जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/158 प्रकरण दाखल तारीख - 28/05/2010 प्रकरण निकाल तारीख – 15/11/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.संजय पि. केरबा कानोले, वय वर्षे 23, धंदा व्यवसाय व शेती, रा.नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. गुरुप्रसाद एन्टरप्राईजेस, जिजामाता हॉस्पीटच्या बाजूस, गैरअर्जदार चिखलवाडी रोड नांदेड. तर्फे प्रो.प्रा.मनोजकुमार मामडे, वय वर्षे धंदा व्यवसाय सध्या रा.गुरुकृपा गिप्ट अण्ड नॉव्हेटी, शॉप नं.71 तारासिंह मार्केट, नांदेड 2. मायक्रोमॅक्स इन्फॉमेटीक्स लि, 9/52/1 किर्तीनगर इंडस्ट्रीयल एरिया, नवी दिल्ली. 3. कल्पतरु सर्व्हीसेस, आनंद नगर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.अनुप बी पांडे. गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड. ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदार क्र 2 तर्फे वकील - अड.बी.एस.शिंदे गैरअर्जदार क्र. 3 - स्वतः निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) 1. अर्जदार संजय पि. केरबा कानोले यांनी गैरअर्जदाराच्या तथाकथित सेवेतील त्रुटीबद्यल ही फिर्याद ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 प्रमाणे दाखल केलेली आहे. अर्जदाराचे थोडक्यात कथन खालील प्रमाणे. 2. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन दि.30/06/2009 रोजी मायेक्रोमॅक्स कंपनीचा मॉडेल क्र. एक्स – 250 आयएम एआय नं.910001050330874 सिरीयल क्र.एक्स- 250 जी 5903087 चा मोबाईल किंमत रु.3,740/- मध्ये विकत घेतला. त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 गुरुप्रसाद इंटरप्राईजेस यांनी त्यांना रितसर पावती दिली, जी अर्जासोबत जोडली आहे. अर्जदाराचे म्हणणे असे की, मोबाईल खरेदी केल्यानंतर काही दिवस तो व्यवस्थीत चालु होता पण काही दिवसांनी अचानक तो बंद पडला व चालुच होत नव्हता. सदर मोबाईल वॉरंटी काळात अचानक बंद पडला. 3. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, ते गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे मोबाईल घेऊन गेले व तो दुरुस्त करुन देण्याची विनंती केली. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तो मोबाईल दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन देऊन मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतला पण काही दिवसांनी तो मोबाईल दुरुस्त न करताच सदर मोबाईल अर्जदारास परत केला. अर्जदाराने तो दोन दिवस वापरुन पाहीला व त्रुटी दुर झाली नसल्याबद्यल त्याची खात्री झाल्याने त्यांनी परत तो मोबाईल दि.09/09/2009 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांना फेर दुरुस्तीसाठी दिला. गैरअर्जदार क्र. 1 यांनी वॉरंटी कार्ड स्वतःकडे ठेवून घेतला व अर्जदारास त्याबाबत डी.ओ.ए. प्रमाणपत्र दिले जे अर्जासोबत जोडले आहे. 4. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, त्यानंतर वेळोवेळी त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना विचारणा केली असता, गैरअर्जदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्यांचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय बंद करुन दुसरा व्यवसाय गुरुकृपा इन्टरप्राईजेस या नांवाने सुरु केला. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांच्याशी संपर्क साधुन सदर मोबाईल देण्याबाबत अथवा मोबाईलमधील त्रुटी दुरुस्त होत नसल्यास त्या ऐवजी तेवढयाच किंमतीचे नवीन मोबाईल देण्याबाबत अथवा त्या मोबाईलची किंमत परत करण्याबाबत वेळोवेळी विनंती केली पण गैरअर्जदार क्र. 1 यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर दि.30/04/2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांनी मोबाईल दुरुस्त करुन देण्यास अथवा त्याची किंमत देण्यास स्पष्ट नकार दिला व न्यायालयात कार्यवाही करण्याची धमकी दिली. म्हणुन अर्जदारास विक्रेता गैरअर्जदार क्र. 1 व उत्पादक गैरअर्जदार क्र.2 यांच्या विरुध्द ही फिर्याद देणे भाग पडले. अर्जदाराची विनंती आहे की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्याकडुन मोबाईलची किंमत रु.4,000/- व मानसिक त्रासाबद्यल रु.50,000/- , दाव्याचा खर्च रु.5,000/- असे एकुण रु.59,000/- त्यावर 12 टक्के व्याजासह मिळावे म्हणुन ही फिर्याद दाखल केली. 5. सुरुवातीला अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या विरोधात फिर्याद दिली होती परंतु गैरअर्जदार क्र. 1 चे म्हणणे नि.8 आल्यानंतर त्यांनी गैरअर्जदार क्र. 3 यांना यामध्ये शेरीक केले आहे. 6. गैरअर्जदार क्र. 1 हे वकीला मार्फत हजर झाले व त्यांनी आपले म्हणणे नि.8 वर दाखल केले. सदरील मोबाईल अर्जदारास दि.30/06/2009 रोजी रु.3,740/- ला विकल्याचे ते मान्य करतात परंतु गैरअर्जदार क्र. 1 ने ते मोबाईल दुरुस्तीसाठी ठेवून घेतला व त्यानंतर दोन दिवसांनी तो परत केला हे त्यांना मान्य नाही, याउलट गैरअर्जदार क्र.1 चे म्हणणे असे की, त्यांनी अर्जदारास स्पष्ट सांगीतले की, ते फक्त मोबाईलची विक्री करतात पण दुरुस्ती करत नाहीत, त्यांचे म्हणणे असे आहे की, उत्पादीत कंपनीने मोबाईल दुरुस्तीसाठी अधिकृत सर्व्हीस सेंटर उपलब्ध करुन दिलेले आहे व जर वॉरंटी कालावधीमध्ये मोबाईल खराब झाला असेल तर ती जबाबदारी कंपनीची असुन ग्राहकानी तो मोबाईल कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटरवर जाऊन दुरुस्त करुन घ्यावा ( या ठिकाणी गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदरील सर्व्हीस सेंटरचे नांव देण्याचे टाळले व ती जागा रिकामी ठेवली.?) गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, त्यानंतर अर्जदार हे त्यांचेकडे कधीच परत आले नाहीत. त्यामुळे दि.09/09/2009 रोजी त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना मोबाईल फेरदुरुस्तीसाठी देण्याचा प्रश्नच येत नाही. गैरअर्जदार क्र.1 चे असेही म्हणणे आहे की, त्यांचा सदरील मोबाईल दुरुस्तीशी अर्थाअर्थी कसलाही संबंध येत नाही. असे असतांना देखील अर्जदाराने त्यांच्या विरुध्द ही खोटी तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी मोबाईल दुरुस्त करुन देतो वैगरे विधान कधीच केले नाही व मोबाईल दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी त्यांची नाहीच. 7. गैरअर्जदार क्र. 1 यांचे असेही म्हणणे आहे की, जेंव्हा अर्जदार हे त्यांचेकडे मोबाईल घेऊन आले त्याच वेळेस त्यांनी अर्जदारांना स्पष्ट सांगीतले की, तुम्ही सदरील कल्पतरु सर्व्हीस सेंटरकडे जाऊन मोबाईल दुरुस्ती करुन घ्या तसे न करता त्यांनी ही खोटी फिर्याद दिली आहे. गैरअर्जदार क्र.1 चे असेही म्हणणे आहे की, ते आजही अर्जदाराचे गैरअर्जदार क्र.2 कंपनीशी संपर्क करुन अर्जदारास सहकार्य करण्यास तयार आहेत पण अर्जदाराने खोटया पध्दतीने ही फिर्याद दाखल केल्यामुळे ती खारीज करुन त्यांना रु.10,000/- दंड लावण्यात यावे.? 8. गैरअर्जदार क्र. 2 उत्पादीत कंपनी हे उशिराने वकीला मार्फत हजर झाले व आपले म्हणणे नि.