::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
(पारीत दिनांक–30 डिसेंबर, 2017)
01. उपरोक्त नमुद तक्रारीं मध्ये तक्रारकर्तीने मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली दाखल केलेल्या तक्रारी हया जरी स्वतंत्ररित्या वेगवेगळया दाखल केलेल्या असल्या, तरी नमुद तक्रारींमधील तक्रारकर्ती एकच असून या सर्व तक्रारीं मधील विरुध्दपक्ष हे सुध्दा एकच आहेत आणि तपशिलाचा थोडाफार भाग वगळता, ज्या कायदे विषयक तरतुदींचे आधारे हया तक्रारी निकाली निघणार आहेत, त्या कायदे विषयक तरतुदी सुध्दा नमुद तक्रारींमध्ये एक सारख्याच आहेत आणि म्हणून आम्ही नमुद तक्रारीं मध्ये एकत्रितरित्या निकाल पारीत करीत आहोत. सर्व तक्रारी या विरुध्दपक्ष गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन एवं लॅन्ड डेव्हलपर्स विरुध्द असून तक्रारकर्तीने आरक्षीत केलेल्या भूखंडांचे विक्रीपत्र विरुध्दपक्षाने नोंदवून दिले नाही या कारणास्तव दाखल केलेल्या आहेत.
02. तक्रारकर्तीचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-(1) प्रोप्रायटरी फर्म असून विरुध्दपक्ष क्रं-(2) सुरेश कोंडबाजी बुरेवार हा त्या फर्मचा प्रोप्रायटर आहे. तक्रारकर्तीने फॉर्म हाऊससाठी भूखंड विकत घेण्याचे ठरविले. विरुध्दपक्ष फर्म तर्फे प्रोप्रायटर म्हणून श्री सुरेश कोंडबाजी बुरेवार याचा शेतीचे अकृषीक निवासी भूखंडात रुपांतरण करुन विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाचे प्रस्तावित ले-आऊट मधील भूखंड विकत घेण्याचे ठरविले, त्या प्रमाणे तिने विरुध्दपक्षाशी संपर्क साधून भूखंडाचे इसारपत्र/बयानापत्र करुन घेतले व इसारपत्र/बयानापत्र तसेच मासिक किस्तीव्दारे भूखंडा पोटी विरुध्दपक्षास रकमा अदा केल्यात. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष फर्म तर्फे प्रोप्रायटर श्री सुरेश कोंडबाजी बुरेवार याचेशी भूखंडापोटी केलेले इसारपत्र/बयानापत्र, भूखंड क्रमांक, भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ, भूखंडाची एकूण किम्मत, दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतींवरुन भूखंडापोटी दिलेली एकूण रक्कम इत्यादीचा संपूर्ण तपशिल परिशिष्ट-अ मध्ये दर्शविल्या प्रमाणे खालील प्रमाणे आहे-
“परिशिष्ट- अ”
अक्रं | तक्रार क्रमांक, त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन | भूखंड क्रमांक | भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्ये व प्रतीचौरस फुट दर | भूखंडाची एकूण किम्मत | भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्ट्रीची मुदत | भूखंडापोटी अदा केलेली एकूण रक्कम (दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतींवरुन)व शेवटचे किस्तीचा दिनांक | बयानापत्र करुन देणा-या फर्मचे नाव |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
1A | CC/15/236 सौ.सुलोचना रुपेंद्र मोदी (जैन) कृषी जमीन मौजा बोरी, तहसिल व जिल्हा नागपूर. प.ह.क्रं-76 खसरा क्रं-257 | 37 | 1614 Rs.-150/- Per Sq.Ft. | 2,42,100/- | Dt-22/01/08 (02Years) | Rs- 2,42,100 /- Dt.-02/03 /2009 | गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन एवं लॅन्ड डेव्हलपर्स |
| | | Total | 2,42,100/- | | 2,42,100/- | |
“परिशिष्ट- अ”
अक्रं | तक्रार क्रमांक, त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन | भूखंड क्रमांक | भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्ये व प्रतीचौरस फुट दर | भूखंडाची एकूण किम्मत | भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्ट्रीची मुदत | भूखंडापोटी अदा केलेली एकूण रक्कम (दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतींवरुन)व शेवटचे किस्तीचा दिनांक | बयानापत्र करुन देणा-या फर्मचे नाव |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
