश पहील्यांदा वटल्यावर दुस-यांदा लावण्याचा प्रश्नच येत नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 च्या संगणकीय रेकॉर्डमध्ये सदर चेक आला व तो वटून परत गेला असल्याचे संगणकात रेकॉर्ड झाले आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी कुठलीही त्रुटी केलेली नाही व सदर तक्रार गैरसमजुतीने दाखल करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
- यानंतर, विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांच्या जबाबासोबत दस्तही दाखल करुन त्याच दस्तांचा आधार घेऊन युक्तीवादही केला. विरुध्दपक्ष क्र. 1 च्या जबाबावरुन व दाखल केलेल्या दस्तातील दस्त क्र. 1 वरुन संपुर्ण घटनाक्रमाचा खुलासा मंचाला झालेला आहे.
विरुध्दपक्ष क्र. 1 च्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याचे 24 पैकी 22 धनादेश वटल्या गेले आहेत. वादातील धनादेशाशिवाय धनादेश क्र. 950223 हा सुध्दा दि. 4/6/2013 रोजी अनादरीत झाला असून, त्याबाबत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 यांना दंडात्मक रकमेसह मासिक हप्त्यांची रक्कम दिलेली आहे. या संबंधी वाद नाही. परंतु वादातील धनादेश क्र. 950238 हा दि. 5/11/2013 रोजी वटवण्याकरिता दिला असता तो दि. 6/11/2013 रोजी संबंधीत बँक ऑफ महाराष्ट्र कडून खात्यात पुरेशी रक्कम नसल्या कारणाने अनादरीत झाला. म्हणून विरुध्दपक्ष क्र. 1 तक्रारकर्त्याकडून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम रु. 450/- इतक्या दंडासह घेण्यास कायदेशिररित्या पात्र आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारकर्त्याला सेवा देण्यात कुठलीही त्रुटी केलेली नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 ने सदर चेक मुंबई शाखेकडे पुन्हा वटवण्यासाठी लावला होता, या विरुध्दपक्ष क्र. 2 च्या म्हणण्यावर विरुध्दपक्ष क्र 1 ने पुर्णपणे मौन बाळगलेले दिसून येते.
विरुध्दपक्ष क्र. 1 ने जबाबासोबत दाखल दस्त क्र. 1 वरील दि. 16/5/2015 च्या ई-मेलचे अवलोकन मंचाने केले. सदरचा ई-मेल विरुध्दपक्ष क्र. 2 च्या पुणे शाखेतील कर्मचा-याने विरुध्दपक्ष क्र. 1 ला पाठवलेला असल्याचे दिसून येते. सदर ई-मेल मंचात तक्रारकर्त्याने प्रकरण दाखल केल्यानंतर जवळपास एक महिन्याने पाठवलेला आहे. सदर ई-मेल मधील मजकुर येणे प्रमाणे
Subject : RE: Instrument number -95238 Rs.1990-Consumer Forum Case – Very very Urgent
Dear Sir
On the above subject we have investigate the entry position On the same day we have returned the cheque inadvertently and same day customer A/C have been debited. This amount is lying in our suspense a/c. Now we are ready to make the payment to your bank. Please inform us.
This is mistake happened inadvertently. Therefore we are deeply regretted for the inconvenience of the customer.
