(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा. सदस्य)
(पारीत दिनांक : 05 जुलै 2016)
1. उपरोक्त नमूद दोन्ही तक्रारकर्त्यांनी सदरच्या तक्रारी मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारी ह्या जरी वेगवेगळ्या दाखल केलेल्या असल्या तरी नमूद तक्ररींमधील विरुध्दपक्ष हे एकच आहेत आणि तपशिलाचा थोडाफार भाग वगळता ज्या कायदेविषयक तरतुदींचे आधारे ह्या तक्रारी निकाली निघणार आहेत, त्या कायदेविषयक तरतुदी सुध्दा नमूद तक्रारींमध्ये एक सारख्याच आहेत आणि म्हणून आम्हीं नमूद तक्रारींमध्ये एकञितरित्या निकाल पारीत करीत आहोत. वरील तक्रारींचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ती हिला स्वतःचे राहण्याकरीता व स्वतःचे मालकीचे घर बांधण्यासाठी भूखंड खरेदी करावयाचे इच्छेने विरुध्दपक्ष यांचेशी संपर्क साधला. विरुध्दपक्ष हे कन्स्ट्रक्शन अॅन्ड लॅन्ड डेव्हलपर्स असून त्याचे गृहलक्ष्मी अॅन्ड लॅन्ड डेव्हलपर्स या नावाने व्यवसाय असून त्याचा प्रोप्रायटर श्री सुरेश कोंडबाजी बुरेवार आहे. विरुध्दपक्ष यांनी मौजा – बोथली, तहसिल – उमरेड, जिल्हा – नागपूर येथे टाकलेल्या ले-आऊट मधील भूखंड क्र.54 ज्याचे एकूण क्षेञफळ 1851.15 चौ.फुट एकूण रक्कम रुपये 64,790/- मध्ये खरेदी करण्याचे ठरले. सदरचे भूखंड तहसिल – उमरेड, जिल्हा – नागपूर शेत सर्व्हे नं.73, प.ह.नं.13 आहे. तक्रारकर्तीने दिनांक 3.3.2008 रोजी टोकन रक्कम रुपये 2000/- देवून भूखंड आरक्षित केले होते, त्यानंतर दिनांक 5.4.2008 रोजी तक्रारकर्ती व विरुध्दपक्ष यांचेमध्ये इसारपञ होऊन रक्कम रुपये 16,196/- विरुध्दपक्षास दिले व उर्वरीत रक्कम रुपये 48,594/- मासिक किस्तीने भरण्याचे ठरले. तसेच विक्रीपञाची मुदत दिनांक 5.4.2008 पासून 4.4.2010 पर्यंत करुन देण्याचे ठरविले होते. तसेच ले-आऊटचे गैरकृषि करुन देणे, ग्रामपंचायत, महानगर पालिका किंवा नागपूर सुधार प्रन्यास यांनी सुचविलेल्या बदलाप्रमाणे तक्रारकर्तीला नोंदणीकृत विक्रीपञ करुन देण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष यांनी स्विकारली होती.
3. तक्रारकर्ती पुढे असे नमूद करते की, झालेल्या करारनामाप्रमाणे दिनांक 5.4.2008 प्रमाणे तक्रारकर्तीने वेळोवेळी विरुध्दपक्षाकडे भूखंडापोटी असलेली रक्कम अदा केली, असे एकूण रुपये 64,804/- तक्रारकर्तीने दिनांक 18.11.2011 पर्यंत भरणा केले. त्यानंतर विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला दिनांक 22.3.2012 रोजी सुचनापञ देवून डेव्हलपमेंट खर्च म्हणून रुपये 64,560/- भरण्यास सुचविले. सदरच्या सुचनापञा मध्ये विक्रीपञासंबंधी कुठलाही मजकूर किंवा ठरावीक मुदत दिली नसल्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाच्या ऑफीसच्या पत्त्यावर संपर्क साधला, परंतु विरुध्दपक्षाने कुठलेही विक्रीपञासंबंधी उत्तर न दिल्यामुळे तक्रारकर्तीने आजपर्यंत विकासीत शुल्क भरले नाही. तक्रारकर्ती आजही विकासीत शुल्क भरण्यास तयार आहे, परंतु विरुध्दपक्षाने भूखंडाचे विकीपञ लावून द्यावे. तक्रारीर्तीने पुढे विरुध्दपक्षाकडे भूखंडाच्या विक्रीपञाबाबत वारंवार तगादा लावला, परंतु विरुध्दपक्षाच्या व्यवसायात अनेक प्रकारचे घोटाळे दैनिक वर्तमानपञातून जाहीर होण्यास सुरुवात झाली, तरी सुध्दा तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडे भूखंडाचे विक्रीपञ लावण्यास विनंती केली, त्यावर सुध्दा विरुध्दपक्षाने दुर्लक्ष केले. सरते शेवटी तक्रारकर्तीने सदरची तक्रार मंचामध्ये दाखल करुन खालील मागण्या केल्या.
