श्री.पुंडलीक झिपरु ठाकरे. ----- तक्रारदार
उ.वय. सज्ञान, धंदा-पेन्शनर,
रा.मु.पंचाने,पो.मिळसांगवे,
ता.मुक्ताईनगर,जि.जळगांव.
विरुध्द
मा.व्यवस्थापक, ----- विरुध्दपक्ष
शासकीय पाटबंधारे कर्मचारी सहकारी
पतपुरवठा संस्था लि.,धुळे, साक्री रोड,
सिंचन भवनासमोर,धुळे, ता.जि.धुळे.
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.एस.कुलकर्णी.)
(विरुध्दपक्षा तर्फे – स्वतः.)
--------------------------------------------------------------------
निकालपत्र
(1) अध्यक्ष,श्री.डी.डी.मडके – विरुध्दपक्ष यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा देऊन सेवेत त्रृटी केली म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, विरुध्दपक्ष हे नोंदणीकृत पतपुरवठा संस्था असून अर्जदार हे विरुध्दपक्षाचे दि.27-07-1990 पासून सभासद आहेत. अर्जदार हे नोकरदार होते व दि.28-02-2010 रोजी रिटायर्ड झाले आहेत. ते रिटायर्ड होईपावेतो त्यांच्या खात्यावर दि.31-03-2009 पावतो वर्गणीची एकुण रक्कम रु.45,200/- असून शेअर्सची रक्कम रु.15,000/- जमा आहे.
(3) तक्रारदार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचे विरुध्दपक्षाकडील सभासदत्व रद्द झाल्याने त्यांची बाकी असलेली शेअर्स व वर्गणीची रक्कम मंजुर होऊन मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला,वकीला मार्फत नोटिस दिली परंतू विरुध्दपक्ष यांनी कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही अथवा रक्कमही परत दिली नाही व तक्रारदारांची रक्कम रु.60,200/- दि.31-03-2009 पासून बेकायदा अडकवून ठेवली आहे. म्हणुन त्यांना सदर तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे.
(4) तक्रारदार यांनी शेवटी विरुध्दपक्ष यांचेकडून त्यांच्या खात्यावरील रक्कम रु.45,200/- मिळावेत, शेअर्सची जमा असलेली रक्कम रु.15,000/- मिळावेत आणि त्यावर अर्ज दाखल तारखेपासून 18 टक्के व्याज मिळावे, अर्जाचा खर्च व वकील फी चे रु.10,000/- मिळावेत आणि इतर योग्य व न्याय्य हुकुम तक्रारदारांच्या लाभात व्हावेत अशी विनंती केली आहे.
(5) तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयर्थ नि.नं.3 वर शपथपत्र तसेच नि.नं.6 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.नं.6/1 वर तक्रारदाराचे मेंबर पास बुक ची छायांकीत प्रत, नि.नं.6/2 ते 6/5 वर विरुध्दपक्ष यांचेशी केलेल्या पत्रव्यवहाराची छायांकीत प्रत, नि.नं.6/6 वर विरुध्दपक्षास वकीला मार्फत पाठविलेल्या नोटिसीची छायांकीत प्रत दाखल केली आहे.
(6) विरुध्दपक्ष यांनी त्यांचे म्हणणे नि.नं.8 वर दाखल केले असून, त्यात त्यांनी असे कथन केले आहे की, श्री.पुंडलिक झिपरु ठाकरे हे या संस्थेचे सभासद असून ते सेवानिवृत्त झाले आहेत. तरी संस्थेकडे त्यांनी राजीनामा दिला असून तो मंजुर करुन त्यांना टप्या-टप्याने जमा वर्गणीचे पैसे अदा करण्यात येईल. तसेच तक्रारदारास टप्या-टप्याने धनादेश दरमहा देण्यात येईल अशी विनंती केली आहे.