नं.25 वर दाखल केले. त्यांच्या मते अर्जदाराचा संपुर्ण अर्ज हा चुकीचाच नसुन बेकायदेशीर देखील आहे, त्यांचे मते फिर्यादीला गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडुन कोणतीही नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही. अर्जदाराकडे हॅण्डसेटमध्ये बिघाड झाले हे सिध्द करण्यासाठी कोणतेही कागदोत्री पुरावे नाहीत ? गैरअर्जदार क्र. 2 चे असे ही म्हणणे आहे की, सदरील मोबाईल गैरअर्जदारांनी त्यांच्या दुरुस्तीचे केंद्रावर कोणताही मोबदला न घेता दुरुस्त करुन दिलेले आहे? गैरअर्जदार क्र. 2 च्या मते अर्जदार हा स्वच्छ हाताने न्यायमंचा समोर आलेले नाहीत व त्यांनी मोबाईलमध्ये नक्की कोणता बिघाड आहे व हा बिघाड कशामुळे झाले हेही सांगीतलेले नाही. त्यांचे शेवटी असेही म्हणणे आहे की, त्यांनी त्यांचे सर्व्हीस सेंटरकडुन वॉरंटी कालावधीमध्ये सदरील मोबाईल दुरुस्त करुन दिलेले असल्यामुळे सदरील फिर्याद दंडासहीत खारीज करावी.? 9. गैरअर्जदार क्र. 3 यांनी त्यांचे म्हणणे नि.नं.22 वर दिले आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार हा सदरील मोबाईल घेऊन त्यांचेकडे दुरुस्तीसाठी आला होता व केवळ याच कारणांमुळे त्यांना या केसमध्ये गोवले आहे. तथापी संपुर्ण फिर्यादीमध्ये गैरअर्जदार क्र. 3 च्या विरुध्द अर्जदाराने कसलाही आक्षेप किंवा उजर किंवा चुकीची सेवा दिल्यासंबंधी तक्रार केली नाही त्यामुळे ती तक्रार खारीज करणे आवश्यक आहे. 10. गैरअर्जदार क्र. 3 चे असेही म्हणणे आहे की, जेंव्हा अर्जदार हा त्यांचेकडे मोबाईल दुरुस्ती करुन घेण्यासाठी आला होता त्या वेळेस गैरअर्जदार क्र. 3 यांनी मोबाईलची तपासणी केल्यानंतर तो मोबाईल दुरुस्त होऊच शकत नाही, असे म्हणुन अर्जदारांना डीओए प्रमाणपत्र दिलेले आहे. सदरील डीओए प्रमाणपत्र देऊन सदरचा मोबाईल बदलुन घेण्याबद्यल त्यांना सुचना करण्यात आली होती. त्यानंतर त्या मोबाईलचे काय झाले याबद्यलची कसलीही कल्पना गैरअर्जदार क्र. 3 यांना नाही. त्यांच्या मते डीओए प्रमाणपत्र हे नियमाप्रमाणे अर्जदार यांनाच देत असतात व तसे डिओए प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अर्जदारांनी सदरील नादुरुस्त मोबाईल व डीओए प्रमाणपत्र हे कंपनीच्या कुठल्याही अधिकृत डिलरकडे जाऊन तो मोबाईल बदलून घेऊ शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे डीओए प्रमाणपत्राचा अर्थच मुळात असा आहे की, तो मोबाईल दुरुस्त होत नसल्यामुळे त्या प्रमाणपत्रानुसार मोबाईल बदली करुन मिळतो. अशा प्रकारे गैरअर्जदार क्र. 3 ने डीओए प्रमाणपत्र अर्जदारास दिल्यामुळे आता त्यांच्यावर कसलीही जबाबदारी येत नाही. त्यांचे काम फक्त वॉरंटी काळात आलेले नादुरुस्त मोबाईल दुरुस्त करुन देणे व तो दुरुस्त होत नसेल तर डीओए प्रमाणपत्र देणे एवढेच आहे. त्यामुळे त्यांनी ही सदरील तक्रार दंडासहीत खारीज करावी असे नमुद केले आहे. 11. अर्जदार यांनी अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे यादी नि.4 सोबत अर्जदाराने मोबाईल गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडुन खरेदी केल्याबद्यलची पावतीची प्रत व गैरअर्जदार क्र. 3 यांनी दिलेले डीओए प्रमाणपत्राची प्रत दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्यांचे शपथपत्र नि.नं.9 वर दिले आहे. त्याचप्रमाणे गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी, शपथपत्र क्रमशः नि.नं.26,23 वर दिलेले आहे. 12. दोन्ही पक्षकारांनी दिलेले कागदपत्र तपासुन पहाता व दोन्ही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून जे मुद्ये उपस्थित होतात ते मुद्ये, त्यावरील सकारण उत्तर खालील प्रमाणे. 13. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार गैरअजदारांच्या सेवेतील तथाकथीत त्रुटी सिध्द करतात काय? गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या विरुध्दच फक्त सिध्द होते. 2. अर्जदार गैरअर्जदाराकडुन सदरील मोबाईल बदलून घेणेस किंव त्याची किंमत वसुल करण्यास पात्र आहेत काय? गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडुनच मोबाईल किंवा त्याची किंमत मिळण्यास पात्र आहेत. 3. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. 14. मुद्या क्र. 1 व 2 – हे दोन्ही मुद्ये एकमेकास पुरक असल्यामुळे त्यांचा एकत्रितरित्या विचार करण्यात येत आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 कंपनीचा सदरील मोबाईल फिर्यादीस दि.30/06/2009 रोजी रु.3,740/- रुपयास विकल्याचे व त्याप्रमाणे त्यांना पावती दिल्याचे कबुल करतात. त्याचप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 हे असेही कबुल करतात की, त्यानंतर फिर्यादी हा त्यांचेकडे सदरील नादुरुस्त मोबाईल घेऊन आला होता, याचा अर्थच स्पष्ट आहे की, सदरील मोबाईल विकल्यानंतर वॉरंटी काळात तो नादुरुस्त झाला होता व त्याप्रमाणे फिर्यादी हा विक्रेत्याकडे म्हणजे गैरअर्जदार क्र. 1 कडे तक्रार घेऊन आला होता. गैरअर्जदार क्र. 1 च्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे काम फक्त मोबाईल विकण्याचा आहे पण दुरुस्तीचे नाही. त्यांच्या मते उत्पादीत कंपनीचे अधीकृत सर्व्हीस सेंटर कल्पतरु सर्व्हीस सेंटर आहे. त्यामुळे त्यांनी फिर्यादीला त्यांचेकडे जाण्यास सांगीतले होते. गैरअर्जदार क्र. 3 चे म्हणणे की, फिर्यादी त्यांचेकडे सदरचा नादुरुस्त मोबाईल घेऊन आला होता व गैरअर्जदार क्र.3 ने ते तपासुन पाहीले व त्यानंतर त्यांनी फिर्यादीस डीओए प्रमाणपत्र देऊन तो मोबाईल दुरुस्त होत नाही असे सांगीतले होते. गैरअर्जदार क्र. 3 चे असे ही म्हणणे आहे की, डीओए चा अर्थच मुळात असा आहे की, तो मोबाईल दुरुस्त होऊ शकत नाही म्हणुन अर्जदार हा सदरील डीओए प्रमाणपत्र व नादुरुस्त मोबाईल कोणत्याही अधिकृत विक्रेताकडे जाऊन त्या बदल्यात नविन मोबाईल बदलून घेऊ शकतात, हे जर खरे असेल तर जेंव्हा अर्जदाराला गैरअर्जदार क्र. 3 कडुन डीओए प्रमाणपत्र मिळाले होते त्याप्रमाणे तो नक्की मोबाईल विक्रेता गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे जाऊन मोबाईल बदलून देण्याची विनंती केली असणार. गैरअर्जदार क्र. 3 च्या मते कोणत्याही अधिकृत विक्रेता सदरील डीओए प्रमाणपत्र पाहून तो मोबाईल बदलून देऊ शकतात, असे जर असेल तर गैरअर्जदार क्र. 1 यांची जबाबदारी होती की, त्यांनी तो मोबाईल ताबडतोब बदलून द्यावयास पाहीजे होते. फिर्यादीचे म्हणणे असे की, असे न करता त्यांनी टाळाटाळच करीत राहीले. म्हणुन त्यांची सेवेतील त्रुटी सिध्द होते. 15. गैरअर्जदार क्र.2 हे नामांकित कंपनी आहे, असे असतांना देखील त्यांनी त्यांचे जबाब नि.25 मध्ये उडवा उडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे.? एकदा म्हणतात तो मोबाईल नादुरुस्त झालेला नव्हता व एका ठिकाणी म्हणतात की, वॉरंटी कालावधीमध्येच तो मोबाईल दुरुस्त करुन देण्यात आला होता.? आपल्या जबाबामध्ये ही गोष्ट त्यांनी दोन वेळेला कथन केले जे की, त्यांचे जबाबामधील परिच्छद क्र. 5 व 15 मध्ये हे आहे. जर मोबाईलच नादुरुस्त झाले नसेल तर तो दुरुस्त करण्याचा प्रश्नच येत नाही. गैरअर्जदार क्र. 2 कंपनीने दोन वेळेस आपल्या जबाबात नमुद केलेले आहे की, त्यांचे दुरुस्तीचे केंद्रावरुन तो मोबाईल कसलाही मोबदला न घेता दुरुस्त करुन दिलेला आहे.? याउलट