निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून गैरअर्जदार क्र. 2 सोनी कंपनीचे एक मनगटी घडयाळ मॉडेल क्रमांक एमएन-2 हे रक्कम रु.6800/- ला गैरअर्जदार क्र. 1 कडून खरेदी केले. सदरील घडयाळयाची एक वर्षाची वारंटी आहे असे सांगितले. अर्जदाराने घडयाळ वापरण्यास सुरुवात केल्यानंतर व्यवस्थित चालत नव्हते व वारंवार बंद पडत होते. त्यामुळे अर्जदार त्रस्त झाल्या व गैरअर्जदार क्र. 3 कडे सदरील घडयाळ दुरुस्तीसाठी दिले. गैरअर्जदार क्र. 3 यांनी घडयाळ दुरुस्तीसाठी ठेवून घेतले व अर्जदारास त्याबाबत पावती दिली. तसेच 15दिवसानंतर येण्यास सांगितले. 15 दिवसानंतर अर्जदार ही गैरअर्जदार क्र. 3 सर्व्हीस सेंटरकडे जाऊन घडयाळ बाबत विचारणा केली असता गैरअर्जदार क्र. 3 यांनी आणखी काही दिवस लागतील जेव्हा आम्हाला सोनी कंपनीतर्फे घडयाळ किंवा त्याबाबत माहिती प्राप्त होईल तेव्हा कळविले जाईल असे सांगितले. त्यानंतर गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास फोन करुन कळविले की, घडयाळ चालू होत नाही, त्यात डिफेक्ट आहे,त्यामुळे त्याऐवजी तुम्हाला नवीन घडयाळ खरेदी करावे लागेल. सदरील घडयाळाचे मॉडेल कंपनीमार्फत बंद करण्यात आले आहे सदरील मॉडेलप्रमाणेच आणखी एक मॉडेल आहे, जो रु.13,800/- ला असून तो तुम्हास खरेदी करावा लागेल आणि त्याची अधिकची किंमत रक्कम रु.7,000/- आपणास द्यावी लागेल. गैरअर्जदार क्र. 2, सोनी कंपनी विविध उत्पादने निर्माण करणारी कंपनी असून सदरील घडयाळातील दोष यंत्र निर्माता यांच्या निर्माणामधील दोषपूर्ण कामाचा नमूना आहे. गैरअर्जदार क्र. 2 हा सदरील घडयाळ अर्जदारास बदलवून देणेस जबाबदार आहे. परंतु गैरअर्जदार यांनी सदरील घडयाळ बदलवून दिलेले नाही. त्यामुळे अर्जदारास मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे. म्हणून अर्जदार ही न्याय मिळणेसाठी मंचासमोर आलेली आहे. अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांचेकडून सोनी कंपनीचे निकृष्ट दर्जाचे मनगटी घडयाळ मॉडेल क्रमांक एमएन-2 पुरविल्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदरील घडयाळाची किंमत रक्कम रु.6800/- दिनांक 01.11.2014 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश द्यावेत किंवा अर्जदाराकडून कोणतीही अधिकची रक्कम न घेता सदरील घडयाळ बदलवून देण्याचा आदेश द्यावा. तसेच अर्जदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.15,000/- व दावा खर्च रक्कम रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश पारीत करावा अशी विनंती अर्जदार यांनी तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 3 बालाजी इंटरप्रायजेस अधिरकृत सर्व्हीस सेंटर हे तक्रारीमध्ये हजर झाले व त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांना अर्जदाराचे हक्कात चेक क्रमांक 738396 रक्कम रु.6800/- कंपनीतर्फे गैरअर्जदार क्र. 3 यांचकडे वर्ग करण्यात आलेला असून सदरील प्रकरण लोक अदालतीमध्ये ठेवण्यात यावे अशी पुरसीस दिली, त्यानंतर प्रकरण लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आले. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदरील धनादेश दिलेला नाही.. लोक न्यायालयानंतर प्रकरणामध्ये दिनांक 29.04.2015, 18.05.2015 व दिनांक 23.06.2015 इत्यादी तारखा ठेवण्यात आल्या. वरील नमुद तारखेस गैरअर्जदार क्र. 1 ते 3 हजर राहिलेले नाही. त्यामुळे अर्जदाराचा युक्तीवाद ऐकला. अर्जदाराने दिनांक 23.06.2015 रोजी अर्जदारास गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जामध्ये नमुद केलेला धनादेश मिळालेला नसल्याबाबत अर्ज दिला. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून गैरअर्जदार क्र. 2 उत्पादीत केलेले मनगटी घडयाळ मॉडेल क्रमांक एमएन-2 दिनांक 01.11.2014 रोजी खरेदी केलेले असल्याचे पावतीवरुन सिध्द होते. सदरील घडयाळ नादुरुस्त झाल्याने गैरअर्जदार क्र. 3 सोनी कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटरकडे दिनांक 29.04.2013 रोजी अर्जदाराने दुरुस्तीसाठी दिले. सदरील पावतीचे अवलोकन केले असता घडयाळामध्ये ‘’ नो पावर ऑन’’ हा दोष असल्याचे दिसते. यावरुन अर्जदाराचे घडयाळ नादुरुस्त असल्याचे दिसते. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास सदरील घडयाळ दुरुस्त करुन दिलेले नाही किंवा त्याची किंमत परत केलेली नसल्यामुळे अर्जदाराने तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार दाखल झाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 3 यांनी उत्पादक कंपनी सोनी कंपनी म्हणजेच गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास घडयाळाची किंमत रक्कम रु.6800/- चा धनादेश पाठविलेला असल्याचे अर्जाव्दारे सांगितले व धनादेशाची ई-मेलव्दारे आलेली प्रत दाखल केलेली आहे. यावरुन गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास घडयाळ सदोष असल्याने अर्जदारास घडयाळाची किंमत परत करण्याची जबाबदारी स्विकारलेली असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे प्रकरणामध्ये नोटीस प्राप्त होऊनही हजर झालेले नाहीत. त्यामुळे अर्जदाराचे तक्रारीतील कथन त्यांना मान्य असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास सदोष घडयाळ देऊन अर्जदाराने तक्रार दाखल केल्यानंतरही अर्जदारास घडयाळाची किंमत परत केलेली नाही यावरुन गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास सदोष घडयाळाची किंमत रक्कम रु.6800/- घडयाळ खरेदी केल्याची तारीख दिनांक 01.11.2014 पासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह आदेश तारखेपासून 30 दिवसाची आत द्यावेत.
3. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.2,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाची आत द्यावेत.
4. गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास तक्रारीचा खर्च रक्कम रु.1,000/- द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.