1B | CC/15/237 सौ.सुलोचना रुपेंद्र मोदी (जैन) कृषी जमीन मौजा चेहाडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर. प.ह.क्रं-25 खसरा क्रं-927, 148, 149, 129, 135, 137 | 133 & 134 | Each Plot-4843.75 Sq.Ft. Total Area-9687.5 Sq.Ft. Rate-Rs.-15/- Per Sq.Ft. | 1,45,312/- | Dt-29/05/07 | Rs- 1,71,496 /- Dt.-15/10 /2009 | गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन एवं लॅन्ड डेव्हलपर्स (Rs.-1,45,000/- Plot Cost (+) Rs.-26,496/- Dev.Charges) |
| | | Total | 1,45,312/- | | Rs- 1,71,496 /- | |
“परिशिष्ट- अ”
अक्रं | तक्रार क्रमांक, त.क.चे नाव तसेच लेआऊटचे वर्णन | भूखंड क्रमांक | भूखंडाचे क्षेत्रफळ चौरसफूट मध्ये व प्रतीचौरस फुट दर | भूखंडाची एकूण किम्मत | भूखंडाचा इसारपत्र/ बयानापत्राचा दिनांक तसेच रजिस्ट्रीची मुदत | भूखंडापोटी अदा केलेली एकूण रक्कम (दाखल केलेल्या पावत्यांच्या प्रतींवरुन)व शेवटचे किस्तीचा दिनांक | बयानापत्र करुन देणा-या फर्मचे नाव |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
1C | CC/15/238 सौ.सुलोचना रुपेंद्र मोदी (जैन) कृषी जमीन मौजा चेहाडी, तहसिल मौदा, जिल्हा नागपूर. प.ह.क्रं-25 खसरा क्रं-927, 148, 149, 129, 135, 137 | 105 & 106 | Each Plot-4843.75 Sq.Ft. Total Area-9687.5 Sq.Ft. Rate-Rs.-15/- Per Sq.Ft. | 1,45,312/- | Dt-07/06/07 | Rs- 1,79,988 /- Dt.-15/10 /2009 | गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन एवं लॅन्ड डेव्हलपर्स (Rs.-1,45,312/- Plot Cost (+) Rs.-34,676/- Dev.Charges) |
| | | Total | 1,45,312/- | | Rs- 1,79,988 /- | |
तक्रारकर्तीचे पुढे असेही म्हणणे आहे की, विरुध्दपक्षाने तिला करारातील भूखंडा संबधाने तिच्या नावे स्टॅम्प पेपरवर बयानापत्र लिहून दिले. करारातील भूखंडाचे संपूर्ण किमती व्यतिरिक्त तिने भूखंड क्रं-105 व 106 आणि भूखंड क्रं-133 व 134 बाबतीत संभाव्य विकासशुल्काची रक्कम सुध्दा विरुध्दपक्षाला अदा केलेली आहे व पावत्या प्राप्त केलेल्या आहेत. तक्रारकर्तीचे असेही म्हणणे आहे की, तिने विरुध्दपक्षाला वेळोवेळी करारातील भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची विनंती केली परंतु विरुध्दपक्षाने योग्य तो प्रतिसाद दिला नाही.
तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाला भूखंडाचे विक्रीपत्र करुन मिळण्यासाठी कायदेशीर नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविल्यात परंतु रजिस्टर नोटीस घेण्यास नकार या पोस्टाचे शे-यासह परत आल्यात. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने भूखंडापोटी रकमा स्विकारुनही विक्रीपत्र नोंदवून दिले नसल्याने दोषपूर्ण सेवा दिली तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला, म्हणून तक्रारकर्तीने विरुध्दपक्षा विरुध्द या स्वतंत्र तक्रारी अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
(1) तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाशी केलेल्या करारातील नमुद भूखंडांचे विक्रीपत्र तक्रारकर्तीचे नावे नोंदवून देऊन प्रत्यक्ष्य मोजमाप करुन ताबे देण्याचे विरुध्दपक्षाला आदेशित व्हावे परंतु करारातील नमुद भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देणे शक्य नसल्यास तक्रारकर्तीने करारातील भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्कम प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे.