गैरअर्जदार क्र. 3, जे की मोबाईल दुरुस्त करणारे आहे, त्यांनी आपल्या जबाबामध्ये स्पष्टपणे सांगीतले आहे की, तो मोबाईल दुरुस्तीच्या परिस्थितीमध्ये नव्हता त्यामुळे त्यांनी तथाकथीत ग्राहकास डीओए प्रमाणपत्र दिले. याचा अर्थ असा की, तो मोबाईल दुरुस्त होऊ शकत नव्हता व डीओए प्रमाणपत्र पाहून तो बदलून देण्याची जबाबदारी कोणत्याही अधिकृत विक्रेत्यावर होती. यावरुन एकच सिध्द होते की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी त्यांची जबाबदारी सांभाळलेली नाही. गैरअर्जदार क्र. 3 यांचा यामध्ये कसलाही कसुर नाही हे कागदपत्रावरुन सिध्द होते. फिर्यादीने देखील त्यांच्या विरुध्द त्रुटीबद्यल एकही शब्द उदगारला नाही. जेंव्हा गैरअर्जदार नं. 3 स्पष्ट म्हणतात कि तो मोबाईल दुरुस्तच होऊ शकत नव्हता तेंव्हा गैरअर्जदार नं. 2 चे म्हणणे कि तो मोबाईल वॉरंटी पिरेड मध्येच विना मोबदला दुरुस्त करुन दिला हे धादांत खोटे आहे.? 16. अर्जदाराचे म्हणणे ऐकून व त्यांचे शपथपत्र व कागदपत्र बघून व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे विसंगतीपुर्ण म्हणणे व शपथपत्र पाहून असे दिसते की, तो मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये नादुरुस्त झालेला असतांना देखील व गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास डीओए प्रमाणपत्र दिलेले असतांना देखील गैरअर्जदार क्र. 1 यांनी तो मोबाईल बदलून दिलेला नाही व असे करुन त्यांनी सेवेत त्रुटी केली आहे व त्या त्रुटीस गैरअर्जदार क्र. 2 सुध्दा भागीदार आहेत, असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांची कायदेशिर व नैतीक जबाबदारी आहे की, त्यांनी ताबडतोब फिर्यादीला नवीन मोबाईल द्यावा किंवा त्याची किंमत रु.3,740/- परत द्यावी व त्यावर फिर्याद दाखल केलेल्या तारखेपासुन 9 टक्के व्याजही द्यावे. एकंदरीत प्रकरणांवरुन असे दिसते की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी विसंगतीपुर्ण विधान करुन फिर्यादीस मानसिक त्रास दिला आहे त्यामुळे ते दोघेही संयुक्तीकरित्या अथवा वैयक्तिकरित्या फिर्यादीस मानसिक त्रासाबद्यल नुकसान भरपाई म्हणुन रु.5,000/- देणे बाध्य आहेत. त्यांची टाळाटाळ वृत्तीमुळेच फिर्यादीस या मंचापुढे ही फिर्याद घेऊन यावे लागले. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी फियादीस या फिर्यादीचा खर्च म्हणुन रु.2,000/- द्यावेत, असे या मंचाचे मत आहे. वरील कारणांमुळे सदरील मुद्यावर निर्णय देऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. फिर्यादीची फिर्याद अंशतः मंजुर करण्यात येत आहे. 2. हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयुक्तीक तसेच वैयक्तिकपणे सदरील कंपनीची नवीन मोबाईल फिर्यादीस द्यावा किंवा त्याची किंमत रु.3,740/-, त्यावर फिर्याद दाखल केलेली तारीख 28/05/2010 पासुन 9 टक्के व्याजाने फिर्यादीस द्यावे. तसे न केल्यास सदरील रक्कमेवर दंडनिय व्याज म्हणुन फिर्याद दाखल केलेली तारीख 28/05/2010 पासुन ते पैसे वसुल होईपर्यंत 12 टक्के व्याज द्यावे. 3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी फिर्यादीस त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्यल रु.5,000/- द्यावेत व कोर्टाचा खर्च म्हणुन रु.2,000/- द्यावेत. जर 30 दिवसांत ही रक्कम दिली नाही तर त्यावर देखील फिर्याद दाखल केलेली तारीख 28/05/2010 पासुन 12 टक्के व्याज देण्यास ते बाध्य असतील. 4. गैरअर्जदार क्र. 3 विरुध्द कसलाही आदेश नाही. 5. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |