::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
(पारीत दिनांक– 30 डिसेंबर, 2017)
01. तक्रारकर्त्याने ग्राहक मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष बिल्डर विरुध्द इसारपत्रा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून न दिल्याचे आरोपा वरुन ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार संक्षीप्त कथन पुढील प्रमाणे-
यातील विरुध्दपक्ष सुरेश कोंडबाजी बुरेवार हा “गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन एवं लॅन्ड डेव्हलपर्स नागपूर” या फर्मचा प्रोप्रायटर असून तो फर्मचे नावाने नागपूर शहर व आसपासचे भागात निवासी भूखंड विक्रीचा व्यवसाय करतो. विरुध्दपक्ष गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन एवं लॅन्ड डेव्हलपर्स या फर्मचे प्रस्तावित मौजा वडगाव, तालुका सेलू, जिल्हा वर्धा येथील पटवारी हलका क्रं-20, खसरा क्रं-100 ते 120 या ले आऊट योजने मधील भूखंड क्रं-8 तक्रारकर्त्याने विकत घेण्याचे ठरविले व त्या नुसार उभय पक्षां मध्ये दिनांक-02/06/2008 रोजी भूखंडाचे इसारपत्र करण्यात आले. (यापुढे निकालपत्रात करारातील भूखंड म्हणजे- प्रस्तावित मौजा मौजा वडगाव, तालुका सेलू, जिल्हा वर्धा येथील पटवारी हलका क्रं-20, खसरा क्रं-100 ते 120 या ले आऊट योजने मधील भूखंड क्रं-8, एकूण क्षेत्रफळ 13303.12 चौरसफूट, प्रतीचौरसफूट दर रुपये-15.30 पैसे प्रमाणे एकूण किम्मत रुपये-2,03,538/- असे समजण्यात यावे) (भूखंड विक्री करार म्हणजे दिनांक-02/06/2008 रोजी तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष फर्म मध्ये भूखंड विक्री संबधाने झालेले इसारपत्र असे समजण्यात यावे) इसारपत्रा मध्ये भूखंडाची संपूर्ण किम्मत रुपये-2,03,538/- विरुध्दपक्षाला प्राप्त झाल्याचे नमुद करण्यात आले.
तक्रारकर्त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, त्याने त्यानंतर विकासशुल्का पोटी दिनांक-05/06/2010 रोजी रुपये-36,644/- आणि दिनांक-02/05/2011 रोजी रुपये-47,094/- अशा रकमा विरुध्दपक्षा कडे जमा केल्यात व पावत्या प्राप्त केल्यात. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्या कडून वेळोवेळी दिनांक-02/05/2011 पर्यंत भूखंडापोटी एकूण रक्कम रुपये-2,87,276/- प्राप्त केली. त्याने विरुध्दपक्षास भूखंड विक्री करारा प्रमाणे वेळोवेळी भूखंड विक्रीपत्र नोंदवून देण्याची विनंती केली परंतु तक्रार ग्राहक मंचात दाखल करे पर्यंत तक्रारकर्त्याचे नावे करारातील भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून दिले नाही व ताबा सुध्दा दिलेला नाही वा भूखंडा संबधी आवश्यक दस्तऐवज पुरविले नाहीत. विरुध्दपक्षा तर्फे भूखंडाचे विक्रीपत्र होऊ शकत नसल्याने त्याने तक्रारकर्त्याचे नावे दिनांक-03/06/2008 रोजी आममुखत्यारपत्र करुन दिले. त्यानंतर भूखंडाचे विक्री संबधी पाठपुरावा केला परंतु प्रतिसाद न मिळाल्याने विरुध्दपक्षाला दिनांक-19/08/2015 रोजी कायदेशीर नोटीस रजिस्टर पोस्टाने पाठविली परंतु सदर नोटीस लेफ्ट या पोस्टाचे शे-यासह परत आली. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने त्याला दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.
म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे खालील मागण्या केल्यात-
विरुध्दपक्षास करारातील भूखंड क्रं-8 चे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्यचे नावे नोंदवून देऊन प्रत्यक्ष्य मोक्यावर मोजमाप करुन देऊन ताबा देण्याचे आदेशित व्हावे. विरुध्दपक्षास ते सुध्दा शक्य नसल्यास त्याने भूखंडापोटी भरलेली संपूर्ण रक्कम रुपये-2,87,276/- वार्षिक-18% दराने व्याजासह परत करण्याचे आदेशित व्हावे. तसेच झालेल्या आर्थिक त्रासा बद्दल रुपये-15,00,000/- त्याच बरोबर शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-2,00,000/- नुकसान भरपाई आणि नोटीस खर्च रुपये-5000/- विरुध्दपक्षा कडून मिळावा.