(2) तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक, शारिरीक आणि आर्थिक त्रासा बद्दल तसेच भूखंडाचे किमती मध्ये झालेल्या वाढी बद्दल नुकसान भरपाई आणि नोटीस खर्च व तक्रारीचा खर्च देण्याचे विरुध्दपक्षाला आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्षा तर्फे तक्रारनिहाय स्वतंत्र लेखी उत्तर अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष सादर करण्यात आले. विरुध्दपक्षाचे उत्तरा मध्ये बयानापत्रातील नमुद केलेला भूखंडाचा दर बरोबर असल्याचे नमुद करण्यात आले. या व्यतिरिक्त तक्रारकर्तीला ईलेक्ट्रिकचा खर्च तसेच विक्रीपत्र नोंदणीचा खर्च देणे होते. ग्राहक तक्रार क्रं- CC/15/238 मध्ये भूखंडाची एकूण किम्मत रुपये-1,45,312/- मिळाल्याचे मान्य करुन विकास शुल्का पोटी फक्त रुपये-20,000/- जमा केल्याचे नमुद केले. तक्रारकर्तीने जरी विकासशुल्काची रक्कम जमा केलेली असली तरी ती आजच्या विकासशुल्काच्या रकमेच्या हिशोबा प्रमाणे जमा केलेली नाही. तक्रारकर्तीने भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यासाठी कधीही विरुध्दपक्षाकडे विनंती वा पाठपुरावा केलेला नाही.
विरुध्दपक्षा तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, तो आजही तक्रारकर्तीने नोंदणी केलेल्या भूखंडांचे विक्रीपत्र नोंदवून देण्यास तयार आहे परंतु तक्रारकर्तीने आजच्या दरा प्रमाणे विकासशुल्काची रक्कम द्दावी.
विरुध्दपक्षाने ग्राहक तक्रार क्रं-CC/15/236 मध्ये मात्र विक्रीपत्र नोंदवून देण्याची बाब नाकबुल केली, त्याने संपूर्ण तक्रार नामंजूर करुन तक्रारकर्ती सोबत केलेले ईसारपत्र त्याने करुन दिलेले नाही वा त्याने तक्रारकर्ती कडून कोणत्याही रकमा घेतलेल्या नाहीत असे नमुद केले.
04. तक्रारकर्तीने तक्रारीचे समर्थनार्थ दस्तऐवज यादी नुसार काही दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये विरुध्दपक्ष फर्म तर्फे करुन दिलेली भूखंडाचीं इसारपत्रे, विरुध्दपक्ष फर्म मध्ये करारातील भूखंडापोटी रकमा भरल्या बाबत पावत्यांच्या प्रती, तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाला पाठविलेली दिनांक-17/08/2015 रोजीची कायदेशीर नोटीस, रजिस्टर पोस्टाच्या पावत्यांच्या प्रती व परत आलेले लिफाफे अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. तसेच प्रतीउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केले.
05. विरुध्दपक्षा तर्फे तक्रारनिहाय लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला.
06. तक्रारकर्ती तर्फे वकील कु. पाटील यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
07. तक्रारकर्तीच्या स्वतंत्र तीन तक्रारी, तक्रारनिहाय विरुध्दपक्षाचा लेखी युक्तीवाद, तक्रारकर्ती तर्फे दाखल केलेल्या दस्तऐवजाच्या प्रती यावरुन ग्राहक मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
::निष्कर्ष ::
08. ग्राहक तक्रार क्रं-CC/15/237 आणि क्रं -CC/15/238 या मधील मजकूर, ईसारपत्र इत्यादी बाबी विरुध्दपक्षाने मान्य केलेल्या आहेत आणि त्याचे उत्तरा प्रमाणे तो आजही या दोन्ही तक्रारीं मध्ये जर तक्रारकर्तीने विकासशुल्काची रक्कम दिली तर विक्रीपत्र नोंदवून देण्यास तयार आहे. मात्र ग्राहक तक्रार क्रं-CC/15/236 मध्ये त्याने संपूर्ण तक्रार नामंजूर करुन तक्रारकर्ती सोबत केलेले ईसारपत्र त्याने करुन दिलेले नाही वा त्याने तक्रारकर्ती कडून कोणत्याही रकमा घेतलेल्या नाहीत अशी भूमीका घेतलेली आहे. परंतु ग्राहक तक्रार क्रं-CC/15/237 व क्रं- CCC/15/238 मध्ये तक्रारकर्तीचे ईसारपत्र विरुध्दपक्षाने मंजूर केले, त्याच तक्रारकर्तीचे ईसारपत्र ग्राहक तक्रार क्रं-CC/15/236 मध्ये नामंजूर करण्यास विरुध्दपक्षाने कशी काय भूमीका घेतली याचे आकलन होत नाही, तिन्ही प्रकरणातील ईसारपत्रावरील विरुध्दपक्षाने केलेल्या सहया आणि तिन्ही प्रकरणातील लेखी उत्तरावरील विरुध्दपक्षाच्या सहया या एकमेकांशी ताळमेळ खातात त्यामुळे विरुध्दपक्षाचे बचावात कोणतेही तथ्य अतिरिक्त ग्राहक मंचास दिसून येत नाही.
09. विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीने भूखंडाचे जमा केलेल्या रकमे बाबत आपल्या उत्तरात विवाद केला परंतु परिशिष्ट-अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे भूखंडा पोटी रकमा जमा केल्याची बाब दाखल पावत्यांच्या प्रतीं वरुन सिध्द होते, त्यामुळे परिशिष्ट- अ मध्ये नमुद केलेल्या एकूण जमा रक्कमा तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे जमा केल्याची बाब सिध्द होते.
10. ग्राहक तक्रार क्रं-CC/15/236 ते ग्राहक तक्रार क्रं- CC/15/238 मधील तक्रारकर्ती श्रीमती सुलोचना रुपेंद्र मोदी (जैन) यांनी दाखल केलेल्या बयानापत्र/इसारपत्राच्या प्रतीवरुन त्यांनी विरुध्दपक्षाचे ले-आऊट मधील ग्राहक तक्रार क्रं-CC/15/236 मध्ये भूखंड क्रं-37 क्षेत्रफळ-1614 चौरसफूट तसेच ग्राहक तक्रार क्रं-CC/15/237 मध्ये दोन भूखंडे क्रं-133 व क्रं-134 प्रती भूखंड क्षेत्रफळ 4843.75 चौरसफूट प्रमाणे दोन भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ- 9687.5 चौरसफूट तसेच ग्राहक तक्रार क्रं-CC/15/238 मध्ये दोन भूखंडे क्रं-105 व क्रं-106 प्रती भूखंड क्षेत्रफळ 4843.75 चौरसफूट प्रमाणे दोन भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ- 9687.5 चौरसफूट या प्रमाणे एकूण 05 भूखंडे ज्यांचे एकूण क्षेत्रफळ-20,989 चौरसफूट खरेदी करण्याचा करार विरुध्दपक्षाशी केला असल्याचे दिसून येते.
11. या ठिकाणी विशेषत्वाने नमुद करणे गरजेचे आहे की,
तक्रारकर्तीने जरी अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष उपरोक्त नमुद तीन तक्रारी वेगवेगळया अशा स्वतंत्ररित्या दाखल केलेल्या असल्या तरी या सर्व तक्रारीं मधील तक्रारकर्ती ही श्रीमती सुलोचना रुपेंद्र मोदी (जैन) हीच आहे. या सर्व तक्रारी मिळून तक्रारकर्तीने मौजा बोरी, तालुका जिल्हा नागपूर तसेच मौजा चेहाडी, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथील एकूण 05 भूखंडे ज्यांचे एकूण क्षेत्रफळ 20,989 चौरसफूट विकत घेण्याचे करार विरुध्दपक्षाशी केलेले आहेत. भूखंडांचे एवढया मोठया क्षेत्रफळा वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीने भूखंड खरेदी बाबत केलेले व्यवहार हे तिच्या वैयक्तिक राहण्यासाठी किंवा वापरासाठी केलेले नसून त्या भूखंडांची पुर्नविक्री करुन नफा कमाविण्याचे उद्देश्याने केल्याचे दिसत असून ते भूखंड खरेदीचे व्यवहार हे व्यवसायिक कारणासाठी केलेले आहेत आणि जेंव्हा एखाद्दा व्यवहार हा व्यवसायिक कारणासाठी करण्यात येत असेल आणि त्या व्यवहारा मध्ये जर काही वाद उपस्थित होत असेल तर अशा व्यवसायिक व्यवहाराचा वाद हा ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी प्रमाणे ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नाही, अशा व्यवसायिक व्यवहारा मधील व्यक्ती ही ग्राहक होत नाही, म्हणून केवळ या एकमेव कारणास्तव ही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