1) भूखंड क्र.54 क्षेञफळ 1851.15 चौ.फूट मौजा – बोथली, शेत सर्व्हे नं.73, प.ह.नं.13 तहसिल – उमरेड, जिल्हा – नागपूर या आवंटीत भूखंडाचे विक्रीपञ करुन देण्याचे आदेश व्हावे व सदरच्या भूखंडाचा ताबा तक्रारकर्तीस देण्यात यावा.
2) भूखंडाचे विक्रीपञ करुन देणे शक्य नसल्यास आवंटीत भूखंडाचे आजच्या सरकारी बाजार भावाप्रमाणे किंमत तक्रारकर्तीला व्याजासह मिळण्याचा आदेश व्हावा.
3) तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 25,000/- देण्याचा आदेश व्हावा.
4. तक्रारकर्तीच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष यांनी मंचा समक्ष उपस्थित होऊन तक्रारकर्तीच्या तक्रारीला निशाणी क्र.11 वर आपले लेखीउत्तर सादर केले. त्यात त्यांनी असे नमूद केले की, तक्रारकर्तीने सदरची तक्रार दाखल करण्यास विलंब केल्यामुळे सदरची तक्रार मंचात चालवू शकत नाही, तसेच तक्रार मुदतबाह्य आहे. सदरच्या तक्रारीचे स्वरुप हे दिवाणी स्वरुपाचे असल्या कारणाने या मंचात चालविता येत नाही व तक्रारीमध्ये नमूद केलेले सर्व आरोप प्रत्यारोप विरुध्दपक्षाने आपल्या लेखीउत्तरात फेटाळून लावले. तक्रारकर्ती करारनामा प्रमाणे वागली नाही, तसेच मुदतीच्या आत भूखंडापोटी भरावयाची रक्कम भरली नाही. तक्रारकर्तीला यापूर्वीच आममुखत्यारपञ, कब्जापञ करुन देण्यास विरुध्दपक्ष तयार होती, परंतु तक्रारकर्तीने त्याला शाश्वती दिली नाही. तक्रारकर्ती ही निव्वळ विरुध्दपक्षाला ञास देण्याकरीता सदारची खोटी तक्रार दाखल केलेली आहे. करीता सदरची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
5. तक्रारकर्तीने सदरच्या तक्रारी बरोबर 1 ते 7 प्रमाणे दस्ताऐवज दाखल केले असून त्यात प्रामुख्याने आममुखत्यारपञ, इसारपञ, किस्तीचे कार्ड व तक्रारीकर्तीने विरुध्दपक्षाकडे भरलेल्या भूखंडापोटी पैशाच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत.
6. सदर प्रकरणात दोनही पक्षाचा मंचा समक्ष तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन खालील निष्कर्ष निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ती ही विरुध्दपक्षाची ग्राहक होते काय ? : होय.
2) विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यांप्रती अनुचित व्यापार प्रथेचा : होय.
अवलंब केला आहे काय ?
3) विरुध्दपक्षाकडून दोषपूर्ण सेवा झाली आहे काय ? : होय.