03. विरुध्दपक्षा तर्फे लेखी उत्तर ग्राहक मंचा समक्ष सादर करण्यात आले. विरुध्दपक्षाने तो भूखंड व बांधकाम व्यवसायी असल्याची बाब मान्य केली मात्र तक्ररकर्त्याने विरुध्दपक्षा सोबत करारातील भूखंड विकत घेण्याचा सौद्दा करुन भूखंडाची संपूर्ण रक्कम त्याला दिली ही बाब नाकबुल केली. विरुध्दपक्षा तर्फे भूखंडाचे विक्रीपत्र होऊ शकत नसल्याने तक्रारकर्त्याचे नावे दिनांक-03/06/2008 रोजी आममुखत्यारपत्र करुन दिल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे त्याने विरुध्दपक्षाशी करारातील भूखंड क्रं-8 चा व्यवहार व त्यापोटी केलेले इसारापत्र नामंजूर केले, ते इसारपत्र विरुध्दपक्षाकडे कार्यरत असलेल्या एजंटच्या माध्यमाने तक्रारकर्त्याने तयार केलेले असून ते खोटे आहे. विरुध्दपक्षाचे कार्यालयात विजया बेन्द्रे, अभय जोशी, निमा भोयर, प्रकाश खन्ना, रोशन आणि गजानन असे कितीतरी एजंट कार्यरत होते व त्यांना विरुध्दपक्षाचे निरनिराळया मालमत्तेची संपूर्ण माहिती होती. विरुध्दपक्षाने त्याचे कार्यालयातील एजंटला इसारपत्राचे बुक दिलेले होते, तसेच त्या एजंट जवळ विरुध्दपक्ष कार्यालयाचे शिक्के सुध्दा होते, त्याचाच दुरुपयोग करुन एजंटनी परस्पर इसारपत्र करुन दिलेले आहे, विरुध्दपक्ष संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून पोलीस मध्ये तक्रार केली नव्हती. इसारपत्रा वरील सही विरुध्दपक्षाची नसून ती सही नक्कल सही आहे. तक्रारकर्त्या कडून भूखंडापोटी कोणतीही रक्कम विरुध्दपक्षाने स्विकारलेली नाही. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही काल्पनीक असून ती विरुध्दपक्षाला मान्य नाही, सबब विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याने तक्रारीचे समर्थनार्थ दस्तऐवज यादी नुसार काही दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये विरुध्दपक्ष फर्म तर्फे करुन दिलेले भूखंडाचे इसारपत्र, विरुध्दपक्ष फर्म मध्ये करारातील भूखंडापोटी रकमा भरल्या बाबत पावत्यांच्या प्रती, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला करुन दिलेले आममुखत्यारपत्र, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला पाठविलेली दिनांक-19/08/2015 रोजीची कायदेशीर नोटीस, रजिस्टर पोस्टाच्या पावत्यांच्या प्रती व परत आलेल्या पॉकीटची छायाचित्रे अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. तसेच प्रतीउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केले.
05. विरुध्दपक्षा तर्फे लेखी उत्तरा सोबत लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला.
06. त.क. तर्फे वकील श्री जैन यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
07. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर, तक्रारकर्त्या तर्फे दाखल केलेल्या दस्तऐवजाच्या प्रती यावरुन ग्राहक मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
::निष्कर्ष ::
08. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने विरुध्दपक्षाचे प्रस्तावित ले आऊट मधील करारातील भूखंड क्रं-8 विकत घेण्याचे ठरविले व त्या नुसार उभय पक्षां मध्ये दिनांक-02/06/2008 रोजी भूखंडाचे इसारपत्र करण्यात आले. इसारपत्रा नुसार प्रस्तावित मौजा वडगाव, तालुका सेलू, जिल्हा वर्धा येथील पटवारी हलका क्रं-20, खसरा क्रं-100 ते 120 या ले आऊट योजने मधील भूखंड क्रं-8 तक्रारकर्त्याने विकत घेण्याचे ठरविले व त्या नुसार उभय पक्षां मध्ये दिनांक-02/06/2008 रोजी भूखंडाचे इसारपत्र करण्यात आले. भूखंड क्रं-8 चे एकूण क्षेत्रफळ 13303.12 चौरसफूट असून प्रतीचौरसफूट दर रुपये-15.30 पैसे प्रमाणे एकूण किम्मत रुपये-2,03,538/- एवढी निश्चीत करण्यात आली. इसारपत्रा मध्ये करारा नुसार भूखंडाची संपूर्ण किम्मत रुपये-2,03,538/- विरुध्दपक्षाला प्राप्त झाल्याचे मान्य करण्यात आले.
