::: आ दे श :::
( पारित दिनांक : 27/08/2014 )
आदरणीय अध्यक्षा , सौ. एस. एम. ऊंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे :-
अर्जदार संस्थेचे शासनमान्य अपंग निवासी व मुक बधीर निवासी विदयालय, वसंतवाडी, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम येथे आहे व त्यांची स्वत:ची इमारत आहे. संस्थेच्या या शाळेच्या इमारतीस सुरुवातीला बोअरव्दारे पाणी पुरवठा होत असे, परंतु पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तो पुरवठा बंद झाल्यागत आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 - ग्रामपंचायत,वसंतवाडी ने तक्रारकर्त्याचे विनंतीवरुन ता. 23/04/2008 चे सभेत ठराव क्र. 7 पारित करुन, अर्जदाराकडून आवश्यक ती अनामत रक्कम स्विकारुन नळ जोडणी करुन देण्यांत यावी, असे ठरविले होते. अर्जदार हा ग्रामपंचायतीने ठरविल्याप्रमाणे आवश्यक रक्कम भरण्यास तयार असून नळ जोडणी करुन देण्याबाबत ता. 03/03/21012 रोजी अर्ज दिला. त्यावरुन ग्रामपंचायत, वसंतवाडी कडून अर्जदार संस्थेस नळ जोडणी करिता 500/- रुपये अनामत रक्कम भरण्यास सुचविण्यात आले. त्याप्रमाणे अर्जदाराने ती रक्कम ता. 20/03/2012 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 ला विरुध्द पक्ष क्र. 3 मार्फत भरली. त्यानुसार अर्जदारास 1/2 इंचाची नळ जोडणी कायदेशीर रित्या करुन देण्यात आली. त्यानुसार अर्जदाराचे संबंधीत विद्यालयास नियमीत पाणी पुरवठा सुरु झालेला होता व तो चालू होता. परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतुन आलेले राजकीय वैमनस्य व आकसापोटी विरुध्द पक्षाने ता. 15/02/2013 रोजी अर्जदार संस्थेच्या मुख्याध्यापकास नोटीस दिली व त्या नोटीसव्दारे, 24 तासाचे आत अर्जदाराने नळ जोडणी काढून टाकून बंद करावी असे गैरकायदेशीररित्या बजावण्यात आले. अर्जदारास आपली बाजु मांडण्याची कोणतीही संधी न देता विरुध्द पक्षाने मनमानीपणे अर्जदाराची नळ जोडणी ता. 27/02/2013 रोजी खंडीत करुन, पाणी पुरवठा बंद केला. त्यामुळे तक्रारकर्त्यास आर्थिक, मानसिक त्रास सोसावा लागत आहे व त्यास विरुध्द पक्ष हे सर्वस्वी जबाबदार आहेत. करिता तक्रारकर्ता यांनी पुर्ववत नळ जोडणी करुन मिळावी म्हणून खालील प्रार्थनेसह सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केलेली आहे.
तक्रारकर्ते यांची प्रार्थना -
अर्जदाराची नळ जोडणी पुर्ववत करुन, अर्जदारास पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करण्याचा आदेश विरुध्द पक्ष यांना दयावा. पाणी पुरवठा अवैधरित्या बंद केल्यामुळे व पाणी पुरवठयाची इतर सोय करुन घ्यावी लागल्यामुळे झालेले नुकसान रुपये 25,000/- तसेच मानसिक त्रास व बदनामीबदद्ल रुपये 25,000/- अशी एकुण 50,000/- रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. याशिवाय प्रकरण दाखल तारखेपासुन, अर्जदाराची नळ जोडणी पुर्ववत जोडून पाणी पुरवठा सुरु करेपर्यंतच्या काळापर्यंत 500/- रुपये रोज प्रमाणे नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्यात यावा.