- निष्कर्ष –
7. सदरच्या प्रकरणात तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडून त्यांनी टाकलेल्या ले-आऊट मधील भूखंडाच्या खरेदी विक्री व्यवहार बाबतचे आहे. सदरचे प्रकरणातील दाखल दस्ताऐवजांचे अवलोकन केले असता, विरुध्दपक्ष यांनी टाकलेल्या ले-आऊट मधील भूखंडाचे विकसीत करुन, गैरकृषि करुन व त्याचप्रमाणे वादीत भूखंडाचे विक्रीपञ विक्रीपञ तक्रारकर्तीला करारनाम्याच्या मुदतीचे आत विक्रीपञ करुन देणे आवश्यक होते. परंतु, विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला मुदतीच्या आत भूखंड विकासीत करुन, गैरकृषि करुन व विक्रीपञ करुन दिले नाही, त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस दोषपूर्ण सेवा दिलेली आहे असे दिसून येते. तसेच, तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष यांची ग्राहक या संज्ञेत मोडते. त्यामुळे सदरच्या भूखंडाचे विक्रीपञ करुन घेण्यास व विकासीत करुन घेण्यास तक्रारकर्ती पाञ आहे, असे मंचास वाटते.
8. उपरोक्त दोन्ही प्रकरणांमधील संक्षिप्त विवरण व तक्रारकर्त्यांनी विरुध्दपक्षांकडे भूखंडापोटी खालील प्रमाणे रक्कम जमा केली आहे.
अ.क्र. | तक्रार क्रमांक | तक्रारकर्त्यांचे नांव | भूखंडाचे क्षेञफळ (चौ.फुट) | भूखंड नंबर | करारनामा दिनांक | भूखंडाची एकूण किंमत (रुपये) | विरुध्दपक्षांकडे भूखंडापोटी जमा केलेली रक्कम (रुपये) |
1. | CC/14/149 | सौ.ज्योती शेंडे | 1851.15 | 54 | 05/04/08 | 64,790/- | 64,804/- |
2. | CC/14/150 | श्रीमती रजनी नागोसे | 1614 | 31 | 19/03/08 | 53,262/ | 53,231/ |
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) विरुध्दपक्षा विरुध्द तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेश करण्यात येते की, तक्रार क्र. CC/14/149 मधील भूखंड क्र.54 एकूण क्षेञफळ 1851.15 चौ.फुट मौजा-बोथली, शेत सर्व्हे नं.73, प.ह.नं.13, तह. उमरेड, जिल्हा – नागपूर येथील भूखंडाचे तक्रारकर्तीकडून उर्वरीत राहिलेली रक्कम घेवून तक्रारकर्तीला भूखंडाचे विक्रीपञ करुन द्यावे.
तसेच, तक्रार क्र. CC/14/150 मधील भूखंड क्र.31 एकूण क्षेञफळ 1614 चौ.फुट मौजा-बोथली, शेत सर्व्हे नं.73, प.ह.नं.13, तह. उमरेड, जिल्हा – नागपूर येथील भूखंडाचे तक्रारकर्तीकडून उर्वरीत राहिलेली रक्कम घेवून तक्रारकर्तीला भूखंडाचे विक्रीपञ करुन द्यावे.
(3) तक्रार क्र. CC/14/149 मधील भूखंडाचे विक्रीपञ होणे शक्य नसल्यास तक्रारकर्तीने भूखंडापोटी जमा रक्कम रुपये 64,804/- दिनांक 18.11.2011 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाप्रमाणे प्रत्यक्ष रक्कम प्राप्त होईपर्यंत विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस द्यावे.
तसेच तक्रार क्र. CC/14/150 मधील भूखंडाचे विक्रीपञ होणे शक्य नसल्यास तक्रारकर्तीने भूखंडापोटी जमा रक्कम रुपये 53,231/- दिनांक 28.10.2009 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजाप्रमाणे प्रत्यक्ष रक्कम प्राप्त होईपर्यंत विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी उपरोक्त प्रकरणातील दोन्ही तक्रारकर्त्यांस झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी प्रत्येकी रुपये 5000/- व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रुपये 3000/- द्यावे.
(5) विरुध्दपक्ष यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(6) सदर आदेशाची प्रत तक्रार क्र. CC/14/149 मध्ये ठेवण्यात येते.
(7) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 05/07/2016