::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :-16/04/2019)
1. अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्द प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
2. अर्जदार हा मुस्लिम समाजाचा आहे. मुस्लिम समाजाचा रमजान ईद हा सण साजरा करण्याकरिता त्याने मुलीसाठी नवीन कपडे खरेदी करण्याचे ठरवले. त्याकरता अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे दुकानाचे नाव असल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार यांच्या दुकानातून मुलीकरता दिनांक 15/6/2018 रोजी बिल क्रमांक 311 द्वारे ड्रेस खरेदी केला. अर्जदार यांनी ड्रेस खरेदी केल्यानंतर घरी परत आल्यावर ड्रेसचे पाहणी केली असता तो काही ठिकाणी फाटलेला होता. ही बाब लक्षात येताच अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे जाऊन ड्रेसमध्ये त्रुटी असल्यामुळे तो परत घेऊन बदलून दुसरा ड्रेस देण्याची विनंती केली. परंतु गैरअर्जदार यांनी ड्रेस बदलून देण्यास नकार दिला. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना वारंवार विनंती केली, परंतु गैरअर्जदार यांनी ड्रेस बदलून दिला नाही व रक्कम सुद्धा परत केली नाही. त्यामुळे अर्जदार यांना तो फाटलेल्या ड्रेस घरी घेऊन परत यावे लागले. गैरअर्जदाराच्या अशा कृत्यामुळे अर्जदार यांना ऐन सणाच्या दिवशी मानसिक आर्थिक शारीरिक त्रास सहन करावा लागला. गैरअर्जदार ची सदर कृती अनुचित व्यापार पद्धती असल्याने सदर तक्रार गैरअर्जदार विरुद्ध अर्जदाराने दाखल केलेली आहे.
3. अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आली.
4. गैरअर्जदाराने तक्रारीत उपस्थित होऊन कथन केले की गुजरात रेडिमेड हे 14 वर्षांपासून चंद्रपूर येथे आहे. आजपर्यंत कोणत्याही ग्राहकाने आमच्या दुकानात बद्दल तक्रार केलेली नाही. गुजरात साडी सेंटर मधून एखाद्या ग्राहकाने एखादी वस्तू घेऊन गेल्यानंतर ती बदलून घेऊ शकतो परंतु जसे कपडे घेऊन गेलेला आहे त्याच स्थितीमध्ये कपडे वापस आणावे लागतात. सदर अर्जदाराने आमच्याकडून ड्रेस खरेदी करून तो घरी गेला व त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो ड्रेस अर्जदाराने आणला असता सदर ड्रेस अर्जदाराला बदली करून देऊ शकलो नाही, कारण ड्रेस अर्जदाराने खराब व फाडून आणला होता. तो डॅमेज करून व त्यावर भरपूर डाग लावून ड्रेस आणला होता. त्यामुळे सदर ड्रेस आम्ही अर्जदाराला बदलवून देवू शकलो नाही. अर्जदाराने जसा फ्रेश ड्रेस पिस आमच्याकडून नेला होता तसाच जर पुन्हा वापस आणला असता तर आम्ही तो ड्रेस अर्जदाराला बदली करून दिला असता. परंतु डाग लागलेला व फाटलेल्या ड्रेस अर्जदाराने आमच्याकडे वापस आणून दुस-या ड्रेसची मागणी केलेली होती. सबब असा ड्रेस अर्जदाराला आम्ही बदलून दिला नाही. यात गैरअर्जदाराची कोणतीही सेवेत त्रुटी नाही असे नमूद करून अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी त्यांनी मंचास विनंती केली आहे.
5. अर्जदारची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच उभय पक्षांच्या तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. गैरअर्जदार ने अर्जदारस त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे काय ? होय
2. आदेश काय ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र.1 बाबत
6. अर्जदाराने त्याच्या मुलीकरिता गैरअर्जदाराकडून ड्रेस विकत घेतला होता ही बाब तक्रारीत दाखल गैरअर्जदाराने दिलेल्या बिलावरून स्पष्ट होते व त्याबद्दल गैरअर्जदार हयांनाही वाद नाही. अर्जदाराने नमूद केले आहे की गैरअर्जदाराकडून घेतलेला ड्रेस फाटका असल्यामुळे तो त्याने दुस-या दिवशी गैरअर्जदाराला बदलवून मागितला. ड्रेस फाटलेला असल्याबाबतचे फोटो अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेले आहेत. परंतु गैरअर्जदाराने ही बाब त्यांचे लेखी उत्तरात नाकबूल केली आहे. वास्तविकतः ड्रेस विकत घेतांना तो तपासून घेण्याची तक्रारकर्त्याची जबाबदारी होती, तसेच 14 वर्षांपासून कार्यरत एक प्रतिष्ठीत व्यापारी प्रतिष्ठान म्हणून तशी जबाबदारी गैरअर्जदार यांचीदेखील होती. तक्रारकर्त्याने ड्रेस विकत घेतल्यानंतर लगेच दुस-याच दिवशी तो सदोष व फाटलेला असल्याची तक्रार गैरअर्जदाराकडे केली होती, ही बाब गैरअर्जदाराने नाकारलेली नाही. एका प्रतिष्ठित दुकानातून घेतलेली वस्तु ही किमान ठरावीक गुणवत्तेची असणे अपेक्षीतच असते. आणी आजच्या व्यस्त जिवनात फसवणूक व कमाल अपेक्षाभंग झाल्याशिवाय रू.1400/- किमतीच्या ड्रेसकरीता कोणताही ग्राहक, न्यायालयाची दारे ठोठावणार नाही असे मंचाचे मत आहे. साहजिकच विवादीत ड्रेस हा फाटका निघाल्यामुळे तक्रारकर्त्याने तो बदलून देण्याची गैरअर्जदाराला विनंती केली हे म्हणणे मंचास ग्राहय वाटते. त्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास दोषपूर्ण ड्रेस विकून त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यांत येते.
मुद्दा क्र. 2 बाबत
7. मुद्दा क्र. १ च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.118/18 अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याकडील विवादीत ड्रेसची किंमत रू.1400/-
तक्रारकर्त्यास परत करावी.
(3) गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याला शारिरीक मानसीक त्रास व तक्रारीच्या
खर्चापोटी एकत्रीतरीत्या रू.1000/- द्यावेत.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.