तक्रारकर्ते यांनी, सदर तक्रार प्रतिज्ञापत्रावर केली व दस्तऐवज यादी प्रमाणे कागदपत्रे दाखल केलीत.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 चा एकत्रीत लेखी जवाब -
विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी संयुक्त लेखी जवाब दाखल करुन तक्रारकर्त्याचे तक्रारीतील सर्व कथन फेटाळत असे नमुद केले की, भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परीषद, वाशिम तर्फे ग्रामीण नळ पाणी-पुरवठा योजना ग्रामपंचायत, वसंतवाडी करिता व ईतरही ग्रामपंचायती करिता तयार करण्यात आली. ही योजना सन 2010 मध्ये सुरु करण्यात आली व नियमांची पुर्तता केल्यानंतर, या योजने अंतर्गत नळ कनेक्शनव्दारे ग्रामपंचायत, वसंतवाडी चे नागरिकांना पाणी पुरवठा दिल्या जातो व त्याबद्दल नियमाप्रमाणे रक्कमा स्विकारुन त्यांना टाकी पासुनच्या पाईप लाईन पासुन नळ कनेक्शन देऊन पाणी पुरवठा दिला जातो. टाकीमध्ये येणा-या मेन पाईप लाईन वरुन कधीही कोणालाही नळ कनेक्शन देता येत नाही. कुंभी ते अनसिंग रोड वरील पुस नदीचे पात्राजवळील विहीरीवरुन टाकीमध्ये येणा-या पाण्याच्या मेन लाईन वरुन कोणालाही कनेक्शन देता येणार नाही. अर्जदार हे ग्राहक नाहीत. दिनांक 23/04/2008 चे ठरावाबाबत विरुध्द पक्षाचे कथन असे आहे की, फक्त 4 सदस्य, 7 पैकी हजर होते व या ठरावात शासनाचे नियमाची पुर्तता केल्यानंतरचा ऊल्लेख केला आहे. दिनांक 23/04/2008 रोजी जल स्वराज्य भारत निर्माण अंतर्गत वसंतवाडी ग्रामपंचायत मध्ये पाणी-पुरवठा योजना अस्तीत्वात नव्हती. त्यामुळे हा ठराव बेंबळी येथील विहीरीवरुन गावातील टाकीमध्ये येणा-या पाणी संदर्भात आणि गावातील टाकीव्दारे ईतर नागरिकांना ज्या पाईप लाईनव्दारे पाणी पुरवठा होतो त्या पाईप लाईन वरुन नियमांची पुर्तता करुन नळ कनेक्शन देण्याबाबतचा दिसून येतो. दिनांक 25/10/2008 चे कथनाबद्दल विरुध्द पक्षाचे असे म्हणणे की, त्यावर सचिवाने सही केली नाही. दिनांक 02/03/2012 रोजीच्या अर्जाबाबत विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, त्यात असे नमुद आहे की, नियमाप्रमाणे संस्था पाणीपटटी भरण्यास तयार आहे, परंतु आजपावेतो तक्रारकर्त्याने कोणतीही पाणीपटटी भरली नाही. तक्रारकर्त्याने 500/- रुपये अनामत रक्कम भरली ती मेन लाईनवरुन जी टाकीपर्यंत रात्रंदिवस सुरु असते, त्या मेन लाईनवरुन नळ कनेक्शन घेण्याची रक्कम नव्हती. दिनांक 25/10/2008 रोजी श्री. पि.डी.राठोड, शिपाई, ग्रामपंचायत वसंतवाडी यांनी कधीही अर्जदारास नळ जोडणी करुन दिली नाही. तक्रारकर्त्याने नियम धाब्यावर बसवुन गैरकायदेशीर हा पाणी-पुरवठा घेतला होता कारण त्यावेळेस तक्रारकर्त्याचे नातेवाईक या गैरअर्जदार ग्रामपंचायतचे सरपंच होते व दिनांक 23/04/2008 रोजीच्या ठरावाच्या वेळेसही तक्रारकर्त्याचे नातेवाईक सरपंच होते, व त्यावेळी एकूण 7 सदस्य होते त्यापैकी 4 सदस्यांनी हा ठराव मंजूर करुन घेतला व तो ठराव असा होता की, गावातील ईतर नागरीक ज्या नळाचे पाईपलाईन वरुन पाणी घेतात त्याच पाईपलाईन वरुन तक्रारकर्त्यास पाणी-पुरवठा मिळाला कारण त्यावेळी जल स्वराज्य योजना सुरु नव्हती. हया ठरावाच्या वेळी ग्रामसभा झाली नव्हती. 