वरील ई-मेल वाचला असता, विरुध्दपक्ष क्र. 2 ला त्याने केलेल्या हलगर्जीपणाची जाणीव होती, परंतु तक्रारकर्ता जेंव्हा वारंवार विरुध्दपक्ष क्र. 2 कडे जात होता, त्यावेळी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी कुठलाच खुसाला तक्रारकर्त्याला केलेला नाही. विशेष म्हणजे या ई-मेल चा उल्लेखही त्यांनी त्यांच्या जबाबात केला नाही व ही बाब मंचापासून लपवून ठेवली व संपुर्ण जवाबदारी विरुध्दपक्ष क्र. 1 वर ढकलून दिली. तसेच जबाबात सदर तक्रार गैरसमजुतीने दाखल करण्यात आल्याचेही म्हटले आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांच्या युक्तीवादात तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 च्या पुणे शाखेला पक्ष केले नसल्याने योग्य त्या पक्षा अभावी सदर तक्रार खारीज करण्यात यावी, अशी मागणी केली. परंतु संपुर्ण प्रकरणाचा अभ्यास केला असता, मंच या निष्कर्षाप्रत आले आहे की, विरुध्दपक्ष क्र. 2 महाराष्ट्र बँक, अकोट या शाखेचा तक्रारकर्ता ग्राहक होता, तसेच सदर विरुध्दपक्ष क्र. 2 चे कोरे चेक त्याने कर्ज फेडीच्या हप्त्यापोटी विरुध्दपक्ष क्र. 1 ला दिले होते. त्यामुळे तक्रारकर्त्याचे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्याशी ग्राहक व सेवा देणारा, असे नाते होते. विरुध्दपक्ष क्र. 2 च्या पुणे शाखेशी झालेला विरुध्दपक्ष क्र. चा व्यवहार हा त्या उभयतांमधला अंतर्गत व्यवहार होता व या व्यवहाराची तक्रारकर्त्याला कोणतीही माहीती नव्हती. विरुध्दपक्ष क्र. 2 च्या पुणे शाखेचा संबंध सदर प्रकरण दाखल झाल्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 ने जबाबासोबत जे दस्त मंचात दाखल केले, त्यावेळी मंचासमोर आला, व याची माहीतीही तक्रारकर्त्याला त्याच वेळी म्हणजे दि. 10/8/2015 रोजी मंचात दस्त दाखल केल्याच्या दिवशी झाल्याचे मंचाच्या निदर्शनास येते. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या पुणे शाखेला पक्ष करणे आवश्यक होते, हा विरुध्दपक्ष क्र. 2 यांचा आक्षेप ग्राह्य धरता येणार नाही. वरील सर्व घटनाक्रमावरुन जरी विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या पुणे शाखेकडून व्यवहारात हलगर्जीपणा झाला असला तरी सदर शाखा विरुध्दपक्ष क्र. 2 यांची असून तक्रारकर्त्याने सर्व व्यवहार विरुध्दपक्ष क्र. 2 शीच केला असल्याने, विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांच्या सेवेत त्रुटी केली असल्याचे निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 च्या पुणे शाखेकडून झालेल्या चुकीची कोणतीही माहीती विरुध्दपक्ष क्र. 2 ने आजपावेतो तक्रारकर्त्याला दिलेली नाही व मंचापासून ही बाब लपवून ठेवली, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी त्यांच्या सेवेत त्रुटी केली असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 च्या पुणे शाखेत दि. 5/11/2013 रोजी तक्रारकर्त्याचा चेक वटवण्यसाठी लावला असता तो दि. 6/11/2013 रोजी अनादरीत होऊन परत आला, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याकडून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम, दंडात्मक रक्कम रु. 450/- सह घेतली. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 ची सदरची कृती त्यांच्या अटी शर्ती नुसारच केलेली असल्याने सदरची कृती मुळे तक्रारकर्त्याला दिलेल्या सेवेत त्रुटी झाली, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 या बँकेने तक्रारकर्त्याला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली नसल्याने त्यांना या प्रकरणात दोषी धरता येणार नाही.
सबब विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या पुणे शाखेने दि. 6/5/2015 रोजी पाठविलेल्या ई-मेलनुसार, तक्रारकर्त्याचे रु. 1990/- आज रोजीही त्यांचे कडेच ‘ Suspense a/c’ ला असल्याचे दिसून येत असल्याने व विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्या हलगर्जीपणामुळे तक्रारकर्त्याचा धनादेश अनादरीत होऊन विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याकडून रु. 450/- इतका दंड वसुल केलेला असल्याने, तक्रारकर्ता या रकमेसह विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी संपुर्ण नुकसान भरपाईपोटी रु. 7000/- तक्रारकर्त्याला देण्याचे आदेश सदर मंच देत आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे……
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) विरुध्दपक्ष क्र. 2, बँक ऑफ महाराष्ट्र अकोट, जि. अकोला यांनी तक्रारकर्त्याला, संपुर्ण नुकसान भरपाईपोटी रु. 7000/-(रुपये सात हजार ) द्यावेत.
3) उपरोक्त आदेशाचे पालन, निकालपत्राची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे, अन्यथा उपरोक्त रकमेवर आदेश तारखेपासून प्रत्यक्ष अदाईपर्यंत द.सा.द.शे. 8 टक्के दराने व्याजासह रक्कम देण्यास विरुध्दपक्ष क्र. 2 पात्र ठरतील.
4) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.