१. तक्रारकर्ता हा बजाज पल्सर 200 एनएस हे वाहन खरेदी करण्याकरीता सरबनी मोटर्स येथे गेला असता सदर वाहन खरेदी करण्याकरीता त्याच्याकडे एकमुस्त रक्कम नव्हती. त्यावेळी तिथे विरूध्द पक्षाचे प्रतिनिधी बसलेले होते व त्यांनी तक्रारकर्त्याला सदर रकमेचे कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी दिली. सदर वाहनाची किंमत ही रू.96,717/- होती.शोरूममधून तक्रारकर्त्यास दिनांक रु19/7/2013 रोजी टॅक्स इन्व्हॉईस प्राप्त झाले. त्यानंतर वि.प.ने तक्रारकर्त्यास डाऊन पेमेंटपोटी रू.40,000/- जमा करण्यांस सांगितले व उर्वरीत रक्कम रू.56,717/- कर्ज म्हणून उपलब्ध करून दिले. वि.प.ने सदर कर्जाच्या नावाखाली तक्रारकर्त्याकडून को-या फॉर्मवर सहया घेतल्या व तक्रारकर्त्यास वि.प.ने कराराची तसेच पेमेंट शेडयुलची प्रत न देताच तोंडी सांगितले की सदर कर्जाची परतफेड दिनांक 20/7/2013 ते दि. 20/6/2015 पर्यंत प्रतिमाह रु.3050/- प्रमाणे 24 हप्त्यात एकूण रू.73,200/- जमा करावयाचे आहेत. तक्रारकर्त्याने अनुक्रमे दिनांक 20/7/2013,दि. 29/9/2013, दि. 12/2/2014, दि. 19/4/2014 व दि.9/5/2014 रोजी अनुक्रमे रू.3050/-, रू.6,100/- रू.9500/- रू,9000/- व रू,50,000/- असे एकूण रू.77,650/- सदर कर्जापोटी वि.प.कडे मुदतीच्या आत भरणा केले. वि.प.ने तक्रारकर्त्यास सदर कर्जासंबंधी कोणतेही दस्तावेज दिले नाहीत. सदर परतफेडीच्या पावत्यांवर एलएफ नं.1597 दर्शविला असून सदर क्रमांक हा करार क्रमांक असू शकतो. तक्रारकर्त्याने वि.प.कडे मुदतीच्या आत रू.77,650/- जमा केले परंतु तक्रारकर्त्यास रू.73,200/- भरावयाचे होते. त्यामुळे वि.प.ने तक्रारकर्त्याकडून जास्तीची रक्कम वसूल केलेली आहे. कर्जाच्या परतफेडीनंतर तक्रारकर्त्याने सदर वाहनाच्या नाहरकत प्रमाणपत्राची वि.प.कडे तोंडी व लेखी मागणी केली परंतु वि.प.ने त्याची दखल घेतली नाही. तसेच तक्रारकर्त्याने वि.प.च्या कार्यालयात जाऊन कर्जपरतफेडीचे शेडयुल व स्टेटमेंटची मागणी केली असता वि.प.ने ते देण्यांस नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 19/12/2015 रोजी अधिवक्त्यामार्फत वि.प.ला नोटीस पाठवून नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली. परंतु नोटीस प्राप्त होवूनही वि.प.ने पुर्तता केली नाही. सबब तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून अशी मागणी केली की वि.प.ची सेवा ही न्युनतापूर्ण सेवा घोषीत करण्यात यावी, कर्जाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यांत यावे तसेच तक्रारकर्त्याकडून जास्तीची वसुल केलेली रक्कम वि.प.नी तक्रारकर्त्यास परत करावी आणि शारिरीक व मानसीक त्रासापोटी रू.50,000/- व तक्रारीचा खर्च तक्रारकर्त्यास द्यावा अशी विनंती केली आहे. २. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करून विरुध्द पक्षास मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. वि.प. ने हजर होवून आपले लेखी उत्तर दाखल केले. तक्रारकर्त्याला दुचाकी बजाज पल्सर 200 एन. एस. वाहन खरेदी करायचे होते व सदर वाहनाची किंमत रू.96,717/- होती, परंतु तक्रारकर्त्याकडे तेवढी एकमुस्त रक्कम नव्हती या बाबी कबूल केले असून तक्रारकर्त्याचे तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबूल केले आहे व पुढे विशेष कथनामध्ये नमूद केले की वि.प.ने तक्रारकर्त्याला बजाज पल्सर 200 एन.एस. हे वाहन खरेदी करण्याकरिता एकूण रू.95,717/- चे अर्थसहाय्य केले होते व तक्रारकर्त्याने रू.1000/- नगदी बुकींग अमाऊंट म्हणून शोरूममध्ये भरणा केले. तक्रारकर्त्याने सदर गाडी सरबानी मोटर्स चे शोरूममधून विकत घेतली. वि.प.ने दिनांक 23/07/2013 रोजी एच डी एफ सी शाखा, चंद्रपूर बॅंकेचा धनादेश क्र.149617द्वारे सदर रक्कम दिली होती व सदर रकमेचा दरमहा रू.3829/- प्रमाणे एकूण 40 किस्तींमध्ये द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह एकूण रू.1,53,147/- परतफेड करावयाची होती. परंतु तक्रारकर्त्याने आजपर्यंत फक्त रू.77,650/- चा भरणा केलेला असून त्याचेकडून रू.75,497/- उर्वरीत थकबाकी व त्यावरील व्याज आजही घेणे आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तक्रारकर्ता हा डाऊन पेमेंटची रक्कम रू.40,000/- वि.