2008 मध्ये ठराव झाला व सन 2012 मध्ये अर्ज केला असे तक्रारीमध्ये नमुद आहे व रक्कमही 2012-13 गट वर्षानंतर भरली. दिनांक 28/12/2012 ते 19/02/2013 च्या कालावधीत अपुरा पाणी-पुरवठयाच्या तक्रारी होत्या, त्याची चौकशी केल्यानंतर असे निदर्शनास आले की, ग्रामपंचायतच्या पाणी-पुरवठा करणा-या मेन पाईपलाईन वर तक्रारकर्त्याने कनेक्शन घेतलेले असल्यामुळे हा पाणी-पुरवठा गावक-यांना अपुरा पडत होता. दिनांक 23/04/2008 च्या ठरावाच्या वेळी वसंतवाडीला पाणी-पुरवठा हा एकांबा येथील बेंबळी गावच्या ग्रामपंचायतीच्या विहीरीवरुन सुरु होता. जल स्वराज्य भारत निर्माण अंतर्गत पाणी-पुरवठा योजना एप्रिल 2010 मध्ये ग्रामपंचायत, वसंतवाडी येथे सुरु करण्यांत आली व या योजने अंतर्गत कुंभी रोडवरील पुस नदीच्या पात्राजवळील विहीरीवरुन पाणी घेणे सुरु झाले व हया मेन पाईप लाईन वरुन सध्याच्या अर्जदाराने नळ कनेक्शन गैरकायदेशीर घेतले होते कारण त्यावेळी सरपंच हे अर्जदाराचे नातेवाईक होते. या मेन लाईन वरुन अर्जदार संस्थेने नळ कनेक्शन घेतल्यामुळे पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला व त्यामुळे गावक-यांना पाणी कमी पडू लागले. तशा त्यांच्या तक्रारी आल्या ( दि. 10/02/2013, 13/02/2013 ) या तक्रारीची दखल गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मंगरुळपीर यांनी घेवून तसे दिनांक 22/02/2013 रोजी विरुध्द पक्षाला पत्र पाठवून ग्रामपंचायत नियमानुसार कार्यवाही करण्याचे सुचित केले. म्हणून दिनांक 26/02/2013 रोजी विरुध्द पक्षाने ठराव घेवून सर्वानुमते ही कार्यवाही केली. दिनांक 26/02/2013 च्या ठरावात असेही नमुद आहे की, अर्जदार संस्था यांना टाकीपासुन नळ कनेक्शन देण्याचे ठरविले, त्यामुळे गावातील पाणी-पुरवठा सुरळीत होईल व अर्जदार संस्थेला देखील पाणी-पुरवठा मिळेल.
विरुध्द पक्ष यांनी जवाब शपथेवर दाखल करुन त्यासोबत साक्षिदारांचे प्रतिज्ञालेख व गावक-यांचा तक्रार अर्ज, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मंगरुळपीर यांचे पत्र व इतर दस्तऐवज दाखल केले.
3) कारणे व निष्कर्ष : -
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचा संयुक्त लेखी जवाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व प्रतिज्ञालेख, तक्रारकर्ते यांचे प्रतिऊत्तर, तक्रारकर्त्याचा लेखी युक्तिवाद व विरुध्द पक्षाचा तोंडी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, वि. मंचाने खालील निष्कर्ष कारणे देऊन पारित केला.
तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, दिनांक 23/04/2008 रोजी विरुध्द पक्ष - ग्रामपंचायत, वसंतवाडी यांनी तक्रारकर्ते यांचे विनंतीवरुन ठराव क्र. 7 पारित करुन,असे ठरविले होते की, तक्रारकर्त्याकडून आवश्यक ती अनामत रक्कम स्विकारुन, त्यांना नळ जोडणी करुन दयावी. त्याप्रमाणे विरुध्द पक्षाने दिनांक 25/10/2008 रोजीग्रामपंचायतचे शिपायास तक्रारकर्त्यास नळ जोडणी करुन देण्याबाबत लेखी निर्देश दिला होता. तक्रारकर्ते यांनी, ग्रामपंचायतीने ठरविल्याप्रमाणे ते आवश्यक रक्कम भरण्यास तयार असून, नळ जोडणी करुन देण्याबाबत दिनांक 03/03/21012 