तक्रारकर्त्याने आपल्या या कथनाचे पुराव्यार्थ इसारपत्राची प्रत दाखल केली. इसारपत्रात करारातील भूखंड क्रं-08 ची संपूर्ण किम्मत रुपये-2,03,538/- मिळाल्याची बाब विरुध्दपक्षा तर्फे मान्य करण्यात आलेली आहे, दाखल इसारपत्राचे प्रती वरुन त्याचे उपरोक्त नमुद कथनास बळकटी प्राप्त होते. या शिवाय तक्रारकर्त्याचे कथना नुसार त्याने त्यानंतर विकासशुल्का पोटी दिनांक-05/06/2010 रोजी रुपये-36,644/- आणि दिनांक-02/05/2011 रोजी रुपये-47,094/- अशा रकमा विरुध्दपक्षा कडे जमा केल्यात व पावत्या प्राप्त केल्यात. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्या कडून वेळोवेळी दिनांक-02/05/2011 पर्यंत भूखंडापोटी विकासशुल्कासह एकूण रक्कम रुपये-2,87,276/- प्राप्त केल्याचे नमुद केले. आपल्या या कथनाचे पुराव्यार्थ तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्म तर्फे निर्गमित पावत्यांच्या प्रती दाखल केल्यात, ज्यावरुन त्याचे या कथनास बळकटी प्राप्त होते.
09. विरुध्दपक्षाचे उत्तरा प्रमाणे तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही काल्पनीक असून ती विरुध्दपक्षाला मान्य नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाशी करारातील भूखंड क्रं-8 चा व्यवहार व त्यापोटी केलेले इसारापत्र नामंजूर केले, ते इसारपत्र विरुध्दपक्षाकडे कार्यरत असलेल्या एजंटच्या माध्यमाने तक्रारकर्त्याने तयार केलेले असून ते खोटे आहे. विरुध्दपक्षाने त्याचे कार्यालयातील एजंटला इसारपत्राचे बुक दिलेले होते, तसेच त्या एजंट जवळ विरुध्दपक्ष कार्यालयाचे शिक्के सुध्दा होते, त्याचाच दुरुपयोग केलेला आहे, विरुध्दपक्ष संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून पोलीस मध्ये तक्रार केली नव्हती. इसारपत्रा वरील सही विरुध्दपक्षाची नसून ती सही नक्कल सही आहे. सबब विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
10. विरुध्दपक्षा तर्फे याच अतिरिक्त ग्राहक मंचा समोर दाखल तक्रार क्रं- CC/15/235 ते CC/15/240, CC/15/261, CC/15/266 सौ.संगीता सुनिलकुमार जैन व इतर तक्रारदार या प्रकरणां मध्ये एक पुरसिस दाखल करुन त्याव्दारे आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांचे तर्फे विरुध्दपक्ष सुरेश कोंडबाजी बुरेवार याचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला असून विरुध्दपक्षाचे मालकीच्या शहराला असलेल्या निरनिराळया जमीनी या गुन्हयात संलग्नित करण्यात आल्यात, त्यामध्ये मौजा रेहाडी येथील खसरा क्रं-132/3 व 132/4 संलग्नित असून त्याच बरोबर मौजा बोरी, घुटी, वारंगा, जुनापाणी, बनवाडी, वेळाहरी, देवळी गुजर, नवरमारी, वरोड, मोहगाव, सालई गोधनी, चिकना, चिमनाझरी, बोरखेडी, घोगली, सोनेगाव, सिंधीविहिरी, झारी, तालुका उमरेड येथील मौजा वडद, ठाणा, धारा, बोथली, पिटीचुहा, डव्हा खापारी, घोटी, फुकेश्वर, सालई, मरमझरी, कच्छीमेठ, म्हसेपठार,तालुका सावनेर येथील मौजा जैतगड या मालमत्तेची खरेदी विक्री, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र, आममुखत्यारपत्र, गहाणखतव्दारे हस्तांतरण करण्यात येऊ नये, या बाबतीत काही आक्षेप असल्यास मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रं-9 नागपूर यांचे न्यायालयात दाद मागावी असे आर्थिक गुन्हे शाखा नागपूर शहर यांचे दिनांक-24 सप्टेंबर, 2016 रोजीचे पत्रात नमुद केलेले आहे. तसेच त्या संबधीचा अहवाल प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रं-09, नागपूर यांचे कडे सादर करण्यात आलेला आहे. त्या संबधाने विरुध्दपक्षाचे वकीलानीं आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी विरुध्दपक्ष सुरेश बुरेवार याला दिलेल्या पत्राच्या प्रती दाखल केल्यात तसेच फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत जाहिर नोटीस, एफआयआरची प्रत, तसेच श्री मोहन नारायणराव घोरपडे, राहणार अमरावती रोड, वाडी, नागपूर यांनी पोलीस स्टेशन गणेशपेठ, नागपूर यांचे कडे विरुध्दपक्ष सुरेश बुरेवार याचे विरुध्द केलेली लेखी तक्रार अशा दस्तऐवजाच्या प्रती सुध्दा दाखल केल्यात.
अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे येथे स्पष्ट करण्यात येते की, कायद्दाव्दारे तक्रारी सोडविण्यासाठी ज्या काही सोयी शासनाने निर्माण केलेल्या आहेत, त्यामध्ये ग्राहक मंचाची निर्मिती ही अतिरिक्त सोय म्हणून निर्माण केलेली आहे, कोणत्या ठिकाणी जाऊन तक्रार करावी हा अधिकार संबधित व्यक्तीस आहे, तक्रारदारांनी विरुध्दपक्षा विरुध्द अतिरिक्त ग्राहक मंच, नागपूर येथे तक्रारी दाखल केलेल्या असल्याने त्या सोडविण्याचे अधिकारक्षेत्र अतिरिक्त ग्राहक मंचास येते, पोलीसांनी नोंदविलेले गुन्हे तसेच सदर तक्रारीं मध्ये दाखल केलेले न्यायप्रविष्ट दस्तऐवज विचारात घेता विरुध्दपक्षाचे मालकीच्या जमीनी गुन्हयात संलग्नित असून त्या संबधीचा अहवाल प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्रं-09, नागपूर यांचे कडे आर्थिक गुन्हे शाखा नागपूर शहर यांनी सादर केलेला आहे आणि या जमीनीच्या विक्रीवर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बंदी घातलेली आहे त्यामुळे आता तक्रारकर्त्याच्या नावे करारातील नमुद मौजा वडगाव, तालुका सेलू, जिल्हा वर्धा येथील पटवारी हलका क्रं-20, खसरा क्रं-100 ते 120 या प्रस्तावित ले आऊट मधील भूखंडाचे विक्रीपत्र विरुध्दपक्षाला नोंदवून देण्याचे आदेश अतिरिक्त ग्राहक मंचास देता येणार नाहीत, त्यामुळे तक्रारकर्ता हा परिशिष्ट अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे त्याने विरुध्दपक्षाला भूखंडापोटी अदा केलेली प्रत्यक्ष्य संपूर्ण रक्कम शेवटची किस्त जमा केल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्के व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे, असे अतिरिक्त मंचाचे मत आहे.
11. तक्रार मुदतीत दाखल आहे या संदर्भात हे ग्राहक मंच पुढील मा.वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयांवर आपली भिस्त ठेवीत आहे-
“Juliet V. Quadros-Versus-Mrs.Malti
Kumar & Ors.” - 2005(2) CPR-1 (NC).
उपरोक्त मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडया मध्ये असे नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करणारा विकासक करारा प्रमाणे भूखंडाचा कब्जा संबधित ग्राहकास देण्यास किंवा त्याने जमा केलेली रक्कम परत करण्यास असमर्थ ठरला तर तक्रार दाखल करण्यास सतत कारण (Continuous cause of action) घडत असते. मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात असेही नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करण्यास विकासक/बांधकाम व्यवसायिक काही प्रयत्न करीत नसेल किंवा त्याठिकाणी कुठलेच बांधकाम होत नसेल तर खरेदीदारास मासिक हप्ते नियमित भरणे अपेक्षित नाही. त्यामुळे असा आक्षेप जर विरुध्दपक्ष घेत असेल तर त्या आक्षेपाचा कुठलाही विचार करण्याची गरज नसते.
12. विरुध्दपक्षाने आपल्या उत्तरात तक्रारकर्त्या सोबत झालेला भूखंड विक्री करार नामंजूर केलेला असून, तो करार विरुध्दपक्षाकडे कार्यरत असलेल्या एजंटच्या माध्यमाने तक्रारकर्त्याने तयार केलेला असून तो खोटा असल्याचे नमुद केले. ग्राहक मंचा तर्फे विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या लेखी उत्तरावरील सहीशी विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला करुन दिलेल्या इसारपत्रावरील सहीशी ताळमेळ घेतला असता दोन्ही सहया या एकमेकांशी जुळतात. तसेच सर्व साधारण व्यवहारा मध्ये एखाद्दा व्यक्तीचे सहीचा दुरुपयोग करुन जर एखाद्दी व्यक्ती आर्थिक धोखाघडी करत असेल तर ज्या व्यक्तीचे सहीचा दुरुपयोग झाला ती व्यक्ती पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करणार नाही असे होऊ शकत नाही, त्यामुळे विरुध्दपक्षाने त्याचे लेखी उत्तरात त्याचे एजंटने कार्यालयीन शिक्क्याचा दुरुपयोग करुन विरुध्दपक्षाची नकल सही मारुन इसारपत्र तक्रारकर्त्याला करुन दिले हा जो बचाव घेतलेला आहे, तो काल्पनीक, बनावट असून तो मान्य होण्या सारखा नाही असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे नावे वादातील भूखंडाचे आममुखत्यारपत्र दिनांक-03/06/2008 रोजी स्टॅम्प पेपरवर नोंदवून दिलेले आहे परंतु ते मुखत्यारपत्र आपल्या उत्तरात नाकारलेले आहे. दाखल मुखत्यारपत्रावर तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष सुरेश कोंडबाजी बुरेवार यांच्या स्वाक्ष-या सुध्दा आहेत, त्यामुळे विरुध्दपक्षाचे बचावात कोणतेही तथ्य अतिरिक्त ग्राहक मंचास दिसून येत नाही.
13. उपरोक्त नमुद प्रकार पाहता यावरुन विरुध्दपक्षाला तक्रारकर्त्याची एक प्रकारे फसवणूक करावयाची होती, असे म्हणणे गैर होणार नाही. या एकाच बाबी वरुन असे म्हणता येईल की, विरुध्दपक्षाचा, तक्रारकर्त्याला करारा प्रमाणे भूखंड विक्री करुन देण्याचा हेतु नव्हता आणि तक्रारकर्त्या कडून रकमा मिळाल्या नंतर त्याला केवळ फसविण्याचा विरुध्दपक्षाचा उद्देश्य दिसून येतो.
14. वरील सर्व कारणास्तव, आम्ही, या निष्कर्षाप्रत आलो आहोत की, विरुध्दपक्षाने केवळ सेवेत त्रृटीच ठेवली नसून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब सुध्दा केलेला आहे. तक्रारकर्त्याने करारा प्रमाणे भूखंडाची संपूर्ण किम्मत दिल्याची बाब विरुध्दपक्षा तर्फे निर्गमित पावत्यांच्या पुराव्यां वरुन सिध्द झालेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने भूखंड आणि विकासशुल्का पोटी विरुध्दपक्ष फर्म मध्ये जमा केलेली एकूण रक्कम रुपये- 2,87,276/- शेवटची किस्त अदा केल्याचा दिनांक-02/05/2011 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेते द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह देण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्षाची राहिल. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-10,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-5000/- विरुध्दपक्षा कडून मिळण्यास तक्रारकर्ता हा पात्र आहे.
15. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही उपरोक्त नमुद तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता शाहिदभाई मोहम्मद नफीस यांची, विरुध्दपक्ष मे.गृहलक्ष्मी कंस्ट्रक्शन एवं लॅन्ड डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर श्री सुरेश कोंडबाजी बुरेवार याचे विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) “विरुध्दपक्षाला” आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्त्याने करारातील भूखंडापोटी विकासशुल्काचे रकमे सह प्रत्यक्ष्य जमा केलेली एकूण रक्कम-2,87,276/- (अक्षरी रुपये दोन लक्ष सत्त्याऐंशी हजार दोनशे श्याहत्तर फक्त) शेवटची किस्त जमा केल्याचा दिनांक-02/05/2011 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह येणारी रक्कम तक्रारकर्त्याला परत करावी.
(3) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला द्दावेत.
(4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.