(7) तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्षांचे कथन तसेच पुराव्यासाठी दाखल केलेली कागदपत्रे पाहता आमच्यासमोर विष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना देण्याच्या सेवेत त्रृटी केली आहे काय ? | ः होय |
(ब) तक्रारदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? | ः होय. |
(क) आदेश काय ? | ः अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(8) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी,शासकीय नोकरीत असतांना विरुध्दपक्ष यांचे सभासदत्व स्वीकारले आणि त्यांचे खाते पान नं.152 वर वेळोवेळी वर्गणीची रक्कम जमा केली. तसेच ते शेअर्स धारक असून त्याची रक्कमही विरुध्दपक्ष यांचेकडे जमा आहे आणि ही बाब विरुध्दपक्ष यांनीही आपल्या कैफीयतीत मान्य केली आहे.
(9) तथापि तक्रारदार सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांना पैशांची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी वारंवार विरुध्दपक्ष यांचेकडे, त्यांचे खाते पान नं.152 वर जमा असलेल्या वर्गणीच्या रकमेची आणि शेअर्सच्या रकमेची मागणी केली, त्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला, वकीला मार्फत नोटिस दिली. परंतु त्यास विरुध्दपक्ष यांनी काहीही प्रतिसाद अथवा उत्तर न देता अनधिकाराने तक्रारदाराची रक्कम अडवून ठेवली. ही विरुध्दपक्ष यांची कृती निश्चितच अयोग्य, बेकायदेशीर व अन्यायकारक आहे असे या न्यायमंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(10) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदारांनी विरुध्दपक्ष यांचेकडून त्यांच्या खात्यावरील रक्कम रु.45,200/- मिळावेत, शेअर्सची जमा असलेली रक्कम रु.15,000/- मिळावेत आणि त्यावर अर्ज दाखल तारखेपासून 18 टक्के व्याज मिळावे, अर्जाचा खर्च व वकील फी चे रु.10,000/- मिळावेत आणि इतर योग्य व न्याय्य हुकुम तक्रारदारांच्या लाभात व्हावेत अशी विनंती केली आहे.
(11) तक्रारदार विरुध्दपक्ष यांचेकडील खाते पान नं.152 वर शिल्लक असलेली संपूर्ण रक्कम रु.45,200/- मिळण्यास व त्यावर द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत. तसेच सदर रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक त्रास व अर्जाचा खर्च सहन करावा लागला आहे असे या न्यायमंचाचे मत आहे, त्यामुळे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- आणि तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे या न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
(12) तक्रारदारांनी विरुध्दपक्ष यांचेकडील शेअर्सची रक्कम रु.15,000/- मिळण्याची विनंती केली आहे. परंतु सदर शेअर्सचे निश्चित मुल्य ठरविणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकृत शासकीय लेखापरिक्षका कडून विरुध्दपक्ष पतपेढीचे व त्याअनुषंगाने तक्रारदाराच्या शेअर्सचे निश्चित मुल्यांकन करुन घेणे आवश्यक आहे. सदर शेसर्सचे मुल्यांकन केल्याशिवाय शेअर्सच्या रकमेबाबत आदेश करणे संयुक्तिक होणार नाही,असे आम्हास वाटते.
(13) त्यामुळे अधिकृत शासकीय लेखापरिक्षकामार्फत विरुध्दपक्ष पतपेढीचे व तक्रारदारांच्या शेअर्सचे निश्चित मुल्य ठरविले गेल्यानंतर, तक्रारदार सदर रक्कम विरुध्दपक्ष यांचेकडून मागण्यास पात्र राहतील असेही या न्यायमंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(14) मुद्दा क्र. ‘‘क’’ - उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
(1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) विरुध्दपक्ष यांनी, या आदेशाच्या प्राप्ती पासून पुढील 30 दिवसांचे आत...
(अ) तक्रारदारास मेंबर पास बुक खाते पान नं.152 मध्ये शिल्लक असलेली संपूर्ण रक्कम रु.45,200/- (अक्षरी रु.पंचेचाळीस हजार दोनशे मात्र) दि.31-03-2009 पासून ते संपूर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह द्यावी.
(ब)तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/- (अक्षरी रु.दोन हजार मात्र) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/- (अक्षरी रु.एक हजार मात्र) दयावेत.