12. विरुध्दपक्षा तर्फे याच अतिरिक्त ग्राहक मंचा समोर तक्रार क्रं- CC/15/235 ते CC/15/240, CC/15/261, CC/15/266 सौ.संगीता सुनिलकुमार जैन व इतर तक्रारदार या प्रकरणां मध्ये एक पुरसिस दाखल करुन त्याव्दारे आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांचे तर्फे विरुध्दपक्ष सुरेश कोंडबाजी बुरेवार याचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला असून विरुध्दपक्षाचे मालकीच्या शहराला असलेल्या निरनिराळया जमीनी या गुन्हयात संलग्नित करण्यात आल्यात, त्यामध्ये मौजा रेहाडी येथील खसरा क्रं-132/3 व 132/4 संलग्नित असून त्याच बरोबर मौजा बोरी, घुटी, वारंगा, जुनापाणी, बनवाडी, वेळाहरी, देवळी गुजर, नवरमारी, वरोड, मोहगाव, सालई गोधनी, चिकना, चिमनाझरी, बोरखेडी, घोगली, सोनेगाव, सिंधीविहिरी, झरी, तालुका उमरेड येथील मौजा वडद, ठाणा, धारा, बोथली, पिटीचुहा, डव्हा खापारी, घोटी, फुकेश्वर, सालई, मरमझरी, कच्छीमेठ, म्हसेपठार,तालुका सावनेर येथील मौजा जैतगड या मालमत्तेची खरेदी विक्री, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र, आममुखत्यारपत्र, गहाणखतव्दारे हस्तांतरण करण्यात येऊ नये, या बाबतीत काही आक्षेप असल्यास मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रं-9 नागपूर यांचे न्यायालयात दाद मागावी असे आर्थिक गुन्हे शाखा नागपूर शहर यांचे दिनांक-24 सप्टेंबर, 2016 रोजीचे पत्रात नमुद केलेले आहे. सदर पोलीस दस्तऐवजां मध्ये वादातील
मौजा म्हसेपठार, तहसिल उमरेड, जिल्हा नागपूर येथील शेतजमीनीचा सुध्दा समावेश आहे. तसेच त्या संबधीचा अहवाल प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रं-09, नागपूर यांचे कडे सादर करण्यात आलेला आहे. त्या संबधाने विरुध्दपक्षाचे वकीलानीं आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी विरुध्दपक्ष सुरेश बुरेवार याला दिलेल्या पत्राच्या प्रती दाखल केल्यात तसेच फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत जाहिर नोटीस, एफआयआरची प्रत, तसेच श्री मोहन नारायणराव घोरपडे, राहणार अमरावती रोड, वाडी, नागपूर यांनी पोलीस स्टेशन गणेशपेठ, नागपूर यांचे कडे विरुध्दपक्ष सुरेश बुरेवार याचे विरुध्द केलेली लेखी तक्रार अशा दस्तऐवजाच्या प्रती सुध्दा दाखल केल्यात.
13. तक्रारकर्तीची जरी फसवणूक झाली आहे, तरी तिला ग्राहक मंचा समक्ष दाद मागता येणार नाही कारण तिने भूखंड खरेदीचे जे व्यवहार केलेले आहेत ते व्यवसायिक स्वरुपाचे असल्याने तक्रारकर्ती ही ग्राहक संरक्षण कायद्दा-1986 चे तरतुदी प्रमाणे “ग्राहक” ठरत नाही. त्यामुळे उपरोक्त नमुद कारणास्तव उपरोक्त नमुद तिन्ही तक्रारीतील अन्य कोणत्याही विवादीत मुद्दानां स्पर्श न करता, आम्ही केवळ याच कारणास्तव या तक्रारी खारीज करीत असून प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) तक्रारकर्ती श्रीमती सुलोचना रुपेंद्र मोदी (जैन) यांची, विरुध्दपक्ष मे.गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन एवं लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर श्री सुरेश कोंडबाजी बुरेवार याचे विरुध्दच्या उपरेक्त नमुद तिन्ही तक्रारी या खारीज करण्यात येतात.
(2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(3) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात. निकालपत्राची मूळ प्रत ग्राहक तक्रार क्रं-CC/15236 मध्ये लावण्यात यावी व अन्य ग्राहक तक्रारीं मध्ये निकालपत्राच्य प्रमाणित प्रती लावण्यात याव्यात.