प.कडे जमा केल्याचे सांगून विद्यमान मंचाची दिशाभूल करीत आहे, परंतु तक्रारकर्त्याने त्यासंदर्भात कोणतेही दस्तावेज दाखल केले नाही, कारण तक्रारकर्त्याने वि.प.कडे अशी कोणतीही रक्कम जमा केली नाही आणि म्हणून तक्रारकर्त्याने त्यासंदर्भात कोणतेही दस्तावेज दाखल केले नाही. तसेच तक्रारकर्त्याने वि.प.कडे कोणतीही जास्तीची रक्कम जमा केली नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 3. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, दस्ताऐवज, तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, आणि तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील त्याबाबतची कारण मिमांसा व निष्कर्ष पुढील प्रमाणे. मुद्दे निष्कर्ष (1) तक्रारकर्ता विरुद्ध पक्षाचा ग्राहक आहे काय? होय (2) विरुद्धपक्षाने तक्रारकर्तास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे होय काय ? (3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? अंशतः मंजूर कारण मिमांसा मुद्दा क्रं. 1 बाबत ः- 4. तक्रारकर्त्याने बजाज पल्सर 200 एन एस हे वाहन खरेदी करण्याकरीता वि.प. यांच्याकडून कर्ज घेतले ही बाब गैरअर्जदाराने मान्य केलेली आहे. सबब तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे ही बाब सिध्द होत असल्यामुळे मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे. मुद्दा क्रं. 2 बाबत ः- 5. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांचेकडून उपरोक्त वाहन खरेदी करण्याकरीता कर्ज घेतले होते. याबाबत वाद नाही. परंतु वि.प.ने आपल्या लेखी उत्तरातील विशेष कथनामध्ये नमूद केले की वि.प.ने तक्रारकर्त्याला बजाज पल्सर 200 एन. एस. हे वाहन खरेदी करण्याकरिता एकूण रू.95,717/- चे अर्थसहाय्य केले होते व सदर कर्जाची परतफेड दरमहा रू.3,829/- प्रमाणे एकूण 40 किस्तींमध्ये द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह एकूण रू.1,53,147/- ची परतफेड करावयाची होती. ही बाब वि.प.यांनी करारनामा, परिशिष्ट अथवा कर्जासंबंधातील कोणताही दस्तावेज दाखल करून सिध्द केलेली नाही. त्यामुळे वि.प. यांनी तक्रारकर्त्याला रू.56,717/- चे कर्ज दिले हे तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन ग्राहय धरण्यायोग्य आहे. विरूध्द पक्षाने आपल्या विशेष कथनात तक्रारकर्त्याने सदर कर्जाच्या परतफेडीपोटी वि.प. यांचेकडे एकूण रू.77,650/- चा भरणा केला आहे ही बाब मान्य केली आहे. तसेच तक्रारकर्त्यानेसुध्दा वि.प.कडे एकूण रू.77,650/- चा भरणा केला आहे असे कथन केले आहे तसेच त्यासंदर्भात वि.प. यांनी दिलेल्या पावत्यासुध्दा दाखल केलेल्या आहेत. वि.प. यांना तक्रारकर्त्याकडून सदर कर्जाच्या रकमेची थकबाकी घेणे आहे हे वि.प.ने दस्तावेज दाखल करून सिध्द केलेले नाही. तक्रारकर्त्याने सदर वाहनाच्या कर्जाची पर्याप्त परतफेड वि.प.कडे करून तक्रारकर्त्याने सदर वाहनाच्या कर्जाचे नादेय प्रमाणपत्राची वि.प.कडे मागणी केल्यानंतरसुध्दा वि.प.ने तक्रारकर्त्यास सदर वाहनाचे नाहरकत प्रमाणपत्र न देवून तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनता केली असे सिध्द होते असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे. मुद्दा क्रं. 3 बाबत ः- 6. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश (1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. (2) विरूध्द पक्षाने तक्रारदारांस न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे घोषित करण्यांत येते. (3) विरूध्द पक्ष यांनी बजाज पल्सर 200 एन. एस. या गाडीच्या कर्जाचे नादेय/नाहरकत प्रमाणपत्र तक्रारकर्त्यांस द्यावे. (4) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक ञासापोटी रु.2,000/- द्यावे. (5) उभय पक्षांनी आपआपला तक्रारखर्च सहन करावा. (6) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी. ( कल्पना जांगडे(कुटे)) ( किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. .अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर. |