रोजी तसा अर्ज विरुध्द पक्षाकडे दिला होता व दिनांक 20/03/2012 रोजी अनामत रक्कम तक्रारकर्ते यांनी भरली. त्यानंतर विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्यास 1/2 इंचाची नळ जोडणी कायदेशीर रित्या करुन देण्यात आली होती. अशी स्थिती असतांना, नंतर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर उभय पक्षामध्ये जबर राजकीय वैमनस्य निर्माण झाले व त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी दिनांक 15/02/2013 रोजी तक्रारकर्ता संस्थेच्या मुख्याध्यापकास नोटीस देवून त्यात असे नमुद केले की, “ ग्रामपंचायत पाणी-पुरवठा करणारी मेन पाईप लाईन वरुन नळ कनेक्शन घेतले आहे, त्यामुळे गावातील टाकीत पाणी चढत नाही व म्हणून गावात पाण्याची टंचाई भासत आहे व गावात ओरड निर्माण होत आहे, तरी ही नोटीस मिळताच 24 तासाचे आत नळ कनेक्शन बंद करण्यात यावे ”. ही नोटीस गैरकायदेशीर आहे,नैसर्गिक न्यायतत्वानुसार नाही म्हणून तक्रारकर्त्यावर बंधनकारक नाही. विरुध्द पक्ष यांनी दिनांक 27/02/2013 रोजी तक्रारकर्त्यास त्यांची बाजु मांडण्याची संधी न देता, एकतर्फी तक्रारकर्त्याची नळ जोडणी खंडीत केली, हयात निव्वळ राजकीय आकसबुध्दी आहे. तक्रारकर्त्याची पाणी पुरवठा सेवा विरुध्द पक्षाने बंद केल्यामुळे तक्रारकर्त्यास त्रास व दररोज रुपये 500/- प्रमाणे नुकसान होत आहे. त्यामुळे नळ जोडणी पुर्ववत करण्याचा व पाणी पुरवठा सुरु करण्याचा आदेश व्हावा.
तक्रारकर्ते यांच्या या युक्तिवादावर विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर दस्तऐवज दाखल करुन, असा युक्तिवाद केला की, दिनांक 23/04/2008 च्या ठरावाच्या वेळी वसंतवाडी ग्रामपंचायतीला पाणी-पुरवठा हा एकांबा येथील बेंबळी गावच्या ग्रामपंचायतीच्या विहीरीवरुन सुरु होता. जल स्वराज्य भारत निर्माण अंतर्गत पाणी-पुरवठा योजना ही एप्रिल 2010 मध्ये सुरु झाली व या योजने अंतर्गत कुंभी रोडवरील पुस नदीच्या पात्राजवळील विहीरीवरुन पाणी घेणे सुरु झाले व हया मेन पाईप लाईन वरुन तक्रारकर्त्याने नळ कनेक्शन गैरकायदेशीर घेतले होते, कारण त्यावेळी सरपंच हे तक्रारकर्त्याचे नातेवाईक होते. या मेन पाईप लाईन वरुन तक्रारकर्त्याने नळ कनेक्शन घेतल्यामुळे पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला व त्यामुळे पाणी- टंचाईच्या काळात गावक-यांना पाणी कमी पडू लागले, तशा त्यांच्या तक्रारी आल्या. हया तक्रारींची दखल गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मंगरुळपीर यांनी घेवून तसे दिनांक 22/02/2013 रोजी या विरुध्द पक्षाला पत्र पाठवून, ग्रामपंचायत नियमानुसार कार्यवाही करण्याचे सुचित केले. म्हणून दिनांक 26/02/2013 रोजी विरुध्द पक्षाने ठराव घेवून सर्वानुमते ही कार्यवाही केली. दिनांक 26/02/2013 च्या ठरावानुसार विरुध्द पक्षाने, तक्रारकर्ते संस्था यांना टाकीपासुन नळ कनेक्शन देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे गावातील पाणी-पुरवठा सुरळीत सुरु राहील व तक्रारकर्ते यांना देखील पाणी-पुरवठा मिळेल. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी कोणतीही सेवेत न्युनता दाखविलेली नाही.
उभय पक्षांचा हा युक्तिवाद ऐकल्यानंतर, मंचाने उभय पक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रांचे काळजीपुर्वक अवलोकन केले, तेंव्हा असे दिसून आले की, तक्रारकर्त्याच्या मते तक्रारकर्ते यांना विरुध्द पक्षाने दिनांक 23/04/2008 रोजीच्या ठरावानुसार नळ जोडणी करुन दिली. या ठरावाचे अवलोकन केल्यास असे दिसते की, हा ठराव केवळ चार ग्रामपंचायत सदस्यांच्या ऊपस्थितीत पारित झाला होता व त्यामधील ऊपस्थित ग्रामपंचायत, वसंतवाडीचे उप सरपंच / सदस्य श्रीचंद भगवान चव्हाण व विठठल बाबुराव राठोड या दोघांचे प्रतिज्ञापत्र विरुध्द पक्षाने रेकॉर्डवर दाखल केले आहे. त्यानुसार, त्यामधील शपथेवार कथनात असे नमुद आहे की, “ दिनांक 23/04/2008 चा ठराव क्र. 7 पारित होतांना सात सदस्यापैकी फक्त चार सदस्य होते व त्यामध्ये आम्ही दोघेजण ऊपस्थित होतो व हा ठराव तक्रारकर्ते यांना बेंबळी विहीरीवरुन गावातील टाकीमध्ये येणा-या पाण्यासंदर्भात व गावातील टाकीव्दारे ईतर नागरिकांना ज्या पाईप लाईनव्दारे पाणी पुरवठा होतो, त्या पाईप लाईन वरुनच नियमांची पुर्तता करुन, नळ कनेक्शन देण्याबाबतचा होता ”. तसेच विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर श्री. पि.डी.राठोड, ग्रामपंचायत शिपाई यांचा देखील प्रतिज्ञालेख दाखल केला आहे. त्यात असे नमुद आहे की, “तक्रारकर्ते यांच्या कथनाप्रमाणे त्यांनी तक्रारकर्ते यांना कधीही नळ कनेक्शन जोडून दिले नाही”. या दोन्ही कागदपत्रांवरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्ते / संस्थेला विरुध्द पक्षाकडून, तक्रारकर्ते म्हणतात त्याप्रमाणे कायदेशीर नळ जोडणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे विरुध्द पक्षाने दिनांक 15/02/2013 रोजी जी ही नळ जोडणी बंद करण्यात येणारी नोटीस तक्रारकर्ते यांना दिली, त्यात विरुध्द पक्षाने कुठलिही अनुचित प्रथा अवलंबलेली मंचाला दिसून येत नाही. तसेच तक्रारकर्ते यांची पाणी पुरवठा सेवा विरुध्द पक्षाने बंद केल्यामुळे तक्रारकर्त्यास त्रास व नुकसान होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, कारण विरुध्द पक्ष यांनी दिनांक 26/02/2013 च्या ठरावाची जी प्रत रेकॉर्डवर दाखल केली, त्यात असा स्पष्ट ऊल्लेख आहे की, विरुध्द पक्ष हे तक्रारकर्ते यांना पाण्याच्या टाकीपासुन नळ कनेक्शन देणार आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याने हे सिध्द केले नाही की, वैमनस्याचे आकसापोटी व निव्वळ बदहेतूने विरुध्द पक्ष क्र. 2 ने विरुध्द पक्ष क्र. 3 मार्फत विरुध्द पक्ष क्र. 1 करिता दिनांक 15/02/2013 रोजी तक्रारकर्ते / संस्थेच्या मुख्याध्यापकांना नोटीस पाठविली. विरुध्द पक्षाने रेकॉर्डवर गावक-यांच्या तक्रारीबाबत व गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मंगरुळपीर यांनी या तक्रारीवरुन विरुध्द पक्षाला दिलेले आदेश, ही कागदपत्रे दाखल केली आहेत, त्यावरुनही विरुध्द पक्षाने केलेली ही कृती गैरकायदेशीर नाही, असे मंचाचे मत आहे. परंतु विरुध्द पक्ष यांनी दिनांक 26/02/2013 रोजीच्या पारित ठरावानुसार तक्रारकर्ते / संस्थेला नियमानुसार नळ कनेक्शन दयावे व पाणी पुरवठा सुरु करुन दयावा, असे आदेश दिल्यास ते न्यायोचित होईल, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. उभय पक्षाने रेकॉर्डवर दाखल केलेली ईतर दस्तऐवज असे दर्शवितात की, उभय पक्षात एकमेकांविरुध्द निव्वळ आकसबुध्दीपोटी ईतरही वाद आहेत, ज्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध येत नाही.
सबब हे न्यायमंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
1. तक्रारकर्ते यांची ही तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते / संस्थेला त्यांच्या दिनांक 26/02/2013
रोजीच्या पारित ठरावानुसार नळ कनेक्शन देवून, पाणी पुरवठा सुरु
करुन दयावा.
3. नुकसान भरपाईबाबत व न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारित
करण्यात येत नाही.
4. विरुध्द पक्ष यांनी वरील आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून
45 दिवसाचे आत करावे, व तसा पुर्तता अहवाल मंचात दाखल करावा.
5. संबंधीत पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्क दयावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) (सौ.एस.एम.उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.